चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
असला नवरा नको गं बाई !!
(भाग २)
(भाग २)
'लग्न करून टाका म्हणजे मुलगा सुधारेल.' या एका अंधश्रद्धेमुळे दरवर्षी हजारो मुलींचे आयुष्य उध्वस्त होत असते. अशाच दुर्दैवी मुलींपैकी एक सुनंदा होती. मालतीबाई आणि अशोकराव यांचा वाया गेलेला मुलगा विजय ज्याचं कुठेच स्थळ जमत नव्हतं, म्हणून दूरच्या गावातील दूरच्या नात्यातील एका मुलीला पसंत करून तिच्याशी आपल्या मुलाचं लग्न लावून दिलं.
मालतीबाई आणि अशोकराव यांचा मुलगा विजय हा त्यांचा एकुलता एकच मुलगा होता. त्यांच्या अतिलाडामुळे तो थोडा वाईट मार्गाला लागला. एकुलता एकच मुलगा आहे आणि लाडाचा आहे म्हणून ते त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेले पण त्याचा उलटच परिणाम होऊ लागला. विजय दारू, जुगार, सट्टा आणि बायांच्या नादी लागला होता. त्याला कितीही बोलून तो सुधारत नव्हता. नोकरी तर तो करतच नव्हता म्हणा आई-वडिलांच्या पैशांवर फक्त मजा मारायचा तेव्हा त्यांच्या पाहुण्यातील कोणीतरी सांगितले एकदा त्याच लग्न करून टाका म्हणजे सुधारेल.
लग्न होऊन सहा महिने झाले. लग्न केल्यावर विजयच्या वागण्यावर काडी मात्र ही फरक पडला नाही. उलट त्याचा बेधुंदपणा अजून वाढत गेला. सुनंदा त्याच्यासाठी एक हक्काची मोलकरीण आणि शारीरिक गरजा भागवण्यासाठी कायदेशीर मिळालेला देह होता.
मालतीबाईंना वाटलं होतं लग्न केल्यावर मुलगा सुधारेल पण त्या हे विसरून गेल्या होत्या, की आपण पंचवीस वर्ष जे संस्कार केले. त्या संस्काराने ही आपला मुलगा जर सुधारू शकत नाही, तर ही मुलगी चार दिवसात अशी कोणती जादूची कांडी फिरवणार होती की त्यांचा वाया गेलेला मुलगा सुधारणार होता.
सुनंदाची मात्र कोंडी होत गेली. तिने जे स्वप्न पाहिले होते त्याच्या एकदम उलटच येथे घडत होते. तिचा नवरा कोणत्याही नोकरीलाही नव्हता. बाहेर टवाळक्या करत दिवसभर हिंडायचा. रात्री तर्राट दारू पिऊन घरी यायचा आता तर तो कधीकधी तिला मारझोडेही करायचा.
सासू उलट सुनंदालाच म्हणायची की, "तुला नवरा सांभाळता आला नाही. आधी माझा मुलगा चांगला होता पण तुझ्या येण्याने आणि तुझ्या वागण्याने तो असा वागायला लागलायं."
सुनंदा मनातल्या मनात सासूला म्हणायची" खरंतर असे बोलून म्हातारे तू आपल्या अपराधीपणावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे गं. कुठं फेडशील हे पाप माझं वाटोळं केलंस तू."
सुनंदाच्या संसारातील दिवस एकेक करून काळोखात बुडत जात होते. ज्या घरात तिला मायेचं व सावलीचं स्थान असायला हवं होतं, तेथे तिला केवळ शिव्या, टोमणे, आणि जबाबदारीचं ओझं मिळालं. विजय रोजच्या रोज अधोगतीला जात होता.
दारूच्या नशेत त्याचे वागणे अधिकच विकृत होत होते. घरातील कोणीही तिच्याकडे लक्ष देत नव्हते. तिच्या डोळ्यांसमोर सारे संसाराचे स्वप्न जळून राख झाले पण तेव्हा तिला एक आशेचा किरण दिसला.
सुनंदाला समजले तिला दिवस गेलेत. कमीत कमी येणाऱ्या बाळाच्या चाहूल विजयला बदलण्यास भाग पाडेल असे तिला आतून वाटू लागले.
क्रमशः
संतोष उदमले
संतोष उदमले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा