अशी जुळली गाठ. भाग - १२
"तुम्ही आता मला या गोष्टीवरून अजून किती दिवस बोलत राहणार आहात. ते निघून गेले यात माझी काहीच चुक नव्हती आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ऋग्वेद माझी चाॅईस नव्हते. मी माझ्या आई बाबांनी आणलेल्या स्थळाला डोळे झाकून होकार दिला होता. मी ऋग्वेद वर नाही तर माझ्या बाबांवर विश्वास ठेवला होता. पण पुढे असं काही होईल हे त्यांनाही माहिती नव्हते." सान्वी म्हणाली. कबीरने तिच्याकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात पाणी होते. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्यालाही वाईट वाटले.
"साॅरी, तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. मी सहजच बोलून गेलो. इथून पुढे मी कधीच त्याचा विषय तुझ्यासमोर काढणार नाही." कबीर म्हणाला.
"तेच बरं होईल, मला त्यांचं नावही नाही ऐकायचं." सान्वी म्हणाली आणि सोफ्यावर येऊन डोळे बंद करून झोपून घेतलं. तिला एसीची सवय नव्हती त्यामुळे पुर्ण अंगावर पांघरून घेतले. अगदी तोंड सुद्धा झाकून घेतले त्यामुळे तिला खरंच झोप लागली आहे की नाही हे कितीतरी वेळ कबीरला कळलेच नाही. तो बेडवर झोपला आणि पडल्या पडल्या मोबाईल बघू लागला. मोबाईल हातात घेतल्यावर त्याला इशिताची आठवण येणं सहाजिकच होतं.
कबीरने व्हाट्सअप ओपन केलं आणि तिला गुड नाईटचा मॅसेज केला तर त्याच्या मॅसेज समोर एकच टिक येत होती. त्यामुळे इशिका झोपली असेल हा विचार करून त्याने मोबाईल ठेवून दिला आणि डोळे बंद करून घेतले. त्या बंद डोळ्यांच्या आत मनात काय चालू होते ते त्याचं त्यालाच माहीत होते.
****************
सकाळी उठल्यावर सान्वी शांतच होती. ते कबीरच्या लक्षात आले. तेव्हा त्याने लगेच तिला विचारलं.
"माझ्यावर रागावली आहेस का तू?" कबीरने शांतपणे विचारलं. त्याचं असं विचारणं तिच्या मनाला सुखावून गेलं पण तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही.
"मी रागावले तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे!" सान्वी म्हणाली.
"मला नाही फरक पडणार पण तुला नक्की पडेल. उद्या आपण तुझ्या आई बाबांना भेटायला जाणार आहोत. त्यांनी जर तुला असं गप्प गप्प पाहिलं तर त्यांना काय वाटेल." कबीर म्हणाला.
"ते माझं मी बघून घेईन. तुम्ही नका टेन्शन घेऊ." सान्वी म्हणाली आणि सरळ बाहेर गेली. ती गेल्यावर कबीरने डोक्यालाच हात लावला.
"या मुली खरंच अशक्य आहे बाबा....अ...श....क्य." कबीर स्वतःशीच बोलला. त्यानंतर त्याने रात्री इशिताला पाठवलेल्या मॅसेजची त्याला आठवण झाली म्हणून त्याने तो पाहिला तर अजूनही एकच टिक दिसत होती. ते बघून कबीरला वेगळीच शंका आली आणि त्याने मोबाईल ठेवला आणि आवरून खाली गेला. तो खाली येताच सान्वी घाईघाईने त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आली. तसं तो हसून तिच्याकडे बघू लागला.
"तू तर रागावली होतीस ना... मग ब्रेकफास्ट कसा काय आणला?" कबीरने हसतच विचारलं.
"तुम्हाला नको असेल तर द्या मी परत घेऊन जाते." सान्वी म्हणाली. ती ही काही कमी नव्हती. तिने कबीरला जशास तसे उत्तर दिले. मग तोही जास्त काही न बोलता सरळ ब्रेकफास्ट करू लागला.
ब्रेकफास्ट करताना त्याने परत एकदा मोबाईल बघितला तर अजूनही इशिताला पाठवलेल्या मॅसेजची त्याला एकच टिक दिसत होती. आता त्याला इशिताची काळजी वाटू लागली. त्याने लवकर ब्रेकफास्ट संपवला आणि ऑफिसला गेला. इशिता अजून आलेली नव्हती. मग त्याने तिला फोन केला आणि तिच्या फोनची एक रिंग वाजताच तो बिझी सांगू लागले. कबीरने नाराज होत मोबाईल ठेवला आणि कामाचं बघू लागला.
थोड्या वेळातच इशिता आली आणि तिचं काम करू लागली. कबीरशी एक शब्दही ती बोलली नाही. कबीरला खुप वाईट वाटले.
"तू आता माझ्याशी बोलणार सुद्धा नाहीये का? आणि माझा नंबर पण ब्लॉक करून टाकला आहे. मी तुला एवढा नकोसा झालोय का!" कबीर दुखऱ्या आवाजात म्हणाला.
"ते काय आहे ना सर, मी इथे गप्पा मारायला नाही तर काम करायला येते आणि नंबर ब्लॉक करण्याचं म्हणाल तर ज्या माणसाने आपल्याला आयुष्यातून ब्लाॅक केलेय त्याचा नंबर तरी कशाला ठेवायचा." इशिता म्हणाली.
"काय बोलतेय तू हे, आणि हे काय कबीर वरून डायरेक्ट सर....?" कबीर म्हणाला.
"प्लीज मला माझं काम करू द्या, मला आता तुमच्याशी बोलायला अजिबात वेळ नाहीये." इशिता म्हणाली आणि सरळ त्याला इग्नोर करत मुद्दाम तिचं काम करू लागली पण कबीरशी असं तोडून बोलताना तिच्या मनाला किती यातना होत होत्या हे तिचं तिलाच माहीत होतं.
कबीर आणि इशिता काम करत असताना तिथे विक्रम आले आणि त्यांनी त्या दोघांना आवाज दिला.
"कबीर, तुम्हाला दोघांना आता बदलापूरच्या साईटवर जावं लागणार आहे. तिथे एक प्राॅब्लेम झाला आहे, तुम्ही गेले तर तो लवकर साॅल्व्ह होईल." विक्रम म्हणाले तसं ते दोघेही एकाच वेळी त्यांच्याकडे बघू लागले.
"सर, साॅरी मी नाही जाऊ शकत तिकडे. तुम्ही माझ्या ऐवजी दुसरं कोणाला तरी पाठवाल का कबीर सरांसोबत." इशिता म्हणाली.
"इशिता, तुला अचानक काय झालयं? तू कामापासून अशी पळ काढत नाही आणि कबीर जेव्हा कुठे जाईल तेव्हा तू त्याच्या सोबत असते मग आताच का तू जायला नाही म्हणतेय?" विक्रमने विचारलं.
"माझी तब्येत जरा बरी नाहीये. डोकं दुखतंय!" तिने खोटंच सांगितलं.
"डोकंच दुखतंय ना मग एखादी टॅबलेट वगैरे घे, वाटेल बरं... तिथला प्राॅब्लेम तू सोडून दुसरं कोणी नीट सोडवू शकणार नाही म्हणून तुला सांगतोय." विक्रम म्हणाले तसं इशिताचा नाईलाज झाला. तिने इच्छा नसतानाही होकार दिला.
थोड्या वेळातच कबीर आणि इशिता बदलापूरला जायला निघाले. गाडीत दोघेही शांत होते. कबीर अधूनमधून तिच्याकडे बघत होता पण ती काही केल्या त्याच्याकडे बघत नव्हती. आता कबीरला काही करून तिला पुर्ण सत्य सांगायचं होतं आणि ही तिच वेळ होती हे ही त्याला माहित होते पण इशिता आपलं बोलणं ऐकून घेणार नाही हे सुद्धा त्याला चांगलंच माहीत होतं. मग त्याने त्याच्या एका मित्राला काॅल केला आणि बरोबर लग्नाचा विषय काढून गावी गेल्यावर तिथे काय काय झालं ते त्याला सांगितले. त्याच्या बाबांनी त्याला कशी जबरदस्ती केली हे सुद्धा सांगितले. ते बोलणं ऐकून इशिताला धक्काच बसला. त्याने फोन ठेवल्यावर ती त्याच्याकडे बघू लागली.
"कबीर, तिकडे गेल्यावर एवढं सगळं झालं आणि तू मला काहीच नाही सांगितले." इशिता म्हणाली.
"कसं सांगणार होतो, तू माझं काहीच ऐकायला तयार नव्हती. मला खरंच हे लग्न करायचं नव्हतं पण बाबा मला असं बोलले म्हणजे एक प्रकारे त्यांनी मला त्यांच्या प्राॅपर्टी मधून बेदखल केल्यासारखेच होते ते आणि त्यावेळी जर मी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे त्यांना सांगितले असते तरी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता. उलट त्यांनीच मला इथून मागे का नाही सांगितले असं विचारलं असतं." कबीर म्हणाला.
"कदाचित तू बोलतोयस ते बरोबर असेल पण आता काहीच होऊ शकत नाही." इशिता म्हणाली.
"पण तू माझी मैत्रीण म्हणून तरी राहू शकतेस ना!" कबीर म्हणाला. पण त्यावर ती काहीच बोलली नाही.
थोड्या वेळाने ते दोघेही बदलापूरच्या साईटवर पोहचले. आणि त्यांनी तिथे सगळीकडे निरिक्षण केले. बदलापूरच्या साईटवरचं काम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ चाललं होतं. इशिताने तिथे आल्यावर लगेच तिच्या कामाला सुरुवात केली. ती कामगारांना प्रत्येक गोष्ट छान समजून सांगत होती. कामगारांना समजावताना आणि क्लायंटची नाराजी दूर करताना संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही.
घरी निघताना आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती.
कबीर गाडी चालवत होता. इशिता शेजारी बसून बाहेर पाहत होती. दोघांमध्ये शब्दांची नाही, तर विचारांची गर्दी होती. पुढे जात असताना अचानक गाडी एक जोरात धक्का देऊन थांबली.
कबीर गाडी चालवत होता. इशिता शेजारी बसून बाहेर पाहत होती. दोघांमध्ये शब्दांची नाही, तर विचारांची गर्दी होती. पुढे जात असताना अचानक गाडी एक जोरात धक्का देऊन थांबली.
"काय झालं?" इशिताने विचारलं. तसं कबीरने पुन्हा स्टार्ट करून पाहिली पण झालीच नाही. त्याने खोल श्वास घेतला.
"बहुतेक इंजिन ओव्हरहिट झालंय." कबीर म्हणाला. त्याचवेळी बाहेर पावसाच्या सरी कोसळू लागल्या. आजूबाजूला रस्ता निर्मनुष्य होता. नेटवर्क पण नेमकं मध्येच गायब झालं काही क्षण दोघेही गप्प होते. गाडी स्टार्ट होत नव्हती म्हणून दोघांनाही टेन्शन आले होते.
इकडे घरी उद्या आई बाबांना भेटायला जायचं म्हणून सान्वी खुप खुश होती. तिने तशी तयारी पण केली होती. तिच्याकडे कबीरचा नंबर नव्हता मग तिने श्रावणी कडून त्याचा नंबर घेतला आणि त्याला फोन करू लागली. त्याचा फोन लागत नव्हता म्हणून ती खुप काळजीत होती. ती सारखी सारखी कबीरला फोन लावत होती आणि घड्याळात बघत होती.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा