असेही प्रेम हे (भाग अंतिम)

नंतर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या नशिबात पहिला वहिला मृदगंध परतुन येत नाही. पहिल्या पावसालाच मातीला सुगंधित करण्याचा मान मिळतो.आपलं प्रेमही तसच आहे, क्षणिक सहवासाचं अत्तर ल्यालेलं. ही सहवासाची कुपी उघडी केली तर त्यातला सुगंध उडून जाईल. त्याऐवजी ती कायमस्वरूपी हृदयात जपली तर आयुष्य सुगंधित करेल. आयुष्याच्या शिंपल्यात आठवणींच्या थेंबांनी तयार झालेला प्रेमाचा हा मोती कायम असाच जपून ठेवूयात. कातरवेळी या आठवणींत चिंब भिजत राहूयात. त्या सोनेरी क्षणांना कायम जगत राहूयात. आयुष्याच्या वळणावर अचानकपणे कधी भेटलोच तर या क्षणांचा कित्ता पुन्हा असाच गिरवूया
प्रेम हे ( भाग अंतिम)

© आर्या पाटील

" सध्या काय करतोस ?" तिने विषय बदलत म्हटले.

" एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनियर इंजिनियर आहे." तो अभिमानाने म्हणाला.

" अरे वा ! खूपच प्रगती केलीस." बोलतांना तिलाही अभिमान वाटला.

" याचं श्रेय तुलाही बरं." तो तात्काळ उत्तरला.

" आणि ते कसं ?" ती आश्चर्याने विचारती झाली.

" पेपरच्या दिवशी जेव्हा मित्राने सोपवलेल्या कॉपीच्या गठ्ठयातून अचूकपणे कॉप्या काढत होतो तेव्हा काय म्हणाली होतीस आठवतं का ?" तो केसांवरून हात फिरवत म्हणाला.

" अगदीच. कोणत्या पानावर कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे हे किती अचूकपणे माहित होतं तुला. तुझी तल्लख बुद्धी तेव्हाच हेरली होती मी.
म्हणूनच म्हटले मी तसे." ती उत्तरली.

" मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तेच केले. माझी मलाच नव्याने सापडलेली बुद्धी अभ्यासात तल्लीन केली आणि त्याची परिणिती यशस्वी भविष्यात झाली. परीक्षेच्या काळातच बाबा गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आईला मानसिक धक्का बसला.छोट्या बहिणीला सांभाळत मग मीच मोठा झालो. काही काळासाठी कॉलेज सुटलं.विस्कटलेली आयुष्याची घडी निट बसवतांना मनमुराद जगणं मात्र मागे पडलं." तो बोलता बोलता शांत झाला.

" म्हणजे तुझं अचानक कॉलेज सोडण्याचं कारण हे होतं ? अरे एकदा तरी बोलायचं होतं. मला नाही निदान तुझ्या मित्रांना तरी कल्पना द्यायची होती. शेवटचा पेपर होता. मितभाषी मला त्या दिवशी खूप काही बोलायचे होते.तुझ्या वाटेवर डोळे लावून बसले होते पण." बोलता बोलता ती शांत झाली.

तिच्या त्या शब्दांनी मात्र तो शहारला.
" म्हणजे ?" त्याने कळत असतांनाही न कळणारा प्रश्न केला.
तोच त्याचा फोन वाजला. त्या फोनने तिची मात्र मोठ्या संकटातून सुटका केली.
स्क्रिनवरचे नाव वाचून त्याने तिच्याकडे पाहिले आणि फोन उचलला.

" बोल " म्हणत त्याने संभाषणाला सुरवात केली.
समोरून त्याची बायको बोलत होती.

" थोडा उशीर होईल. तिला फोन दे." म्हणत तो जागेवरून उठला.
फोनवर त्याची लेक रडत असल्याचा तिने अंदाज बांधला.

" वैदेही, बाळा मी येतोय लगेच. तुझे चॉकलेट्स आणलेत आणि डॉलही." त्याने असे म्हणताच समोरून आनंदी स्वरात फोन ठेवला गेला.

" लेकीचं नाव 'वैदेही' ठेवलस ? " बोलतांना तिच्या डोळ्यांत मात्र अश्रू तरळले.

" हो " तो ही हळवा झाला.

" पण का ?" ती त्याच्या दिशेने वळत म्हणाली.

" माझ्या हृदयाजवळचं नाव आहे ते." तो ही तिच्या डोळ्यांत पाहत उत्तरला.

त्याच्या उत्तराने तिने मात्र आपला चेहरा ओंजळीत झाकला.

" वैदेही, तुला वाईट वाटले का ? आय ॲम सॉरी." तो हळवा होत म्हणाला.
चेहऱ्यावरून हात काढत तिने मात्र मानेनेच नकार दिला.

" खूप बरं वाटलं. जुने दिवस आठवले." ती स्मितवदनाने उत्तरली.

" जुन्या आठवणी अजूनही आठवतात तुला." तो ही हसत म्हणाला.

" काही आठवणी जुन्या असो वा नव्या त्या हृदयाच्या कायम जवळ असतात. मनाच्या गाभाऱ्यात नंदादीपाप्रमाणे कायम प्रकाशीत." ती भावनिक होत म्हणाली.

" कातरवेळी मन अजूनही त्या गाभाऱ्यापाशी रेंगाळतं. त्या आठवणींत चिंब न्हाहून निघतं. हसता हसता कधी डोळ्यांतून अश्रू ओघळतात तेच कळत नाही. क्षणभर वास्तवाचा विसर पडतो आणि भूतकाळातच पाऊल अडते. नाव नसलेलं ते नातं आठवून मनाला मात्र शाश्वत आनंद होतो." त्याला गहिवरून आले.

एकमेकांप्रतीच्या भावना आता मात्र पावसाच्या सरींसारख्या बरसू लागल्या.

" एखादं नातं मनापासून स्विकारलं ना, की त्याची ओढ ते नातं कायम जिवंत ठेवते. जरी नाव नसलं तरी या नात्याला भावना आहेत, संवेदना आहेत. खूप कमी वेळात जुळलेलं हे नातं तेवढच घट्ट आहे. मन कातर होतांना त्याला सावरण्याची शक्ती आहे या नात्यात. आपलं कोणीही नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा आपलेपणाची अभिव्यक्ती आहे या नात्यात. अव्यक्त असलं तरी शाश्वत आहे आणि कायमच राहिल." ती स्पष्टपणे म्हणाली.

" अव्यक्त प्रेमाचं नातं." त्यानेही लगेच आपलं मन रितं केलं.

" प्रत्येक वेळी प्रेमाला व्यक्त करण्याची गरज असतेच असे नाही. अव्यक्त प्रेमही मनात नेहमीच जपलेलं राहतं." तिही विश्वासाने म्हणाली.

"अव्यक्त प्रेमाला कशाचीच भीती नसते. अपराधीपणाची भावना नसते. ते मनापासून जपलेलं असतं त्यामुळे तुटण्याची शक्यता नसते.आपलं नातंही तसच आहे." तो आपल्या भावना उलगडत म्हणाला.

" मला वाटलं होतं की हे सगळे माझ्याच मनाचे भास आहेत; पण आज आठवणींच्या पैलतीरावर तुलाही उभं असलेलं पाहिलं आणि आनंद झाला. तारुण्यातील त्या सुखद आठवणींना 'अव्यक्त प्रेमाचं' शीर्षक मिळालं." बोलतांना तिचा स्वर आनंदाने भरला होता.

" मी एकटाच या आठवणींना जगतो आहे हा माझा अंदाजही आज चुकीचा ठरला. तश्या तर या आठवणी नेहमीच माझी ओंजळ मानसिक आनंदाने ओतप्रोत भरतात ; पण आजच्या भेटीने मात्र मनाला तृप्त केले." तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला.

" तुझा नंबर नाही देणार ?" ती बॅगेतून मोबाईल काढत म्हणाली.

" एकमेकांच्या संपर्कात राहून कदाचित प्रेमाच्या या नितळ भावना आपण प्रदूषित करू. आपल्या अव्यक्त प्रेमाला कोणीही दोष दिलेला मला सहन होणार नाही." त्याची भूमिका ऐकून ती मात्र स्तब्ध झाली.

" पहिल्या प्रेमाच्या गोड आठवणी आहेत या, त्यांना संपर्काचं लेबल लावून कटू का करायच्या ?" तो असे बोलताच तिलाही ते योग्य वाटले.

" बरोबर आहे तुझे. प्रीतीचं हे गाव आठवणींच्या रुपातच जिवंत राहिलेलं योग्य ठरेल. मलाही नाही पटणार आपल्या नात्याला अफेयरच्या नावाखाली पायदळी दुडवलेलं." ती खात्रीने म्हणाली.

" नंतर धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या नशिबात पहिला वहिला मृदगंध परतुन येत नाही. पहिल्या पावसालाच मातीला सुगंधित करण्याचा मान मिळतो.आपलं प्रेमही तसच आहे, क्षणिक सहवासाचं अत्तर ल्यालेलं. ही सहवासाची कुपी उघडी केली तर त्यातला सुगंध उडून जाईल. त्याऐवजी ती कायमस्वरूपी हृदयात जपली तर आयुष्य सुगंधित करेल. आयुष्याच्या शिंपल्यात आठवणींच्या थेंबांनी तयार झालेला प्रेमाचा हा मोती कायम असाच जपून ठेवूयात. कातरवेळी या आठवणींत चिंब भिजत राहूयात. त्या सोनेरी क्षणांना कायम जगत राहूयात. आयुष्याच्या वळणावर अचानकपणे कधी भेटलोच तर या क्षणांचा कित्ता पुन्हा असाच गिरवूया." तो खूप सुंदर बोलत होता आणि ती शहाण्या बाळागत त्यांच म्हणणं मन लावून ऐकत होती.

" ठरलं तर मग. प्रेमाच्या आपल्या पर्वाला हृदयाच्या कप्प्यात कायमचं जपून ठेवायचं." ती हात पुढे करत म्हणाली.

" अगदीच ठरलं." म्हणत त्याने तिच्या हातात हात दिला.

आयुष्याच्या त्या वळणावर ते दोन जीव काही वेळापुरते का होईना ; पण नव्याने एकमेकांच्या सहवासात रमले.एकमेकांच्या संपर्कात न राहता, नात्याला कोणतेही नाव न देता, प्रेमाचे हे अव्यक्त नाते कायम जपण्याचे आश्वासन देते झाले. भरदिवसा त्यांच्या नात्याचा चांदवा मनाच्या तलावावर उतरला. त्या शीतल प्रकाशाला अंतरंगात भरत ते आणखी तेजोमय झाले. उठून उभे राहत त्यांनी एकवार एकमेकांकडे पाहिले. नजरेने, नजरेचा, नजरेतून निरोप घेतला. पुन्हा एकदा तिचा हात हातात घेत त्याने निरोपाची तयारी दाखवली. तिनेही मानेनेच होकार देत त्याला दुजोरा दिला. आपआपल्या गाडीजवळ पोहचत दोघांनी हातानेच निघण्याचा इशारा केला.भूतकाळाला वर्तमानाच्या चावीने कुलूपबंद करत, शेवटचे एकमेकांकडे पाहिले आणि आपापल्या मार्गाने निघाले.
सहवासाचा सांजप्रकाश क्षितिजावर सांडून त्यांच्या अव्यक्त प्रेमाचा सूर्य अस्ताला निघाला, उदया पुन्हा आठवणींच्या गर्भातून जन्म घेण्यासाठी.

समाप्त

© आर्या पाटील

🎭 Series Post

View all