अरेंज लव मॅरेज भाग १
"आशू आज घरी लवकर ये बरं का, संध्याकाळी आपल्याला मुलगी बघायला तिच्या घरी जायचं आहे."
आशिष ऑफिसमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला सांगितले.
यावर आशिष म्हणाला," आई तू मला त्यांचा पत्ता पाठवून ठेव, मी डायरेक्ट तिकडे पोहोचेल."
तेवढ्यात आशिषचे बाबा रुम मधून येऊन म्हणाले, "आशू पण वेळेवर पोहोच नाहीतर पाहुण्यांसमोर बॅड इम्प्रेशन पडेल."
आशिष म्हणाला," हो बाबा मी वेळेत येईल, तुम्ही काही काळजी करु नका."
ऑफिस मधून लवकर जायचं असल्याने आशिष त्याची कामे पटपट आवरत होता. आशिष खूप घाईने काम आवरतो आहे हे त्याचा सहकारी कुणालच्या लक्षात आल्याने तो म्हणाला," आशिष आज खूप घाईत दिसत आहेस. ऑफिसमध्ये आल्यापासून तू माझ्याकडे बघून एक शब्द सुद्धा बोलला नाहीस."
आशिष हातातील काम थांबवत म्हणाला," अरे आज ऑफिस मधून लवकर निघायचे आहे, पाहुण्यांकडे वेळेत पोहोचलो नाहीतर बाबांचा ओरडा खावा लागेल आणि मलाही दिलेली वेळ पाळायला आवडते."
कुणाल म्हणाला," पाहुण्यांकडे म्हणजे मुलगी बघायला जाणार आहेस का?"
"हो." आशिषने उत्तर दिले.
कुणाला म्हणाला,"मुलगी काय करते? आणि अजून किती मुली बघणार आहेस? पटकन एखादी फायनल करुन टाकायची. अजून किती घरचे कांदेपोहे खाणारेस देव जाणे."
आशिष म्हणाला," अरे लग्न म्हणजे काय शॉपिंग आहे का? पटकन एखादी फायनल करायला, लग्न हे एकदाच होतं आणि माझं असं म्हणणं आहे की, आयुष्याचा जोडीदार निवडताना घाई न करता जरा निवांतपणे योग्य अशी व्यक्ती शोधायला हवी, नाहीतर आयुष्यभर पस्तावा व्यक्त करण्याची वेळ येईल. मला एका संवेदनशील मुलीसोबत लग्न करायचं आहे, हल्ली दिखाऊगिरीच जास्त झाली आहे. असो तुला माझ्या भावना समजायच्या नाहीत. माझ्या भावना समजून घेणारी आजतरी मला भेटेल अशी आशा आहे."
संध्याकाळी आशिष ऑफिस मधून लवकर निघाला. आईने पाठवलेल्या पत्त्याचं गुगल मॅपवर लोकेशन टाकून तो निघाला. रस्ता नवीन असल्याने आशिष हळुवारपणे बाईक चालवत होता. संध्याकाळची वेळ असल्याने बऱ्यापैकी ट्रॅफिक होती. आशिष मनातल्या मनात म्हणाला," ट्रॅफिक वरुन तर असं वाटतंय की आपल्याला पोहोचायला नक्कीच उशीर होईल, फर्स्ट इम्प्रेशन बॅड पडायला नको पाहिजे पण काय करु ही ट्रॅफिक कमी व्हायचं नावच घेत नाहीये. आता बाबाही ओरडतील."
सिग्नलवर गाडी थांबल्यावर आशिषचं लक्ष पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूकडे गेलं तिथं एक मुलगी एका बाईच्या तोंडावर पाणी शिंपडून उठवण्याचा प्रयत्न करत होती, ती मदतीसाठी लोकांना बोलावत होती पण कोणीच तिच्या जवळ जात नव्हते, जे ते आपल्या रस्त्याने जात होते. सिग्नल सुटल्यावर आशिषने बाईक पुढे नेऊन त्या मुलीजवळ थांबवली व त्याने तिला विचारले," एक्स्क्यूज मी, मी आपली काही मदत करु शकतो का?"
ती मुलगी म्हणाली," हो मी रस्त्याने जाताना बघितलं की ह्या काकू चक्कर येऊन पडल्या होत्या, त्या बेशुद्ध झाल्या आहेत, मी त्यांना शुद्धीत आणण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे पण त्या काहीच रिस्पॉन्स देत नाहीयेत."
आशिष काकूंना शुद्धीत आणण्यासाठी त्या मुलीची काय मदत करेल? हे बघूया पुढील भागात...
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा