Login

अशी जुळली गाठ. भाग -९

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ९

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

"कबीर रूममध्ये आला आणि तो इशिताला फोन करू लागला पण इशिता त्याचे काॅल घेतच नव्हती. तो खुप वैतागला होता. तो जितक्या वेळा फोन करत होता तितक्याच वेळा ती फोन कट करत होती. शेवटी तिनेही वैतागून त्याचा फोन घेतला.

"मी सारखा सारखा फोन कट करतेय, याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाही, एवढी साधी गोष्टही तुला कळत नाही का!" इशिता चिडून बोलली.

"प्लीज एकदा माझं ऐकून घे. तू जर माझं काही ऐकलं नाही तर नेमकं काय घडलंय हे तुला कसं कळेल!" कबीर म्हणाला.

"काहीही घडलं असेल मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं इथेच विषय संपला. त्यामुळे इथून पुढे मला फोन करायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव कबीर, घरात मी एकटी नाहीये... माझे आई बाबा असतात. तुझ्यामुळे मी अडचणीत यायला नको." इशिता म्हणाली.

"इथून मागे रात्र रात्र जागून माझ्याशी फोनवर बोलायची तेव्हा नाही कधी तू अडचणीत आली, मग आता कशी अडचणीत येशील!" कबीर.

"इथून मागची गोष्ट वेगळी होती, जरी आई बाबांना कळलं असतं तर मी तुझ्याबद्दल सांगितलं असतं पण आता काय सांगू त्यांना?" इशिताच्या या प्रश्नाचे उत्तर कबीरकडेही नव्हते. त्याने फोन ठेवला आणि मागे वळला तोच समोर सान्वी होती. आता सगळा राग तो तिच्यावर काढू लागला.

"हे सगळं फक्त तुझ्यामुळे होतंय, का आलीस तू माझ्या आयुष्यात? काय गरज होती तुला माझ्याशी लग्न करायची? का नकार दिला नाहीस तू?" कबीर चिडून बोलला. त्याचा राग आणि तो चिडका आवाज बघून ती खुप घाबरली. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. फक्त डोळ्यांत आसवं तेवढी जमा झाली होती.

कबीर रागाने रूमच्या बाहेर जाऊ लागला तोच तिने त्याला अडवले.

"प्लीज असं डोक्यात राग घालून कुठे जाऊ नका. बाहेर आई बाबा बसले आहेत, त्यांनी तुम्हाला यावेळी बाहेर जाताना पाहिलं तर घरात वाद होतील." सान्वी थरथरत्या आवाजात बोलली. तो अजूनही तिच्याकडे रागाने बघत होता. तिची तर त्याच्याकडे बघायची हिम्मतच होत नव्हती.

"मला माहितीये हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालंय, त्यामुळेच तुम्हाला एवढा त्रास होतोय. तुम्ही सांगा ना मी तुमचा राग घालवायला काय करू! तुम्ही सांगाल ते मी करीन." सान्वी म्हणाली.

"खरंच मी सांगेल ते ते करशील तू?" आता कबीरने राग आवरला आणि शांतपणे तिला विचारलं.

"हो तुम्ही सांगा फक्त काय करू मग मी लगेच करते." सान्वी म्हणाली.

"मग कायमची माझ्या आयुष्यातून निघून जा!" कबीर म्हणाला तसं तिच्या पायाखालची जमीन सरकली. तो असं काही म्हणेल हा विचारच तिने केला नव्हता. आता तिला तिची बाजू मांडणं गरजेचं वाटलं म्हणून तिने स्वतःला खंबीर करत बोलायला सुरुवात केली.

"ते आता शक्य नाही, आता आपलं लग्न झालंय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुमच्या नावंच मंगळसूत्र मी गळ्यात घातलंय. अग्नीच्या साक्षीने तुमच्या सोबत सातफेरे घेतले आहे. मग अशी कशी मी निघून जाऊ." सान्वी घाबरली होती तरी सुद्धा ठामपणे बोलत होती.

"मी हे सगळं काहीच मानत नाही, मला डिव्होर्स हवा आहे. तेव्हा चुपचाप काही न बोलता डिव्होर्स द्यायचा समजलं." कबीरने डिव्होर्सचा विषय काढला तसं ती पुर्ण हादरली. तरी पण ती ठामपणे ती त्याला जाब विचारायला उभी राहिली.

"जर तुम्हाला डिव्होर्सच हवा होता तर लग्नाला तरी कशाला तयार झालात, तेव्हाच नाही म्हणायचं होतं ना! माझ्या आयुष्याचं असंही वाटोळं होणार होतं आणि तसंही होणारच होतं. ते काही नाही, मी तुम्हाला डिव्होर्स देणार नाही." सान्वी पण आता हट्टाला पेटली होती. तिचाही आवाज चांगलाच चढला. पण कबीरला ते अजिबात नाही आवडलं. त्याने तिच्या दंडाला धरलं आणि तो जोरात दाबला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून रागाने बघू लागला.

"एक दिवस झाला नाही तुला इथे येऊन, नाही तर तुझी एवढी हिंमत वाढली. कोण समजतेस कोण तू स्वतःला!" कबीर रागाने म्हणाला. तसं तिने जोरात त्याच्या हाताला हिसका दिला आणि तिचा हात सोडवून घेतला.

"मी बोलणार, कारण माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला वाटत असेल मी गावाला राहिलेली आहे त्यामुळे मी साधी गरीब आहे. पण तसं काही नाहीये. मला माझ्या अस्तित्वासाठी बोलणं गरजेचं आहे. मी काय तुम्हाला जबरदस्ती केली नव्हती माझ्याशी लग्न करा म्हणून. आपण डिव्होर्स घेतल्यानंतर काय होईल याचा विचार करा जरा, तुम्हाला लोक काहीच नाही म्हणणार पण हा समाज माझ्याकडे बोटं दाखवायला मोकळा होईल. त्यांना काय चर्चेला अजून एक विषय मिळेल. एकाशी लग्न ठरलं तर तो लग्नातून पळून गेला आणि दुसऱ्याने केलं तर त्याने डिव्होर्स दिला. म्हणजे माझ्यातच काहीतरी दोष आहे असं म्हणायला लोक मागे पुढे बघणार नाही." सान्वी बोलत होती आणि कबीरला वस्तू स्थितीची जाणीव करून देत होती.

सान्वीच्या बोलण्यावर कबीर बेडवर बसला. आता त्याची तिच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती. कारण ती जे बोलली होती ते कुठे ना कुठे तरी त्याच्या मनाला पटत होतं आणि तो स्वतःलाच दोषी समजू लागला होता. एकाच वेळी दोघींच्या आयुष्याशी आपण खेळतोय असे त्याला वाटत होते. तो काहीच न बोलता उठला आणि बाहेर गेला. यावेळी सान्वीने त्याला अडवलं नाही पण तो गेल्यावर ती खुप रडली आणि तिच्या नशिबालाच दोष देऊ लागली.

बराच वेळ झाला तरी कबीर रूममध्ये आला नाही म्हणून तिने झोपून घेतलं. बराच वेळ झाला तरी तिला झोप लागत नव्हती. रात्री कधीतरी उशिरा तिचा डोळा लागला.

*************

सकाळी सविता हाॅलमध्येच चहा पित होती. त्याचवेळी कबीर तिला गेस्ट रूममधून बाहेर येताना दिसला. तसं तिचा चेहरा पडला. तिने लगेच त्याला आवाज दिला.

"कबीर, हे काय तू गेस्ट रूममध्ये झोपला होता की काय रात्री?" सविताने विचारलं.

"आई, मग काय करायचं होतं मी. जे काही घडलंय ते लगेच स्विकारण्याची माझ्याकडून अपेक्षा करू नका. मी हे अचानक झालेलं लग्न नाही स्विकारू शकत!" कबीरने स्पष्टपणे सांगितले.

"तुम्ही दोघं एकमेकांशी बोललाच नाही, एकत्र राहिलाच नाही तर तुमच्यात सगळं नीट कसं होईल आणि तुमचा संसार कसा सुरळीत होईल?" सविताने विचारलं पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. त्याला समोरून सान्वी येताना दिसली मग तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला.

"साॅरी आई, थोडा उशीरच झाला उठायला!" सान्वी सविता जवळ येताच म्हणाली.

"तुला झोपायलाच उशीर झाला असेल हे समजतंय मला, कबीर रात्री रूममध्ये नव्हता ना!" सविता म्हणाली आणि नेमकं ते विक्रमने ऐकलं आणि तिथूनच ते माघारी फिरले आणि कबीरच्या रूममध्ये गेले.

"कबीर, हे काय ऐकतोय मी... तू रात्री रूममध्ये नव्हतास." विक्रमने रागानेच विचारलं.

"बाबा, ते मी...." कबीर पुढे काही बोलणार तोच त्यांनी हात दाखवून गप्प राहायला सांगितले.

"आज हे घडलं ते शेवटचं, परत या घरात मला असल्या गोष्टी कानावर पडायला नको आहे. सान्वी तुझी लग्नाची बायको आहे हे अंतिम सत्य आहे ही गोष्ट लक्षात ठेव." विक्रम रागाने बोलले आणि निघून गेले. ते गेल्यावर कबीर खिडकीत उभा राहिला. त्याच्या कानात सारखं सारखं त्यांचं तेच वाक्य घुमत होते.

"सान्वी तुझी लग्नाची बायको आहे."

कबीर आता पुरता अडकला होता, तो इशिताला सोडू शकत नव्हता आणि सान्वीला स्विकारू शकत नव्हता. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची अवस्था झाली होती.

सारखा सारखा त्याच गोष्टीचा विचार करून त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. आता कामात गुंतल्या शिवाय काही डोक्यातले विचार जाणार नाही हा विचार करून तो फ्रेश होऊन तयार होऊन ऑफिसला गेला. तिथे गेल्यावर केबिनमध्ये गेला आणि समोर इशिताला बघून त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.

"इशिता, मला वाटलंच होतं तू माझ्याशिवाय राहूच शकणार नाही. तुला माझी आठवण येत होती म्हणूनच तू आलीस ना.... आय एम सो हॅपी इशिता." कबीर म्हणाला आणि तिला मिठी मारायला पुढे झाला तसं तिने त्याला मागे ढकललं.

"मी इथे काही तुझ्यासोबत रोमान्स करायला नाही आली आहे. हे लेटर घे आणि बघ. म्हणजे तुला समजेल मी कशासाठी आली आहे ते." इशिता म्हणाली तसं कबीरने लेटर घेतलं आणि त्यावरून नजर फिरवली आणि क्षणात त्याचे डोळे पाणावले.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all