Login

अशी जुळली गाठ. भाग - २१

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - २१

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान कबीर, सान्वी आणि घरचे सगळे घरी पोहचले. प्रवासाने दमल्यामुळे सगळ्यांनी एक दिड तास आराम केला.

संध्याकाळी सात वाजता सान्वी फ्रेश होऊन खाली आली आणि देवासमोर दिवा लावला. त्यानंतर किचनमध्ये गेली आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आता तिला कबीर आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडी निवडी बद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली होती त्यामुळे तिला जेवण बनवायला सोपं जात होतं.

कबीर आणि विक्रम तर आल्यापासून फक्त कामाचंच बोलत होते. जेवणाची वेळ झाली तरी त्यांचं काम आणि कामाचे फोन चालूच होते. ते बघून सविताची चिडचिड चालू झाली.

"काय हो तुमचं हे... आल्यापासून तुम्ही दोघेही फक्त कामाचं बोलताय. काम सोडून दुसरं काही सुचतच नाही का तुम्हाला!" सविता म्हणाली.

"आता तिकडे होतो तेव्हा कामाचा विषय तरी काढला का आम्ही.... नाही ना... मग आता इथे आलोय तर काम बघावंच लागणार ना, त्याशिवाय काही पर्याय आहे का? एकतर कामाचा लोड पण आहे आणि नेमकं आता इशिता जाॅब सोडायचा म्हणतेय, ती गेल्यावर तर किती धावपळ होणार आहे हा विचारच करवत नाही." विक्रम म्हणाले. तसं सान्वी सविताकडे बघू लागली.

"आई, इशिता कोण हो...? मी आजच हे नाव ऐकलंय." सान्वी म्हणाली.

"तुला कबीरने सांगितलं नाही का काही?" सविताने तिलाच प्रश्न विचारला.

"नाही, आणि मी इशिता हे नाव पण त्यांच्या तोंडून कधी ऐकले नाही." सान्वी म्हणाली.

"अगं ती कबीरची पीए आहे. खुप मेहनती आहे. कुठलाही प्राॅब्लेम असो, ती असा चुटकीसरशी सोडवते. पण तुला कबीरने कसं काय तिच्याबद्दल काही सांगितले नाही." सविता म्हणाली तसं सान्वी कबीर कडे बघू लागली.

"आई, तू पण ना... काही पण प्रश्न येतात तुझ्या डोक्यात, हिला सगळं सांगायला किंवा सगळं माहिती असायला आमच्या लग्नाला असे दिवस तरी कितीसे झाले आहे. आमच्यात अजून कामाबद्दल काही बोलणं पण झालं नाही आणि तसा विषय पण नाही निघाला. मग लगेच कसं तिला काही माहिती होईल." कबीर म्हणाला.

"हो ते पण आहेच. बरं चला आता जेवून घ्या, नाही तर अजूनच उशीर होईल." सविता म्हणाली तसं सगळेच जेवायला बसले. थोड्या वेळातच सगळ्यांची जेवणं झाली. त्यानंतर कबीर बाहेर शतपावली करायला गेला. सान्वी पण तिचं सगळं आवरून खोलीत गेली. तोपर्यंत कबीर सुद्धा खोलीत आला.

"मी तुमच्या हाताला मलम लावून देते. अजून एक दोन वेळा लावला की मग तुम्हाला बरं वाटेल." सान्वी म्हणाली. त्यावर कबीर काहीच बोलला नाही. त्यामुळे त्याचा होकार समजून तिने लगेच हात पकडला आणि मलम लावू लागली.

"तू माझी एवढी काळजी कशाला घेतेस? मी अजूनही तुझ्याशी हवं तसं मनमोकळेपणाने बोलत नाही तरी सुद्धा तू सतत माझ्या जवळ का येत असते?" कबीरच्या मनात आलेला प्रश्न त्याने तिला विचारला. तसं ती हलकंसं हसली.

"तुम्ही मला अजून तुमच्या मनात स्थान दिले नाही. हे मला माहीत आहे पण माझं तसं नाहीये... ज्या दिवशी तुमच्या नावंच मंगळसूत्र गळ्यात घातलं त्या दिवसापासून तुम्हीच माझं सर्वस्व झालात. मला खात्री आहे की एक दिवस तुम्ही पण माझा स्विकार कराल आणि तुमच्या मनात आणि या बेडवर मला जागा मिळेल." सान्वी म्हणाली.

"जर समजा तसं झालंच नाही तर?" कबीरने विचारलं.

"तसं नाही होणार, कारण तसं काही असतं तर तुम्ही माझ्या बाबांना वचनच दिलं नसतं." सान्वी म्हणाली. बोलता बोलता तिचा मलम लावून झाला. मग ती सोफ्यावर बसली.

"कबीर एक प्रश्न विचारू का?" म्हणजे तो तुम्हाला आवडेल की नाही माहित नाही पण तरीही माझ्या मनात आला म्हणून विचारावासा वाटला." सान्वी म्हणाली.

"हो विचार...." कबीर एकदम थंड आवाजात बोलला. आता ही मध्येच काय प्रश्न विचारणार आहे असा विचार त्याच्या मनात आला.

"तुमचं कोणावर प्रेम तर नाही ना....!" सान्वीच्या या प्रश्नाने कबीर चांगलाच हादरला. हिला इशिता बद्दल काही माहिती झालं की काय असा विचार त्याच्या मनात येऊन गेला.

"तुला आजच हा प्रश्न का विचारावासा वाटला?" कबीरने तिलाच प्रश्न केला.

"खरं सांगू का... माझा तुमच्यावर आधीपासूनच विश्वास होता, त्यात तुम्ही माझ्या बाबांना वचन दिले म्हणून अजून जास्त विश्वास बसला आहे तुमच्यावर, पण तरीही एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारतेय. कारण जे काही असेल ते आताच माहिती असलेलं बरं. नंतर जर चुकीच्या पद्धतीने समोर आलं तर मला तो धक्का सहनच होणार नाही, म्हणून विचारतेय." सान्वी म्हणाली. त्यावर कबीर काहीच न बोलता विचार करू लागला.

कबीरला वाटत होते की सान्वीने स्वतःहून विचारलं आहे तर तिला सगळं काही खरं सांगून टाकावं.... पण परत त्याने विचार केला हिला खरं सांगितल्यावर ही निघून गेली तर बाबांच्या रागाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आता जे काही आहे ते इथेच संपलेलं बरं. म्हणून त्याने परत इशिता बद्दल काही सांगायचा विचार मनातून काढून टाकला.

"हे बघ... माझं कोणावरही प्रेम नाहीये आणि हे असले प्रश्न मला परत विचारू नकोस. खुप रात्र झाली आहे, तू ही आराम कर आणि मलाही आराम करू दे." कबीर म्हणाला आणि त्याने तोंडावर पांघरूण घेऊन झोपून घेतलं. पण सान्वी त्याच्या बोलण्याने खुश झाली नव्हती. त्याच्या आवाजाचा टोन तिला काहीतरी वेगळाच जाणवत होता. ती कितीतरी वेळ तो जे बोलला ते खरं बोलला की खोटं बोलला याचाच विचार करत होती.

सकाळी कबीर झोपेतून उठला तेव्हा सान्वी झोपलेलीच होती. मग तो उठून त्याचं आवरून बाहेर आला. त्याला एकट्याला येताना बघून सविताने त्याला विचारलं.

"सान्वी नाही आली का?"

"नाही, ती अजून झोपलेली आहे. गाढ झोपेत वाटत होती मग मी ही नाही उठवलं." कबीर म्हणाला.

"बरं असूदे, झोपू दे तिला... तू बस मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणते." सविता म्हणाली आणि त्याला ब्रेकफास्ट दिला.

"कबीर, तू आजचा दिवस घरी थांबलास तरी चालेल. तुझ्या हाताला जखम आहे. उगाच कामात कसला धक्का लागला तर अजून त्रास होईल. एक ऑनलाइन मिटींग आहे तेवढी फक्त अटेंड कर, बाकी एवढं काही महत्त्वाचे नाहीये." विक्रम म्हणाले.

"हो चालेल..." कबीर म्हणाला आणि ब्रेकफास्ट करू लागला. थोड्या वेळातच सान्वी आली. उशीर झाल्याने ती थोडी गडबडली होती.

"आई, साॅरी मला उशीर झाला. पण उद्यापासून मी वेळेवर उठेल." सान्वी म्हणाली.

"असूदे गं.... तसंही लवकर उठून फार काही कामं नाहीयेत इथे. ती श्रावणी बघ, अजून लोळत पडली आहे. कधी उठणार आहे काय माहीत." सविता हसून म्हणाली तसं सान्वी हलकसं हसली आणि किचनमध्ये गेली. कबीर तिच्याकडे बघत होता, तिने कबीर कडे पाहिलं नाही की त्याच्याशी बोलली सुद्धा नाही. ते बघून त्याला थोडं विचित्रच वाटलं पण तिला उठायला उशीर झाला असेल म्हणून न पाहता गेली असेल असं समजून तो परत ब्रेकफास्ट करू लागला.

थोड्या वेळातच कबीरने सान्वीला आवाज दिला.

"मला चहा आणते का?" कबीर तिचं नाव न घेताच बोलला पण तिला कळलं की तो तिच्याकडेच चहा मागतोय मग तिने त्याला चहा आणला आणि तो टेबलवर ठेवून ती काही न बोलताच आत निघून गेली. आता कबीरच्या लक्षात आले की ही आपल्याशी मुद्दाम बोलत नाहीये. पण ती का बोलत नाहीये हे काही त्याला कळत नव्हते. तो चहा पिऊन परत तिला आवाज देणार तोच इशिताचा फोन आला. त्याने फोन रिसिव्ह केला आणि बोलायला बाहेर गेला.

"हॅलो इशिता, बोल ना...." कबीर म्हणाला.

"बायकोसोबत फिरून झालं असेल तर आज तरी ऑफिसला येणार आहे की नाही?" इशिता म्हणाली.

"साॅरी, आज मी खरंच नाही येणार, माझी तब्येत जरा बरी नाहीये. पण काही अर्जंट काम असेल तर मला काॅल कर." कबीर बोलला पण त्याच्या त्या बोलण्याचा इशिताने वेगळाच अर्थ काढला आणि तिला त्याचा रागही आला.

"म्हणजे आता मी कामाशिवाय तुला फोन करायचा नाही का? तसंच असेल तर स्पष्ट बोल ना... मला फोन करू नको म्हणून, उगाच कामाचं नाव कशाला मध्ये घेतोय." इशिता रागावून बोलली तसं कबीरने कपाळावर हात मारला.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all