शीर्षक:- अशी ही कौतुकाची दिवाळी
भाग :-३ (अंतिम)
दोन दिवसांनी बाईंनी सगळ्यां वस्तूंसोबत त्यांनी बनलेल्या वस्तू शहरातील बाजारात विक्रीसाठी ठेवल्या. त्या वस्तू चांगल्या किमतीत विकल्या गेल्या. त्यांना मागणीही खूप आली. त्यामुळे बाईंनी त्यांना आणखी बनवायला सांगितल्या. आनंदाने त्या दोघांनी बनवले. त्या विकल्या नंतर बाईंनी त्यांच्या वाटणीचे पैसे तर त्यांना दिले वरून बक्षीस म्हणूनही थोडे पैसे देऊ केले पण ते घेण्यास राधा नम्रपणे नकार देत म्हणाली,"तुम्ही आमची मदत केली. आम्हाला इतकं सगळं शिकवलं. तेच खूप आहे. बाई, आम्हाला अजून एक मदत कराल."
राधाच्या स्वाभिमानाचे बाईंना कौतुक वाटले.
त्यांनी काय म्हणून विचारले.
"या पैशातून आईसाठी एक साडी आणि बाबांसाठी एक शर्ट आणून द्यालं." तिच्या या बोलण्याने बाईंना भरून आले. त्यांनी त्या दोघांना गळ्याशी लावून घेतले.
दिवाळीच्या आदल्या दिवशी शाम आणि सविता यांनी शेत मालकाकडून जास्तीचे पैसे घेऊन राधा आणि माधवसाठी नवीन कपडे आणि थोडे फटाके आणले. ते पाहून दोघेही आनंदाने नाचू लागले. त्या दोघांना आनंदात पाहून सविता आणि शाम यांच्या चेहऱ्यावरती समाधान झळकले.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राधाने शाम व सविता यांना डोळे झाकायला सांगितले आणि त्यांच्या हातात बाईंनी आणून दिलेली शर्ट आणि साडी ठेवली. जेव्हा दोघांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.
आधी तर ते कोठून आणले हे म्हणून दटावून विचारले.
ते काही सांगणार तोच सुषमा बाई दिवाळीचा फराळ आणि आकाशकंदील घेऊन तिथे येत म्हणाल्या,"नमस्कार, राधाचे आईबाबा. ही साडी आणि हा शर्ट राधा आणि माधव यांनी त्यांच्या मेहनतीच्या कमाईतून घेतला आहे. तुम्हाला तर त्यांचं कौतुक आणि अभिमान वाटायचा हवा. अशी ही कौतुकाची दिवाळी छान साजरा करा."
बाईंच्या बोलण्याने शाम आणि सविता अवाक झाले. ते गोंधळून बाईंकडे एकदा व त्या दोघांकडे पाहिले. त्या दोघांनी हसून मान खाली घातली.
त्यावरून बाईंना समजले की त्यांना या दोघांबद्दल काहीच माहिती नाही.
जेव्हा बाईंनी त्या दोघांबद्दल सर्व सांगितले. तेव्हा त्या दोघांचा ऊर अभिमानाने दाटून आले.
बाई कौतुकाच्या नजरेने पाहत त्यांना म्हणाल्या," खूप गुणी लेकरे आहेत दोघेही. या वयात किती समज आहे दोघांना! मेहनती तर खूप आहेत आणि स्वाभिमानही. मला तर आधी वाटलं की स्वतःसाठी हे सर्व करत आहेत. पण जेव्हा तुम्हां दोघांसाठी विचार केल्याचे कळले तेव्हा मात्र यांचं मला प्रचंड कौतुक वाटलं. तुम्हाला माहिती आहे का? मी बक्षीस दिले यांनी तर ते घेतले नाही. अगदी नम्रपणे नकार दिला. त्यांनी तयार केलेला हा आकाशकंदील, पणत्या घ्या. बघा किती सुरेख बनवलं आहे."
आकाशकंदील आणि पणत्या पाहून शाम आणि सविता यांच्या डोळ्यांतून कौतुकाचे आनंदाश्रू तरळले. पटकन त्यांना जवळ घेऊन त्यांच्या माथ्यावर ओठ टेकवत कौतुकाचा वर्षाव केला.
बाईंनी नंतर उरलेले पैसे आणि त्यांच्यासाठी आणलेला फराळ दिला. पुन्हा एकदा त्यांनी राधा माधवचे कौतुक केले आणि निघून गेल्या.
"आपली लेकरं किती लवकर मोठी झाली नव्हं ! हिरे हायती आपली लेकरं !" अंगणात फटाके उडवणाऱ्या राधा आणि माधवकडे कौतुकाने बघत सविता म्हणाली.
"व्हयं गं, अक्शी बराबर बोललीस बघ तू. अशी ही कवतीकाची दिवाळी या दोघांमुळे बघाया मिळतेया. आपल्याला कायम ध्यानात राहील बघ ही कवतीकाची दिवाळी!" शाम सविताच्या बोलण्याला दुजोरा देत त्या दोघांना भारावून बघत म्हणाले.
समाप्त -
परिस्थितीमुळे मुले लवकर समंजस बनतात. मेहनत करून कौतुकाचे पात्र बनतात.
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा