असेही एक वचन
श्रेया रोजच्या सारखी बँकेत पोहोचली. आज ती जरा जास्तच उत्साहात होती. तसे पण रजू मावशी येणार असल्या की ती जास्तच खूष असे. त्याला कारणही तसेच होते. त्या आणि त्यांचे पती छोटेसे काम असले तरी दोघेही एकत्र येत असत. दोघेही एकमेकांना साजेसेच होते म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडाच जणू. त्यांना मूलबाळ मात्र नव्हते. रजू मावशी म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व. त्या नेहमी सकाळीच येत असत. त्यांना पाहिल्यावर तिचा दिवस अगदी छान जाई. बराच वेळ झाला तरी मावशी काही आल्या नाहीत. श्रेयाची चलबिचल सुरू झाली कारण त्या एकदम वक्तशीर होत्या. तिच्या मनात आले आपण फोन करून विचारुया की थोडा वेळ थांबू या. काउंटर वर पण जास्त गर्दी नव्हती. शेवटी तिने फोन केलाच,
"हॅलो, रजू मावशी तुम्ही आज बँकेत येणार आहात ना. तुम्ही अगदी वेळेवर येणाऱ्या आला नाहीत म्हणून काळजी वाटली." आणि रजू मावशीकडून तिला जे कळलं त्याने ती एकदम उदास झाली . दोन दिवसांपूर्वी त्यांच्या पतीना सिवियर हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले.
श्रेयाची मावशींशी ओळख ह्याच काउंटरवर झाली होती. प्रथम दर्शनीच श्रेयाला त्या खूप आवडल्या होत्या. नुकतीच त्यांनी साठी ओलांडली होती. दिसायला सुंदर राहणी साधी पण उठावदार. केसांमध्ये नेहमी फुल किंवा गजरा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावर स्मित हास्य. श्रेया ग्राहक सेवा देण्यात खूपच नावाजलेली होती. तिच्या बद्दल कोणाकडूनही काही तक्रार नव्हती. त्यामुळे रजू मावशींशी थोडी ओळख झाल्यावर त्या तिला म्हणाल्या तू मला मॅडम नको म्हणून. मावशी म्हणत जा. श्रेया ही लगेच हो म्हणाली.
नंतर नंतर मावशी बँकेत येताना घरी केलेला एखादा पदार्थ तिच्यासाठी आणू लागल्या. ती कधी काही बोलली तर म्हणत अग तुला दिल्या मुळे मला आनंद मिळतो. तिच्या वाढदिवसाला हमखास छोटी भेटवस्तू देत. मावशी नियमाला धरून वागणाऱ्या. कधी गर्दी असताना श्रेया त्यांना म्हणायची द्या तुमचे काम आधी करते. तर त्या म्हणायच्या नाही ग असू दे. इतर लोक पण त्यांचा वेळ खर्च करून आले आहेत. त्यांचं होवू दे माझा नंबर येईल तेव्हा माझं कर.
अशा हसऱ्या खेळकर रजू मावशींवर काळाने असा घाला घातला . कसं निभावून नेतील त्या सर्व. दोघं नवरा बायको प्रत्येक ठिकाणी एकत्र जात. बँकेत सुद्धा कामाला वेळ लागला तरी दोघे गप्पा मारत बसलेले असत. श्रेया दोन तीन दिवसांनी त्यांना भेटून आली. त्या खूपच खचून गेल्या होत्या.
दोन महिन्यांनंतर रजु मावशी नेहमी सारख्याच सकाळच्या वेळी बँकेत आल्या. श्रेयाने त्यांच्या कडे पाहिलं आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास च बसेना. रजू मावशी अगदी आधी सारख्याच तयार होवून आल्या होत्या. सुंदर साडी, मंगळसूत्र, कुंकू आणि मुख्य म्हणजे केसातील गजरा. सर्व काही तसेच होते. काउंटर वर गर्दी नसल्या मुळे श्रेयाने आपल्या सहकाऱ्याला लक्ष द्यायला सांगून ती त्यांच्या जवळ गेली. जवळ गेल्यावर तिला जाणवले की त्यांनी सारा साजशृंगार पूर्वी सारखाच केला असला तरी त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर एक उदास छटा आहे. मावशी तिला म्हणाल्या,
" मला असं पाहून तुला आश्चर्य वाटलं का." श्रेया चाचरत म्हणाली,
" नाही असं काही नाही. तुम्हाला असं पाहून मला आनंदच झाला." मावशी तिला म्हणाल्या,
"अग ह्यांच्या निधनाने मी पार कोलमडून गेले ग. नातेवाईक दिवस कार्य होई पर्यंत राहिले. नंतर घरात मी एकटीच. मी सर्व करायचे म्हणून करत होते. गबाळ्या सारखी रहात होते. दिवस झाल्यावर पाच सहा दिवसांनी चहा पिता पिता एक कावळा खिडकीत आला आणि काव काव करत माझ्या कडे पाहत राहिला. मला जाणवले की हा काहीतरी सांगू पाहतोय. हे गेल्यावर माझे स्वतः कडे अजिबात लक्ष नव्हतं. मला क्षणात आठवले ते आम्ही एकमेकांना दिलेले वचन. आम्ही ठरवले होते की आपल्या पैकी कोणीही आधी गेले तरी आपण अजिबात आपल्या राहणीमानात फरक करायचा नाही. जसे आपण आता वावरतोय तसेच वावरायचं. असेच चांगले कपडे घालायचे. हातात हात घेवून एकमेकांना वचन दिले. माझ्या मनात आले पण समाज काय म्हणेल. तरीही समाजाचा विचार बाजूला ठेवून मी मनाशी ठरवलं की लोक काहीही बोलले तरी आपण आपल्या वचनाशी प्रामाणिक राहायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी नेहमी सारखी तयार होवून चहा घेत होते तर कावळा आला ना ग खिडकीत. त्या दिवशी तो काव काव न करता फक्त माझ्या कडे पाहत होता. आता रोजच तो कावळा खिडकीत येतो मी त्याला मी जे खाते ते सर्व देते. कधी मुद्दाम ह्यांच्या आवडीचे करून त्याला देते.आणि असं करण्याने मलाही एक आत्मिक समाधान मिळतं."
श्रेया ला वाटले काय हरकत आहे मावशींनी असे राहायला. खरं तर समाजाने हे मान्य करायला हवे की स्त्री विधवा झाली तरी तिने हे असं जीवन जगायला काहीच हरकत नाही. पूर्वीसारखं एकांतवासात का बरं स्वतःला कोंडून घ्याव." श्रेया लगेच मावशींना म्हणाली,
" तुमचं म्हणणं मला पटतंय आणि तुमचं डोंगराएव्हढे दुःख पण मी समजू शकते. पण मावशी तुमचं प्रसन्न स्मित हास्य पण तुमच्या चेहऱ्यावर असू दे. त्याला थोडा वेळ लागला तरी चालेल पण मला तुम्हाला तसेच बघायला जास्त आवडेल." आपण पाहतो की जिवंत पाणी दिलेलं वचन पण लोक तोडतात. मृत व्यक्तीला दिलेलं वचन निभावणाऱ्या मावशी मला खूप श्रेष्ठ वाटल्या. श्रेया ने मनोमन देवाकडे प्रार्थना केली की ह्यांना सदोदित असेच ठेव.
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा