अशी जुळली गाठ. भाग - ६
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
इशिताने कबीरला मिठी मारली आणि ती त्याच्याशी एवढी खुश होऊन बोलत होती पण कबीरचा मात्र पुतळा झाला होता. तो काहीच कसं बोलत नाही हा प्रश्न तिला पडला. मग ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याच्याकडे बघू लागली.
"काय झालं कबीर, तुझा चेहरा असा का पडला आहे? तू काहीच का बोलत नाही." इशिताने काळजीने विचारलं तेव्हा कबीर भानावर आला आणि तिच्याकडे बघू लागला. खरं तर तिच्याकडे बघायची सुद्धा त्याची हिम्मत होत नव्हती पण आता तिला काहीतरी सांगावं लागेल असा विचार त्याच्या मनात आला. पण खरं सांगितल्यावर तिला तो धक्का सहनच होणार नाही हे त्याला माहीत होते. तो खुर्चीवर शांत बसला आणि परत विचारात हरवून गेला. इशिताला त्याचं असं गप्प राहणं आणि विचारात हरवून जाणं सहन होत नव्हते. तिला त्याची जास्तच काळजी वाटू लागली.
"कबीर, तू काहीच का बोलत नाहीये? मला आता खरंच टेन्शन येतंय. काय झालंय? तू आपल्याबद्दल घरी सांगितलं आणि घरच्यांना आपलं रिलेशन मान्य नाही असं काही आहे का?" इशिताने रडवेल्या सुरात विचारलं. तिचा तो रडवेला चेहरा बघून त्याच्या मनाला वेदना होत होत्या. आता लगेच इशिताला काय घडलंय ते सांगण्यात काहीच अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं.
"तू समजतेस तसं काहीच नाही झालंय, गावी गेल्यावर माझी तब्येत बिघडली म्हणून आम्ही लगेच आलो. आता सुद्धा मला बरं वाटत नाहीये, मला घरी जावं लागणार आहे. मी इथे काही काम करू शकेल असे नाही वाटत मला." कबीरने खोटंच सांगितलं. त्याला आता तिच्या नजरेसमोर थांबणं शक्यच नव्हते म्हणून तो तिथून पळ काढू पाहत होता.
"अरे मग ठिक आहे ना... नाही तुला बरं वाटत तर जा घरी आणि छान आराम कर, कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना... मी सगळं बघून घेईन." इशिता म्हणाली तसं तो उठला आणि तिच्याकडे न बघताच जाऊ लागला. ते तिला जरा विचित्रच वाटलं. तिने परत त्याला आवाज दिला.
"कबीर, तू मला साधं हग सुद्धा नाही केलं. मी आल्यावर सुद्धा तू काहीच रिस्पॉन्स नाही दिला आणि आताही माझ्याकडे न बघताच जातोय. याआधी तू कधीच असं वागला नाही!" इशिता म्हणाली. त्यांचं प्रेम एवढं गहिरं होतं की ते समोर आल्यावर आणि एकमेकांचा निरोप घेऊन जाताना ते एकमेकांना मिठी मारल्याशिवाय राहतच नव्हते. असं असलं तरी त्यांनी त्यांच्या मर्यादाही ओलांडल्या नव्हत्या. इशिता बोलताच कबीर मागे फिरला. तिने पाहिलं तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो पुढे आला आणि त्याने तिचा हात हातात घेतला.
"इशिता, मला आज तुझ्याकडून एक वचन हवं आहे." कबीर गहिवरलेल्या आवाजात बोलला.
"तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तू फक्त माग तुला कसलं वचन हवंय, एक काय असे हजार वचन देईल मी. माझ्या आयुष्यात तू सोडून काहीच महत्वाचं नाहीये." इशिता म्हणाली आणि नकळत त्याच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब गालावर ओघळला.
"काहीही झालं तरी... अगदी काहीही, तू माझी साथ कधीच सोडणार नाही आणि माझ्यापासून कधीच दूर जाणार नाही हे वचन हवंय मला!" कबीर म्हणाला. तो तिला वचनात बांधू पाहत होता पण त्याचं लग्न झालंय हे सांगायची त्याची हिंमतच झाली नाही. त्याच्या बोलण्यावर इशिता गोड हसली.
"तुला हे वचन मागायची गरजच नाही कबीर, कारण मलाच तुझ्यापासून दूर जायचं नाहीये. मला तू आयुष्यभर माझ्या आयुष्यात हवा आहे. आपलं लग्न कधीही होवो पण मी मनातून तुला कधीच माझा जीवन साथी मानलं आहे." इशिता त्याचा हात हातात घेत म्हणाली तसं तो करंट लागल्यासारखा मागे झाला. त्याचं मन काय विचार करत होतं हे त्याला स्वतःलाच कळत नव्हते. तो लगेच तिथून निघून गेला. इशितासाठी त्याचं वागणं एक कोडंच झालं होतं. ती पण बराच वेळ त्याचा विचार करत होती.
घरी पुजेची जोरदार तयारी सुरू होती. पुजा घरातल्या घरातच होती पण सगळं काही साग्रसंगीत होत होतं. सान्वीने स्वतः पुजेचा प्रसाद केला. श्रावणी तिच्या मागे मागेच करत होती.
"वहिनी, आता बसं झालं ना तुझं काम... आता चल छान तयार हो. आज मी तुला तयार करणार आहे... हा पण साडी तेवढी तू नेस, बाकी मेकअप मी करेल. मला काही साडी वगैरे नेसवायला जमणार नाही." श्रावणी हसून म्हणाली.
"नाही, मी करेल माझं माझं... तसंही मला मेकअप करायला फारसं नाही आवडत." सान्वी म्हणाली त्याचवेळी सविता तिथे आली आणि तिने तिचं बोलणं ऐकलं.
"तुला आवडत नसला तरी आज तू छान मेकअप करायचा, कबीर समोर आल्यावर तो तुझ्याकडे बघतच राहायला हवा. सान्वी, तुमचं लग्न कशा परिस्थितीत झालंय माहितीये ना मग आता तुला कबीरचं मन जिंकायला हवं. असं म्हणतात की प्रेमानं जग जिंकता येते. मग तुला कबीरचं मन जिंकणं एवढं अवघड नाहीये." सविता म्हणाली.
"आई, पण ते तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही." सान्वी म्हणाली.
"आता त्याच्या डोक्यात राग आहे म्हणून तो तसं वागतोय, बाकी माझा कबीर मनाने खरंच खुप चांगला आहे आणि खुप प्रेमळ सुद्धा आहे." सविताच्या त्या शब्दांनी सान्वीच्याही मनात आशा निर्माण झाली. तिलाही तिचा संसार सुखाचा व्हायला हवा होता.
"आई, मग आज रात्रीचं जेवण मी बनवू का?" सान्वीने विचारलं. तिने बऱ्याच वेळा ऐकले होते की पुरूषांचं मन जिंकण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. आता तिला तिथूनच प्रयत्न करायचे होते.
"हो चालेल ना, पण तुला जमेल ना?" सविताने विचारलं.
"हो मला माझ्या आईने सगळा स्वयंपाक शिकवला आहे." सान्वी म्हणाली.
"बरं कर पण आता जा आणि छान तयार हो... हा कबीर कसा नाही आला अजून, मी यांना त्याला फोन करायला सांगते." सविता म्हणाली आणि बाहेर विक्रम होते तिथे गेली आणि त्यांना सांगू लागली.
"अहो sss जरा कबीरला फोन करून बघा... एवढ्यात यायला हवा होता तो!" सविता म्हणाली.
"त्याने मोबाईल फोडला आहे माहितीये ना तुला मग कसा फोन करायचा?" विक्रम जरा चिडून बोलले.
"ते माहितीये मला, म्हणून तर तुम्हाला सांगायला आली आहे ना, ऑफिस मधल्या फोनवर फोन करा!" सविता म्हणाली तसं त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला. कबीरच्या केबिनमध्ये इशिता होती. टेबलवरचा लँडलाईन वाजताच तिने तो रिसिव्ह केला.
"कबीर, कधी येणार आहेस तू घरी?" इशिताने फोन रिसिव्ह करताच विक्रमने विचारलं. पलिकडून इशिता आहे हे त्यांना माहीतच नव्हतं. पण त्यांनी असा प्रश्न विचारल्यावर ती पण गोंधळली कारण कबीर तिला घरी जातो असं सांगून गेला होता.
"सर, मी इशिता बोलतेय. कबीर सर कधीच घरी गेले आहे. ते घरी आले नाही का?" इशिता म्हणाली. ती कबीरला इतरांसमोर सरच म्हणत होती फक्त तो एकटा असेल तेव्हा कबीर म्हणायची. पण आता तो ऑफिसमध्ये नाही हे ऐकून विक्रमलाही टेन्शन आले.
"काय? तो ऑफिसमध्ये नाहीये?" त्यांनी अविश्वासाने विचारलं.
"हो तब्येत बरी नाही असं सांगून ते गेले इथून! तुम्ही त्यांच्या मोबाईलवर काॅल करून बघा ना, म्हणजे ते कुठे आहे हे समजेल!" इशिता काळजीने बोलली. पण कबीरने त्याचा मोबाईल फोडला होता हे काही तिला माहिती नव्हते. विक्रमलाही तिला हे सांगावं की नाही हा प्रश्न पडला. त्यांनी तिला काहीच सांगितलं नाही. ओके बोलून फोन ठेवून दिला. कबीर असा अचानक कुठे गेला असेल याचं त्यांनाही टेन्शन आले होते. त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तो कुठे आहे आणि कसा आहे काहीच कळायला मार्ग नव्हता.
विक्रमने फोन ठेवल्यावर इशिताने कबीरला फोन केला पण त्याचा फोनच लागत नव्हता. ती परत परत फोन करत होती पण फोन काही लागत नव्हता अर्थात तो लागणारही नव्हता. त्यामुळे तिला कबीरची खुपच काळजी वाटू लागली. कबीरच्या काळजीने तिचे डोळे पाणावले. एकतर आधीच तो तब्येत बरी नाही असं सांगून गेला होता त्यामुळे तिला टेन्शन तर येणारच होतं. त्यात ती विक्रलाही परत फोन करून विचारू शकत नव्हती.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
