Login

अशी जुळली गाठ. भाग - ८

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ८

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

"कबीर, मी काहीतरी विचारतेय तुला. तू काहीच का बोलत नाहीये?" कबीर काही न बोलता नुसताच उभा होता म्हणून इशिताने पुन्हा विचारलं.

"इशिता, आपण आता इथे काही बोलायला नको. आपण नंतर बाहेर भेटून बोलू, तू जा आता." कबीर म्हणाला आणि तिला सरळ सरळ तिथून घालवू लागला. पण इशिता काही केल्या तिथून जायला तयार नव्हती.

"मला आता इथेच बोलायचं आहे कबीर, तू खरं काय ते सांगितल्याशिवाय मी इथून जाणार नाही. बोल आत तुझ्या बाजूला जी मुलगी पुजेला बसली होती ती कोण होती?" इशिताने रागाने विचारलं. तसं कबीरने डोक्याला हात लावला आणि तिला कसं सांगू याचा विचार करू लागला.

"हे बघ इशिता, मी आता इथे तुला काहीच सांगू शकत नाही. प्लीज तू जा इथून, आपण नंतर बोलू. आई बाबांनी ऐकलं तर खरंच खुप मोठा प्राॅब्लेम होईल." कबीर म्हणाला.

"ऐकूदे, मला नाही फरक पडत. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय मी जाणार नाही. मला तू सांगणार नसशील तर मी सरळ आत जाऊन तुझ्या आई बाबांना विचारते आणि आपल्या रिलेशनशिप बद्दल सांगते. मग जे होईल ते होईल." इशिता खुप चिडली होती. त्यामुळे आता कबीरकडे तिला सांगण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. त्याने तिला हाताला धरून गेटच्या बाहेर नेलं आणि तिथे गेल्यावर एक दिर्घ श्वास घेत तिच्याकडे बघू लागला.

"इशिता, माझं लग्न झालंय." तो एवढंच बोलू शकला. पण ते ऐकून इशिताला घेरी आली. ती खाली पडणार तोच त्याने तिला पकडले. पण परत तिने स्वतःला सावरलं आणि त्याला दूर ढकलले.

"दूर हो माझ्यापासून, हात लावू नकोस मला, एवढा मोठा विश्वास घात... कबीर, अरे तू सकाळीच माझ्याकडून वचन घेतलं ना काही झालं तरी साथ सोडू नकोस. इथे तर तुच माझी साथ सोडलीस. का वागलास कबीर तू असं?" इशिता चिडून बोलत होती पण डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हते.

"इशिता, मी हे लग्न ठरवून नाही केलंय. मला जबरदस्तीने लग्न करायला भाग पाडले होते. मी अजूनही तुझाच आहे. माझ्या मनात फक्त आणि फक्त तुच आहेस." कबीर म्हणाला.

"मी तुझाच आहे हे म्हणणं इतकं सोपं वाटलं का तुला, तसं असतं तर कोणत्याही परिस्थितीत तू हे लग्न केलं नसतं. तुझ्यावर जबरदस्ती करायला तू लहान नाहीये कबीर." इशिता.

"माझ्यावर विश्वास ठेव इशिता, मी तुला खरंच फसवलं नाहीये. माझा नाईलाज होता म्हणून मला लग्न करावं लागलं, पण जरी माझं लग्न झालं असलं तरी मी हे लग्न मानत नाही. मला तूच हवी आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही... तू प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस." कबीर.

"एवढा कसला नाईलाज होता तुझा कबीर, अरे तू गावावरून आल्यावर आपण आपल्या लग्नाबद्दल घरच्यांशी बोलणार होतो ना... मी अगदी वाटेकडे डोळे लावून बसले होते तुझ्या आणि तू काय केलंस... तू लग्न करून माझ्यासमोर उभा राहिला आणि आता म्हणतोय की मी तुला हवी आहे. कुठल्या हक्काने बोलतोय तू सांग ना! बायकोचं स्थान तर तू दुसरंच कोणाला तरी दिलं आहे ते तर तू मला कधी देऊ शकणार नाही." इशिता.

"प्लीज माझी मनस्थिती समजून घे ना, खुप मोठ्या पेचात अडकलोय गं मी, मलाही हे लग्न करून आनंद होत नाहीये." कबीर.

"तुला आनंद झाला नसता तर असा तिच्या हातात हात घेऊन पुजेला बसला नसता. बसं झालं... आता मला काहीच ऐकायचं नाहीये. आजपासून तुझं माझं प्रेम संपलं असं समज. इथून पुढे माझ्याशी बोलण्याचा किंवा मला भेटण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस. मी फक्त आपलं नातंच तोडत नाहीये त्यासोबत तुझ्याकडची नोकरी सुद्धा सोडत आहे. तुझी बायको आहे ना आता तिलाच तुझी पीए म्हणून ठेव." इशिता खुप दुखावली गेली होती. ती रडता रडता चिडून बोलली आणि तिथून जाऊ लागली कबीर तिला अडवायचा खुप प्रयत्न करत होता पण ती थांबलीच नाही.

इशिता रागाने पुढे गेल्यावर कबीर दोन्ही गुडघे टेकून बसला आणि खाली मान घालून दोन्ही हातात तोंड लपवत ढसाढसा रडू लागला. इशिता एवढं बोलून रागवून गेल्यावर त्याच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तो आता काही केल्या आवरत नव्हता.

बराच वेळ कबीर बाहेरच रडत होता. तो अजून आत आला नाही म्हणून सविताने श्रावणीला बाहेर बघायला पाठवलं. श्रावणीने बाहेर अंगणात सगळीकडे कबीरला शोधलं पण तो तिथे नव्हता. त्याची गाडी तिला पार्किंग मध्ये दिसली तेव्हा ती गेटच्या बाहेर आली आणि बघू लागली तर कबीर गुडघ्यावर बसून रडताना तिला दिसला. ते बघून तिचं काळीज धडधडायला लागलं. ती खुप घाबरली, ती आज पहिल्यांदाच आपल्या भावाला एवढं रडताना पाहत होती. त्यामुळे तिच्या काळजात धस्स झालं होतं.

श्रावणी हळूहळू एक एक पाऊल टाकत त्याच्याकडे गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

"दादा, तू रडतोय...." श्रावणी गहिवरल्या स्वरात बोलली. तिच्या आवाजाने कबीर उठला आणि तिला घट्ट मिठी मारली आणि एखाद्या लहान मुलासारखा त्याने हंबरडा फोडला. त्याचा तो हंबरडा कानावर पडताच श्रावणीच्या अंगातलं त्राणच निघून गेले. तिचे पाय थरथरू लागले.

"दादा, काय झालंय? तू एवढं का रडतोय?" श्रावणीने विचारलं तसं तो मागे झाला आणि त्याने लगेच डोळे पुसले. आता त्याला वस्तू स्थितीची जाणीव झाली.

"काही नाही... काही नाही... मला काहीच झालं नाही...." कबीर बडबडत आत निघून गेला. श्रावणी मात्र सुन्न होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तशीच तिथेच उभी राहिली. आपला दादा एवढं का रडत होता हेच विचार तिच्या मनात चालू होते.

कबीर आत येताच समोर विक्रम समोर बसलेले होते पण त्यांचा फोन चालू होता त्यामुळे त्यांनी कबीरचे बारीक निरीक्षण केले नाही म्हणून त्याचा रडवेला चेहरा त्यांनी नीट पाहिलाच नाही.

कबीर रूममध्ये गेला आणि तोंडावरच पाणी मारले. नंतर आरशात बघू लागला.

"एवढं काय पाप केलं होतं मी... म्हणून आज माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्याच प्रेयसीने माझ्यावर एवढे आरोप केले. का माझं म्हणणं एकदाही ऐकून घेतलं नाही... का??? का????? का या वेदना माझ्या वाट्याला आल्याय? मी सगळं काही सहन करू शकतो पण इशिताचा राग नाही सहन करू शकत आणि ती माझ्यापासून दूर जाणं तर अजिबातच नाही सहन होणार मला. देवा का माझ्या आयुष्यात एवढा गुंता वाढवून ठेवला?" कबीर आरशात बघून एकटाच बोलत होता आणि देवालाही जाब विचारत होता.

इशिता त्याच्यावर रागावून निघून गेल्यामुळे तो सैरभैर झाला होता. त्याला त्याचं सर्वस्व गमावल्या सारखं वाटत होतं. तो एकटक आरशात बघत होता त्याचवेळी सान्वी आत आली. तिची त्याच्याशी बोलायची काय पण त्याच्याकडे बघायची पण हिम्मत होत नव्हती. तरी सुद्धा घाबरत तिने त्याला आवाज दिला.

"तुम्हाला खाली जेवायला बोलावलं आहे." सान्वी म्हणाली तसं त्याने तिच्याकडे वळून पाहिलं तर तिला त्याच्या नजरेत राग दिसला. तो राग बघूनच ती घाबरली आणि खाली गेली. ती गेल्यावर सविताने दोन वेळा कबीरला हाक मारली तेव्हा कुठे कबीर खाली जेवायला गेला.

जेवणातले सगळे पदार्थ सान्वीने बनवले होते, कबीरने जेवायला सुरुवात केली तेव्हा सान्वीचं लक्ष त्याच्याकडेच होतं. तो आपल्या जेवणाचं कौतुक करेल असं तिला वाटलं होतं पण कबीर एका शब्दानेही काही बोलला नाही. तो जेवण फक्त पोटात ढकलायचे म्हणून ढकलत होता. तो काय खातोय याकडे सुद्धा त्याचं लक्ष नव्हते तर त्याला ती जेवणाची चव तरी कशी कळणार होती. तो काहीच बोलत नाही हे बघून सविताने त्याला विचारलं.

"कबीर, खीर कशी झाली आहे आणि अळूवडी? तुला आवडते ना म्हणून आज सान्वीने अळूवडी केली आहे. तुला आवडली का?" सविताने एवढं उत्सुकतेने विचारलं पण कबीरच्या चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हलली नाही. तो काहीच बोलला नाही म्हणून सविताने परत एकदा विचारलं तेव्हा त्याने फक्त 'छान' असं एका शब्दात उत्तर दिले. पण त्या आवाजात सुद्धा एक वेगळीच गुढता होती. जरा सुद्धा उत्साह नव्हता त्यामुळे सान्वीला खुप वाईट वाटले.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all