आर्ट इचोल- कलात्मकतेचा समृद्ध मंच

मध्यप्रदेशातील अशा एका स्थळाची संक्षिप्त माहिती जिथे गेल्यावर प्रत्येक आर्टिस्टिक व्यक्ती मंत्रमुग्ध होईल. कलात्मकतेचे स्वातंत्र्य देणाऱ्या या स्थळाविषयी लगेच जाणून घ्या.
भारतात आपण जेवढी भ्रमंती करतो तेवढी जास्त आपल्याला नवनवीन ठिकाणांची माहिती मिळतच जाते; त्यामुळे आज मी अशाच एका ठिकाणाविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे ज्या स्थळाविषयी बरेच भारतीय अनभिज्ञ असले तरी देश-विदेशातील पर्यटक मात्र आवर्जून तिथे भेट देत असतात तर हे ठिकाण म्हणजे आर्ट इचोल. हे भारतातील मध्यप्रदेश या राज्यातील, अलीराजपूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे मात्र समृद्ध सांस्कृतिक वारसा अन् पारंपारिक कला प्रकारांसाठी ते खरे खास ओळखले जाते.

कलेच्या दृष्टीने समृद्ध असलेले हे गाव विशेषत्वाने क्लिष्ट भित्तीचित्रे आणि वेगवेगळ्या कलाकुसरीच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध असून त्या हस्तनिर्मित भित्तीचित्रांनी व कलाकुसरीच्या कलाकृतींनीच गावातील बहुसंख्य घरे आणि देवळांच्या भिंती सुशोभित केल्याचे आढळून येते. आर्ट इचोल गावातील गावकरी पिठोरा/पिथोरा कलाप्रकार, पौराणिक कथा, देव-देवी-देवता यांचे चित्रण करणारी आदिवासी चित्रकलेची पारंपारिक शैली व कौशल्य आजही चिरतरुण ठेवत असल्यामुळे आर्ट इचोल या गावालाच 'पिठोरा/पिथोरा गाव' असेही संबोधित केले जाते.

खरंतर पिठोरा कलावंतांचे हे सबंध गाव पिढ्यानपिढ्या या असंख्य कलाकृतींचे जतन करत असून या कलाप्रकाराचा वारसा नवजात पिढीलाही प्रदान करत असल्याने आर्ट इचोल गावाचे नैसर्गिकरित्या सौंदर्य विशेष खुलले आहे. अशा या गावात आणखी एक अद्वितीय वास्तू आहे जिचे नाव आहे, आर्ट इचोल- अ क्रिएटिव्ह एस्केप. ही एक अशी विलक्षण अन् अनोखी संकल्पना आहे जी कला, संस्कृती आणि ग्रामीण अनुभवांची आपापसांत सांगड घालते. हा एक उपक्रम आहे जो देशविदेशातील कलावंतांना भारतातील मध्यप्रदेश राज्यातील एका छोट्याशा आर्ट इचोल गावातील पारंपारिक कला आणि संस्कृतीत मिसळायला संधी देऊन क्षणात आपलेसे करून घेतो.

आर्ट इचोल- अ क्रिएटिव्ह एस्केप या ठिकाणी नवोदित कलाकारांसाठी कला कार्यशाळा आहे. कुशल कारागिरांकडून पारंपारिक पिथोरा कला, भित्तीचित्रे आणि इतर स्थानिक कला प्रकार शिकण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन नवोदित कलाकारांना बरेच काही शिकायला मिळते. एवढेच नव्हे तर, बहुतांश प्रमाणात विदेशी कलावंत या वास्तूला भेट देत असतात त्यामुळे त्यांना ग्रामीण भारतीय जीवनाचा अनुभव घेता येतो, स्थानिकांशी संवाद साधून गावाचा इतिहास, पौराणिक कथा आणि तेथील प्रचलित चालीरिती जाणून घेण्याचा बहुमान प्राप्त होतो व या देवाणघेवाणीमुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा विदेशातही अप्रत्यक्षरित्या प्रचार-प्रसार होण्याची शक्यता असते.

त्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे झाडे झुडपे असल्याने व शुद्ध हवा वाहत असल्याने मन अगदी प्रफुल्लित होतं. पक्ष्यांचा किलबिलाटही नेहमी ऐकू येत असतो त्यामुळे त्या वातावरणात कलावंत हमखास प्रेरित होतात आणि लेखन, चित्रकला किंवा छायाचित्रण अशा वेगवेगळ्या स्वतःच्या सर्जनशील छंदाला जोपासतात. उदाहरणार्थ एखादा चित्र कलाकार तेथील सौंदर्य त्याच्या कलेतून चित्रात मांडतो, एखादा लेखक एखादी कथा, लेख वा कविता लिहून काढतो अन् छायाचित्रकाराला त्या परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याला कॅमेरात कैद करण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे एक क्रियात्मक अन् कलात्मक स्वातंत्र्य तेथे उपलब्ध आहे.

तसेच तिथे गेल्यावर मुक्कामाचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण निसर्ग आणि कलेने वेढलेल्या या पारंपारिक गावातील घरांमध्ये किंवा पर्यावरणास अनुकूल निवासस्थानांमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. खरं सांगायचं तर कलावंतांना खरी भूक कलेचीच असते पण स्थानिक पदार्थांपासून बनवलेल्या अस्सल, घरगुती जेवणाचा आस्वाद ही घ्यायला काहीच हरकत नाही.

प्रेरणा आणि नवीन तंत्र शोधणारे कलाकार, पारंपारिक, पौराणिक आणि सांस्कृतिक अनुभव शोधत असलेले प्रवासी, शांतताप्रिय व एकांतप्रिय कलाकार अन् ग्रामीण भारत व पारंपारिक कला प्रकारांमध्ये स्वारस्य असलेल्या कोणालाही 'आर्ट इचोल- एक क्रिएटिव्ह एस्केप' हे एक आदर्श गंतव्यस्थान आहे. कलाकारांच्या या क्रियाशील व सर्जनशील जगात पाऊल ठेवल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. या ठिकाणी आढळणाऱ्या जवळपास सर्वच शिल्परचना, कलाकृती आणि आर्टिफॅक्ट्स हे देशविदेशातील कलावंतांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले आहेत परंतु त्या कलाकृतींचे निरखून आकलन केले तरी ते सर्व टाकाऊ वस्तूंपासून बनवले गेल्याची खात्री पटतच नाही.

प्रतिष्ठित, नावाजलेले कलावंत असो वा नवोदित कलाकार या सर्वांसाठी आर्ट इचोल असा एक मंच आहे जिथे सच्चा कलाकार स्वतःच्या कलात्मकतेला ओळखून मनपसंत कलाकृती स्वहस्ते निर्माण करू शकतात अन् कुणी त्यांना निर्बंध सुद्धा लादत नाही म्हणूनच या ठिकाणी जगभरातील कलाकारांच्या नामांकित शिल्परचना, शिल्पाकृती आणि कलाकृती आढळतात. उदाहरण द्यायचे झाले तर तिथे एक वीटभट्टीसारखी एक कलाकृती देखील आढळते जी एका स्वित्झर्लंडच्या कलावंताने वीट निर्माण करणाऱ्या कलाकारांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करण्यासाठी निर्मिली आहे.

त्याचबरोबर एक आर्ट गॅलरी सुद्धा तिथे आहे आणि त्या ठिकाणी सर्व कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले जाते. प्रदर्शनात प्रदर्शित केली जाणारी प्रत्येक कलाकृती आणि कौशल्यपूर्ण वस्तू आपले मन जिंकून घेते. ज्यांना अशा कलाकृतींमध्ये रस आहे, आवड आहे त्यांनी आवर्जून आर्ट इचोलला भेट द्यावी कारण शहरातून बाहेर पडण्याची, तुमची सर्जनशीलता वापरण्याची आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी जोडण्याची तुमच्यासाठी ही एक कलात्मक संधी आहे.

©®
सेजल पुंजे.