असेही मातृत्व ( भाग 3 )

About Motherhood

माहेरी आल्यावर माझी काळजी घ्यायला सर्वजण होते.आई वेगवेगळे पदार्थ बनवून माझे डोहाळे पुरवू लागली. माहेरी मी खूप खूश होती.सर्वांच्या प्रेमाने मी भारावून जात होती. सासरहूनही फोन येत होते.काळजी ,सूचना असायच्या.यांच्या तब्येतीची मी नेहमी विचारपूस करायची.'इकडचे काही टेंशन घेऊ नकोस.तू फक्त तुझी व बाळाची काळजी घे.' असेच मला सांगितले जायचे.सर्व काही चांगले होईल असा देवावर विश्वास ठेवून मी आनंदी राहत होती.
नऊ महिने पूर्ण झाले होते. डॉक्टरांनी दिलेली डिलेव्हरीची तारीख जवळच होती. आईने घरात तशी तयारीही सुरू केली होती.


"आई, काय झाले गं ? तू का रडते आहेस? बाबांच्याही डोळ्यात पाणी?"

आईच्या रडण्याचा आवाज ऐकून मी आईला विचारले.

"बेटा,मुंबईहून फोन होता.एक वाईट बातमी आहे.जावईबापू आपल्याला सोडून गेले गं..."

बाबांनी रडवेल्या स्वरात मला सांगितले.

ही बातमी ऐकून मला चक्करच आली.आईबाबांनी मला सावरले.

आईबाबांसोबत मी ही मुंबईला जाण्याचा आग्रह धरला.पण माझी अवघड परिस्थिती पाहून आणि डॉक्टरांनीही प्रवास नाही सांगितला होता त्यामुळे आईबाबांनी मला बरोबर नेले नाही. माझ्यासाठी मावशीला बोलावून घेतले.

मी माझे सौभाग्य गमावले होते आणि आमचा बाळ ...ज्याचे जन्माला येण्यापूर्वीच पितृछत्र हरवले होते.

आईबाबा मुंबईहून परतले.

"असे कसे झाले ? काही कळले का?"

मी आईबाबांना विचारले.

"आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे.जावईबापूंना लग्नाच्या अगोदरपासूनच फुफ्फुसाचा आजार होता.त्यांच्या आईची इच्छा होती की, आपल्या मुलाचे लग्न व्हावे, संसार व्हावा. म्हणून त्यांनी मुलाचे लग्न केले.मुलावरील आपल्या प्रेमापोटी,स्वतः च्या इच्छेसाठी त्यांनी आपल्याला अंधारात ठेवले.आपल्याला त्यांच्या आजाराबाबत काही सांगितले नाही म्हणजे ही आपली फसवणूकच झाली ना?त्यांच्या वागण्याबोलण्यातून आपल्याला ते सर्व चांगले वाटले.त्यामुळे आपणही जास्तीची चौकशी, विचारपूस वगैरे काही केले नाही. आपल्यालाही कोणी काही सांगितले नाही. तिथे लोक आपआपसात बोलत होते तेव्हा आम्हांला समजले.त्याच क्षणी तुझ्या सासरच्या लोकांना या सर्व गोष्टीचा जाब विचारावा असे वाटले.पण दुःखाचा प्रसंग पाहून आम्ही शांत राहिलो."

बाबांनी असे सांगताच ..
अगोदरच दुःखी असलेले माझे मन एकदम सुन्न झाले.
खरे काय? खोटे काय? कोणाला दोष द्यावा? सासरच्या लोकांना की आपल्या नशिबाला? सासूबाईंनी आपल्या मातृत्वाचा विचार करून, मुलाच्या सुखाचा विचार करून मुलाचे लग्न केले; पण त्यांनी माझा आणि माझ्या मातृत्वाचा विचार का नाही केला? आपल्या सुखासाठी इतरांना दुःख देण्याचा यांना काय अधिकार? या सर्व गोष्टींचा विचार करताना माझ्या मनात प्रश्न आला ..असेही मातृत्व असू शकते का?

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all