असेही मातृत्व ( अंतिम भाग )

About Motherhood

कितीही दुःख असले तरी जगावेच लागते.प्रतिभाही जगत होती.
बाळही मोठा होत होता. बाळाचे हसणे,बोलणे पाहून प्रतिभाला छान वाटत होते.बाळासोबत असताना ती दुःख विसरून जायची.
आईवडिलांचा व भावाचा तिला खूप आधार वाटत होता.त्यांच्या पाठिंब्यामुळेच ती दुःखातून सावरत होती.
प्रतिभाचे पुढचे आयुष्य आणि बाळाचे भविष्य याचा विचार करून, नातेवाईकांनी प्रतिभाचे दुसरे लग्न करण्याचा सल्ला तिच्या आईबाबांना दिला.पहिला असा अनुभव आल्यामुळे दुसऱ्या लग्नाचा प्रतिभाने विचारही केला नाही. ती लग्नासाठी तयार नव्हती.
लोकांचा वाईट अनुभव आल्यावर माणसाचे मन साशंक बनत जाते. प्रतिभाच्या आईवडिलांचेही तसेच झाले. पहिल्या वेळेस आपण कोणावर इतका विश्वास ठेवला नसता,खोलात चौकशी केली असती तर कदाचित आज असा दिवस आपल्या आयुष्यात आला नसता. असे त्यांना वाटू लागले.

आपल्याकडून होते तोपर्यंत आपण तिची काळजी घेत आहोत.भाऊही तिची काळजी घेतो. पण त्याचे लग्न झाल्यानंतर परिस्थिती अशीच राहील कशावरून? एखादे चांगले स्थळ मिळाले तर लग्न करून तिच्या हक्काच्या घरी सुखाने राहील. असा एक विचार प्रतिभाचे आईवडील करायचे आणि दुसरे स्थळ चांगले मिळाले तर ठीक ..नाही तर प्रतिभाच्या आयुष्यात पुन्हा दुःख! असा दुसरा विचारही त्यांच्या मनात येत असे.

प्रतिभासाठी जेव्हा स्थळ येऊ लागली. तेव्हा ते सर्व प्रकारे चौकशी करू लागले.

अशी काही स्थळ होती,ते प्रतिभाशी लग्न करायला तयार होते पण मुलाची जबाबदारी घेणार नव्हते.
प्रतिभा तर मुलाला सोडून राहू शकत नव्हती. तिला स्वतः पेक्षा मुलाची जास्त काळजी होती. त्यामुळे लग्न झाले नाही तरी चालेल पण मुलाला मी कुठेही सोडणार नाही. या मतावर ती ठाम होती.कोणतीही आई स्वतः पेक्षा आपल्या मुलांच्या सुखाचाच जास्त विचार करते.
आपल्या सासूबाईंनीही आपल्या मुलाच्या सुखाचा विचार केला पण त्याचा परिणाम आपण भोगत आहोत. याचे प्रतिभाला वाईट वाटायचे.

प्रतिभाने दुसऱ्या लग्नाचा विचार मनातून काढून टाकला होता. ती नोकरीही करू लागली होती.

अधूनमधून एक दोन स्थळेही येत होती. पुन्हा तेचं चौकशी, विचारपूस, नकार..वगैरे. सुरू होते.

'सर्व कुठे मनासारखं मिळतं, कुठेतरी ऍडजस्ट करावंच लागत.'

लोकांचे टोमणेही ऐकायला येऊ लागले.

टोमणे मारणाऱ्यांचे काय ..ते त्यांचे काम करत असतात. ज्याच्यावर प्रसंग आलेला असतो,ज्याने दुःख सहन केलेले असते..त्यालाच सर्व कळत असते.

यामुळे प्रतिभा व तिचे आईवडील या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते.

एका नातेवाईकाने एका स्थळाबद्दल सूचवले.मुलगा घटस्फोटीत होता. प्रतिभाच्या आईबाबांनी सर्व चौकशी केली. व्यवस्थित वाटले आणि प्रतिभाच्या बाळालाही स्विकारणार होता. त्यामुळे प्रतिभाच्या आईबाबांनी तिला लग्नासाठी समजावले.
खूप विचार केल्यानंतर प्रतिभा लग्नाला तयार झाली.

दुःखाच्या छायेतून बाहेर पडून प्रतिभा आपल्या संसारात सुखी झालेली पाहून तिच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.

समाप्त
नलिनी बहाळकर


सदर कथा ही सत्य घटनेवर आधारित लिहिली आहे.या कथेनिमित्त एवढेच सांगावेसे वाटते,आईवडिलांचे आपल्या मुलांवर प्रेम असते.मुलांच्या सुखासाठी ते प्रयत्नही करत असतात. पण आपल्या मुलांच्या सुखासाठी इतरांना त्रास होईल,दुःख होईल,कोणाची फसवणूक होईल.असेही वागू नये. आपल्या स्वार्थासाठी कोणावर अन्याय होऊ नये.

🎭 Series Post

View all