अशी जुळली गाठ. भाग - १९
डिसेंबर -जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"दादा sss हे बघ इथे आग लागली आहे." श्रावणी किंचाळली तेव्हा कबीर धावतच तिथे आला आणि त्याने समोर पाहिलं. तो ही ती आग बघून घाबरला.
"अरे बापरे, केवढी आग लागली आहे... पण इथे या घरात काय आहे?" कबीरने विचारलं. तेव्हा श्रावणीला आठवलं की सान्वी त्याच घरात झोपायला गेली होती. ते आठवताच श्रावणी खुप घाबरली.
"दादा sss इ... थे..... वssss...." श्रावणी इतकी घाबरली होती की तिला पुढे काही बोलताच येत नव्हते. तिला काय म्हणायचं आहे ते कबीरलाही कळेना.
"श्रावणी, नेमकं काय झालयं? ही आग बघून तू एवढी का घाबरली आहे?" कबीरने विचारलं. श्रावणी बोलायचा प्रयत्न करत होती पण घाबरल्यामुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. ती आग बघून सगळेच तिथे आले आणि सान्वीची आई रडून सान्वी आत आहे हे सांगू लागली. ते ऐकून सगळेच घाबरले. सान्वी आत आहे हे कळल्यावर कबीर कसलाही विचार न करता पुढे जाऊ लागला. सविता आणि विक्रम त्याला अडवत होते पण तो कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त सान्वीचा चेहरा दिसत होता. तो पुढे धावत होता पण सविता त्याचा हात मागे ओढत होती. पण तरीही तो थांबेना.
"आई, सान्वी आत अडकली आहे! मला तिला वाचवायला हवं." तो जवळजवळ ओरडत म्हणाला आणि तिच्या हातातून स्वतःला सोडवत डायरेक्ट आत आगीत शिरला.
आत धूर इतका वाढला होता की डोळे उघडे ठेवणंही कठीण होत होतं. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता, पण त्या वेदनांपेक्षा सान्वीला काही होणार तर नाही ना याची कबीरला भीती वाटत होती.
"सान्वी… सान्वी…" तो तिला हाक मारत पुढे पुढे जात होता. पुढे आल्यावर एका कोपऱ्यातून हलकासा खोकल्याचा आवाज आला. त्या आवाजाने त्याच्या अंगात नवी ताकद संचारली. धुरामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं पण सान्वीच्या आवाजाने तो अंदाज घेत पुढे पुढे जात होता. सान्वी एका कोपऱ्यात जमिनीवर बसली होती, धुरामुळे तिला श्वास घेता येत नव्हता, डोळे पाणावले होते आणि चेहरा सुद्धा काळवंडून गेला होता.
"कबीर…" तिच्या ओठांतून कसेबसे शब्द बाहेर पडले.
तो क्षणाचाही विलंब न करता तिच्याजवळ गेला आणि तिला दोन्ही हातांवर उचललं.
तो क्षणाचाही विलंब न करता तिच्याजवळ गेला आणि तिला दोन्ही हातांवर उचललं.
घाबरू नकोस, मी आलोय ना आता तुला काही होऊ देणार नाही." कबीर म्हणाला. तो स्वतःला आणि तिलाही धीर देत होता. तिला उचलून बाहेर येताना जळत्या लाकडाचा तुकडा खाली पडला आणि नेमका तो त्याच्या हाताला लागला. पण त्या वेदना जाणवायलाही त्याच्याकडे वेळ नव्हता. तो फक्त सान्वीकडे बघत होता. आणि तिला सुखरूप बाहेर कसं काढता येईल याचाच प्रयत्न करत होता.
थोड्या वेळातच तो कसं बसं तिला बाहेर घेऊन आला. तो बाहेर येताच सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सान्वीची आई धावत येऊन तिच्याकडे बघत रडू लागली. पण त्याचवेळी सान्वीने डोळे बंद केले आणि ती बेशुद्ध झाली. तिची अवस्था बघून तिचे आई बाबा चांगलेच घाबरले.
"कबीर, सान्वीला पटकन गाडीत ठेव. आपल्याला तिला आताच हाॅस्पीटलमध्ये घेऊन जायला हवं." विक्रम म्हणाले तसं कबीर धावतच गाडीकडे गेला. विक्रम आणि बाकीचेही त्याच्यामागे गेले. सान्वीला गाडीत ठेवताच तिचे आई बाबा पण लगेच तिच्यासोबत बसले. सविता आणि श्रावणी अजूनही खुप घाबरलेल्या होत्या.
"आई, तुम्ही दोघी इथेच थांबा. मी तिथे गेल्यावर तुम्हाला फोन करेल." कबीर म्हणाला आणि गाडीत बसला. गाडी स्टार्ट करताच त्याच्या हाताला भाजल्याचं त्याला जाणवलं आणि त्याच्या तोंडून एक वेदनेची कळ बाहेर पडली. त्याचवेळी विक्रमचे त्याच्या हाताकडे लक्ष गेले.
"किती भाजलंय तुला कबीर, तू हो बाजूला मी ड्राईव्ह करतो." विक्रम काळजीने म्हणाले. तसं कबीर उठला आणि ते ड्रायव्हींग सीटवर बसले. प्रभाकर त्यांना हाॅस्पीटलचा रस्ता सांगत होते. काही वेळाने ते हाॅस्पीटलमध्ये पोहचले.
तिथे गेल्यावर लगेच सान्वीला आत नेलं आणि तिच्यावर उपचार सुरू केले. सगळेच बाहेर काळजीत बसले होते. सान्वीच्या आईच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नव्हते. कबीर सुन्न होऊन एका खुर्चीत बसला होता आणि आता कुठे त्याला मंदिरात गुरूजी बोलले होते. त्यातला शब्द ना शब्द आठवू लागला. त्यांचं बोलणं आठवून त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. तो त्याच विचारात होता त्याचवेळी विक्रम आले आणि त्याच्या भाजलेल्या हातावर मलम लावू लागले.
"कबीर, आज तू स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सान्वीला वाचवलंस. मला तुझा खुप अभिमान वाटतोय. आता माझी खात्री आहे की सान्वीला तू कधीच अंतर देणार नाही आणि काळजी करू नकोस ती लवकरच बरी होईल. तू तिच्या सोबत आहेस त्यामुळे तिला काहीच होणार नाही." विक्रम म्हणाले तसं कबीर त्यांच्याकडे एकटक बघू लागला.
"बाबा, पण मला एक कळत नाहीये. तिथे अशी अचानक आग कशी लागली असेल?" कबीरने विचारलं.
"ते काही माहीत नाही, पण आता आपल्यासाठी सान्वी बरी होणं महत्वाचं आहे. तिला जास्त कुठे भाजलेलं नसेल तर बरं होईल." विक्रम म्हणाले.
थोड्या वेळातच डॉक्टर आले आणि त्यांनी सान्वीला शुद्ध आल्याचे सांगितले. तसं सगळेच आत तिला बघायला गेले. तिला बघताच तिच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आले.
"सान्वी, कशी आहेस तू?" तिच्या आईने विचारले.
"आई, मी ठिक आहे." सान्वी म्हणाली. सुदैवाने तिला काही दुखापत झाली नव्हती. फक्त धूरा मध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे तिची शुद्ध हरपली होती. विक्रम पण तिच्याशी बोलले. तिच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर सगळेच बाहेर गेले. आता फक्त कबीरच तिथे तिच्याजवळ उभा होता. तिला त्याच्या हाताची जखम दिसू नये म्हणून तो हात पाठीमागे करून उभा राहिला. कबीरला समोर बघताच तिचे डोळे पाणावले.
"तुम्ही माझ्यासाठी एवढा मोठा धोका पत्करून आगीत शिरलात. तुम्हाला काही झालं तर.....?" सान्वीला पुढे बोलवेना सुद्धा. तिचा लगेच हुंदका दाटून आला.
"तुला काही झालं नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी बघ तुझ्यासमोर धडधाकट उभा आहे, मलाही काहीच नाही झाले. आता कसलाही विचार करू नकोस आराम कर. मी डाॅक्टरांशी बोलून येतो, आता घरी सोडणार असतील तर आपण घरी जाऊ." कबीर म्हणाला तसं तिने हलकीशी मान हलवली. मग तो लगेच बाहेर गेला. तो गेल्यावर ती त्याचाच विचार करत होती. आपल्यासाठी कबीरने स्वतःचा जीव धोक्यात घातला म्हणून तिला खुप आनंद झाला होता.
कबीरने डाॅक्टरांना विचारलं तेव्हा त्यांनी सान्वीला घरी घेऊन जायला सांगितलं. मग थोड्या वेळातच ते घरी गेले. घरी जाईपर्यंत बरीच रात्र उलटून गेली होती. खुप उशीर झाल्यामुळे कोणाची जेवायची इच्छाही नव्हती पण सविताने सगळ्यांना जबरदस्तीने जेवायला दिलं.
सान्वी अजूनही घाबरलेलीच होती. तिच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जात नव्हता. रात्री ती तिच्या आई जवळच झोपली होती. झोप तर तिला येत नव्हती पण डोळे मिटून तशीच पडून राहिली होती.
कबीरच्याही डोळ्यासमोरून ते आगीचे चित्र जात नव्हते. आपण वेळेवर आलो नसतो तर काय झालं असतं या विचारानेच त्याला घाबरायला होत होतं. त्यालाही रात्री झोप लागली नाही. सारखा सारखा तोच विचार करून त्याची झोप मोडली होती.
रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी सगळेच उशीरा उठले. खरं तर कबीर आणि त्याच्या आई बाबांचं सकाळी घरी जायचं ठरलं होतं पण कालच्या प्रकारामुळे त्यांनी त्यांचं जाणं थांबवलं होतं.
सकाळी सगळेच एकत्र येऊन नाष्टा करत होते. फक्त सान्वी तेवढी आली नव्हती.
"सान्वी बरी आहे ना आता?" सविताने सान्वीच्या आईला विचारलं.
"तशी बरी आहे पण आतून खुप घाबरली आहे ती. रात्री झोपच लागली नव्हती तिला म्हणून आता मीच तिला उठवलं नाही." सान्वीची आई म्हणाली.
"असूद्या तिला आराम करू द्या, तसंही आम्ही आता उद्याच जाणार आहोत." सविता म्हणाली.
"मी काय म्हणतोय, सान्वीला अजून चार दिवस राहू द्या इथेच, तसंही आता ती घाबरली आहे. काही दिवस इथे राहिली तर तिचाही आराम होईल." प्रभाकर पाटील म्हणाले. त्यावर सगळेच कबीर कडे बघू लागले. कारण तिला ठेवायचं की नाही ठेवायचं हा निर्णय तोच घेणार होता.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा