Login

अशी ही एक लव्हस्टोरी भाग ७

कलेक्टर ची कहानी...
भुतकाळ,  चार वर्षांपूर्वी


" बाप्या तुला किती वेळा सांगितलं आहे ...मी त्या युवा शी लग्न करणार नाही म्हणून..." ती घरात रागातच आपल्या खोलीत जात म्हणते...


" अगं पण का ..?? युवा खरच चांगला मुलगा आहे...शिवाय शिकलेला आहे तो सुद्धा...गावचा माननीय उपसरपंच आहे ...त्याला गावात ईतक मानतात मग तुलाच काय एवढा प्रोब्लेम आहे..." तिचे वडिल , अनिल सरपोतदार बोलतात...


" हो ना...आणि आईची माझ्या खुप ईच्छा होती गं तुला नातसुन करून घ्यायची..." तिची मॉम ही या दोघांच्या संभाषणात सहभागी होत बोलते, " तुझ्यावर किती जीव होता जिजी ( मिताली ची आजी )  चा तुझ्या तुला तर चांगलंच माहित आहे..."


" हे हेच मला आवडत नाही... इमोशनल करत माझ्याशी बोललेले..." ती तिच्या मॉम कडे रागात पाहत बोलते, " ह्यासाठी मी तुला आत येऊ देत नव्हते ...बाप्या बरोबर बोलताना...कारण एक बाप्याचा आहे ज्याला माझं मन कळतं..." ती आपल्या बाबांसमोर उभी राहुन भावुक होऊन बोलते...


" हो पण या वेळी तुझ्या बाप्या कडे ही तुझी ही डाळ शिजणार नाही हं..." अनिल बोलतात, " हे बघ आत्तापर्यंत तुला हवं तसं मी वागु दिलं ...पोरीला परत या अशा  घरात जायचं आहे..आताच मनसोक्त जगु द्यावं या विचाराने ...पण आता नाही मी ऐकणार काही तुझं...तुला युवाशी लग्न करावच लागेल...चार दिवसांनी तुझं लग्न आहे त्याच्याबरोबर आणि उद्या साखरपुडा...ह्यावर आता काही चर्चा मला नकोय..." ते थोडंसं दामटवत चं बोलतात...


" काय चार दिवसांनी...?? " ती तर ओरडतेच जवळ जवळ..." अहो पण माझी परिक्षा आहे ,चार दिवसांनी ... पोलिस भरतीची..." ती तोंड पाडून बोलते...


" ते पोलिस भरती वैगेरे काही तुझ्या सासरी चालणार नाही...उगी कसलही खुळ डोक्यात घेऊन बसु नकोस...नाही ती स्वप्नं पाहु नये..." तिचे वडिल अजुनही रागातच बोलत असतात..


" बघितलं...?? साधं एक स्वप्न माझं तुम्हांला पुर्ण करता येत नाही...आणि बाता मारत आहात कि तुम्ही मला कायम माझ्या मनाप्रमाणे वागु देता ...आणि काय म्हणालात मघाशी ...?? कि तुम्हांला वाईट वाटतं होतं कि या घरात चं मला जायचं आहे म्हणून तुम्ही हवं ते मला करू देत होता... म्हणजे तुम्हांला ही पटतंय कि हे घर माझ्या साठी चांगलं नसेल भविष्यात....आणि तरी ही...हं ...तरी ही तुम्ही मला या घरात कायमच पाठवत आहात..." ती ही आता बरीच चिडली होती...पण अनिल सर मात्र आता बरेच शांत झाले होते...त्यांच्या डोळ्यांत नकळत पाणी आले होते...


" बाबा..." तिला त्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसताच ती ही भावुक होते...ती त्यांचा हात पकडून बेडवर बसवते आणि आपण मात्र खाली कार्पेटवर बसत त्यांचा हात हातात घेऊन बोलते ," बाबा मला माफ करा पण खरंच माझी ईच्छा नाही आहे या घरात जायची...तुम्ही ही पाहत आहात ना...हा दौलत मामा कसा वागतो सगळ्यांशी ते...आत्ता चं...अजुन आमचं लग्नही झालं नाही तरी त्याच्या आत त्याने माझ्यावर बंदी घातली आहे बर्याच गोष्टी वर...तो युवा ही ...तसाच मामा प्रमाणे‌..." ती खुप च भावुक होऊन बोलत असती...तिच्या मनात मामा विषयी व युवा विषयी असलेली अढी सपशेल दिसत होती...


" नाही मितु ...तु समजतेस तसं नाहीये जावईबापु...ते मनाने खुप चांगले आहेत...आणि बापु व दौलत जींच बोलत असशील तर ...सोनु ...तुला तर माझ्यापेक्षा चांगलं माहित आहे कि ते कसे आहेत..?? ते वरून जरी कडक दिसत असले तरी आतुन मवाळ आहेत...तु जर त्यांना जीव लावलास...त्यांच्या विरोधात गेली नाहीस तर ते तुला राणी बनवुन ठेवतील‌.. कदाचित या प्रोपर्टी वर फक्त तुझा हक्क असेल..." ते तिची समजुत घालत बोलतात..



" आणि माझ्या स्वप्नांच काय...??" तिला तरी करिअर महत्वाचे होते...


" तुझ्या स्वप्नांना घाल चुलीत सध्या...आत्ता मला एक शब्द विचारायचं नाही... गुपचुप लग्नाला उभी रहा ...नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत...एवढं लक्षात ठेवं..." ते कडक शब्दांतच तिला सुनावतात...


" ओके फाईन...मी लग्नाला तयार आहे..." ती आपलं तोंड वाकडं करतच बोलते...आणि तिच्या मॉम बाबांच्या चेहर्यावर मात्र आनंद झळकतो....


" मी आत्ताच ही बातमी दौलत जींना देऊन येतो..." म्हणत अनिल राव तर हसतच आपल्या खोलीबाहेर पडतात...तिची आई तिला आपल्या कुशीत आनंदाने घेते..‌माऊलीच्या डोळ्यांत पाणी होते,आपली लेक सासरला जाणार आता ह्याच विचारांनी...


" मॉम तु का आत्ता रडतेस..?? झालं आहे ना आत्ता तुमच्या दोघांच्या मनाप्रमाणे..." ती चिडतच बोलते...


" तु आई होशील ना तेव्हा कळेल तुला..." तिची आई तिच्या चेहर्यावरून आपला हात मायेने फिरवत बोलते...


" ईव्ह..." ती हातांच्या मुठी करत बोलते..." ओके...तेव्हाच तेव्हा बघु...पण आता बाहेर जाऊयात..." ती ईरिटेड होत बोलते...तशा त्या गालात हसतात...तिच्या अशा वागण्याने...आणि तिचा हात पकडून दोघी माय लेक बाहेर पडतात...


" अभिनंदन ... ताईसाहेब...." दौलत मामा त्या दोघींसमोर येत तिच्या आईच्या पायाला स्पर्श करत बोलतो...


" छोटे ...तुझं ही अभिनंदन...तुझ्याही मुलाचं माझ्या मुलीबरोबर लग्न ठरलंय..." त्या त्याला उठवत हग करत हसत म्हणतात...तिच्या होकारामुळे घरातलं वातावरण खुप च वेगळ झालं होतं..जणु यासाठी ते सालोसाल वाट पाहत असलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं....बापु तर आपल्या वाड्याच्या टेरेस वर जातात आणि बंदुक चालवतात...जणु फटाक्यांची माळ एका मागोमाग  फोडावे ...तशी त्यांच्या बंदुकीच्या गोळ्या चालत होत्या ...मिताली मात्र हे दृश्य  पहिल्यांदाच पाहत होती...ती त्यामुळे भांबावुन गेली होती...


" तुम्हांला तर माझ्याशी लग्न करायचे नव्हते ना..." युवा तिच्या हाताला पकडून रागातच वाड्याच्या मागच्या बाजुला घेऊन गेला...आणि तिच्यावर बरसायला लागला..." मला वाटलं तुम्ही या एवढ्या शिकलेल्या सवरलेल्या...शहरात वाढलेल्या...तरी बी माझ्यासारख्या गावंढळ मुलाशी लग्नाला नकार द्याल असं मला वाटलं होतं... त्यामुळे मी गेले महिनाभर निर्धास्त होतो....पण हिथे तर तुम्ही लग्नाला तयार बी झालात..." तो एकटाच बोलत असतो...तिला काहीच बोलायची संधी तो देत नव्हता..


" व्हॉट...?? तुम्हांला जर हे लग्नच  अमान्य होतं तर मग तुम्ही का तयार झालात ह्या लग्नाला..." ती आता रागातच बोलते...ईतका वेळ तिला वाटत होतं कि तो तयार आहे लग्नाला पण हिथे तर तो ही तयार नव्हता लग्नाला हे ऐकुन तिचा ही पारा चढला होता...


" हे बघा मिताली ...मी का तयार झालो ह्यापेक्षा तुम्ही का करत आहात हे लगिन तेच मला कळेनासं झालं आहे...खरतर मी तुमच्या ना हिथुन लायकीचा आहे ना तिथुन...शिवाय मला या गावाचा, या जिल्ह्याचा कलेक्टर व्हायचं आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालु आहे गेल्या वर्षभरापासून ....त्याची परिक्षा ही आठ दिवसांवर आली आहे...अजुनही वेळ गेली नाही ...तुम्ही आत्ता जाऊन आत्याला सांगा कि हे लग्न तुम्हांला मान्य नाही..." तो तिला जरासं शांत होऊन बोलतो...


" आणि तुम्हांला काय वाटतं युवाजी...मी ही खुप खुशीने हो बोलले आहे का...?? मला ही पोलिस भरतीत व्हायचं होतं...लग्नाच्या दिवशी चं माझी परिक्षा होती पोलिस भरतीची...बाप्याला सांगितलं मी ही पण ते ऐकतिल माझं तर खरं ना...आता मला वाटतंय तुम्ही चं नकार सांगा तुमच्या आत्तीला..." ती बोलतच असते कि किशा आणि त्याची बायको त्या दोघांजवळ येतात...


क्रमशः

©® चैत्राली यमगर डोंबाळे

🎭 Series Post

View all