अशी जुळली गाठ. भाग - १५
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
सान्वी सकाळी लवकरच उठली आणि देवीच्या दर्शनाला जायचं म्हणून तिने छान हिरव्या रंगाची काठपदराची साडी नेसली. हातात हिरव्या बांगड्या घातल्या आणि स्वतःला आरशात बघू लागली. आज आरशात बघताना तिला तिचा लग्नाचा दिवस आठवला. त्या दिवशी ती यात आरशासमोर तयार होऊन बसली होती आणि रडत होती. रडून रडून सगळा मेकअप गेला होता. पण आज त्याच आरशात स्वतःला बघताना तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण परत एका क्षणात तिचं हसू मावळलं. तिला रात्रीचा प्रसंग आठवला. कबीरने एवढ्या जवळ घेऊन सुद्धा आपल्या ओठांना साधा स्पर्श सुद्धा केला नाही या गोष्टीचं तिला वाईट वाटत होतं.
"माझं लग्न तर झालं आहे आणि त्यात मी खुप खुश आहे, असं मी म्हणतेय... मी खरंच खुश आहे की मी मलाच फसवतेय." सान्वीने आरशात बघून स्वतःलाच प्रश्न विचारला. तसं तिचे डोळे पाणावले.
"हरकत नाही, आता जरी कबीर माझा बायको म्हणून स्वीकार करत नसले तरी ते माझ्याशी वाईटही वागत नाही, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. त्यांनाही त्यांचा वेळ घेऊ दे, मग ते नक्की माझा स्विकार करतील." सान्वीने स्वतःची समजूत काढली आणि परत चेहऱ्यावर हसू आणलं.
ती आरशात बघत होती त्याचवेळी कबीरही तयार होऊन आला आणि समोर सान्वीला बघताच तो तिच्याकडे एकटक बघू लागला. तिचं रूप अगदी देवी सारखं दिसत होतं. त्या रूपात तो इतका हरवून गेला होता की त्याला आजूबाजूला कोणी आहे की नाही याचे सुद्धा भान नव्हते राहिले. त्याला असं बघून सान्वीचा चेहरा अजूनच खुलला. ती ही हसतच त्याच्याकडे बघू लागली. दोघेही एकमेकांकडे बघण्यात इतके गुंतले होते की श्रावणी त्या दोघांना बघून हसत होती हे सुद्धा त्यांना कळले नाही. शेवटी श्रावणीने कबीरच्या दंडावर जोरात चापट दिली आणि त्याला आवाज दिला.
"दादा, तुमचं एकमेकांकडे बघून झालं असेल तर निघता का आता? नाही तर इथेच एकमेकांना बघण्यातच पुर्ण दिवस जाईल तुमचा." श्रावणी हसत म्हणाली. तसं त्या दोघांनी ओशाळून खाली मान घातली. त्यांचं ते अवघडलेपण बघून श्रावणी तिथून बाहेर गेली. ती गेल्यावर सान्वी परत कबीर कडे बघू लागली.
"माझं आवरलं आहे, तुमचं झालं असेल तर निघायचं का आपण?" सान्वीने हसतच विचारलं तेव्हा तो भानावर आला आणि मान डोलावली. मग दोघेही एकत्रच बाहेर आले.
"देवीचं मंदिर इथून जास्त लांब नाहीये, आपण चालतच जाऊया. तेवढंच छान गप्पा होतील आणि तुम्हाला गावही बघता येईल." सान्वी म्हणाली.
"नको, तुला साडीत नीट चालायला जमणार नाही, आपण गाडीतच जाऊ, गाव बघायला काय ते नंतरही बघता येईल." कबीर म्हणाला. त्याचं असं काळजीत बोलणं तिच्या मनाला खुप सुखावून गेलं. मग तीही हसतच गाडीत बसली. त्याच्या बाजूला पुढच्या सीटवर बसताना तिच्या मनात एक वेगळीच भावना आली. कबीरची बायको म्हणून हा आपला मान आहे, असे तिला वाटले आणि अभिमानाने गळ्यातलं मंगळसुत्र हातात गच्च पकडून ठेवलं.
कबीरने गाडी स्टार्ट केली नंतर त्याला इशिताचा फोन आला. आता सान्वी समोर फोन घेऊ की नको घेऊ हेच त्याला कळेना. मग त्याने गाडी थांबवली आणि सान्वीकडे बघू लागला.
"एक महत्वाचा काॅल आहे, मला घ्यावाच लागेल. तू बसून रहा मी आलोच." असे बोलून कबीर खाली उतरला आणि त्याने इशिताचा फोन रिसिव्ह केला.
"इशिता, आज मी एक दिवस ऑफिसमध्ये नाहीये तर तुला आठवण येतेय ना माझी! मला माहितीये तू मला विसरू शकत नाही." फोन रिसिव्ह करताच कबीर म्हणाला.
"सर, मी तुम्हाला कामासाठी फोन केला आहे. आपण तिकडे साईटवर गेलो होतो, त्या प्रोजेक्टची फाईल मला इथे कुठेच भेटत नाहीये." इशिताचं असं सरळ तुटकपणे बोलणं ऐकून त्याच्या काळजावर कोणीतरी घाव घातल्यासारखे होत होते पण त्याने स्वतःला सावरलं आणि बोलू लागला.
"साॅरी, ती फाईल घरीच ठेवली आणि आता मी नेमकं गावी सान्वीच्या बाबांच्या घरी आलोय, मी पाठवतो कोणाला तरी ती फाईल घेऊन." कबीर म्हणाला. तो सान्वीच्या बाबांच्या घरी गेला आहे हे ऐकून तिचा चेहराच उतरला आणि तिने लगेच फोन कट केला. फोन कट केल्यावर कबीर मोबाईल समोर धरून त्याच्याकडेच बघू लागला.
"मला माझ्या आयुष्यात नेमकं कोण हवं आहे. इशिता की सान्वी? मी तिचाही विचार करतो, हिच्याकडेही ओढला जातोय. नेमकं काय चाललंय माझं मलाच कळत नाहीये." कबीर मनातल्या मनात बोलला आणि दोघींचाही विचार करू लागला. तो लवकर येईना म्हणून सान्वीने काच खाली करून त्याला आवाज दिला.
"अहो sss तुमचा फोन झाला नाही का अजून? आपल्याला उशीर होईल." तिच्या आवाजाने कबीर भानावर आला आणि गाडीत बसला. गाडीत बसताच त्याने विमलला फोन केला आणि ती फाईल कुठे आहे ते सांगून ती ड्रायव्हर सोबत ऑफिसला पाठवायला सांगितली. त्यानंतर तो सान्वीकडे बघू लागला.
"साॅरी, पण कामाचा फोन होता आणि ती फाईल आता ऑफिसमध्ये पोहचवणं महत्वाचे होते म्हणून वेळ गेला." कबीर म्हणाला.
"ठिक आहे ना.... काम म्हटल्यावर होणारच, तुम्ही तुमची सगळी कामं सोडून इथे आलात हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे." सान्वी म्हणाली. मग कबीरने गाडी स्टार्ट केली आणि दोघेही थोड्या वेळातच मंदिरात पोहचले. तिथे देवीची आरती चालू होती. सान्वीने डोळे बंद केले आणि देवीसमोर हात जोडून ऊभी राहीली. पण कबीरचं लक्ष तिच्याकडेच होतं. ही मुलगी आपल्या आयुष्यात येणं हा योगायोग आहे की अजून दुसरंच काही आहे. मंदिरातही त्याच्या मनातलं युद्ध थांबत नव्हते.
आरती झाली. दोघांनी जोडीने देवीचं दर्शन घेतले आणि तिथे गुरूजी होते त्यांचे दर्शन घ्यायला गेले. दोघेही खाली वाकताच त्यांनी बोलायला सुरुवात केली.
"हे लग्न तुमच्या मर्जीने नाही तर देवाच्या मर्जीने झालं आहे. तेव्हा त्याची मर्जी जपा." गुरूजी म्हणाले तसं सान्वी आणि कबीर एकमेकांकडे बघू लागले. यांना कसं कळलं हाच विचार दोघांच्या मनात चालू होता. पण दुसऱ्याच क्षणी कबीरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागला पण गुरूजी बोलायचे थांबले नाही.
"तू आता सध्या द्विधा मनस्थितीत आहे, कुठल्या तरी एका दगडावर पाय द्यायला तुला जमत नाही. पण जर काहीतरी एक ठरवलं नाही तर स्वतःचं सुख हरवून बसशील." गुरूजी बोलताच कबीरची पावलं थांबली आणि तो गुरूजींकडे वळला.
"तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?" त्याने गुरूजींना विचारलं.
"म्हणायचं तर खुप काही आहे पण सगळं इतक्या लगेच नाही सांगू शकत... पण एक गोष्ट लक्षात ठेव ही तुझ्या बाजूला उभी आहे ती तुझी बायको आहे आणि तिचं कुंकू खुप बळकट आहे, तुला प्रत्येक संकटांतून ती वाचवणार आहे म्हणून तर देवाने तुमची गाठ जुळवून आणली आहे. ती तुझं रक्षा कवच आहे, तिला जपलास तरच तुझ्यावरचं संकट दूर होईल. तिला जपला नाही तर खुप मोठा अनर्थ होईल. बाकी तू समजदार आहेस." गुरूजी म्हणाले. त्यांचं बोलणं ऐकून ते दोघेही आतून हादरले.
"गुरूजी, तुम्ही काय म्हणताय ते काहीच कळत नाही, मला जपायचं आहे म्हणजे संकट नेमकं कोणावर येणार आहे?" सान्वीने गंभीर होत विचारलं.
"मी जेवढं सांगितले आहे त्याचा विचार करा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. या आता..." गुरूजी म्हणाले. तसं ते दोघेही घाबरतच तिथून बाहेर पडले.
"तुम्हाला गुरुजींच्या बोलण्याचा काही अर्थ कळला का? कळला असेल तर मला सांगा की!" सान्वी म्हणाली.
"माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये, त्यामुळे मी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत नाही." कबीर म्हणाला. पण तरीही ती सारखं सारखं विचारत होती. मंदिराच्या पायऱ्या उतरताना त्या दोघांचा तोच विषय चालू होता. ती त्याला पटवून देत होती गुरूजी सांगतात ते सगळं खरं असतं पण तो काही पटवून घेत नव्हता. बोलण्यात त्यांचं समोर लक्षही नव्हतं. चालता चालता अचानक सान्वीला कोणाचा तरी धक्का लागला. ती पडणार तोच कबीरने तिला सावरलं आणि त्याचवेळी त्याच्या कानावर साॅरी असा आवाज आला तसं त्याने सान्वीला सावरत समोर पाहिलं आणि समोरच्या व्यक्तीला बघून त्याला धक्काच बसला.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा