Login

अशी जुळली गाठ. भाग - १३

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - १३

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

कबीरचा फोन लागत नव्हता म्हणून सान्वी खुपच अस्वस्थ होती. तिच्या मनात काही बाही विचार येत होते. तिने बराच वेळ फोन केल्यावर सुद्धा फोन लागेना मग ती शेवटी बाहेर गेली आणि सविताला आवाज दिला.

"आई, खुप उशीर झालाय पण हे अजूनही घरी आले नाही, मी कधीपासून फोन करतेय पण त्यांचा फोनही लागत नाहीये." सान्वीने काळजीने सांगितले. एकतर तिच्या लग्नात जे काही झाले त्यामुळे ती अजूनच घाबरली होती. ऋग्वेद जसा निघून गेला, तसं कबीरही रागाने कुठे निघून जाईल की काय याची तिला भिती वाटत होती. म्हणून ती घाईघाईने सविताला सांगायला आली होती. तिने सविताला सांगितल्यावर तिलाही कबीरची काळजी वाटू लागली.

"हो गं... बराच उशीर झालायं, रोज तर तो यावेळी घरी येत असतो पण आज अजून नाही आला. हे ही आले नाही अजून, तू थांब मी यांनाच फोन करून बघते." सविता म्हणाली आणि विक्रमला फोन करू लागली. तेवढ्यात सान्वीला ते येताना दिसले. तसं तिने सविताला सांगितलं.

"आई, ते बघा... बाबा आलेत, पण ते एकटेच आहे. हे नाहीये त्यांच्यासोबत." सान्वी म्हणाली. तसं सविता घाईघाईने पुढे गेली आणि त्यांना विचारू लागली.

"काय हो तुम्हाला यायला एवढा उशीर कसा झाला? आणि कबीर कुठे आहे त्याचा फोन का नाही लागत?" सविताने काळजीने विचारलं. आता विक्रम काय सांगताय याकडेच सान्वीचं लक्ष होतं.

"कबीर साईटवर गेला आहे. तिकडे बहुतेक रेंजचा प्राॅब्लेम असेल त्यामुळे फोन लागत नसेल. तो येईलच त्याचं काम झाल्यावर, नको टेन्शन घेऊ." विक्रम म्हणाले तसं सान्वीचा जीव भांड्यात पडला.

इकडे कबीर कधीपासून गाडी स्टार्ट करत होता पण ती होतच नव्हती. बाहेर हलकासा पाऊस चालूच होता. अजून एवढा अंधार पडला नव्हता. कबीर परत परत गाडी स्टार्ट करत होता पण ती होतच नव्हती. ते बघून इशिताला पण टेन्शन आलं.

"कबीर, काय झालयं नेमकं? गाडी का चालू होत नाहीये?" इशिता म्हणाली.

"आता नीट चेक करून बघावं लागेल, त्याशिवाय काही चालू होणार नाही असं वाटतंय." कबीर म्हणाला आणि गाडीतून बाहेर आला आणि त्याने बोनट उघडलं आणि इंजिन बघू लागला. त्याचवेळी इशिता पण बाहेर आली आणि तो काय करतोय ते बघू लागली. दिवसभर दोघेही थकले होते त्यामुळे दोघांनाही घरी जायची ओढ लागली होती. म्हणून कधी एकदा गाडी स्टार्ट होतेय असं त्यांना झालं होतं.

पाऊस पडत असल्यामुळे दोघेही चांगलेच ओले झाले होते. कबीरचं लक्ष इशिताकडे गेलं तर तिचे केस ओले होऊन पावसाचं पाणी तिच्या केसांच्या बटांतून खाली येत ते गालावरून मानेवर ओखळत होतं. तिला ओलं चिंब भिजलेली बघून त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. त्याने गाडीचं बोनट खाली केलं आणि तिच्याकडे भान हरपून बघू लागला. तो तिच्याकडे बघण्यात इतका गुंग झाला होता की पाऊस पडतोय याचे सुद्धा त्याला भान नव्हते.

फक्त कबीरच नाही तर यावेळी इशिताची नजर सुद्धा तिला दगा देत होती. सगळं काही विसरून ती ही भिजलेल्या कबीरकडे एकटक बघत होती.

क्षणभर दोघेही तसेच एकमेकांकडे बघत उभे राहिले आणि एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. आता पावसाचा आवाज सुद्धा त्यांच्या श्वासांच्या आवाजाशी मिसळून गेला होता. बोलायचं खूप काही होतं, पण शब्द ओठांपर्यंत येऊन थांबत होते.

थोड्या वेळातच इशिताने नजर वळवायचा प्रयत्न केला, पण कबीरच्या नजरेतली ती ओढ तिला अजूनही तिथेच रोखून धरत होती. तिचं हृदय वेगाने धडधडू लागलं होतं जसं काही तो आवाज कबीरलाही ऐकू जाईल की काय याची तिला भीती वाटत होती.

कबीर एक पाऊल पुढे आला. फक्त एक पाऊल… पण त्या पावलात त्याचं सगळं धैर्य, सगळं अपराधीपण आणि  प्रेम एकवटलेलं होतं.

"इशिता…" त्याच्या ओठांवरून तिचं नाव बाहेर पडलं. त्याचा तो प्रेमळ आवाज ऐकताच तिच्या अंगावर काटा आला. तिने मान खाली घातली... पण डोळ्यांत साठलेली भावना ती लपवू शकली नाही. पावसाच्या थेंबांत मिसळून तिच्या डोळ्यांतलं पाणी गालावरून ओघळलं. तिचे अश्रू पावसाच्या पाण्यात विरून गेले.

कबीर परत पुढे एक पाऊल गेला आणि त्याची नजर तिच्या ओठांवर स्थीर झाली. तिच्या नाकावरूनही पावसाचं पाणी ओघळत होतं. त्याने तिला स्पर्श करायला हात पुढे केला पण त्याचवेळी अचानक त्याला आठवलं, तो आता कुणाचा तरी नवरा आहे. ही जाणीव थंड गारांच्या पावसासारखी त्याच्या अंगावर जोरात आदळली. तो क्षणभर मान खाली घालून उभा राहिला. तो काही बोलणार तेवढ्यात परत थांबला. कारण त्याला तिच्याशी काही बोलायचा हक्कच उरला नव्हता.

पावसाचे थेंब दोघांवर पडत होते, पण इशिताला जाणवत होतं. आज ती पावसात नाही, तर त्याच्या आयुष्यातून ओलसरपणे बाहेर पडत होती. ती एक पाऊल मागे सरकली आणि त्याच्याकडे बघू लागली.

"काही गोष्टी मनातच सुंदर असतात कबीर, त्या वास्तवात आणल्या की त्या पाप होऊन जातात." इशिता म्हणाली आणि सरळ गाडीत जाऊन बसली.

कबीर तिथेच उभा राहिला, आता त्यालाही गहिवरून आले होते. त्या पावसाच्या थेंबात त्याचेही अश्रू धुवून निघत होते. कसं बसं त्याने ते आवरले आणि परत गाडीत बसून परत गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी गाडी स्टार्ट झाली. गाडी स्टार्ट होताच दोघांनीही एक दिर्घ श्वास घेतला आणि समोर बघू लागले. दोघेही पावसात भिजल्यामुळे आता थंडीही वाजत होती. मग कबीरने गाडीतील हिटर ऑन केला. तेव्हा छान ऊब येऊ लागली.

दिवसभर थकल्यामुळे आणि गाडीत हिटरच्या ऊबेमुळे इशिताला छान झोप लागली. कबीर शांतपणे ड्राईव्ह करत होता. इशिताचं घर आल्यावर त्याने तिला उठवलं. तेव्हा ती पण उठली आणि त्याच्याकडे बघू लागली.

"साॅरी, हल्ली झोप लागत नाही त्यामुळे कधी डोळा लागला ते कळलेच नाही." इशिता म्हणाली. तिच्या आवाजात एक विलक्षण उदासिनता होती. ती कबीरला जाणवली होती. त्या उदासीनतेचं कारण आपण आहोत ही भावना त्याच्या मनात होतीच त्यामुळे त्याला स्वतःचाच राग येत होता.

"इट्स ओके पण आता तुझं घर आलंय, त्यामुळे तुला उतरावं लागेल." कबीर म्हणाला.

"थॅंक्यू!" ती एवढंच बोलली आणि गाडीतून उतरून सरळ घरी गेली. ती गेल्यावर कबीर गाडीत बसला तोच विक्रमचा फोन आला. मग त्याने तो रिसिव्ह केला.

"कबीर, अरे कुठे आहेस तू? आम्ही सगळे कधीपासून तुझी वाट पाहतोय तुझा फोनही लागत नव्हता, आता कुठे तो लागलाय." विक्रम म्हणाले.

"बाबा मी येतोय थोड्या वेळातच. घरी आल्यावर बोलू आपण." कबीर म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. तो येतोय हे ऐकून त्यांचाही जीवात जीव आला.

"काय हो काय म्हणाला कबीर, कुठे आहे तो?" विक्रमने फोन ठेवल्यावर सविताने काळजीने विचारलं.

"येतोय म्हणाला थोड्या वेळातच, म्हणजे येईल तो... नको काळजी करू." विक्रम म्हणाले. मग सगळेच कबीरची वाट बघू लागले.

काही वेळाने कबीर घरी आला. त्याला घरी यायला बराच उशीर झाला होता. तरी सुद्धा सगळेच त्याच्यासाठी जेवायला थांबले होते. कबीरला आलेलं बघताच सान्वी धावतच पुढे गेली. त्यानेही त्याच्या हातातली बॅग तिच्याकडे दिली.

"तुम्हाला एवढा उशीर कसा काय झाला? आणि तुमचा फोन का लागत नव्हता? मी कितीतरी वेळ तुम्हाला काॅल करत होती." सान्वीने विचारलं. खरं तर त्याला तिचं ते विचारणं अजिबात आवडलं नव्हतं पण समोर विक्रम बसले होते त्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता.

"गाडी अचानक बंद पडली होती. त्यामुळे उशीर झाला आणि पावसामुळे नेटवर्क पण नव्हतं म्हणून फोनही करता आला नाही." कबीर म्हणाला.

"बरं ठिक आहे, तू व्यवस्थित घरी आला हेच महत्वाचे आहे. जा फ्रेश होऊन ये, आम्ही पण जेवायचं थांबलो आहोत." सविता म्हणाली तसं कबीर आत गेला आणि थोड्याच वेळात फ्रेश होऊन आला.

सगळ्यांची जेवणं झाली. बराच उशीर झाल्यामुळे सगळेच झोपायला गेले. सान्वीला कबीरशी बोलायचं होतं पण त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता त्यामुळे तिनेही काहीच न बोलता झोपून घेतलं.

ठरल्याप्रमाणे सकाळी सगळेच लवकर उठले आणि आवरून सान्वीच्या बाबांच्या घरी जायला निघाले. आता हा प्रवास त्यांच्यासाठी अजून काय घेऊन येणार होता. हे येणारा काळच ठरवणार होता.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"