अशी जाऊ हवी! अंतिम भाग

About Relations
"अगं, जया,किती गं तुझं मन मोठं! घरासाठी किती राबते! सर्वांच्या सुखाचा विचार करते.त्याग कसा करावा? हे शिकावं तर तुझ्याकडूनच!"

ज्योती जयाला म्हणाली.


"अगं, एवढे काय कौतुक करते आहे माझे? आणि एवढे कौतुक
करण्याइतकं मी काही केलेले नाही."

जया ज्योतीला म्हणाली.

"अगं बाई,एवढं सगळं करूनही ....काही नाही केले.असे कसे म्हणतेस तू? एवढी चांगली नोकरी सोडून घरात काम करते आहे. नणंदबाई घरात काही काम करत नाही तरी त्यांच्याशी चांगली वागते आणि तुझी जाऊबाई बघं...कशी मस्त राहते! काॅलेज
लाईफ एन्जॉय करते आहे!
ती एन्जॉय करते आणि तू
काकूबाईसारखी घरात राहते. उलट संध्याच्या मदतीने घराची जबाबदारी सांभाळत तू नोकरी केली असती. इतकी कशी भोळी गं तू? "

ज्योती काळजीचे भाव चेहर्‍यावर आणत जयाला म्हणाली.

"अगं, मी माझ्या संसारात, जीवनात सुखी आहे. मी ओमसाठी नोकरी सोडली. बाकी काही कारण नाही."

ज्योतीच्या बोलण्यावर जया एवढंच म्हणाली.


माणसाचं मन मोठ विचित्र असतं..मनात कधी कोणते विचार येतील? हे सांगता येत नाही.
आपल्या मनात काही भावना,विचार नसतील; पण कोणी आपल्याला काही सांगितले, कुठे काही ऐकले की मनात तसे विचार येऊ लागतात.

जयाच्या मनात सासरच्या लोकांबद्दल चांगल्याच भावना होत्या आणि ती त्याप्रमाणे वागतही होती; पण ज्योतीने तिच्याबद्दल सांगितलेले ऐकून,तिचे मन विचार करू लागले की, ' खरंच मी इतकी भोळी आहे,चांगली आहे. माझ्या भोळेपणाचा,चांगुलपणाचा सर्वजण उपयोग करून घेत आहेत का? नोकरी सोडण्याचा आपला निर्णय बरोबर होता की चुकीचा?'

मन शांत असेल तर आपल्याकडून होणारी कामेही चांगली होतात;पण मन शांत नसेल, मनात वेगवेगळे विचार सुरू असतील तर काम व्यवस्थित होत नाही. इतरांवर राग,चिडचिड होते.
ज्योतीच्या बोलण्याने जयाचे मन वेगळ्या विचारात गढून गेले आणि त्याचा परिणाम तिच्या वागण्यात दिसून येत होता.

जयाच्या वागण्यात झालेला बदल संध्यालाही जाणवू लागला होता; पण ती अगोदरसारखीच वागत होती.


ज्योतीने जसे जयाच्या मनात नको ते विचार भरले तसेच तिने संध्यालाही सांगितले,

" आजच्या जगात कोणी इतके चांगले असते का गं? मगं तुझी
जाऊ इतकी चांगली कशी असू शकते? नक्कीच तिचा काहीतरी स्वार्थ असेल त्यामागे. तुझ्याशी गोड गोड बोलून काहीतरी मिळवायचे असेल तिला तुमच्याकडून. घरदार,शेती,सासूबाईंचे दागिने वगैरे. तू व तुझा नवरा तिच्या चांगुलपणावर आंधळा विश्वास ठेवत आहात आणि ती हळूहळू तुमच्याकडून सर्व काढून घेईन. तुझे सासरे व सासूबाई दोघेही कशातच नाही. नणंदबाईंना तर कोण विचारणार? त्यामुळे घरात तिचीच सत्ता! बघं बाई मला तू साधीभोळी वाटली,स्वभावाने चांगली वाटली म्हणून तुझ्या भल्यासाठीच सांगितले. मला काय करायचे तुमच्या कुटुंबात? मला जे वाटले ते बोलली गं."


ज्योतीच्या बोलण्याचा जयाच्या मनावर जसा परिणाम झाला तसाच संध्याच्याही मनावर!

चांगल्या विचारांपेक्षा वाईट विचार लवकर परिणाम करतात. तसेच झाले होते.

संध्याही कामापुरता जयाशी बोलू लागली.

मन दोन प्रकारे विचार करते.
असे असेलही आणि नसेलही.

जयाच्या मनात यायचे की, आपण जे काही केले ते चांगल्यासाठीच! संध्याला शिक्षण करण्याविषयी मी च सांगितले. तिची इच्छाही होती आणि ती पण घरातील कामे करून शिक्षण घेते आहे ना? ओम थोडा मोठा झाला की,मी पण करेल काहीतरी आणि घरातील कामे करणे म्हणजे काही सोपे काम नाही. स्वतःला गृहिणी म्हणण्यात कमीपणा तरी का वाटू द्यायचा! ज्योतीने उगाच आपल्या मनात काहीतरी भरवले आहे.'


एके दिवशी संध्या घरी येत असताना,
शेजारच्या घरात सासूसूनांचे भांडण सुरू होते. संध्याला आश्चर्य वाटले की, यांचे तर छान जमत होते मगं...असे का झाले?

या प्रश्नाचे उत्तर तिला बाजूला उभे राहून,भांडणाचा आनंद घेत हसणार्‍या ज्योतीकडे गेले.

'अरे! या बाईने तर आपल्या मनात पण वहिनींविषयी चुकीचे सांगून घरात भांडण लावण्याचा प्रयत्न केला.
तिचे ऐकून मी काही वहिनींशी भांडणार वगैरे नव्हते; पण गैरसमज होण्यास वेळ लागत नाही ना!
ज्योतीसारखे असे अनेक लोक असतात...जे इतरांच्या मनात चुकीचे विचार पसरवून घरात भांडण लावतात व घराचा आनंद हिरावून घेतात. अशा लोकांपासून दूरच राहावे आणि आपल्या लोकांबद्दल आपल्या मनात प्रेम,विश्वास राहिला तर असे कितीही लोक आयुष्यात आले तरी आपल्या नात्यातील प्रेम,गोडवा दूर करू शकणार नाही.'

संध्या या विचारात घरात पोहोचली.
तेव्हा जया तिला म्हणाली,
"त्या ज्योतीपासून थोडी दूरच रहा गं, एके दिवशी मला कसे वागायचे? काय करायचे? वगैरे शिकवत होती."

"वहिनी,मलाही काहीतरी सांगत होती; पण मी फक्त ऐकून घेतले."

संध्या असे बोलताच दोघीही हसायला लागल्या.


शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संध्या नोकरी करू लागली. जयाही ट्युशन्स घेऊ लागली.
एकमेकांवरचा विश्वास, प्रेम व एकमेकींना समजून घेण्याची भावना पाहून
जया व संध्या दोघींच्याही मनात
यायचे की, 'प्रत्येकाला अशी जाऊ हवी!'


समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all