अरेंज लव मॅरेज भाग ३(अंतिम)
रुममध्ये गेल्यावर कोमलने आशिषला विचारले, "काकू शुद्धीत आल्या होत्या का?"
आशिष म्हणाला," हो, काकू शुद्धीत आल्या होत्या. त्यांचा मुलगा आल्यावर मी लगेच निघालो, घरी गेल्यावर आता बाबा खूप ओरडतील."
कोमल हसून म्हणाली," नाही ओरडणार, मलाही यायला उशीरच झाला होता."
आशिष म्हणाला,"मला वाटलं होतं की, तुम्ही डॉक्टर असाल."
कोमल म्हणाली," मी हॉस्पिटलमध्ये अकाऊंट डिपार्टमेंटला जॉब करते. एनिवेज आपल्याला वेगळया विषयावर बोलायला पाठवलं आहे."
आशिष म्हणाला," हो ना पण मला काय बोलावं हेच सुचत नाहीये."
कोमल म्हणाली," मग मीच बोलते, हॉस्पिटल मधून निघाल्यावर घरी पोहोचेपर्यंत रिक्षात मी तुमचाच विचार करत होते, इतकेजण रस्त्याने ये जा करत होते पण कोणीच थांबलं नाही, तुम्हाला घाई होती तरी तुम्ही माणुसकीच्या नात्याने थांबलात आणि काहीही संबंध नसताना माझी व त्या काकूंची मदत केलीत. तुमच्या वर्तनातील मला आवडलेली पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या धावपळीत तुमच्या जागी एखादा दुसरा मुलगा असता तर त्याने कशी मदत केली आहे हे माझ्यासमोर दाखवले असते तसेच माझ्यासोबत जास्त बोलण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही साधं माझ्याकडे डोळे भरुन बघितलं सुद्धा नव्हतं की माझं नाव सुद्धा तुम्ही विचारलं नव्हतं. इथे घरी आल्यावर पण तुम्ही कशी एका परक्या स्त्रीची मदत केली हे सांगून मोठेपणा मिरवता आला असता पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. तुम्ही काय करता? तुमचं शिक्षण काय आहे? तुम्ही महिन्याला किती कमावता? यापैकी मला काहीच जाणून घ्यायचं नाहीये कारण हे सर्व माझ्या आई वडिलांनी बघूनच तुम्हाला आमच्या घरी बोलावलं असेल. माझ्यासाठी तुम्ही माणूस म्हणून कसे आहात? हे जास्त महत्त्वाचे आहे आणि ते तुमच्या वर्तनातून तुम्ही दाखवून दिलं आहे. पगार, नोकरी हे सगळं तात्पुरतं आहे, तुमचा स्वभाव, तुमच्यातील माणुसकी हे शेवटपर्यंत राहतं. मला वाटलं नव्हतं की मी स्वतः एखाद्या मुलाला प्रपोज करेल आणि तेही माझ्या घरी.
तुम्ही माझ्याशी लग्न कराल?"
कोमलने प्रपोज केल्यावर आशिष जरा गोंधळलाच. तो म्हणाला," मलाही वाटलं नव्हतं की एखादी मुलगी मला प्रपोज करेल म्हणून. मी आजवर बऱ्याच मुली बघितल्या पण आजचा योगायोग बघा ना तुमच्या घरी येण्याआधीच तुमची व माझी भेट झाली. माझ्याआधी तुम्ही त्या काकूंच्या मदतीला गेला होतात त्यामुळे तुम्ही किती संवेदनशील आहात हे कळून आलंच आणि मला अशाच संवेदनशील मुलीसोबत मला लग्न करायचं होतं. कोमल तुझ्या सोबत लग्न करायला मला आवडेल."
कोमल लाजून म्हणाली," बाहेर जाऊन आपल्या दोघांच्याही आई बाबांना ही गोड बातमी सांगावी लागेल."
आशिष व कोमल रुममधून बाहेर आल्यावर त्यांनी ह्या लग्नासाठी होकार असल्याचे सांगितले. आशिष व कोमल दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते त्यांच्या प्रेमाची कथा रस्त्यावर अचानक भेटल्यापासूनच सुरु झाली होती असं म्हणायला काही हरकत नाही. पुढील दोन महिन्यांत त्यांचे धुमधडाक्यात अरेंज लव मॅरेज पार पडले.
समाप्त.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा