असे पर्यंटनस्थळ जिथे मी परत जाईन
मला लहानपणापासूनच भटकंतीची आवड. लहाणपणी सुट्टीत आजीकडे, आत्याकडे,मावशीकडे,जायचे. नातेवाईकांना तर भेटायला आवडायचंच , पण फिरण्यातला आनंद काही वेगळाच. कॉलेज ला असताना ट्रेकिंग ला जायचे सहलीला जायचे . मुख्य आनंद भटकंती . लग्नाआधी जेवढी फिरले त्यापेक्षा जास्त लग्ना नंतर हि फिरले आणि चान्स मिळेल तेव्हा फिरायला तयार ! दुग्धशर्करा योग म्हणजे नवरोबाला सुद्धा फिरायची हौस आहे त्यामुळे आमची भटकंतो चालूच असते.
लंडन देखा पॅरिस देखा ... हे गाणं आठवतंय का .अगदी तसच झालाय आमच. आम्ही दोघे आणि माझी मुलगी तिघांनी जर्मनी ,स्वित्झर्लंड, रोम ,इटली,स्कॉटलंड फिरलोय . खर सांगते लंडन सिटी तर अमेझिंग आहे ,थेम्स रिव्हर मधून बोटीने प्रवास करताना मधून ओपन होणारा लंडन ब्रिज पाहताना चा अनुभव शब्दात सांगणं कठीणच आहे . युनाइटेड किंग्डम (UK ) मधील सर्वच लोकेशन नयनरम्य आहेत . पॅरिस मधील आयफेल टॉवर (Eiffel Tower ) खालून वर बघताना त्याची भव्यता डोळ्यात मावत नाही . रोम मधील colosseum हे ancient Roman वास्तवाची आणि भव्यतेची जाणीव करून देते . जगातील सर्वात लहान कंट्री Vatican City मधील ख्रिस्त लोकांचे पोप यांचे तेथील वास्तव्य आणि पवित्रता जाणवते . स्वित्झर्लंड ला गेल्यावर स्वर्ग खाली अवतारलाय असेच वाटते .
मघाशी मी गाण्याची दुसरी ओळ मुद्दामून नाही लिहिली ती म्हणजे . "सारे जग मे कही नहीं है दुसरा हिंदुस्थान ". आपला भारत पण विविधतेने नटलेला आहे सेव्हन वंडर्स मधील एक म्हणजे आग्रा येथील ताजमहाल . तिथे गेल्यावर खरोखरच कळते कि ताजमहाल ला का प्रेमाचे प्रतीक म्हणतात . असे अप्रतिम वास्तुशिल्प कि जे आयुष्यात एकदा तरी नक्की पहावे . तसेच राजस्थान गुजरात,नैनिताल,,कुल्लू ,मनाली ,सिमला ,हैदराबाद हे सर्व याची देही याची डोळा पाहिलंय .जन्म कोकणातला म्हणून कोकण ,गोवा ,महाराष्ट्र पण भटकलेय. त्यामुळेच तर म्हणाले कि विविधतेने नटलेला भारत .
पण अजून मी मूळ मुद्यावर आलेले नाही . माझा मुद्दा आहे "पुणे तिथे काय ऊणे " पुणे जस विद्येचे माहेरघर आहे तसेच पुण्याची अजून एक खासियत आहे ती म्हणजे ऐतिहासिक पुणे . मी ज्या स्थळाच्या प्रेमात आहे ते या ऐतिहासिक पुण्यात आहे .आणि त्या स्थळावर मी लहानपणापासूनच प्रेम करते जरी माझे लहानपण पुण्यातील नसून कोकणातील आहे. हे स्थळ ओळखण्यासाठी एकाच वाक्य पुरेसे आहे ते म्हणजे "गड आला पण सिंह गेला ". करेक्ट एकदम करेक्ट मी सिंहगडा विषयी बोलत आहे . चौथी च्या पुस्तकात एक धडा होता गड आला पण सिंह गेला .अजूनही त्या धड्यातील चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे तानाजी मालुसरे यांनी दरबारात ठसकावून सांगितलेल वाक्य "आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचं ".आणि मग तानाजी मालुसरे “यशवंती” नावाच्या घोरपडीच्या साहाय्याने किल्ला वर चढून जातात .तानाजी मालुसरे यांच्या परक्रमामुळे कोंढाणा किल्यावर स्वराज्याचा झेंडा फडकावला गेला . त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा एक मावळा गमवावा लागला . हा मावळा शत्रूवर सिंहासारखा तुटून पडला तेव्हा हा बालेकिल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला .जेव्हा छ. शिवाजी महाराजांना कळले कि तानाजी मालुसरे यांचे युद्धात प्राण गेले तेव्हा महाराज्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहले आणि त्यांच्या तोंडातून वाक्य निघाले "गड आला पण सिंह गेला ".तेव्हापासून तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ कोंढाणा किल्ल्याचे नाव हे सिंहगड ठेवण्यात आले.
सिंहगड हा पुण्याच्या नैऋत्य दिशेला आहे. समुद्र सपाटीपासुन ४४०० फूट उंच आहे . सिंहगडावर दूरदर्शचा टॉवर उभा केलेला आहे. दोन पायऱ्यासारख्या खंदकामुळे पुण्यातून कुठूनही दिसतो .म्हणजे आपण म्हणू शकतो साक्षात छत्रपती शिवाजी महाराज अख्या पुण्यावर लक्ष ठेवून आहेत .पुरंदर ,राजगड ,तोरणा ,लोहगड,,विसापूर आणि तूंग असा हा एवढा मोठा परिसर सिंहगडावरून दिसतो. स्वराज्याच्या द्रुष्टीने महत्वाचा होता. त्याकाळी सिंहगड आदिलशहा च्या ताब्यात होता म्हणजेच मुघलांकडे होता . शिवाजी महाराजांची राजधानी राजगड हि होती आणि स्वराज्याच्या राजधानी जवळ मुघलांचा अड्डा या सिंहगडावर असणे फार धोकादायक होते . म्हणूनच सिंहगड मराठा साम्राज्यात घेणे हि काळाची गरज होती .वीर तानाजी मालुसरे यांनी त्यांच्या प्राणांची आहुती देऊन हा किल्ला मिळवला .
चौथीच्या धड्यातील हा सिंहगड माझ्या मनात घर करून बसला होता तो पहिल्यांदा पाहण्याचा योग २००१ साली आला PMT च्या बस ने दिवसभराचा पास काढून आम्ही सिंहगडाच्या पायथ्या पर्यंत गेलो तिथून पुढे tracks ने वरती गेलो . घरातून जाताना आम्ही मोठा डबा भरुन पावभाजी करून घेतली होती .गडावर बसून खाल्ली होती. सिंहगडावर पोहचतानाचा प्रवास अजून विसरले नाही. जिथे बसून पावभाजी खाल्ली होती ती जागा सुद्धा अजून लक्षात आहे त्यानंतर सिंहगडावर मी बऱ्याचदा गेले. कधी कॉलेजच्या मित्र मैत्रिणीं बरोबर ,कधी ऑफिसच्या मैत्रिणी ,कधी ट्रिप ,कधी ट्रेक,कधी फॅमिली गेट टुगेदर ,कधी छोटीशी ट्रिप,कधी अचानक ठरलेला स्पॉट ,कधी स्ट्रेस रिलीफ स्पॉट ,कधी रोमॅंटिक स्पॉट ,कधी ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीचा सांत्वनाचा स्पॉट ,अशा अनेक कारणासाठी आणि माझ्या आयुष्यातील असंख्य आणि अनमोल क्षणांचा सोबती आहे .
साधारण २००२ साली टाटा मोटर्स तर्फे सिंहगडावर ट्रेकिंग कॅम्प केला होता .भाऊ टाटा मोटर्स मध्ये असल्याने ह्या कॅम्प मध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले . तेव्हा सिंहगडाच्या पायथ्यापासुन वर चढून गेलो होतो कारण तो एक ट्रेकिंग कॅम्प होता . तेव्हा चढून जाणाऱ्या पहिल्या तीन मध्ये मी एक होते. टाटा मोटर्स तर्फे गडावर ४ -५ दिवस राहण्याची सोय केली होती . रोज नवीन ऍक्टिव्हिटीस करायला शिकायला मिळत होत्या .रॉक क्लाइंबिंग ,रॅपलिंग,रिव्हर क्रॉसिंग पहिल्यांदा केले. तेव्हा सिंहगड खूप जवळुन पाहायला मिळाले .सिंहगडाचे दोन दरवाजे आहेत .एक पुणे दरवाजा एक कल्याण दरवाजा .संपूर्ण गडावर पाणी पुरवठ्यासाठी बांधलेले देव तळे ,लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधीजींची भेट झालेले ठिकाण आणि सर्वात महत्वाचे तानाजी मालुसरे यांचे स्मारक इत्यादी पाहायला मिळाले . साधारणत: २००० वर्षांपूर्वी बांधलेला सिंहगड त्याला फार मोठा इतिहास आहे .अनेक युद्ध त्याने सोसली आहेत .इंग्रज सुद्धा या गडाच्या मोहाला मुकले नाहीत स्वातंत्र्यापूर्वी २/३ वर्षे सिंहगड इंग्रजांच्या अमलाखाली होता. बाकी मी पुणेकरांना सिंहगडाविषयी काय सांगणार !
वर्षातून एकदा प्रत्येक ऋतु मध्ये सिंहगडावर जाऊन यावे असे हे पर्यटन स्थळ आहे . उन्हळ्यात अनेक फॅमिली ट्रिप्स ,स्कूल ट्रिप्स ,ऑफिस ट्रिप्स येत असतात . प्रत्येक पायरी चढताना आपण मावळा बनत असतो आणि एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंहगडाच्या मातीला झालेला आपला स्पर्श मनाला भारावून टाकतो . जाता जाता वाटेत महाराजांचे सेवेकरी आपली सेवा करायला सज्जच असतात आपल्याला माठातील ताक ,दही ,लिंबू सरबत देत असतात .आवळा, चिंच, पेरू, कैऱ्या ,काकड्या असा जंगलचा मावा खायला मिळतो . त्यामुळे सिंहगड उन्हाळ्यात एक उत्तम सहल आणि मनाला रिफ्रेश करून सोडते.
पावसाळ्यात जर सिंहगडावर जाण्याचा योग आला तर नक्की समजा तुम्ही गेल्याजन्मात काहीतरी पुण्य केले होते चोहीकडे हिरवळ ,ओल्या मातीचा सुगंध आणि रिमझिम पडणारा पाऊस . दीर्घ श्वास घेतला तर भरघोस ऑक्सिजन मिळतो जो आपल्या आरोग्याला पण फायदेशीर असतो. नयनरम्य सृष्टी, गरमागरम भजी आणि काचेच्या ग्लासमध्ये वाफाळलेला चहा ... वर्णन ऐकूनच मनाची तृप्ती होते
पुण्याच्या गुलाबी थंडीत सर्वजण ट्रेकर्स बनतात.पहाटे निघून लोकं पायथ्यापाशी पोहचतात आणि ट्रेकिंग सुरु करतात .अगदी सकाळी वाट धुक्यात हरवलेली असते . जस चालायला सुरुवात करतात तसा रस्ता क्लिअर होत जातो .आजूबाजूला झाडांवर धुक्याचे दव पडलेले असते. झोंबणारा गारवा , सूर्याकिरणे आणि आपण यामध्ये लपंडाव चालू असतो.असा हा सोनेरी प्रवास आणि सोनेरी क्षण सिंहगडावर फक्त हिवाळ्यात अनुभवायला मिळतो.सर्वच ऋतूंमध्ये निसर्गाने नटलेला असा हा सिंहगड पुण्यातील एक नंबर वन पर्यटन स्थळ आहे. सिंहगड मला सारखा बोलवत असतो आणि आमंत्रण थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे असल्यासारखे मला वाटते आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य !!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा