Login

असाही एक रोझ डे

असाही एक रोझ डे

असाही एक रोझ डे
  
      

रोज डे म्हणजे गुलाब दिवस. असे म्हटले की किती सारी सुंदर सुंदर नाजूक गुलाबाची सुंदर फुले डोळ्यासमोर येतात. गुलाबाची बागच दिसते आपल्याला तर! कॉलेजमधे मुला मुलींना तर उधाण आलेले असते. मुलं आपल्या मैत्रीणीसाठी विविध रंगाची गुलाबाची फुले घेऊन जातात. खास करून लाल गुलाब. लाल गुलाब म्हटले की ते प्रेमाच प्रतिक अशीच काहीशी धारणा असते.
          

इतर दिवशी पाच रुपयाला मिळणारे गुलाब आज चक्क वीस ते पन्नास रुपयाला विकल्या जाते. आजच्या दिवशी तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले असते.

         
आज माझ्या बाजुला राहते ती ज्योती. खडूस कुठली, उगाच काहीतरी कारण घेऊन माझ्याशी बोलायला आली आणि सारखं सारखं डोक्याला हात लावत होती. एव्हाणा तिने डोक्यात घातलेले लाल गुलाबाचे सुंदर फुल दिसले. तिच्या केसात नुकतेच फुललेले ताजे टवटवीत लाल फुलं खूप सुंदर दिसत होते. आत्ता मला कळाले की ती सारखी का डोक्याला हात लावत होती? कारण तिला मला ते गुलाबाचे फुल दाखवायचे होते. मी पण मुद्दामच मग तिला विचारले,"काय ग रोझ डे झाला वाटत तुमचा?"
तशी ती लाजतच मला हो बोलली.
"आमच्या अहों नी सकाळीच आणले माझ्यासाठी मार्केट मधे जाऊन. तुला नाही दिले का तुमच्या अहों नी गुलाबाचे फुल? नाही म्हंटल आज रोझ डे आहे ना!"
तिने असे बोलल्यावर लगेच मी ह्यांच्याकडे रागाने एक तिरपा कटाक्ष टाकला आणि ज्योतीला सांगितले,
"मला नाही आवडत अग गुलाबाचे फुल. मला ॲलर्जी आहे त्याच्या वासाची."
तिला काहीतरी थातूरमातूर सांगून कटवली आणि पुन्हा ह्यांच्याकडे डोळे बारीक पाहिले.

कसे बसे तिला घरातून घालवली आणि मनात म्हटले,'ही ज्योती फुलं दाखवायला आली होती की आमच्यात ठिणगी टाकायला? हेच कळत नव्हते. आमची स्वारी लगेच इकडच्या रुम मधून तिकडच्या रुम मधे जाण्यास वळली तेव्हड्यात मी त्यांना आवाज दिला.
"अहो, जरा इकडे येता का?"
माझा कडक आवाज ऐकताच ते कसे बसे माझ्या जवळ भीत भीतच आले. त्यांना वाटले की मी आता ओरडेल त्यांना, पण मी तसे काहीच बोलले नाही. त्यांचा चेहरा तेव्हा बघण्यासारखा झाला होता... अगदी केविलवाणा. मला तर त्यांच्याकडे पाहुन हसूच येत होते.

            मी त्यांना किचन मधे जरा मदतीला बोलावले होते. त्यांना बोलावून जेवणाची सगळी सामग्री टेबलवर ठेवण्यास सांगत होते. सगळी तयारी झालीच होती फक्त सॅलड तेव्हडे कापायचे बाकी होते. मी टोमॅटो, काकडी, बीट चिरायला घेतलेच होते की ह्यांनी मला अडवले आणि बोलले,"तू जा बाहेर हे सगळे जेवणाचे ताट वगैरे घेऊन पुढे, आज मी सॅलड चिरतो."
त्यांच्या तोंडून स्वतः हुन कामासाठी मागणी आली म्हंटल्यावर मी लगेच मागे झाले आणि मनातच बोलले.
"अरे वा! आज काय झाले ह्यांना. नेहेमी मी काही काम सांगितले की चिडतात, पण आज मात्र स्वतःहुन स्वारी काम करत होती."
मी लगेच तिथला किचनमधला सगळा कारभार त्यांना सोपवला आणि पुढे जाऊन टेबल वर ताट वाढू लागले.

पाच मिनिटे झाली दहा मिनिटे झाली तरी हा माणूस काही किचन बाहेर येण्याचे चिन्ह दिसेना म्हणून मी पुन्हा आवाज दिला आणि तो ही कडक शब्दात.
"अहो, होईल का आज सॅलड चिरून?"

"हो आलो आलो, लगेच आलो."
किचन मधुन लगेच उत्तर आले आणि दाणकन ताट खाली पडल्याचा आवाज झाला.

"एक काम धड होत नाही ह्या माणसा कडून, काही ना काही गोंधळ घालून ठेवतात नेहमी."
असे म्हणून मी किचन मध्ये जायला डायनिंग टेबलच्या खुर्ची मधून उठतच होते की हे सॅलडचे ताट घेऊन बाहेर येताना दिसले.

थोड्याच वेळात ह्यांनी सॅलड चिरले आणि पुढे माझ्यासमोर आणून ठेवले. इतके छान चिरले होते त्यांनी टोमॅटो आणि बीटचे गुलाब तयार करून काकडीची पाने तयार केली होती. खुप सुंदर दिसत होते ते सॅलड. ते खाऊ की नको हा प्रश्न पडला होता मला तर!

माझ्यासमोर सॅलडची डिश ठेवून ह्यांनी मला म्हंटले.
"गुलाब दिनाच्या खुप खुप शुभेच्छा मॅडम." असे म्हटले आणि आम्ही दोघे ही गोड हसलो.
"आज मी खरचं विसरलोच होतो तुला गुलाब आणायला; म्हणून हा सगळा खटाटोप."
त्यांनी लगेच आपली बाजू सांभाळून घेत म्हंटले.

आता मला हे कळलेच होते की हे विसरणारच, कारण ह्यांना काही असले आवडत नाही हे रोझ डे आणि चॉकलेट डे. लग्नाच्या आधी ठिक होते, पण लग्नानंतर आमच्यात फक्त रुमाल दे, पाकिट दे, सॉक्स दे, डबा दे, माझं घड्याळ दे... हे असेच होते.

"आता उद्या चॉकलेट डे आहे आणि मला कॅडबरी आणायला विसरू नका." मी जरा दम देउनच सांगितले, म्हणजे लक्षात ठेवून आणतील.

"हो हो माते, उद्या नक्की तुला मोठ्ठी कॅडबरी आणणार. मला माहितीये तुला ड्रायफ्रूटची कॅडबरी आवडते ती, पण आज हे सॅलड खाणार आहे की नुसतेच बघणार आहेस."
त्यांनी माझ्याकडे बघून हसून म्हंटले. खरं तर ते गुलाब ह्यांनी इतके छान केले होते की खावेसेच वाटत नव्हते. ते खा म्हणत होते आणि त्यांनी स्वतःच्या हाताने मला त्या बीटाच्या गुलाबातील एक पाकळी खाऊ घातली आणि मी त्यांना लगेच बोलले.
"असे रोझ तुम्ही माझ्यासाठी रोज रोज बनवाल का?"
हे म्हणताच त्यांनी कपाळावर हात मारून घेतला.

"हो बाई, हे असे गुलाब तुला आज काय रोज रोज कापून खाऊ घालेन."
असे म्हणताच आम्ही दोघेही खो खो खी खी करत हसत जेवण केले. गप्पा मारत, एकमेकांना चिडवत असे करून आमचे जेवण आटोपले.

आता त्याला काय होतंय! कधीतरी असा ही एक रोझ डे साजरा करावा!