असेही एक अनोखे रक्षाबंधन
आज रक्षाबंधन होतं. सकाळी संध्या बाजारात भाजी घेण्यासाठी गेली होती. लोकांची लगबग सुरू होती. बहिणी भावासाठी राख्या निवडत होत्या, दुकानदार मोठ्या आवाजात ऑफर सांगत होते, लहान मुले रंगीबेरंगी फुगे घेऊन फिरत होती.
संध्या मात्र त्या सगळ्यापासून वेगळी, आपल्या विचारात होती. "आपल्याला भाऊ असता तर... आपणही त्याच्यासाठी राखी घेतली असती, निदान बहिण तरी हवी होती." हाच विचार तिच्या मनात सतत घोळत होता. कारण संध्या एकटीच होती, तिला भाऊ बहिण कोणीच नव्हते.
ती विचारात होती तेवढ्यात रस्त्याच्या कडेला तिला एक छोटा मुलगा दिसला. वय जास्तीत जास्त सात-आठ वर्षे. केस विसकटलेले, कपडे जुने आणि धुळीने माखलेले. तो लोकांकडे बघत होता, जणू पोट भरण्यासाठी काही मिळेल का पाहत होता.
संध्याला त्याच्या डोळ्यांतील भूक आणि एकटेपणा लगेच जाणवला. ती पुढे गेली आणि त्याला विचारले.
"काय झालं बाळा? इथे का उभा आहेस?" तिने विचारल्यावर तो मुलगा संकोचत म्हणाला,
"काय झालं बाळा? इथे का उभा आहेस?" तिने विचारल्यावर तो मुलगा संकोचत म्हणाला,
"घर नाही... आई-बाबा नाहीत. दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही. मला खुप भुक लागली आहे म्हणून मी काहीतरी काम शोधायला आलो." तो मुलगा म्हणाला तसं संध्याच्या हृदयात जणू काहीतरी दाटून आलं. तिला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटले.
"चल, तुला आधी पोटभर खाऊ घालते. मग पुढचं पुढं बघू," संध्या हळू आवाजात म्हणाली. पण तो थोडा संकोचला, तरीही तिच्या डोळ्यांतील माया पाहून तो तिच्या मागे गेला.
घरी आल्यावर तिने त्याला हात धुवायला दिलं, गरम पोळी-भाजी आणि गोड शिरा वाढला. मुलगा काही क्षण गप्प बसून खायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधान दिसू लागलं.
जेवण झाल्यावर संध्या विचारू लागली,
"तुझं नाव काय आहे?"
"नाव नाही… लोक मला फक्त ‘अरे’ म्हणून हाक मारतात." तो म्हणाला तसं संध्या थोडी थबकली.
"तुझं नाव काय आहे?"
"नाव नाही… लोक मला फक्त ‘अरे’ म्हणून हाक मारतात." तो म्हणाला तसं संध्या थोडी थबकली.
"हो का मग मी तुला नाव ठेवते – शौर्य." संध्या हसून म्हणाली तसं त्या मुलाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच हलकंसं हसू उमटलं.
आज रक्षाबंधन आहे. हे आठवून संध्याने आपली जुनी लाकडी पेटी उघडली. आत अनेक वर्षांपासून जपून ठेवलेली राखी तिने अलगद बाहेर काढली. ती लहान असताना तिने ती राखी घेतली होती आणि तशीच जपून ठेवली होती. ती घेऊन ती शौर्य जवळ येऊन बसली.
"शौर्य, तुला राखी म्हणजे काय माहीत आहे का?" संध्याने विचारलं. तेव्हा तो डोळे मोठे करून म्हणाला, "नाही."
"राखी म्हणजे असा धागा असतो जो सांगतो – मी तुझं रक्षण करीन, आणि तू माझं." ती म्हणाली तसं शौर्य त्या राखीकडे बघू लागला.
"आजपासून तू माझा भाऊ… आणि मी तुझी बहीण." संध्या म्हणाली आणि तिने ती राखी त्याच्या हातात बांधली.
शौर्य थोडा गोंधळला, पण त्याच्या डोळ्यांत ओलावा दिसला. तसं तिला काळजी वाटली.
"काय झालं शौर्य?" संध्याने विचारलं.
"कोणी मला कधी भाऊ म्हटलंच नाही… पण मी खरंच तुझं रक्षण करेन, ताई." शौर्य म्हणाला.
त्या क्षणी घरात जणू नवीन प्रकाश आला. तो फक्त धागा नव्हता, तर दोन एकाकी मनांना जोडणारा पूल होता.
त्या दिवसानंतर शौर्य तिच्या घरीच राहू लागला. संध्या त्याला शाळेत घालून शिकवू लागली. हळूहळू तो अभ्यासात हुशार होऊ लागला, आणि वसाहतीतील लोकही त्या अनोख्या भावाबहिणीच्या नात्याला मान देऊ लागले.
प्रत्येक रक्षाबंधनाला संध्या आता नवीन राखी विकत घ्यायची, आणि शौर्य तिला छोटसं का होईना पण मनापासून घेतलेलं गिफ्ट द्यायचा – कधी एक पुस्तक, कधी तिच्या केसांसाठी गजरा.
काही वर्षांनी, शौर्य इंजिनिअर होऊन मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. त्या वर्षी रक्षाबंधनाला तो घरी परत आला आणि संध्याने राखी बांधल्यावर तो म्हणाला,
"ताई, आज तुझं रक्षण फक्त धाग्याने नाही… तर माझ्या आयुष्यभराच्या वचनाने करीन. तू माझ्यासाठी जे केलंस, त्याचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही." शौर्य बोलताच संध्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली, आणि त्या क्षणी तिला जाणवलं – कधी कधी नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा हृदयाच्या धाग्यांनी घट्ट बांधली जातात.
समाप्त....
सौ. रोहिणी किसन बांगर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा