Login

अशी जुळली गाठ. भाग - ७

कबीर आणि सान्वीच्या अबोल नात्याची कथा
अशी जुळली गाठ. भाग - ७

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

विक्रम कबीरच्या विचारात होते तोच सविता त्यांना कबीर बद्दल विचारू लागली.

"काय हो, कबीर येतोय ना...!" सविता.

"हो येईलच तो तुम्ही पुजेची तयारी करा आणि सान्वी तयार झाली आहे का ते बघा!" विक्रम म्हणाले. त्याला ऑफिस मधून जाऊन बराच वेळ झाला आहे हे काही त्यांनी तिला सांगितलं नाही. काही झालं तरी कबीर वेळेवर याची त्यांना मनातून खात्री वाटत होती.

सान्वी पुजेसाठी छान तयार झाली होती. ती स्वतःलाच आरशात बघत होती. कालचा दिवस कसाही गेला असला तरी आज सविता आणि श्रावणी मुळे तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. सविता आली आणि तिच्याकडे बघू लागली.

"सान्वी, खुप गोड दिसतेय तू... खरं तर लग्नात सुनेला काहीतरी द्यायचं असतं पण हे सगळं अचानक घडल्यामुळे तुला काही देता आलं नाही, हा बघ हा राणी हार तुझ्यासाठी आणला आहे. हा घाल म्हणजे अजून सुंदर दिसशील." सविता म्हणाली. पण सान्वीला तो हार घ्यायला थोडं अवघडायला झालं, आधीच त्यांचे खुप उपकार झाले आणि अजून त्यात परत हे हार वगैरे तिला कसं तरीच वाटू लागले.

"आई, कशाला उगाच आणला... याची खरंच काही गरज नव्हती." सान्वी म्हणाली.

"अशी कशी गरज नव्हती, मला आई म्हणतेस ना मग माझं ऐकायचं. मी तुझ्यासाठी एवढा प्रेमाने आणला आहे तर घाल तो." सविता म्हणाली.

"आई, तू दे इकडे. मी घालते वहिणीच्या गळ्यात हा हार." श्रावणी म्हणाली आणि तिने लगेच तो हार श्रावणीच्या गळ्यात घातला. मग ती सान्वीचे मोबाईल मध्ये फोटोही काढू लागली. त्या दोघींचं एवढं प्रेम बघून सान्वी पण भारावून गेली.

विक्रम बाहेर कबीरच्या काळजीतच बसले होते. तेवढ्यात त्यांना तो येताना दिसला. त्याला बघून त्यांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांची काळजी पण थांबली.

"कबीर, कुठे गेला होता एवढा वेळ?" कबीर आत येताच विक्रमने विचारलं.

"एक काम होतं त्यासाठी बाहेर गेलो होतो." कबीरने शांतपणे उत्तर दिले. त्याचा शांत आवाज ऐकून विक्रमच्या मनालाही शांत वाटलं. तो शांत होता म्हणून त्यांनीही जास्त प्रश्न विचारले नाही.

"बरं ठिक आहे, आता गुरुजी येतीलच तू तयार होऊन ये." विक्रम म्हणाले तसं कबीर पुढे जाऊ लागला तोच विक्रमने परत थांबवलं.

"हा घे तुझा मोबाईल, सकाळी रागात मोबाईल तोडलास ना... आताच तुझ्यासाठी दुसरा मागवला आहे, तो अजून चालू केला नाही, तू त्यात सीम कार्ड टाकून चालू कर." विक्रम म्हणाले आणि त्याच्यासमोर नवीन मोबाईल पुढे केला. त्यानेही तो शांतपणे घेतला आणि रूममध्ये जाऊ लागला तोच समोरून सान्वी येताना दिसली.

सान्वी साडी नेसून छान तयार होऊन आली होती. तिच्याकडे बघताच एक क्षण त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. ती गावच्या मातीत लहानाची मोठी झाली होती. तिचं बीए कम्प्लीट झालं होतं. दिसायला तर ती सुंदर होतीच. कबीर तिच्याकडे बघत असताना त्याचं लक्ष तिच्या गळ्यात असलेल्या मंगळसूत्राकडे गेलं आणि त्याला वास्तवाची जाणीव झाली. तो काहीच न बोलता सरळ आत गेला.

कबीर काहीच बोलला नाही म्हणून सान्वीचा चेहरा उतरला पण श्रावणीने तिला डोळ्यांनीच धीर दिला आणि देवघरात घेऊन गेली.

थोड्या वेळातच गुरूजी आले, कबीरही आवरून खाली आला. त्याची पुजेला बसायची अजिबात इच्छा नव्हती पण घरात पुन्हा कसलेही वाद नको म्हणून तो शांतपणे पुजेला बसला. तो शांत झालेला बघून सविता आणि विक्रम पण खुश होते.

पुजा चालू झाली कबीर आणि सान्वी दोघेही पुजेला बसले. घरात धुप दिपांचा वास सगळीकडे दरवळत होता. वातावरण अतिशय मंगलमय होते.

इशिता कबीरला फोन करून करून कंटाळली होती. त्यानंतर तिने विक्रमलाही फोन केले पण ते पुजेच्या गडबडीत होते आणि त्यांचा मोबाईल त्यांच्या खोलीत होता त्यामुळे त्यांना तिचे फोन आल्याचे कळलेच नाही. आता इशिताला काही धीर धरवत नव्हता. ती सरळ कबीरच्या घरी येऊ लागली.

इशिता कबीरच्या घरी पोहचली आणि दाराबाहेरच तिला गुरूजींचा आवाज आला, त्या आवाजावरूनच घरात पुजा चालू आहे हे तिला ओळखायला वेळ लागला नाही. तिचे पाय बाहेरच स्थिरावले.

घरी पुजा आहे मग कबीरने आपल्याला काहीच कसं सांगितलं नाही हा प्रश्न इशिताला पडला. तिला आता आज जाऊ की नको जाऊ असेही वाटू लागले पण मनात कबीरची काळजी होती. एवढ्या जवळ येऊन तो घरी आला आहे की नाही हे बघितल्याशिवाय ती थोडीच परत जाणार होती. ती आत आली आणि समोर बघू लागली. ते समोरचं दृश्य बघून तिला एक क्षण काहीच कळेनासे झाले. मग परत जेव्हा तिने नीट पाहिलं तेव्हा कबीर पुजेला बसलेला होता आणि त्याच्या बाजूला एक साडी नेसलेली तिच्याच वयाची युवती होती. तिला क्षणभर हे काय चाललंय तेच कळत नव्हते. पण पुजेला असं फक्त नवरा बायकोच बसू शकता एवढं तर तिला कळत होतं.

कबीरला असं दुसऱ्या कोणासोबत बघून तिच्या मनात काय काय विचार येत होते हे तिचं तिलाच माहीत. पण हे असं होऊच शकत नाही.‌ असंही तिचं मन तिला सांगत होतं. डोळ्यांनी बघून सुद्धा तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता.

कबीरला तर इशिता आलेली सुद्धा कळलं नाही. त्याचं लक्ष समोर पुजेकडे होतं पण मनात मात्र इशिताचेच विचार चालू होते. तो फक्त शरीराने तिथे बसला होता. तो विचारात असल्यामुळे इशिता आल्याची चाहूलही त्याला लागली नाही.

इशिता एकाच जागी स्थीर उभी राहिली. तिच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हते. लताने तिला पाहिलं आणि खूनेनेच खाली बसायला सांगितलं पण तिने बसायला नकार दिला आणि लगेच बाहेर गेली. तिला बाहेर जाताना विक्रमने पाहिलं पण त्यांना वाटलं की ती कबीर बद्दल काही विचारायला आली असेल आणि कबीर दिसल्यामुळे लगेच परत गेली असेल. त्यामुळे त्यांनीही तिला थांबवलं नाही.

इशिता बाहेर आली पण तिचे पाय काही तिथून निघत नव्हते. तिची पावलं जड झाली होती. मनात विचारांचं काहूर माजले होते. परत आत जावं आणि आता जे काही पाहिलं त्याचा कबीरला जाब विचारावा असे तिला वाटत होते पण तिची हिम्मत होत नव्हती. ती बाहेरच थांबून होती.

थोड्या वेळातच पुजा संपन्न झाली, आरती झाली. सगळं शांततेत पार पडल्यामुळे विक्रम आणि सविता दोघेही खुश होते. सान्वी श्रावणी सोबत आत गेली त्याचवेळी कबीर घराबाहेर जाऊ लागला. पण सविताने त्याला अडवले.

"कबीर, आताच तू पुजेवरून उठला आहे ना, मग लगेच बाहेर चाललास पण!" सविता.

"मी इथेच बाहेर पोर्च मध्ये आहे. कुठे लांब नाही चाललोय." कबीर म्हणाला आणि बाहेर जाऊ लागला. त्याला विक्रमने जो मोबाईल दिला होता तो त्याने चालू केला. त्याचं लग्न जरी झालं असलं तरी ऋग्वेद येईल ही आशा त्याने सोडली नव्हती. तो बाहेर येता येता त्यालाच फोन करत होता आणि नेमकं त्याचवेळी त्याला समोर इशिता दिसली. तिच्या डोळ्यात पाणी होते. ते बघून त्याच्या हातातला मोबाईलच निसटून पडला. तो एकटक इशिताकडे बघू लागला.

"इशिता, तू आता इथे?" कबीरने थरथरत्या आवाजात विचारलं. ती शक्यतो कधी घरी येत नव्हती पण आज अचानक आल्यामुळे त्यालाही ती नेमकी का आली आहे हे कळत नव्हते.

"का? मी यायला नको होतं का इथे?" इशिताने विचारलं. तिचा बोलण्याचा सूर नेहमीपेक्षा वेगळा जाणवला. तिचा चेहरा, तिचे डोळे बघून कबीरला भिती वाटू लागली. हिला आपल्या लग्नाबद्दल तर कळलं नाही ना अशी शंका त्याच्या मनात आली. तरीही तो तिच्याशी शांतपणे बोलला.

"तू घरी कधी येत नाही म्हणून विचारलं, पण मग तू इथे का थांबली आहे? आत का नाही आली?" कबीर.

"मी आत आली होती आणि आत काय चाललं होतं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय कबीर. पण एवढं सगळं बघून सुद्धा माझा त्यावर विश्वास बसत नाहीये. मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे सगळं." इशिता रडवेल्या सुरात बोलली. इशिताचं बोलणं ऐकून कबीर पुरता हादरला. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. आपलं लग्न झालंय हे इशिताला कोणत्या तोंडाने सांगावं हेच त्याला कळत नव्हते.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all