अशी जाऊ हवी! भाग 1

About Relations


"काय हो ताई, तुम्ही ओमला काही खायला बनवून दिले नाही का? त्याला खूप भूक लागली होती.तसे त्याने तुम्हांला सांगितलेही."

ऑफिसमधून दमून भागून आलेली जया आपल्या नणंदबाईंना थोड्या रागातच म्हणाली.

"अगं,त्याला खायला काय बनवू? हे सुचतंच नव्हते. मी बनवून दिलेले त्याला आवडत नाही. तो खात नाही व्यवस्थित.म्हणून मी आता त्याला दूध बिस्किट देणारंच होते; तितक्यात तू आलीच."

नणंदबाईंनी आपल्या शब्दांत स्पष्टीकरण दिले.

जयाने ओमसाठी पटकन त्याचा आवडता उपमा बनवला आणि तो त्याने आवडीने खाल्ल्यावर जयाने स्वतःसाठी मस्त चहा बनवला.

आई स्वतः कितीही थकलेली असली; तरी मुलांसाठी, त्यांच्या आनंदासाठी नेहमी तयार असते. मुलांच्या आनंदात आपला थकवा पार विसरून जाते.


जया पण अशीच होती.ती कितीही थकूनभागून आलेली असली तरी; ओमसाठी गरमागरम खायला बनवून द्यायची.खाऊन पिऊन झाल्यावर मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिला बरे वाटायचे.

'आईची माया वेगळीचं असते!'
असे म्हटले जाते ..ते अगदी खरेच आहे.


जया एका कंपनीत नोकरीला होती. तिचा नवराही इंजिनिअर होता व एका चांगल्या कंपनीत नोकरीला होता.
सासू, सासरे,जया, तिचा नवरा, ओम, दीर ,नणंदबाई व नणंदबाईंचा मुलगा असे एकत्र कुटुंब होते. दीराचे लग्न झालेले नव्हते.
नणंदबाईंचे लग्न झालेले होते;पण नवरा व्यसनी असल्याने त्या घटस्फोट घेऊन,आपल्या मुलासोबत माहेरीच राहत होत्या.

जया लग्न करुन सासरी आली,तेव्हा नोकरी करत होती;पण ओम झाल्यावर नोकरी सोडून दिली. सासूबाईही नेहमी गावाला जायच्या. आणि तेव्हा नणंदबाई त्यांच्या सासरी होत्या.नणंदबाईंचाही सुखाचा संसार होता. घरचे सर्व व्यवस्थित होते;पण त्यांच्या नवर्‍याला दारूचे व्यसन लागले.
नणंदबाईंनी व सासरच्यांनी खूप प्रयत्न केले व्यसन सोडवण्यासाठी;पण नवरा काही व्यसनाला सोडत नाही उलट जास्त होते आहे. असे त्यांना जाणवले तेव्हा त्या मुलाला घेऊन कायमच्या माहेरी आल्या.

जयाच्या दीराचे शिक्षण सुरू होते; त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी जयाच्या नवर्‍यावर होती. सासरे खाजगी कंपनीत नोकरीला होते. त्यांना पगारही जास्त नव्हता आणि मुलांचे शिक्षण, लग्न यात खूप खर्च झाला होता. नवर्‍याच्या जबाबदारीचा थोडासा भार हलका करावा म्हणून जया पुन्हा नोकरी करू लागली. आता ओमला सांभाळायला त्याची आत्याही होती. त्यामुळे काळजी नाही. असे जयाला वाटू लागले.

नणंदबाईंचे शिक्षण 12 वी.झाले होते. त्यांनी पुढे काहीतरी शिक्षण घेऊन नोकरी किंवा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. यासाठी जया व तिच्या नवर्‍याने नणंदबाईंना खूप समजावले,शिवणक्लास ही लावून दिला; पण त्यांना ते काही जमत नव्हते. मग आता निदान घरातील कामे तरी व्यवस्थित करायची ना! असे जयाचे म्हणणे होते; पण तेही व्यवस्थित नाही. त्यामुळे जयाला त्यांचा राग येऊ लागला. 'आम्ही आमचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडायचे आणि आम्ही काही अपेक्षा ठेवल्या तर...आम्ही चुकीचे!'
सासूसासरे व नणंदबाईंचे वागणे,बोलणे पाहून जयाच्या मनाला असे वाटायचे.
पण असे मनात येऊनही ती काही बोलू शकत नव्हती. कारण नणंदबाईंबद्दल घरात सर्वांनाच सहानुभूती,प्रेम होते. तिच्या अशा परिस्थितीत आपणच तिला समजून घ्यायला हवे . असे सर्वांचे म्हणणे होते. जयालाही त्यांच्याबाबतीत सहानुभूती होती,काळजी होती; पण 'नणंदबाईंनीही घरातील परिस्थिती पाहून वागायला हवे ना...घरात थोडीफार मदत केली. निदान मी ऑफीसला गेल्यावर,ओमला व्यवस्थित सांभाळले,त्याला खाऊ पिऊ घातले तर ...मलाही ओमची काळजी राहणार नाही.' एवढेच जयाचे म्हणणे होते.


काही महिन्यांनंतर...


"जया, तू नोकरी का सोडली?"
जयाच्या नवर्‍याने तिला आश्चर्याने विचारले.

"अहो, मलाही नोकरी करायला आवडत होते. घरातील जबाबदारी सांभाळत मी नोकरी करतच होती. पण ओमकडे दुर्लक्ष होत होते. त्याला मी माझा वेळ देणे गरजेचे वाटले; म्हणून खूप विचार करून मी नोकरी सोडली."

जयाने थोड्याशा नाराजीच्या स्वरात उत्तर दिले.

"अगं, पण तू घरी असताना त्याची काळजी घेते व आई,ताई पण घेतात ना काळजी त्याची..तू घरी नसताना?"

जयाच्या उत्तराने समाधान न झाल्याने,तिचा नवरा तिला म्हणाला.

क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all