#लघुकथास्पर्धा
शीर्षक:- अशी बायको नको!
राधवीचे नुकतेच लग्न झाले होते. दिसायला सुंदर आणि शांत स्वभाव भासवणारी ती आपल्या नवऱ्यासोबत पुण्याला राहायला गेली. तीच्या आई वडिलांना एकटा राहणारा मुलगाच हवा होता. राधवीचा नवरा, दक्ष हा स्वभावाने शांत आणि गरीबीतून वरती आला होता. त्यामुळे गावी राहणारे त्याचे आई-वडील तो कधी सुट्टी असल्यावर घरी येईल ह्याचीच वाट पाहत असायचे.
राधवीने आधी शांत राहून कोण कसे आहे ह्याचे नीट निरीक्षण केले. तिला नोकरी करण्यात रस नव्हता म्हणून तिने लग्ना आधीच नोकरी सोडली होती. नवऱ्यासाठी ती वेळेत नाश्ता आणि डब्बा बनवून द्यायची. असेच दिवस एका मागून एक जात होते.
माणसाचा मूळ स्वभाव कितीही लपवला तरी तो बाहेर येतोच असेच काहीसे तिचे झाले होते. आधी शांत आणि गोड बोलणारी बायको आता सगळीकडे दुर्लक्ष करायला लागली होती.
पहिला सण वटपौर्णिमा आला तर आपल्याला उपवास करायला लागू करू नये म्हणून माहेरी जावून बसली. तिच्या सासूला हे पटले नव्हते तरी उगाच भांडण नको म्हणून गप्प बसली.
श्रावण महिना सुरू झाला आणि पूजा करण्यासाठी त्याला फुले आणायला सांगितली.
"राधवी ही फुले घे आणि त्याचा हार बनव." त्याने सांगितले.
तिने धागा आहे पण सुई नाही असे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्याकडून सर्व फुले घेतली आणि प्रत्येक फुलाला गाठ मारून त्याचा हार बनवला. देव्हाऱ्यातील देव खूप दिवस झाले त्यांची पूजा न केल्याने जळमाटाने काळी पडली होती.
त्याने आधी सर्व स्वच्छता केली व्यवस्थित त्याची आई करते तसे देवांच्या मूर्त्यांना स्नान घालून हळदी आणि कुंकू लावून देव्हाऱ्यात ठेवले. त्याला वाटले की ती मदत करेल पण ती माहेरून आलेल्या फोनवर गप्पा मारण्यात व्यस्त होती.
"हे फुलांचे हार वगैरे बनवायला मला येत नाहीत कारण माझे पप्पा करतात ही कामे." तिने सांगितले.
दिवसभर काम करून थकल्याने त्याने दुर्लक्ष केले. त्याने दूध-साखर ठेवून नीट पूजा केली. त्यादिवसापासून त्याने स्वतःच पूजा करायचे ठरवले.
"हॅलो आई, तू कशी आहेस?" दक्षने आईला गावी फोन केला.
"मी ठीक आहे. बाळा, तू कसा आहेस आणि राधवी कशी आहे?" त्याच्या आईने विचारले.
"ती ठीक आहे. तुम्ही थोडे दिवस इथे राहायला येता का?" त्याने विचारले.
"बाळा, काय झालं? सर्व ठीक आहे ना? अरे आम्हाला दोन महिने तरी शेतीच्या कामामुळे तिथे राहायला यायला जमायचे नाही. दसरा झाला की येतो की." त्याची आई म्हणाली.
"बरं, काही नाही असेच विचारले." तो म्हणाला.
"बाकी तुला कधी राधवी फोन करते का गं ?" त्याने विचारले.
"नाही रे. मीच तिला काल नि परवा दोन दिस केला होता पर तिने काय उचलला नाही. पुन्हा लावला तर दुसऱ्या फोनवर बोलत आहे असे सांगत होते." त्याच्या आईने सांगितले.
"बरं, मी ठेवतो फोन. नंतर करतो."
घरी आल्यावर चहा आणि पाणी झाल्यावर त्याने विचारले, "राधवी, आईचा फोन तुला एक-दोन दिवसात आला होता गं ?" त्याने विचारले.
"न.. नाही." तिने खोटेच सांगितले.
"जरा तुझा फोन दे. मला कॉल लावायचा आहे. माझ्या मोबाईलवरून लागत नाहीये." तो म्हणाला.
तिने दिला आणि त्याने पाहिले तर त्याच्या आईचे मिस्ड कॉल खूप होते पण तिने त्यांचा कॉल उचललाही नाही आणि पुन्हा केलाही नाही.
"हे काय राधवी? तू आता खोटे बोलायला लागली आहेस का? स्वतःहून तू फोन करत नाहीस आणि माझ्या आईने केला तर तू उचलत नाहीस. तसेच तुझ्या आईचे किती फोन येतात दिवसांतून पण माझ्या आईशी बोलायला तुला वेळ नाही?" त्याने रागात विचारले.
"ओ, तुम्ही माझ्यावर संशय घेता का? त्यांच्याशी काय बोलायचे? सारखे आपले हे केलं का ते केलं का विचारतात. त्या गावात राहून त्यांना इथले काय समजणार? आणि मी माझ्या आईशी केव्हा आणि किती बोलायचे हे तुम्ही मला सांगायचे नाही." असे म्हणून तिने बेडरूमचा दरवाजा जोरात लावला.
त्याला त्यादिवसापासून एक आठवडा घरात जेवण मिळाले नाही. आपली काही चूक नाही म्हणून त्यानेही तिचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न केला नाही.
त्याला आपल्या आईला कमी लेखणे पटले नव्हते. लग्न व्हायच्या आधी ही गोड बोलायची, मी सर्वांना सांभाळून घेईन म्हणायची हे ती खोटे बोलली का असेच त्याला वाटत होते.
तिच्या घरच्यांचा वाढणारा हस्तक्षेप त्याला आवडत नव्हता. असेही नव्हते की तिचे वय काही खूप कमी होते ज्यामुळे तिला योग्य काय आणि अयोग्य काय समजत नव्हते.
"पुढच्या महिन्यात आई आणि बाबा येणार आहेत. त्यामुळे तू नीट वागशील अशी मी अपेक्षा करतो." त्याने तिला सांगितले.
तिने काही उत्तर दिले नाही.
"आई बघ ना, आता माझे सासू आणि सासरे येणार आहेत. आता ह्या दोघांचे मी करायचे का? त्यांना तर सर्व जेवण लागते. दिवस माझा त्यातच जाईल." ती फोनवर आईला बोलली.
"अगं राधे, तू कशाला काम करते? सरळ सासूला बोलायचे हे येत नाही ते येत नाही. करू दे की लाडक्या लेकासाठी जेवण. तू कशाला राबतेस? तुझी सासू काय जास्त बोलायला लागलीच तर ऐकून घ्यायचे नाही. तू माझी मुलगी आहे हे विसरू नकोस." तिची आई आपल्या मुलीला चांगले सांगायचे सोडून हे असे सांगत होती.
तिचे सासू-सासरे आले. आपल्या आईवडिलांना घरी आलेले पाहून फक्त दक्षलाच आनंद झाला होता.
राधवीने ते इथे राहायला आलेत म्हणून मध्यस्थी असलेल्या एका काकूंना दुसऱ्या दिवशी फोन करून त्यांना प्रायवसी मिळत नाही म्हणून सांगितले.
जेवणात मुद्दाम मीठ आणि तिखट जास्त किंवा कमी टाकायची. तिला तरी कोणी काहीच बोलायचे नाही. सासू असे बनव असे सांगायला लागली की तुमचा मुलगा तसेच खातो हे ऐकून त्या शांत बसत.
"सूनबाई जरा स्क्रूड्रायव्हर दे." असे एकदा दक्षचे वडील म्हणाले.
"मला नाही माहीत कुठे ठेवला." तिने सांगितले.
"अगं, आपल्या घरातील वस्तू कुठे ठेवल्यात हे तुला माहीत असायला हवे ना? तू तर कुठे आहेत हे साधे शोधण्याचा प्रयत्न पण केला नाहीस." त्यांनी तिला म्हंटले.
"माझ्या घरातल्या वस्तू कुठे आहेत नि कुठे नाही हे तुम्ही नका सांगू. उगाच इथे राहून मला त्रास देता." ती रागात म्हणाली.
"राधवी तोंड सांभाळून बोल. ते माझे वडील आणि तुझे सासरे आहेत." कामावरून आलेला दक्षने सर्व ऐकले होते.
"ते कसे बोलतात ते दिसत नाही का तुम्हाला? आले माझ्यावर ओरडायला." ती त्याच्यावर पण रागवत बोलली.
त्याने तिथेच राधवीच्या आईला फोन लावला.
"सासूबाई, तुमच्या मुलीला येवून घेवून जा. तिला माझ्या आई वडिलांचा मान राखायचा नाहीये. त्यामुळे मला अशी बायको नको." त्याने एवढे बोलून फोन बंद केला.
"पाहा, आले नाहीतर आमच्यामध्ये भांडण लावून मोकळे झाले." तिने सासू -सासऱ्यांना उद्देशून म्हंटले.
त्याचा धसका घेवून त्याच्या आईला त्याचदिवशी सौम्य हृदयाचा झटका आला. तातडीने त्यांना रुग्णालयात नेले.
"माफ करा, मला माझी आई जास्त प्रिय आहे. खूप हालअपेष्टा खावून मला वाढवले आहे. त्यामुळे मला माझी आई हवी बायको नको. खूप वेळा तिला मी नीट वागण्यासाठी समजावले पण एक आई-वडील म्हणून चांगले न सांगता तुम्ही माझ्या आईवडिलांबद्दल खूप वाईट छबी मनात निर्माण केली. आमच्या दोघांचे विचार खूप वेगळे आहेत. मी लग्नाचा सर्व खर्च जरी अर्धा तुम्ही केला असेल तो देतो पण आपण इथेच थांबू." असे म्हणून त्याने ते नाते संपुष्टात आणले.
राधवीला त्याचा काहीच फरक पडत नव्हता आणि तिने पण त्याच्याकडून काही पैसे मागून घटस्फोट दिला.
दक्षच्या आई-वडिलांना आपल्या मुलाचा संसार मोडलेला पाहून दुःख झाले पण त्याला झालेला मानसिक त्रास पाहून त्यांनी त्याचा निर्णय स्वीकारला.
© विद्या कुंभार
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा