अशी जुळली गाठ. भाग - २०
डिसेंबर -जानेवारी २०३५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"आम्ही सगळे उद्या जाऊ आणि जाताना सान्वीला पण सोबत घेऊन जातो. ती जर इथे राहिली तर अजून झालेल्या प्रकाराचा विचार करत बसेल. तिकडे गेली तर जागा बदलल्यामुळे ती विसरून तरी जाईल." कबीरचं ते बोलणं सान्वीच्या आई बाबांना पण पटलं. त्यामुळे त्यांनीही जास्त जबरदस्ती केली नाही.
"तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. फक्त तिची काळजी घ्या. आम्हाला तर आता तिची जास्तच काळजी वाटायला लागली आहे." प्रभाकर पाटील म्हणाले.
"पण मला एक कळत नाहीये, तिथे अशी अचानक आग लागली कशी? तुम्ही तिथे जाऊन नीट पाहिलं नाही का?" विक्रम म्हणाले.
"नाही ना, सान्वीची अवस्था बघून त्यावेळी कोणालाच काही सुचलं नाही. आजुबाजूच्या लोकांनी येऊन आग विझवली तिकडे सुद्धा आपल्या कुणाचं लक्ष नव्हते. आग कधी विझली तेही आपण नीटसं पाहिलं नाही." प्रभाकर पाटील म्हणाले.
"याआधी कधी असा प्रसंग ओढवला होता का इथे?" कबीरने विचारलं.
"नाही हो, कधीच नाही... आमच्या शेजारी पाजारी सगळेच चांगले आहे. त्यामुळे कोणी मुद्दामहुन करेल असं नाही वाटत." प्रभाकर पाटील म्हणाले.
"जाऊदे आता, तो विषय नकोच... आपली मुलगी सुखरूप आहे हेच खुप झाले." सान्वीची आई म्हणाली.
"हो पण आहेच तुम्ही बसा सगळे, मी जरा शेतावर जाऊन येतो." प्रभाकर पाटील म्हणाले आणि ते शेतावर गेले. कबीर उठला आणि आतल्या खोलीत जाऊन बसला. त्याला काही कामाचे फोन करायचे होते ते तो करत होता.
थोड्या वेळातच सान्वी त्याच्याकडे आली. ती आलेली बघताच त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि तिच्याकडे बघू लागला. त्याचवेळी तिचं लक्ष त्याच्या हाताकडे गेले आणि ते बघून ती लगेच त्याच्याजवळ गेली.
"बापरे, हे किती भाजलंय तुम्हाला आणि तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही." सान्वी काळजीने बोलली.
"एवढं काही नाहीये, होईल ते हळूहळू बरं." कबीर म्हणाला.
"असं नुसतं असंच ठेवून ते बरं होणार आहे का? त्यावर काही मलम तरी लावायला हवा ना..." सान्वी म्हणाली.
"रात्री बाबांनी लावला होता. त्यामुळे थोडं बरं वाटतंय, आता होईल बरं." कबीर म्हणाला.
"असं एकदा मलम लावण्याने थोडीच बरं होत असतं, ते काही नाही... मी तुम्हाला परत लावते मलम." सान्वी म्हणाली आणि तिथे समोरच टेबलवर मलम होता. तो घेतला. कबीर नाही म्हणत असतानेही ती जबरदस्तीने त्याला मलम लावू लागली.
मलम लावताना सान्वीच्या मऊ हाताचा स्पर्श होताच कबीर तिच्याकडे एकटक बघू लागला. तो आपल्याकडे एकटक बघतोय हे लक्षात येताच सान्वी त्याच्याकडे बघू लागली.
"दुखतंय का हो खुप, माझ्यामुळेच तुम्हाला ही जखम झाली. माझं चुकलं, मी तिथे एवढं संध्याकाळ पर्यंत थांबायलाच नको होतं." सान्वी म्हणाली.
"घडणाऱ्या गोष्टी घडतच राहतात, एवढा विचार करू नको आता. जे झालं ते विसरून जा." कबीर म्हणाला तसं तिने मान हलवली आणि मलम लावून होताच थोडी मागे सरकली. त्यानंतर तिला परत गुरूजींचं बोलणं आठवलं.
"कबीर, गुरूजींनी जे सांगितले होते तसंच झालं. फक्त हे संकट कोणा एकावर होतं की दोघांवर होतं ते काही कळलं नाही. फक्त यातून दोघेही सुखरूप बाहेर पडलो. हे एक बरं झालं." सान्वी म्हणाली.
"असं काही नसतं, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाहीये आणि तू ही विश्वास ठेवू नकोस. काही गोष्टी योगायोगाने पण घडत असतात. असो... आपल्याला उद्या सकाळी घरी जायचं आहे. तेव्हा आजच सगळी तयारी करून ठेव." कबीर म्हणाला.
"हो चालेल, तुम्ही आराम करा आणि काही लागलं तर मला आवाज द्या." सान्वी म्हणाली आणि तिथून निघून गेली. ती गेल्यावर कबीरने परत मोबाईल घेतला. आता त्याच्या मनात परत इशिताचा विचार आला. तिच्याशी बोलणं झालं नव्हतं म्हणून त्याला खुप अस्वस्थ वाटत होतं. एकतर इतके दिवस तिच्यापासून दूर राहायची सवय नव्हती त्यात आता बोलणंही होत नव्हते. त्यामुळे आता त्याला तिची आठवण येत होती. तिला फोन करावा असा विचार मनात येताच त्याला गुरूजींचं एक वाक्य आठवलं.
"तू आता सध्या द्विधा मनस्थितीत आहे, कुठल्या तरी एका दगडावर पाय द्यायला तुला जमत नाही. पण जर काहीतरी एक ठरवलं नाही तर स्वतःचं सुख हरवून बसशील." ते वाक्य आठवून कबीरच्या हातातून मोबाईल आपोआप निसटला.
"मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही हे जरी खरे असले तरी गुरूजींच्या बोलण्यात तथ्य आहे. ते म्हणताय तसं खरंच मी द्विधा मनस्थितीत आहे. एकाच वेळी मी दोघींचाही विचार करत आहे. मला नेमकं काय हवंय तेच मला कळत नाहीये. काय करू मी, कसं यातून बाहेर पडू. आता एवढं सगळं झाल्यावर मी सान्वीला बाजूला करू शकत नाही आणि इशिताला विसरणं मला जमणार नाही." कबीर मनातल्या मनात स्वतःचीच बोलत होता. किती तरी वेळ तो त्या दोघींचाही विचार करत होता. खुप प्रयत्न करूनही त्याच्या मनातून दोघीपैकी एकीचाही विचार जात नव्हता.
****************
ठरल्याप्रमाणे सकाळीच सगळ्यांची जायची तयारी झाली. सान्वीने पण लवकर उठून सगळी तयारी केली. निघताना आई बाबांनी बरंच काही दिलं होतं ते तिने गाडीत ठेवलं.
लग्नानंतर सगळेच पहिल्यांदा आले होते त्यामुळे सान्वीच्या आईने सगळ्यांसाठी काही न काही गिफ्ट आणले होते. सविताला साडी आणि कबीरलाही ड्रेस आणला होता. एवढं सगळं बघून सविता नाही नाहीच म्हणत होती पण तरीही सान्वीच्या आईने जबरदस्तीने दिलंच.
सान्वीने दाराबाहेर पाऊस टाकताच सान्वीच्या आई बाबांचे डोळे पाणावले. सान्वीच्याही डोळ्यात पाणी होतेच. विक्रम पुढे आले आणि त्यांनी प्रभाकरराव आमच्या खांद्यावर हात ठेवला.
"नका काळजी करू, सान्वीची काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत." विक्रम म्हणाले. तसं प्रभाकर पाटील कबीर समोर आले आणि त्याच्याशी बोलू लागले.
"मी तुमच्याकडे कधीच काही मागणार नाही फक्त मला आज एक वचन हवंय तुमच्याकडून!" प्रभाकर पाटील म्हणाले तसं सान्वी पुढे आली.
"बाबा, काही पण काय.... आता कसलं वचन घेताय तुम्ही. तुम्हाला दिसतंय ना मी किती खुश आहे तरी सुद्धा असं का करताय?" सान्वी म्हणाली.
"माझं बापाचं मन आहे पोरी, ते तुला नाही कळायचं. एकदा की कबीररावांनी वचन दिले की मग मी निश्चिंत राहील." प्रभाकर पाटील म्हणाले.
"तुम्हाला काय वचन हवंय बोला, देतो मी..." कबीर म्हणाला. तेव्हा त्यांनी सान्वीचा हात हातात घेतला आणि कबीरच्या हातावर ठेवला.
"मला एवढंच वचन हवंय, तुमच्या आयुष्यात कितीही चढउतार आले. काहीही झालं तरी तुम्ही माझ्या मुलीचा हात सोडणार नाही." प्रभाकर पाटील म्हणाले तसं कबीर स्तब्ध झाला. त्याचे हात थरथरू लागले. त्यांना वचन द्यायला त्याचं मन तयार होईना. तो काहीच बोलला नाही म्हणून प्रभाकर पाटील पण काळजीत पडले. कबीरच्या मनात काय चालू आहे ते त्यांनाही कळेना, सान्वी सुद्धा फक्त त्याच्याकडेच बघत होती. कबीर काहीच बोलत नाही हे बघून विक्रमच पुढे आले आणि त्यांनी त्या दोघांचे हात पकडले.
"मी वचन देतो तुम्हाला, हे दोन्ही हात मी कधीच वेगळे होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही." विक्रम म्हणाले.
"हेच वाक्य जर कबीर रावांच्या तोंडून ऐकायला मिळालं असतं तर मनाला समाधान मिळालं असतं." प्रभाकर पाटील म्हणाले तसं कबीर त्यांच्याकडे बघू लागला.
"बाबा, मी वचन देतो तुम्हाला. तुमच्या मुलीचा हात आणि तिची साथ कधीच सोडणार नाही." कबीर म्हणाला तसं त्यांचं समाधान झाले. पण त्याने हे वाक्य बोलायला उशीर केला त्यामुळे त्यांची काळजी अजूनच वाढली होती.
"बरं चला आता आम्ही निघतो, नाही तर परत उशीर होईल." विक्रम म्हणाले.
"हो हो या... आणि पोहचल्यावर फोन तेवढा करायला विसरू नका." सान्वीची आई म्हणाली.
"हो, आता तुम्हीही वेळ काढून आमच्या घरी या. लेकीचं सासर कसं आहे ते तरी बघा. तेवढाच आम्हालाही आनंद होईल आणि आम्हालाही तुमचा पाहुणचार करायला मिळेल." सविता म्हणाली.
"हो नक्कीच येऊ आम्ही. आता सध्या शेतातील कामं आहेत. ती झाली की मग येऊ वेळ काढून." सान्वीची आई म्हणाली. मग सगळेच त्यांचा निरोप घेऊन गाडीत बसले आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली.
पुर्ण प्रवासात कबीरच्या डोक्यात आता एकच गोष्ट फिरत होती ती म्हणजे सान्वीच्या बाबांना दिलेलं वचन.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा