शीर्षक:- अशी ही कौतुकाची दिवाळी..!
भाग:- २
खूप विचाराअंती राधाला एक आयडिया सुचली. ती माधवला घेऊन तिच्या शाळेतल्या शिक्षिका सुषमा बाई यांच्याकडे गेली. बाई गावातच राहत होत्या. त्यामुळे तिला त्यांचं घर माहिती होतं.
त्या दोघांना पाहून बाई आश्चर्याने म्हणाल्या," अरे, राधा-माधव ! तुम्ही इथे कसे? काही काम आहे का माझ्याकडे?"
राधा हाताची बोटे एकमेकांत गुंफून चाचरत म्हणाली," बाई, तुम्ही म्हणाला होतात नव्हं की दिवाळीसाठी पणत्या आणि आकाश कंदील बनवायचे हायती. तुमच्या दुकानात आम्ही बी काम करू. आम्हाला द्याल का तुम्ही तुमच्या या दुकानात काम?"
बाईच्या घरासमोर एक छोटेखानी वर्क शॉप होते. तिथे हाताने वस्तू बनवले जायचे. बाई स्वतः टाकावू पासून टिकाऊ वस्तू बनवायच्या. ज्याला शहरात खूप मागणी होती. गरजूंना त्या काम देत. शाळेत ते कधी कधी मुलांना याबद्दल सांगायच्या. एखादा तास ते त्याच प्रात्यक्षिक करून घ्यायच्या. आता दिवाळी आली म्हणताना त्यांनी दिवे आणि आकाशकंदील बनवायचे प्रात्यक्षिक करून दाखविले होते. ते राधा आणि माधव यांना फार आवडले होते.
" अरे, तुम्ही दोघे लहान आहात. तुम्हाला कसे काम देऊ?" बाई त्यांना म्हणाल्या.
"न्हाई म्हणू नका, बाई. आम्हाला गरज हाय. आय बाला मदत करायची हाय." राधा हात जोडत आर्जव करत म्हणाली.
"बाई, हे बघा, म्या राधातायच्या एवढं मोठा झालो. म्या लहान न्हाई आता." माधव टाचा उंचावून राधाच्या खांद्याला हात टेकवत म्हणाला.
बाई हसल्या. त्या दोघांचं त्यांना खूप कौतुक वाटलं. त्या इवल्या जीवांची आईबाबांना मदत करण्याची धडपड पाहून बाई थक्क होऊन म्हणाल्या," ठीक आहे. उद्यापासून तुम्ही दोघे या. पण काम म्हणून नाही हं. शिकण्यासाठी या. तुम्हाला मी सगळं शिकवेन. तुम्ही केलेल्या वस्तूंना जर बाजारात चांगली किंमत मिळाली तर त्याचे सगळे पैसे तुम्हाला देईल. चालेल ना."
"व्हयं, चाललं की. उद्या पासन कशापायी आजपासून करतो की. ते तुम्ही शाळेत म्हणता बघा काय बरं?.." राधा डोकं खाजवत विचार करू लागली.
"कल करे सो आज करं, आज करो सो अब. हेच ना, राधाताय." माधव एकदम उल्हासून डोळे मिचकावत म्हणाला.
"हो, अगदी बरोबर." बाई त्याच्या डोक्यावरील केस विस्कटत हसत म्हणाल्या.
तो बावरून त्यांच्याकडे बघू लागला.
बाईंनी त्या दोघांना काय, कसे करायचे ते समजून सांगितले. पहिल्या दिवशी दोघांना काही जमले नाही. त्यामुळे दोघेही हिरमुसली.
"प्रयत्न करत राहा जमेल," असे म्हणत बाईंनी त्यांना प्रोत्साहन दिले.
दुसऱ्या दिवशी आईबाबा शेतात गेल्यावर ते दोघे बाईंकडे आले. आता थोडे प्रयत्न केल्यावर त्यांना तेथील सर्व छान जमले. माधवने सुंदर असा लहान आकाशकंदील बनवला. ते त्याने स्वतः बनवले होते याचा आनंद तर होताच शिवाय बाईंची कौतुकाची थाप मिळाली होती त्यामुळे त्याचे आकाश ठेंगणे झाले होते.
राधानेही आकाशकंदील बनवले. मातीच्या दिव्यांना रंग देऊन त्यावर सुंदर नक्षीकाम केले. तिची चित्रकला खूप छान होती आणि अक्षर सुंदर मोत्यासारखे होते म्हणून तिने छान ग्रिटिंग कार्ड तयार केले. बाई त्यांच्या कामावर खूप खुश झाल्या.
सविता व शाम घरी यायच्या आत दोघे परत येत असतं. त्यामुळे त्यांच्या या उद्योगाबद्दल दोघांनाही कल्पना नव्हती.
क्रमशः
जेव्हा राधा आणि माधव यांच्या बद्दल कळल्यावर काय असेल शाम आणि साविता यांची प्रतिक्रिया?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा