असेही मातृत्व ( भाग 2 )

About Motherhood

सासरचे मूळ गाव आमच्या गावाकडेच होते ; पण ते सर्व अनेक वर्षांपासून मुंबईला राहत होते.गावाकडे जास्त येणेजाणे नव्हते. लग्नानंतर मीही मुंबईला सासरी आली.
सासरच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे घर वगैरे सर्व छान होते.सासूबाईंनी आमचे खूप छान स्वागत केले.छानसा गृहप्रवेश करून मीही आता त्यांच्या घराची गृहलक्ष्मी झाले. लग्नानंतरची पूजा वगैरे करून माहेरी आली.माझ्याकडून सासरचे कौतुक ऐकून माहेरी सर्वांना बरे वाटले. समाधान वाटले.

"अशीच सुखी-समाधानी रहा,सुखाचा संसार कर." असा आईवडिलांनी दिलेला आशीर्वाद घेऊन माहेरी काही दिवस राहिल्यानंतर मी सासरी आली.सासूबाई माझ्याशी खूप प्रेमाने आणि समजूतदारपणे वागत होत्या.त्यामुळे मला सासूबाईंची भीती न वाटता त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला.हळूहळू मी संसारात रमू लागले.सर्व काही चांगले मिळाले म्हणून मी देवाचे आभार मानले.
सर्व काही छान सुरळीत सुरू होते.पण माझ्या मनात थोडी काळजी सुरू झाली होती.लग्न होऊन 4,5 महिने झाले होते आणि हे आजारी पडले.सर्दी, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.डॉक्टरांना दाखवले.औषधोपचाराने थोडे बरे वाटू लागले.मला वाटले सर्दी,खोकला वगैरे होत राहतो. त्यामुळे एवढे मनावर घेतले नाही. पण काही दिवस बरे वाटले की पुन्हा त्रास सुरू व्हायचा.त्यामुळे मला चिंता वाटू लागली होती.

"चांगल्या डॉक्टरांना दाखवा.योग्य उपचार घ्या."
मी यांना सांगू लागली.

"अगं, चांगल्या डॉक्टरांना दाखवतो आहे आणि उपचार पण बरोबर आहे. काही काळजी करण्यासारखे नाही. तू नको जास्त काळजी करू."

सासूबाई मला म्हणू लागल्या.

यांच्या आजारीपणामुळे मी थोडी चिंतेत होती आणि त्यात मला मातृत्वाची चाहूल लागली.मनाला आनंद तर झालाच होता.आनंदाची बातमी घरात सांगितल्यावर सर्वांना खूप आनंद झाला होता.सासूबाई तर खूपचं खूश! त्या माझ्यासाठी माझ्या आवडीचे पदार्थ करू लागल्या.आनंदाची बातमी ऐकून यांनाही आनंद झाला होता; पण त्यांच्या चेहऱ्यावर मला काळजीची भावनाही दिसून येत होती.

औषधांमुळे यांना बरे वाटू लागले होते त्यामुळे माझ्या मनातील चिंता थोडी कमी झाली होती.बाळंतपणासाठी मी माहेरी जायला निघाली तेव्हा सासूबाईंनी अनेक सूचना दिल्या.यांनीही 'काळजी घे स्वतः ची आणि बाळाची.' असे सांगितले. हे सांगत असताना त्यांना अजून काही सांगायचे आहे. असे त्यांच्या चेहऱ्यावरून मला जाणवत होते.
'अजून काही सांगायचे आहे का?'
मी असे विचारल्यावर,

'काही नाही.'

एवढेच म्हणून मला निरोप दिला.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all