अरेंज लव मॅरेज भाग २
आशिष म्हणाला," आपल्याला त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, इथे जवळ एखादं हॉस्पिटल आहे का? मी गुगल वर शोधतो."
ती मुलगी म्हणाली," इथे दहा मिनिटांच्या अंतरावर एक हॉस्पिटल आहे, मी तिथेच जॉब करते, एखादी रिक्षा थांबवता का? मी काकूंना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते, काकूंच्या पर्समध्ये फोन असेल तर त्यावरुन त्यांच्या घरच्यांना संपर्क करा."
आशिषने एक रिक्षा थांबवली,त्यात ती मुलगी त्या बाईला घेऊन बसली व रिक्षा हॉस्पिटलच्या दिशेने गेली. आशिष आपली बाईक घेऊन रिक्षाच्या पाठोपाठ गेला, त्या बाईच्या पर्समधून मोबाईल काढून आशिषने तिच्या मुलाला फोन लावून त्याची आई हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं, तो मुलगा येईपर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये थांबणं योग्य होईल असे आशिषला वाटले. आशिष वेटींग एरियात बसलेला होता, त्याला बघून ती मुलगी त्याच्याजवळ येऊन म्हणाली," काकूंच्या घरच्यांसोबत काही कॉन्टॅक्ट झाला का?"
"हो त्यांचा मुलगा इकडे येतो आहे, त्या कश्या आहेत? शुद्धीवर आल्या का?" आशिषने विचारले
ती मुलगी म्हणाली," अजून त्या शुद्धीवर आल्या नाहीत पण येतील, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ब्लडप्रेशर वाढल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या असतील."
तेवढ्यात त्या मुलीचा फोन वाजला, बहुदा तिच्या घरुन फोन असावा असं आशिषला तिच्या बोलण्यावरुन वाटलं तेव्हा त्याला आठवले की अरे बापरे आई बाबा पाहुण्यांच्या घरी पोहोचले असतील पण आत्ता यावेळी असं निघून जाणंही आपल्याला पटत नाहीये. त्या मुलीने फोन ठेवल्यावर आशिष तिला म्हणाला," तुम्हाला जायचं असेल तर जा, मी त्या काकूंचा मुलगा येईपर्यंत थांबतो."
ती मुलगी म्हणाली," मला थांबायला आवडलं असतं पण घरी पाहुणे आले असल्याने मला जायला लागेल."
आशिष म्हणाला," हो चालेल, तुम्ही जा."
ती मुलगी निघून गेल्यावर आशिषला त्याच्या बाबांचा फोन आला तेव्हा त्याने तो ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेल्या बाईंचा मुलगा पुढील काही वेळातच तिथे पोहोचल्यावर आशिषने त्याची भेट घेऊन त्याला सर्व काही सांगितलं व तो पटकन हॉस्पिटल मधून निघाला.
पाहुण्यांचा पत्ता शोधत शोधत आशिष त्यांच्या घरी पोहोचला,त्याला उशिरा आलेलं बघून बाबा म्हणाले, "हे काय आशू संध्याकाळी ट्रॅफिक असते हे तुला माहीत होतं ना, मग ऑफिस मधून थोडं लवकर निघायचं होतं ना."
यावर ज्या मुलीला बघायला आशिष गेला होता तिचे वडील म्हणाले," असूदेत त्यांना फार उशीर झाला नाहीये, आपल्या कडची ट्रॅफिकच अशी आहे की नेमक्या घाईच्या वेळीच लागते."
आशिष काही न बोलता खाली मान घालून बसला होता. तेवढ्यात एक मुलगी चहाचा ट्रे घेऊन आली, चहाचा कप आशिष जवळ घेऊन आली तेव्हा आशिषने तिच्याकडे बघितले आणि आशिषच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली कारण ही मुलगी तीच होती जी आशिषला काही वेळापूर्वी भेटली होती. आशिषच्या हातात चहाचा कप दिल्यावर ती एका खुर्चीत जाऊन बसली. आशिषच्या आईने तिला काही प्रश्न विचारले, त्यावरुन आशिषला समजले की, त्या मुलीचं नाव कोमल आहे. कोमलने आशिषच्या आईच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मग आशिषचे बाबा म्हणाले," आशू तुला कोमलला काही विचारायचं असेल तर विचारुन घे."
यावर कोमलचे बाबा म्हणाले," ते दोघे आपल्यापुढे बोलायला लाजत असतील, कोमल आशिष रावांना घेऊन तुझ्या रुममध्ये जा आणि तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही निवांत बोलून घ्या."
कोमल आशिषला घेऊन तिच्या रुममध्ये गेली.
रुममध्ये गेल्यावर आशिष व कोमलमध्ये काय बोलणं होतं? ते बघूया पुढील भागात…
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा