Login

अशी जुळली गाठ. भाग - ११

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ११

डिसेंबर -जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

"काय झालं वहिनी, एवढा कसला विचार करतेय?" सान्वीला विचारात हरवलेलं बघून श्रावणीने विचारलं.

"मला कबीर आवडतात की नाही हे सांगणं कठीण आहे, कारण आमचं जरी लग्न झालं असलं तरी अजून आमच्यात पाहिजे तसा संवाद नाही झालाय... पण मी हे लग्न मनापासून स्विकारले आहे. माझा होणारा नवरा ऐनवेळी लग्नातून निघून गेला. माझं काय होईल, याचा विचारही त्याने केला नाही पण अशा वेळी कबीर पुढे आले आणि त्यांनी माझ्याशी लग्न केलं. भले आई बाबांनी जबरदस्ती केल्यामुळे ते लग्नाला तयार झाले पण त्यांनी लग्न केलं आणि माझं आयुष्य सावरलं हे माझ्यासाठी महत्वाचे आहे." सान्वी बोलत होती त्याचवेळी नेमकं कबीर तिथे आला आणि त्याने तिचं बोलणं ऐकलं. तो एवढं रागाने तिच्याशी बोलला होता तरी सुद्धा तिचं त्याच्याविषयीचं मत ऐकून तो तिच्याकडेच बघू लागला. श्रावणीने कबीरला आलेलं बघताच तिने त्याला आवाज दिला.

"दादा, तू आताच रूममध्ये गेला होता ना मग लगेच परत आलास?" श्रावणीने विचारलं.

"माझा मोबाईल विसरलो होतो इथेच म्हणून तो घ्यायला आलो होतो." कबीर म्हणाला आणि त्याचा तिथेच राहिलेला मोबाईल घेऊन तो परत रूममध्ये गेला.

"वहिनी, तू पण जा आणि दादाशी बोलण्याचा प्रयत्न कर. तुमच्यात आता संवाद होणं खुप गरजेचं आहे." श्रावणी म्हणाली तसं सान्वीने पापण्यांची उघडझाप केली आणि कबीरच्या मागेच रूममध्ये गेली. तिने पाहिलं तर तो बेडवर बसला होता आणि मोबाईल स्क्रोल करत होता. त्याच्याशी काहीतरी बोलायचं म्हणून तिने विषय काढला.

"आज तुमच्यासाठी काय स्पेशल बनवू? म्हणजे तुम्हाला आता काय खायला आवडेल?" सान्वीने हसतच विचारलं.

"तुला हवं ते कर... तसंही मला आवडणाऱ्या गोष्टी मला कधी भेटतच नाही." कबीरचं ते कोड्यातलं बोलणं सान्वीला कळलंच नाही.

"असं का बोलताय तुम्ही?" सान्वीने विचारलं.

"माझ्या एका प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे देशील का?" कबीरने तिला विचारलं तसं ती त्याच्या बाजूला थोडं अंतर ठेवून बेडवर बसली. थोडी घाबरलेलीच होती ती तरीही त्याच्याकडे बघत होती.

"विचारा...." सान्वी.

"तुझं ऋग्वेद सोबत लग्न ठरलं होतं, एवढंच नाही तर तुमचा साखरपुडा सुद्धा झाला होता. तरी सुद्धा तू एवढ्या लवकर ते सगळं कसं काय विसरली? खास करून ऋग्वेदला..." कबीरने विचारलं.

"आमचं लग्न असंही अरेंज मॅरेजच होतं. अगदी प्रेम वगैरे असं काही नव्हतं पण लग्नाआधी आमच्यात बोलणं व्हायचं. ऋग्वेदचं बोलणं नेहमी मला कोरडं कोरडं वाटायचं. पण तेव्हा मी एवढा विचार नव्हता केला आणि त्यांना विसरायचं म्हणाली तर त्यांनी जाताना माझा विचार केला नाही, माझा विश्वासघात करून ते निघून गेले आहे. अशा माणसाला आठवून मी का स्वतःला त्रास करून घेऊ." सान्वीचं ते स्पष्ट आणि परखड बोलणं कबीरच्या मनाला भावलं.

"तो तुझ्याशी आधीपासूनच कोरडेपणाने बोलत होता म्हणजे याचा अर्थ असा की त्याला आधीपासूनच तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं." कबीर म्हणाला.

"तसंही असेल कदाचित पण आता माझ्यासाठी ऋग्वेद हा विषय कायमचा संपला आहे. आता मी सान्वी कबीर भोसले आहे आणि हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे." सान्वी म्हणाली.

"मी तुला सोडून जाईल की काय याची तुला भिती नाही वाटत का?" कबीरने विचारलं.

"नाही वाटत... कारण माझा अजूनही लग्न संस्थेवर विश्वास आहे." सान्वी म्हणाली.

"तरी सुद्धा ऋग्वेदने तो विश्वास मोडलाच ना मग मी का नाही मोडू शकत?" कबीरने सरळ तिच्या डोळ्यात बघत विचारलं. त्याच्या त्या प्रश्नाने तिच्या पोटात खड्डाच पडला आणि त्याने डिव्होर्सचा विषय काढला होता ते तिला आठवलं. त्यामुळे ती काहीच बोलू शकली नाही. कबीर उठला आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. इशिता बद्दल सान्वीला सांगावं की काय असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण ती ही गोष्ट आपल्या आई बाबांना सांगेल की काय याचीही त्याला भिती वाटू लागली आणि त्याच्या मनात आलेला विचार त्याने तसाच दाबून ठेवला.

सान्वी सुद्धा शांतपणे त्याच्या बोलण्याचा विचार करत होती. त्याचवेळी तिच्या बाबांचा फोन आला आणि खुश होऊन तिने तो रिसिव्ह केला.

"हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही?" सान्वीने विचारलं. बोलताना तिचा कंठ दाटून आला होता. तिचा आवाज ऐकताच कबीर मागे वळून तिच्याकडे बघू लागला तर तिचे डोळे पाणावले होते पण चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ती आपल्या आई बाबांशी भरभरून बोलत होती. मध्येच डोळ्यातलं पाणी पुसत होती. कबीर तिचं फोनवरचं बोलणं ऐकत होता. फोन ठेवल्यावर तिने कबीरकडे हलकसं हसत पाहिलं.

"बाबांनी आपल्या दोघांना बोलावलं आहे. याल ना तुम्ही?" सान्वीने विचारलं आणि खुप आशेने त्याच्याकडे बघू लागली.

"तू जा... मला जमेल असं नाही वाटत!" कबीरने नकार दिला तसं तिचा चेहरा उतरला पण ती काहीच बोलली नाही. पण आज त्यांच्यात थोडा का होईना संवाद झाला होता त्यामुळे तेवढं तरी तिला समाधान वाटत होते.

स्वयंपाकाची वेळ होऊन गेली हे सान्वीच्या लक्षात येताच ती घाईघाईने किचनमध्ये गेली. तर तिथे सविता आणि विमल होत्या. ती घाईघाईने आत येताच सविताशी बोलू लागली.

"साॅरी आई, मला यायला खुप उशीर झाला. ते...." सान्वी पुढे काही बोलणार तोच सविताच बोलू लागली.

"अगं ठिक आहे ना, एवढं काही नाही आणि तू रोजच जेवण बनवायला हवं असं काही नाहीये." सविता म्हणाली तसं सान्वी हलकसं हसली आणि तशीच शांत उभी राहिली. सविताने तिच्याकडे पाहिलं आणि तिला काहीतरी विचारावं असं वाटू लागलं.

"सान्वी, कबीर बोलला का गं तुझ्याशी?" सविताने काळजीने विचारलं.

"हो..." सान्वीने एकाच शब्दात उत्तर दिले. मग त्यावर सवितानेही जास्त प्रश्न विचारले नाही. सान्वी पण लगेच तिला मदत करू लागली.

सगळेच एकत्र डायनिंग टेबल वर येऊन जेवायला बसले होते. विक्रम कबीर कडे बघत बोलू लागले.

"सान्वीच्या बाबांचा फोन आला होता, त्यांनी तुला आणि सान्वीला बोलावलं आहे तर तुम्ही दोघंही परवा जाऊन या." विक्रम म्हणाले तसं कबीर सान्वीकडे रागाने बघू लागला. त्याला वाटलं की तिनेच त्यांना सांगितले आहे.

"बाबा, पण मला खरंच वेळ नाहीये." कबीर म्हणाला.

"परवा रविवार आहे कबीर आणि दोन दिवस गेलास तर काही फरक पडणार नाही. मी आहे इथलं सगळं सांभाळून घ्यायला. तेव्हा आता मला यावर चर्चा नकोय." विक्रम म्हणाले तसं कबीर शांतच बसला. विक्रम हल्ली त्याचं काहीच ऐकत नव्हते हे त्याला कळलं होतं. त्यामुळे आता आपण नकार देण्यात काहीच अर्थ नाही हे त्याला कळून चुकलं होतं.

"अहो sss मी काय म्हणते ऐका ना.... फक्त या दोघांनी जाण्यापेक्षा आपणही जाऊ, निलिमा माझ्यावर रागावली आहे. ती माझे फोन सुद्धा घेत नाही. प्रत्यक्ष जाऊन बोललो तर तिचाही राग घालवता येईल आणि सान्वीच्या आई बाबांना पण भेटणं होईल, आपण सगळे गेलो तर त्यांना आनंदच होईल." सविता म्हणाली.

"बरं ठिक आहे तू म्हणतेस तर तसं करू, तिथे गेल्यावर त्या ऋग्वेदचं नेमकं काय झालं ते ही कळेल." विक्रम म्हणाले. मग पुढे शांततेत सगळ्यांचं जेवण झालं.

कबीर रूममध्ये गेला आणि सान्वीची वाट बघू लागला. ती  येताच तो तिच्याकडे रागाने बघू लागला.

"मी तुझ्यासोबत यायला नाही म्हणालो तर लगेच बाबांना सांगायला गेलीस ना... तुला जर असं वाटत असेल ना तू आई बाबांचं मन जिंकून मला प्रत्येक गोष्टीत तुझ्या तालावर नाचवशील तर तसं नाही होणार." कबीरच्या रागाचा भडका चांगलाच उडाला होता पण यावेळी सान्वी घाबरली नाही तर हसू लागली. तिला हसताना बघून कबीरचा राग अजूनच वाढला.

"मी एवढा रागाने बोलतोय आणि तुला हसायला येतंय, मी काय तुला जोकर वाटतोय का!" कबीर अजूनच रागाने बोलला.

"जोकर नाही पण खरं सांगू का तुम्हाला नीट रागवताही येत नाही आणि रागावणं हा तुमचा मुळ स्वभाव नाहीये. एवढं तरी मी या दोन तीन दिवसांत तुम्हाला ओळखलं आहे." सान्वी म्हणाली.

"माझा स्वभाव बरं तुला दोन दिवसांत ओळखता आला, मग ऋग्वेदच्या मनात काय आहे ते का नाही समजलं तुला!" कबीरने ऋग्वेदचं नाव घेताच सान्वीचा चेहरा उतरला. तिच्या डोळ्यात पाणी आले पण मोठ्या मुश्किलीने ते अडवलं.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all