अशी जुळली गाठ. भाग - १६
डिसेंबर-जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"ऋग्वेद sss तू...." समोर ऋग्वेदला बघून कबीर बोलला. ऋग्वेद हे नाव कानावर पडताच सान्वी सुद्धा समोर बघू लागली. ऋग्वेदला समोर बघून तिला खुप राग आला होता पण कबीर असल्यामुळे ती फक्त बघतच राहिली. ऋग्वेदही फक्त त्या दोघांकडे बघत होता. काही क्षणातच त्याचे सान्वीच्या गळ्याकडे लक्ष गेलं तेव्हा त्याला तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसले आणि तिचा हात अजूनही कबीरने धरलेला होता. त्यामुळे ऋग्वेदला समजायला वेळ लागला नाही. तरी सुद्धा त्याने कबीरला विचारलं.
"कबीर... तुम्ही दोघं एकत्र?" ऋग्वेदने विचारताच कबीरने त्याच्या सानकन कानाखाली वाजवली.
"तुला हे तोंड वर करून विचारताना लाज कशी वाटली नाही. कुठे होतास तू इतके दिवस? तू निघून गेल्यावर मागे सान्वीचं काय होईल याचा विचार सुद्धा तुला करावासा वाटला नाही का! तू गेल्यामुळे ऐनवेळी मला लग्नाला उभं राहावं लागलं, कळलं का तुला!" कबीर रागाने लाल बुंद झाला होता. त्याचा आवाजही चढलेला होता. तिथे असणारे लोक सुद्धा त्याच्या आवाजाने त्या तिघांकडे बघू लागले.
"मला हिच्याशी लग्न करायचं नव्हतं." ऋग्वेद म्हणाला. आता सान्वीलाही हे बोलणं ऐकवलं नाही. तिनेही ऋग्वेदच्या एक कानाखाली वाजवली.
"माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर मग एवढा सगळा घाट घालताच कशाला होता. आधीच नाही म्हणून सांगायचं होतं ना, मी काय माझ्याशी लग्न करा म्हणून तुमच्या मागे लागले नव्हते." सान्वी रागाने म्हणाली.
"प्लीज, तुम्ही दोघेही असं माझ्यावर चिडू नका. त्यावेळी मी खुप मोठ्या पेचात अडकलो होतो. तेव्हा माझ्यावर काय परिस्थिती ओढवली ते मी तुम्हाला सांगूही शकत नव्हतो." ऋग्वेद म्हणाला.
"तू आता असाच म्हणशील रे, तू गेला पण मागे किती आणि काय काय घडलं हे तुला माहीत नाही. मावशी आणि आई दोघीही एकमेकींचा जीव की प्राण आहे. मी कधीच त्यांना भांडताना पाहिलं सुद्धा नाही. पण त्यादिवशी तू गेल्यापासून मावशी आईशी बोलत सुद्धा नाहीये. आई अजूनही तिला फोन करतेय पण मावशी फोन सुद्धा घेत नाही. काकांची तर सगळ्या गावासमोर मान खाली गेली हे तरी माहिती आहे का तुला!" कबीर रागाने बोलला.
"मला सगळं कळतंय पण त्यादिवशी माझं जाणं खुप गरजेचं होतं. तुला माहितीये का कबीर, मी आधीपासूनच लग्नाला तयार नव्हतो पण काही कारणाने मला या लग्नाला होकार द्यावा लागला." ऋग्वेद म्हणाला.
"असं काय कारण होतं जरा कळूद्या तरी!" सान्वी म्हणाली.
"माझं निशावर जिवापाड प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न करणार होतो पण आमची कास्ट वेगळी असल्यामुळे तिच्या बाबांनी या लग्नाला नकार दिला. त्यांनी नकार दिल्यामुळे मला आमच्याबद्दल घरी सांगायचा प्रश्नच आला नाही. अशातच सान्वीचं स्थळ सांगून आलं. मी निशाला परत परत विचारत होतो पण तिचं एकच म्हणणं होतं की बाबा नाही ऐकत. शेवटी तिने जेव्हा मला तिचा विषय सोडून दे असं सांगितलं तेव्हा मी सान्वीला होकार दिला. पण आमचं लग्न चार दिवसांवर आल्यावर निशाच्या बाबांनी मला फोन केला आणि तिची तब्येत बिघडली आहे असं सांगितलं." ऋग्वेद बोलता बोलता थांबला आणि मोठ्याने श्वास घेऊ लागला.
कबीर आणि सान्वी पण बऱ्याच वेळा पासून उभे होते. मग ते दोघेही पायरीवरच एका कडेला बसले. ते दोघं बसल्यावर ऋग्वेद पण बसला.
"पुढे काय झालं?" कबीरने विचारलं.
"मग काय... तिला ॲडमीट केलं होतं, मी तिला भेटायला हाॅस्पीटलमध्ये गेलो. तेव्हा तिची अवस्था खुपच वाईट होती. तिला सलाईन चालू होते. किती तरी दिवस जेवली नव्हती ती. त्यामुळे खुपच अशक्त झाली होती. मग तिचे बाबाही आमच्या लग्नाला तयार झाले. म्हणजे तसं ते दाखवत होते. पण माझं लग्न तेव्हा चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मी खुप मोठ्या पेचात पडलो होतो. काय करावं काहीच सुचत नव्हते. तुझ्याशी बोलून तुझी मदत घ्यायची होती पण शेवटच्या क्षणापर्यंत मला तुझ्याशी बोलता आले नाही." बोलताना ऋग्वेदचे डोळे पाणावले होते. कबीर आणि सान्वीला सुद्धा ते ऐकून वाईट वाटत होते.
"मग तू त्यांना तुझं लग्न ठरलं होतं ते सांगितले नाही का?" कबीरने विचारलं.
"मी निशाला नाही सांगितले पण तिच्या बाबांना सांगितले होते." ऋग्वेद म्हणाला.
"मग ते काय म्हणाले?" कबीर.
"ते म्हणाले की माझं लग्न ठरल्याचं निशाला सांगायचं नाही, ती बरी होईपर्यंत मी तिला भेटायचं. ती बरी झाल्यावर ते परत आम्हाला दोघांना वेगळं करणार होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आलीच होती पण निशाला सुद्धा ते कळलं होतं. म्हणून तर ती मला सारखेच फोन करत होती. लग्नाच्या दिवशी मी तिचे काॅल घेत नव्हतो तेव्हा तिने मला मॅसेज केला, ' तू जर आता माझ्याकडे आला नाही तर मी आत्महत्या करेल, कारण मला कळलं आहे आज तुझं लग्न आहे. आणि मला हे पण कळलं आहे माझे बाबा मला फसवताय.' तिचा तो मॅसेज वाचला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
"म्हणून तू तिचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत तिकडे गेला!" कबीर.
"हो आणि तिथे गेल्यावर तिने हट्टाने तिथेच हाॅस्पीटलमध्ये मला तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला सांगितले. तिने सलाईन काढून फेकले होते. त्यामुळे तिचे बाबा सुद्धा काही करू शकले नाही आणि मला तर त्यावेळी तिचा जीव सोडून दुसरं काहीच महत्वाचं वाटत नव्हते मग मी ही कसलाही विचार न करता तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिथे हाॅस्पिटलमध्येच एक प्रकारे आमचं लग्न झालं." ऋग्वेदने त्याची सगळी कहाणी सांगितली. पण त्यात चुक कोणाची होती आणि दोष कोणाला द्यावा हेच कळत नव्हते. त्याची कहाणी ऐकून ते दोघेही सुन्न झाले होते. क्षणभर त्या तिघांमध्ये शांतता होती. पण नंतर सान्वीने बोलायला सुरुवात केली.
"ऋग्वेद, तुम्ही पहिली चुक कुठे केली माहितीये का... तुमचं आणि निशाचं प्रेम होतं, ही गोष्ट बरोबर आहे पण तिचे बाबा लग्नाला तयार नव्हते, कारण काय तर तुमची कास्ट वेगळी, हेही कारण ठीक आहे असं समजू आपण... पण तुम्ही माझ्याशी लग्न करायची घाई केली. तुम्हाला घरी काही सांगायचं नव्हतं तर नव्हतं सांगायचं पण थोडा वेळ घ्यायचा होता. परीस्थिती जाणून घ्यायची होती मग पुढचं पाऊल उचलायचे होते. एवढ्या लगेच माझ्याशी लग्न करायला होकार द्यायची गरज नव्हती, म्हणतात ना सगळ्या गोष्टीवर वेळ हेच औषध असतं पण तोच वेळ तुम्ही घेतला नाही." सान्वी म्हणाली.
"चुक झाली माझी!" ऋग्वेद.
"तुमच्या एका चुकीमुळे किती काय काय घडून गेलं, त्यादिवशी जर कबीरने माझ्याशी लग्न केलं नसतं तर काय झाले असते याचा विचार करा जरा." सान्वी म्हणाली तसं ऋग्वेदने खाली मान घातली.
"सान्वी बरोबर बोलतेय ऋग्वेद, तू खरंच खुप घाई केली. तुझ्या एका अती घाईमुळे काय काय होऊन बसलंय याची तुला कल्पना सुद्धा नाहीये." कबीर उदास होऊन बोलला. त्याक्षणी त्याला इशिताचा चेहरा आठवला आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. तो आता निशामध्ये इशिताला इमॅजिन करू लागला. त्यामुळे त्याचे हातपाय सुद्धा थरथरू लागले. त्याला एवढं थरथरताना बघून सान्वी खुपच घाबरली.
"कबीर, तुम्हाला काही होतंय का? तुमचे हात पाय बघा किती थरथरताय, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आपण घरी जाऊ चला!" सान्वी काळजीने म्हणाली. तसं कबीर सान्वीकडे बघू लागला. त्याला तिच्या डोळ्यात त्याच्याविषयी प्रेम आणि काळजी दोन्ही दिसत होते. तिची ती काळजी बघून त्याने स्वतःला सावरलं.
"नाही... मी ठिक आहे." कबीर म्हणाला.
"कबीर, थांब... मी तुझ्यासाठी पाणी आणतो." ऋग्वेद म्हणाला आणि घाईघाईने पाणी आणायला गेला. सान्वी आणि कबीर लगेच घरी जाणार होते त्यामुळे त्यांनी काही पाणी वगैरे सोबत आणलं नव्हतं. ऋग्वेद पाणी घेऊन आला आणि ते कबीरला दिलं. कबीर शांतपणे पाणी प्यायला आणि परत ऋग्वेद कडे बघू लागला.
"निशा कशी आहे आता? कबीरने शांतपणे विचारले.
"ती आता ठिक आहे पण अजूनही हाॅस्पीटलमध्येच आहे." ऋग्वेद म्हणाला.
"मग तू मावशी आणि काकांना सांगितले की नाही काही अजून?" कबीर.
"हो, सांगितले ना.... लग्नानंतर दोन दिवसांनी मी त्यांना फोन करून सांगितले आणि सान्वी बद्दल सुद्धा विचारलं पण त्यांनी मला सान्वी बद्दल काहीच सांगितलं नाही. रागावून फोन ठेवून दिला." ऋग्वेद म्हणाला.
"मग आता ते निशाला स्विकारतील का?" कबीरने विचारलं. तसं ऋग्वेद हलकसं हसला पण त्याच्या हसण्यात एक विलक्षण उदासिनता होती.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा