अशी जुळली गाठ. भाग - १४
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
कबीर, सान्वी आणि सगळे संध्याकाळी चारच्या सुमारास सान्वीच्या बाबांच्या घरी पोहचले. सान्वीचे आई बाबा त्या सगळ्यांची खुप आतुरतेने वाट पाहत होते.
कबीरची गाडी दारासमोर थांबताच सान्वीचे आई बाबा लगबगीने बाहेर आले. सान्वीने गाडीतून खाली उतरताच तिच्या आईला मिठी मारली. तिच्या बाबांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.
"सान्वी, कशी आहेस बाळा?" प्रभाकर पाटीलांनी विचारलं.
"बाबा, मी खुप खुश आहे. तुम्हा सगळ्यांची खुप आठवण येत होती." सान्वी म्हणाली. तिचे डोळे पाणावलेले होते पण चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते बघून तिचे आई बाबा पण खुश झाले.
"विक्रमराव, तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. आज माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो फक्त तुमच्यामुळेच दिसतोय." प्रभाकर पाटील म्हणाले.
"आभार मानून आम्हाला परके करू नका पाटील साहेब, त्यादिवशी सान्वी मध्ये मला माझी मुलगी दिसत होती. त्यामुळे माझं हृदय पिळवटून निघालं होतं, म्हणून मी तो निर्णय घेतला." विक्रम म्हणाले.
"अहो sss आता तुमच्या गप्पा नंतर मारा, पाहुणे प्रवासाने दमले असतील त्यांना आधी आत तर येऊद्या." सान्वीची आई म्हणाली.
"हो हो... या तुम्ही आत." प्रभाकर पाटील म्हणाले तसं ते सगळे आत गेले पण सान्वीच्या आईने कबीर आणि सान्वीला दारातच थांबवले आणि त्यांची दृष्ट काढून, त्यांचं औक्षण करून त्यांना आत घेतलं.
"तुम्ही बसा, मी तुमच्या चहा पाण्याचं बघते." सान्वीची आई म्हणाली आणि पुढे जाऊ लागली तोच सान्वीने तिला आवाज दिला.
"आई, यांना साखर कमी आणि जास्त दुधाचा चहा लागतो. तू तसाच बनव." सान्वी म्हणाली तसं तिची आई कौतुकाने तिच्याकडे बघत राहिली. कबीर सुद्धा त्याची आवड तिने लक्षात ठेवली म्हणून तिच्याकडेच एकटक बघू लागला. नंतर तिची आई हसतच आत गेली. मग सान्वीचा लहान भाऊ समीर तिथे आला आणि त्याच्या बाबांनी त्याचीही ओळख करून दिली. थोड्या वेळातच सान्वीची आई चहा घेऊन आली.
लग्नाच्या गडबडीत त्यांचं बोलणं झालंच नव्हतं त्यामुळे आता चहा पिताना चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. सान्वीच्या आईने चहासोबत नाष्टाही आणला होता. तो ही सगळ्यांनी केला.
थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर सान्वीची आई सगळ्यांच्या जेवणाचं बघायला किचनमध्ये गेली तेव्हा सान्वी पण तिच्या सोबत गेली. दोघी मिळून स्वयंपाकाची तयारी करू लागल्या.
सान्वी तिच्या आईला कबीर आणि घरातल्या इतरांना काय काय आवडतं ते सांगत होती. आपल्या मुलीने एवढ्या लवकर सगळ्यांच्या आवडी निवडी जाणून घेतल्या ते बघून तिची आई पण खुश होती.
"सान्वी, तसं तर तुझ्या चेहऱ्यावरून तू खुश आहेस असंच दिसतंय, पण तरीही विचारतेय... तू खरंच खुश आहे ना बाळा, आम्हाला दाखवण्यापुरता हा आनंद नाहीये ना तुझ्या चेहऱ्यावर." तिच्या आईने काळजीने विचारलं.
"आई, अगं मी खरंच खुप खुश आहे. घरातले सगळेच मला खुप समजून घेतात. आई, बाबा तर माझे खुप लाड करतात आणि श्रावणीच्या रूपात तर मला एक मैत्रीणच मिळाली आहे. एवढंच नाही तर घरात सगळ्या कामांना नोकर माणसं आहेत, मला काहीच करावं लागत नाही. हा... पण थोडं फार जेवण मी आवड म्हणून बनवते." सान्वी सगळ्यांबद्दल भरभरून सांगत होती पण कबीर बद्दल अजून काही बोलली नव्हती हे तिच्या आईच्या लक्षात आले.
"सगळं चांगलं आहे पण जावई बापू कसे आहेत? त्यांच्या बद्दल तर तू काहीच सांगितलं नाही." आईने विचारले.
"आई, त्यांचा स्वभाव सुद्धा खुप गोड आहे. मनाने खुप निर्मळ आहे. आत एक बाहेर एक असं नाहीये त्यांचं. खरं सांगू का मला कधी कधी वाटतं की देवाने आमची गाठ आधीच जुळवली असेल म्हणून तर अशा पद्धतीने का होईना पण आमचं लग्न झालं." सान्वी म्हणाली.
"तू खुश आहे हे ऐकून खुप बरं वाटलं बघ... आता आमची काळजीच मिटली." तिची आई म्हणाली. त्या दोघी बोलत असताना कबीर तिथून जात होता. त्याच्या कानावर सान्वीचं बोलणं पडलं त्यामुळे तो खरं तर मुद्दामच भिंतीच्या आडून ती नेमकं आपल्या बद्दल काय सांगतेय हे ऐकायला तिथे थांबला होता. ती त्याच्याबद्दल एवढं चांगलं बोलेल असं त्याला वाटलं नव्हतं. आता त्याच्या मनात सान्वीची एक वेगळीच इमेज तयार झाली.
"ज्या मुलीशी आपण अजून एकदाही प्रेमाने बोललो नाही ती मुलगी आपल्या बद्दल आणि आपल्या घरच्यांबद्दल एवढं भरभरून बोलतेय म्हणजे हिचं मन खरंच किती मोठं असेल." कबीर मनातल्या मनात बोलला आणि तिथून बाहेर गेला.
कबीरला बाहेर जाताना बघून समीर पण त्याच्या मागे गेला.
"दाजी, तुम्हाला घरात आवडत नाही का? तुम्ही एकटेच बाहेर फिरताय!" समीरने विचारलं.
"नाही... नाही... पण इथे बाहेरही छान मोकळी हवा आहे ना म्हणून बाहेर फेऱ्या मारतोय." कबीर म्हणाला.
"हो इथली गावची हवा आहेच मस्त थंडगार." समीर म्हणाला.
"तू काय करतोय आता? म्हणजे शिक्षण वगैरे..." कबीरने विचारलं.
"बारावी सायन्सला होतो मी, परीक्षा झाली आणि आताच सीईटी परीक्षा पण दिली. अजून रिझल्ट लागायचा आहे." समीरने सांगितलं.
"अरे व्वा, छानच आहे की... मग पुढे काय करायचा विचार आहे?" कबीरने विचारलं.
"मला इंजिनिअर व्हायचं आहे. माझं स्वप्न आहे ते." समीर म्हणाला.
"व्वा छान, तू नक्कीच तुझं स्वप्न पूर्ण करशील. माझी काही मदत लागली तर सांग, मी तुला नक्की मदत करेल." कबीर म्हणाला. त्यानंतर समीर आणि त्याच्या बराच वेळ छान गप्पा चालल्या होत्या. बाहेर आता खुप अंधार झाला होता. पण चंद्राचा प्रकाश छान पडला होता. सान्वी त्या दोघांना शोधत शोधत तिथे आली.
"तुम्ही दोघं इथे बसलाय, मी तुम्हाला घरातच शोधत होती. चला आता सगळे जेवायला वाट बघताय तुमची!" सान्वी म्हणाली.
"इथे खुप छान हवा आहे ना त्यामुळे खरंच खुप छान वाटतंय!" कबीर म्हणाला.
"मग तुमचं जेवणाचं ताट इथेच आणू का? बसा एकटेच इथे जेवत!" सान्वी रागाने म्हणाली.
"हम्म्म, ऍक्च्युली माझा पण तोच विचार होता." कबीर म्हणाला.
"चला गप्प आत... म्हणे माझा पण तोच विचार होता." सान्वी डोळे फिरवत बोलली.
"इथे येऊन तुझा आवाज चांगलाच वाढला आहे हं...." कबीर हसत म्हणाला.
"तुम्ही आता माझ्या राज्यात आहात समजलं, त्यामुळे माझाच आवाज वाढणार." सान्वी म्हणाली आणि पुढे जाऊ लागली तोच कबीरने तिचा हात धरला आणि तिला मागे ओढलं. बिचारा समीर ते बघून तिथून निघूनच गेला. सान्वी बेसावध असल्यामुळे ती मागे वळताच त्याच्या छातीवर धडकली. ती खाली पडणार तोच त्याने कमरेवर हात ठेवून तिला सावरलं. आता दोघांच्या चेहऱ्यामध्ये खुप कमी अंतर होते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.
"इथे तुझ्या राज्यात फक्त दोनच दिवस आहे पण माझ्या राज्यात तुला कायमचं राहायचं आहे समजलं." कबीर म्हणाला आणि त्याची नजर तिच्या ओठांवर स्थीर झाली. तो हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांवर नेऊ लागला तोच सान्वीने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या हृदयाची धडधड वाढली. पण कबीर पासून तिला दूर व्हायचं नव्हतं ती स्थीर उभी राहून डोळे मिटून तशीच राहिली.
कबीर जसजसा पुढे ओठ नेऊ लागला तसं त्याला इशिताची आठवण आली आणि वास्तवाचे भान झाले. तसं तो मागे झाला आणि सान्वीचा हात सोडून तो आत गेला. त्याने तिला बाजूला करताच तिने डोळे उघडले. कबीरला पुढे जाताना बघून ती नाराजच झाली. आणि तीही आत गेली.
सान्वीच्या आई बाबांचं घर मोठं आणि छान कौलारू होतं बाहेर मोठी पडवी होती. तिथेच सगळ्यांना जेवायला सतरंजी टाकली होती आणि सगळ्यांची ताटं मांडली होती. गावच्या जेवणाचा स्वाद सगळीकडे दरवळत होता. सोबतीला चुलीवर भाजलेले पापड, लोणचं आणि कांदा यांचाही मस्त वास येत होता. त्या वासानेच कबीरची भुक अजून वाढली.
"व्वा मस्तच बेत आहे वाटतं जेवणाचा... मला तर वासानेच अजून भुक लागली आहे." कबीर म्हणाला आणि सगळे एका पंगतीत जेवायला बसले होते तिथे बसला. सगळ्यांची गप्पा मारत मारत छान जेवणं झाली.
सान्वीच्या आईने त्यांची सगळ्यांची एकाच खोलीत झोपायची सोय केली होती. झोपायला जायच्या अगोदर प्रभाकर कबीरशी बोलले.
"जावई बापू, उद्या सकाळी जरा लवकर उठाल का? आमच्या गावात देवीचं मंदिर आहे ना तिथे नवीन लग्न झालेले सगळेच देवीचा आशीर्वाद घ्यायला जातात. तुम्ही गेलात तर आम्हाला आनंदच होईल." प्रभाकर पाटील म्हणाले.
"हो जाऊ की आम्ही, मी उठेल सकाळी लवकर." कबीर म्हणाला आणि आत गेला. दिवसभर प्रवासाने सगळे दमले होते त्यामुळे सगळ्यांनाच लवकर झोप लागली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
