Login

असं सासर नको ग बाई... भाग 3 अंतिम

Nanad Baich Sasar
असं सासर नको ग बाई...भाग 3 अंतिम

©® ऋतुजा वैरागडकर

तिच्या ऑफिसवरून पण तिला टोमणे ऐकावे लागायचे.

ऑफिसला इतका वेळ लागतो का? ऑफिसलाच जाते की अजून कुठे फिरायला जाते? कुणाशी काही लफड तर नाही ना? नको ते बोलणं ऐकून सुकन्याला कंटाळा आलेला होता.


आणि सुकन्या निखिलला काही सांगायला गेली की तो तिच्यावर हात उचलायचा.

दिवस कसाही ऑफिसमध्ये निघून जात असे पण संध्याकाळी घरी आल्यानंतर सुकन्याला सगळ्यांची भीती वाटायला लागली. तिच्या मनात हळूहळू स्वतःबद्दल असूया निर्माण व्हायला लागली, ती आता स्वतःलाच दोष द्यायला लागली.

'मीच अशी आहे, माझ्यातच काहीतरी कमी आहे.' नको नको ते विचार येऊ लागले, तिच्यात न्यूनगंड निर्माण व्हायला लागला. हळूहळू सुकन्या तब्येतीने ढासळली.


एक दिवस ती चक्कर येऊन पडली. डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट सांगितलं. तिच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवलं. माहेरी आल्यानंतर सुकन्याने सगळ्यांना सगळं सांगितलं. तिच्यासोबत होणाऱ्या प्रत्येक घटना, प्रत्येकाच बोलणं केलेल्या त्रास, सगळ सांगितल.

सुकन्या बोलत होती आणि सगळे स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होते. सगळ्यांची मन सुन्न झाली होती. कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हते.

पारू सुकन्याला बिलगली, तिला घट्ट मिठी मारली.

"सुकू मला माफ कर ग, मला खरंच माफ कर. माझ्यामुळे.... माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला. तु मला थोडी कल्पना दिली होती पण मी समजावून तुला तुझ्या सासरी पाठवलं. माझी खूप मोठी चूक झाली आणि तू ही सगळा त्रास सहन करत राहिलीस. सुकू नको ग असं सासर त्यापेक्षा तू इथे रहा. निखिलरावांना घटस्फोट दे. काही गरज नाही अशा घरात जायची. असं सासर नको ग सुकू."


"पण पारुल मी अशी एकटीच आयुष्यभर कस जीवन जगेल ."

"हे बघ सुकू याचा विचार आपण नंतर करूया. आधी त्या शैतानाच्या तावडीतून तुला सोडवू देत. आपण उद्याच वकिलांना भेटायला जाऊ. निखिलरावांना घटस्फोटाची नोटीस देऊ. तू आता घरात जाणार नाहीस."


वसुंधरा ताई आणि प्रदीप दोघांनीही तिला जवळ घेतलं.

"मला माफ कर सुकू, मी तुझा मोठा भाऊ असून सुद्धा तुझी काहीच मदत करू शकलो नाही. पण आज सत्य समोर आलय त्यामुळे आता मी तुझ्यासोबत आहे, तू त्या घरात जाणार नाहीस.

सुकन्याने निखिलला घटस्फोटाची नोटीस पाठवली. काही महिन्यानंतर कायदेशीर त्यांच्या घटस्फोट झाला. सुकन्या आता आनंदात माहेरी राहू लागली.