असेही मातृत्व भाग 1 ( मातृत्व )

About Motherhood

"अभिनंदन.. मुलगा झाला."

नर्सने असे सांगताच प्रतिभाचे मन आनंदाने भरून आले.

नऊ महिन्यांची प्रतिक्षा, झालेला त्रास आणि बाळंतपणाच्या वेदना हे सर्व सहन करत आई झाल्याचा आनंद..हा प्रत्येक स्त्रीसाठी काही वेगळाच असतो!
मिळालेल्या मातृत्वाच्या क्षणाचा आनंद तिला आयुष्यभर लक्षात राहतो.
तसाच आनंद प्रतिभालाही झाला होता.एकीकडे या मातृत्वाचा आनंद होता आणि दुसरीकडे ज्याच्यामुळे हे मातृत्व मिळाले त्या व्यक्तीविषयी तिला रागही येत होता.बाळ मोठे झाल्यावर, त्याला समजू लागल्यावर,त्याने आपल्या वडिलांविषयी विचारले तर काय सांगू? या प्रश्नाच्या उत्तरात प्रतिभाला आपला भूतकाळ आठवू लागला.


वडिलांना कमी पगाराची नोकरी होती.घरखर्चाला हातभार म्हणून आई जेवणाचे डबे बनवायची,वाळवणाचे पदार्थ बनवून विकायची.कॉलेजचे शिक्षण करत मीही आईला त्यात मदत करायची.छोटा भाऊही शिक्षण घेत होता.आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती पण खाऊन पिऊन सुखी होतो.

असेच छान दिवस जात होते.

माझी B.A. ची परीक्षा संपली न संपली तोच आमच्या एका नातेवाईकाने माझ्यासाठी स्थळे दाखवायला सुरूवात केली.

"मला अजून लग्न नाही करायचे." मी आईबाबांना सांगितले.

"अगं बघितले म्हणजे लगेच लग्न होते का? आवड-नावड,पसंत-नापसंत या गोष्टी पण असतात ना . सुरुवात तर करूया."

बाबा मला समजावत म्हणाले.

नातेवाईकाने दाखवलेल्या स्थळापैंकी एकदोन स्थळे कोणालाच आवडली नाही.त्यामुळे अजून तरी काही लग्न वगैरे नाही या विचाराने मला आनंदच होत होता.

माझा हा आनंद फार काळ राहिला नाही. एक दोन महिन्यांनी त्या नातेवाईकाने पुन्हा एक स्थळ दाखवले.

मुलगा दिसायला चांगला होता,नोकरी करणारा होता आणि आर्थिक परिस्थिती आमच्यापेक्षा खूप चांगली होती.आम्हांला सर्वांना मुलगा आवडला होता;पण आपली परिस्थिती त्यांच्या तोलामोलाची नाही त्यामुळे कदाचित ते नाकारतील.असे सर्वांना वाटले होते.पण त्यांचा होकार आला आणि आम्हा सर्वांना आनंदाबरोबर थोडे आश्चर्यही वाटले.

पैशांपेक्षा इतर गोष्टींनाही महत्त्व देणारे लोक जगात असतात.

असे आम्हांला वाटले.

दोन्हीकडचा होकार झाला आणि साखरपुडाही झाला.
लग्नाची तारीख पण जवळचीच निघाली.आम्हा दोघांना एकमेकांशी जास्त बोलायला,एकमेकांना समजून घ्यायलाही वेळ मिळाला नाही.लग्नाची तयारी घाईतच करावी लागली.

लग्न छान पार पडले.आमच्या इकडच्या लोकांपेक्षा सासरच्या लोकांनी खूप मजा केली.सासूबाई तर खूप खुश होत्या.
माझ्या माहेरच्या मंडळींना सासरकडची मंडळी आवडली. 'प्रतिभा खूप नशिबवान आहे.चांगले लोक मिळाले.' असे सर्वजण म्हणत होते.हे ऐकून मलाही छान वाटत होते.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all