शीर्षक:- अशी ही कौतुकाची दिवाळी..!
भाग:- १
"सावू, यंदा दिवाळी साजरा करता येईल असे वाटना बघ मला." बाहेर धो-धो कोसळणाऱ्या पावसाला पाहत उदास होतं शाम सविताला म्हणाला.
"व्हयं वं, पर लेकरांस्नी कसं सांगायचं? कवा धरन, ते दिवाळी सणाची वाट बघत्याती. गेली दोन वरीस झालं, त्यास्नी कपडालत्ता बी घेतला न्हाई. यंदा इचार केला व्हुता, पर ह्यो दोडाचा पाऊस काय थांबच न्हाय." सविताही त्या पावसाकडे बघत नाराजीने म्हणाली.
त्याने उदासीनतेने मान डोलावत सुस्कारा सोडला.
शाम आणि सविता — नवरा-बायको, शेतात मजुरी करणारे. यांना दोन मुले— राधा आणि माधव.
राधा सातवीत, तर माधव पाचवीच्या वर्गात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होते. दोघेही खूप हुशार आणि वयाच्या मानाने जरा जास्तच समंजस होते.
मागच्या दोन-तीन वर्षांपासून दोघांनाही नवीन कपडे घेतले नव्हते. शेत मालकीण तिच्या मुलांचे थोडे जुने झालेले कपडे या दोघांना द्यायची. तेच कपडे हे मुले घालत.
माधव कधी कधी ते कपडे घालताना कुरकुर करत घालण्यास नकार देत हट्टीपणा करत नाराजीने म्हणायचा," आय, ही अशी ढगळी कापड म्या न्हाई घालणार ! ही कापड घातलं की समदी मला बुजगावणं म्हणूनश्यान चिडवतात अन् हसतात बी !"
"आरं माद्या, आता घालून जा, नंतर म्या सुई-दोऱ्याने टाचून देईल हं, सोन्या." सविता त्याच्या गालावर हात फिरवून मायेने समजावत होती.
"न्हाय आय ! तू मला कवा बी असंच सांगतिया!" तो गाल फुगवून हाताची घडी घालून तिच्याकडे पाठ करून उभा राहिला.
"आरं, असं नगो करूस रं, माझ्या राजा. बघ बरं तुझ्या तायनं बी जुनीच कापड घातल्याती. ती कवा काय बोलती का?" सविता राधाकडे कौतुकाने पाहत म्हणाली.
"तायला बराबर तिच्या मापाची कापड भेटल्याती ; पर माझी बघ की कशी हायती अंगापरीस भोंगा!" तो अंगावरील एका हाताच्या बोटांच्या चिमटीत शर्ट व दुसऱ्या चिमटीत गुडघ्याच्या खाली असलेली चड्डी धरत ओठ पुढे काढत म्हणाला.
त्याच्या ओठ बाहेर काढण्याने राधा तोंडावर हात ठेवून हसू लागली. तेव्हा सविताने तिला डोळे दाखवत दरडावले. ती गप्प उभी राहिली.
"पोरांनो, तुम्हास्नी एक गंमत सांगू ? यंदाच्या दिवाळीला तुम्हा दोघास्नी बी तुमचा बा नवीन कापड घेणार हाय." सविता पुन्हा त्याच्या खांद्याला धरून त्याला समजावत म्हणाली.
"हुं, तू हे मागच्या अन् त्याच्या मागच्या वर्षी बी असंच म्हणाली होतीस. असू दे घालतो म्या हीच कापड." तोंड बारीक करून म्हणत तो खेळायला निघून गेला.
"आय, तू त्याचं बोलणं नको मनावर घेऊस. तो अजून लहान हाय, म्या समजावते त्याला. तू फिकीर करू नकोस." तो गेलेल्या दिशेला पाहत राधा सविताच्या कमरेला विळखा घालत म्हणाली.
"गुणाची गं बाय माझी !" असे म्हणत तिने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत डोळ्यांत आलेले पाणी पदराने हलकेच टिपून घेतले.
असेच काही दिवस निघून गेले. दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली. तसे त्या चिमुकल्या जीवाला नवीन कपडे आणि फटाक्यांचे वेध लागले.
यावेळी आपणही आपल्याला जमेल तसे आईबाबांना मदत करायची असे राधा आणि माधव यांनी ठरवले. पण करायचे काय हा दोघांनाही प्रश्न पडला.
क्रमशः
काय करतील राधा आणि माधव?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा