असेही मातृत्व ( भाग 4 )

About Motherhood

आपल्या मुलाच्या सुखासाठी त्यांनी माझ्या आयुष्याचा खेळ केला.बाळाला जन्म देणारी त्याची आई असेल पण वडील नसणार..
असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले.

पोटात दुखायला लागले त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि बाळाला जन्म देवून मी आई झाले.


नर्सने माझ्याजवळ बाळाला आणले आणि मी माझ्या भूतकाळातील विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडले.
बाळाला पाहून आनंदही होत होता.पण तितकेच वाईटही वाटत होते.माझ्या व माझ्या बाळाच्या नशिबात पुढे काय असेल? माझ्या सासूबाईंचे मातृत्व पाहून मला आता माझ्या मातृत्वाची काळजी वाटू लागली.मी पण आपल्या बाळासाठी अशी वागेल का? आपल्या मुलांसाठी आई इतर सर्वांशी लढते पण आपल्या मुलांवरील प्रेमासाठी, आपल्या मातृत्वासाठी आई इतरांना फसवूही शकते का? दुःख देऊ शकते का? हा ही विचार मनात येऊ लागला.
बाळाचे वडील असते आणि सर्व काही चांगले असते तर बाळाच्या आगमनाचे किती कौतुक झाले असते!
दोन्हीकडे आनंदाचा उत्सव असता;पण अशा दुःखद प्रसंगी माझे बाळ जन्माला आले त्यामुळे त्याच्या आगमनाचा आनंदही साजरा करता आला नाही.

पुत्रप्राप्तीचा प्रतिभाला आनंदही होता आणि सासरकडून झालेल्या फसवणुकीचा रागही होता.अशा संमिश्र भावना प्रतिभाच्या मनात येत होत्या.
प्रतिभाला मुलगा झाल्याची आणि तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना व ओळखीतील लोकांना समजली.ते भेटायला येऊ लागले.

'प्रतिभाची फसवणूक झालेली आहे.तिच्यावर अन्याय झालेला आहे.तुम्ही त्यासाठी सासरच्या लोकांवर केस करा.'
काहींनी असे सांगितले तर काहींनी असेही सल्ले दिले..

"सासरचे श्रीमंत आहेत. त्यामुळे पैशाच्या बळावर ते केस जिंकू शकतात. केस करून आपला तर काही फायदा होणार नाही उलट वेळ,पैसा सर्व खर्च होईल. त्यामुळे केस वगैरेच्या भानगडीत पडूच नका."

हे सर्व ऐकून प्रतिभाच्या आईबाबांना तर काय करावे? हेच सूचत नव्हते. त्यांना प्रतिभाची आणि तिच्या बाळाची काळजी वाटत होती.प्रतिभाला मुलगा झाल्याचे तिच्या सासरी कळाले होते पण ते पाहण्यासही आले नाही आणि नंतर काही संबंधही ठेवला नाही.
सासरच्यांनी संबंध ठेवले नाही आणि प्रतिभाच्या माहेरच्यांनीही केस वगैरे न करता,आहे ती सत्य परिस्थिती स्विकारून प्रतिभाला पुढे जगण्यासाठी पाठबळ देण्याचे ठरवले.प्रतिभाचे आईवडील हे तिचे आईवडील म्हणून जबाबदारी पार पाडत होते आणि प्रतिभा आपल्या मुलाची आई म्हणून आपली जबाबदारी पार पाडत होती.
फसवणूक,अन्याय,राग वगैरे या सर्व गोष्टी एकीकडे होत्या. काळानुसार त्या मागेही पडतील पण मिळालेले मातृत्व विसरता येणार नव्हते. बाळाची आई म्हणून त्याची काळजी घेणे प्रतिभाला करावेच लागणार होते आणि ते ती करत होती.

क्रमशः
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all