अशी जाऊ हवी! भाग 2

About Relations
"अहो, आई इथे असून नसल्यासारखाच! सारख्या कुठे ना कुठे जात असतात. आज हा नातेवाईक तर उद्या तो नातेवाईक.त्यामुळे त्यांच्यावर कशी अवलंबून राहू? आणि ताई आपल्या स्वतःच्या मुलाला सांभाळतील की ओमला? त्यांच्याकडून ओमला सांभाळण्याची जबाबदारी व्यवस्थित होत नाही. हे मला जाणवते आहे. म्हणूनच मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला."

"जशी तुझी इच्छा.."

जयाच्या बोलण्यावर तिचा नवरा एवढंच म्हणाला.


जयाने नोकरी सोडल्याने,तिच्या नवर्‍याच्या पगारावर घरखर्च सुरू होता. सासरे छोटेमोठे काम करत घरखर्चाला हातभार लावत होते. पण घरखर्चही दिवसेंदिवस वाढत होता. असेच काटकसर करत सर्व सुरू होते.


जयाच्या दीराचे शिक्षण पूर्ण झाले व तो नोकरीला लागला. त्यामुळे घरात येणाऱ्या पैशाचा स्त्रोत वाढला.
जीवन जगणे थोडे सोपे झाले.

जयाच्या दीरासाठी नात्यातील एका मुलीचे स्थळ सांगून आले. मुलगी दिसायला छान होती. सर्वाना मुलगी आवडली व ती जयाची लहान जाऊ म्हणून घरात आली.

'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीप्रमाणे,

जयाच्या कुटुंबातही जयाचे व तिच्या जाऊचे पटणार नाही. कामावरून भांडण होणार. घरातील लोक,आजूबाजूचे व नातेवाईक मंडळी यांचा असा अंदाज होता;पण त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला. जया व तिची जाऊ,संध्या यांच्यात कधी भांडण,वादविवाद होत नव्हते; उलट दोघींचे सूर छान जुळले होते. संध्या दोन भावांची एकुलती एक बहीण होती; त्यामुळे तिला जयाच्या रुपात बहीणच भेटली होती. जया माहेरी एकत्र कुटुंबात वाढलेली त्यामुळे सख्ख्या बहिणींप्रमाणे काकांच्या मुलींशीही तिचे चांगले पटायचे.आता सासरीही संध्याला ती लहान बहिणीसारखी वागवत होती.


संध्याचे B.C.A. झालेले होते. तिची M.C.A.करायची खूप इच्छा होती;पण वडिलांनी तिचे लग्न करायचे ठरवले ; त्यामुळे तिची इच्छा अपूर्ण राहिली.
तिची ही इच्छा गप्पांमधून जयाला समजली.


"संध्या, तू M.C.A.साठी काॅलेजला ॲडमिशन घे. घरातले काही टेंशन घेऊ नको. मी सांभाळून घेईन सर्व."

जया संध्याला म्हणाली.

जयाने सांगितलेले ऐकून संध्याला आनंद तर झालाच व तो तिच्या चेहऱ्यावर उमटलाही.

आपल्या भावना सावरत ती जयाला म्हणाली,
"वहिनी,मी काॅलेजला गेल्यावर घरातील कामांची जबाबदारी तुमच्या एकटीवर येईल. माझ्या मनाला हे नाही पटत."

"अगं, काही नाही सवय आहे मला कामांची.तू ॲडमिशन घ्यायचे म्हणजे घ्यायचेच...मी तुझे काही ऐकणार नाही."

जयाने आपल्या अधिकाराचा उपयोग करत संध्याला जणू हुकूमच दिला.

हो ...नाही ...करत एकदाचे संध्याचे ॲडमिशन झाले व ती काॅलेजला जाऊ लागली. काॅलेजला जाण्या अगोदर आणि काॅलेजातून घरी आल्यावर संध्या आपली कामे करत होती. वहिनी आपल्याला इतका छान सपोर्ट करत आहेत. याची तिला जाणीव होती; त्यामुळे ती पण आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडीत होती.


जया घरातील सर्व कामे आनंदाने करत होती. ओमलाही वेळ देत होती.ओमप्रमाणे नणंदबाईंच्या मुलाचेही घरात लाड होत होते. कुठलाच भेदभाव नव्हता. नणंदबाईंशीही सर्वजण चांगलेच वागत होते. उलट त्याच जयाशी व संध्याशी व्यवस्थित बोलत नव्हत्या,त्यांच्याबरोबर व्यवस्थित वागत नव्हत्या. जया व संध्या यांचे विचार, स्वभाव जुळत होते. एकमेकांबद्दल त्यांना आपुलकीची भावना होती त्यामुळेच त्यांचे चांगले पटत होते. पण नणंदबाई आपल्या वेगळ्या विचारांमुळे अलिप्त राहत होत्या.

त्यांच्या बोलण्यामुळे,वागण्यामुळे संध्याला त्यांचा राग यायचा व ती त्यांना पटकन बोलायचीही. मग नणंदबाईंना राग,रूसवाही यायचा.
जया मोठी जाऊ या नात्याने संध्याला तिच्या बोलण्यावरून रागवायची,समजावून सांगायची आणि आपल्या गोड बोलण्याने नणंदबाईंचा रूसवाही दूर करायची.घरात आनंद राहण्यासाठी प्रयत्न करायची. घरात सुखशांती,समाधान राहावे यासाठी देवाला प्रार्थना करायची.
कुटुंबातील लोकांचे एकमेकांवर प्रेम,विश्वास असल्यास कुटुंबात आनंद,समाधान तर राहतेच;पण कुटुंबाची एकता बाहेरील कोणी तोडू शकत नाही. असे जयाचे म्हणणे होते.

जयाचे व संध्याचे नाते,मैत्री घरात आनंद निर्माण करत होते तर नातेवाईक,आजूबाजूच्या काही लोकांना ते पाहवत नव्हते;विशेषत: ज्यांच्या घरात सासूसूनांचे, जावाजावांचे पटत नव्हते, भांडणे होत होती. अशा लोकांना आपल्या घरातील त्रासापेक्षा.. जया व संध्या यांच्या घरातील आनंद त्यांच्या मनाला त्रास देवू लागला.

क्रमश:
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all