Login

अशी जुळली गाठ. भाग - २३

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - २३

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

इशिताला समोर बघताच सान्वीने स्वतःकडे पाहिलं तर ती भिजलेली होती आणि तिचे पायही चिखलाने भरले होते. तिचा अवतार बघून तिची तिलाच लाज वाटू लागली. आपला हा असा अवतार समोर जी कोणी आहे तिला दिसायला नको असा विचार करून सान्वी कबीरच्या मागे लपली. सान्वीला असं बघून इशिताला खरं तर हसू आले पण तिने कबीरच्या खांद्यावर हात ठेवलेले बघून इशिताच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले.

"या कोण आहे कबीर?" सान्वीने हळू आवाजात विचारलं.

"ती माझी पीए आहे, आई जिच्याबद्दल बोलत होती ना, तिचं ही इशिता." कबीरहीनेही हळू आवाजातच सांगितले.

"ओह्ह्... हीच का ती, मी आलेच... पटकन चेंज करून येते." सान्वी म्हणाली आणि लगेच आत गेली. ती गेल्यावर इशिता पुढे आली कबीर समोर उभी राहिली.

"इशिता... तू आता इथे!" कबीर म्हणाला.

"का? मी आलेलं आवडलं नाही का तुला? की माझ्यामुळे तुमच्या रोमान्स मध्ये अडथळा आला." इशिता म्हणाली. तिच्या आवाजाचा स्वर काहीतरी वेगळाच होता.

"तसं काही नाहीये, तू अचानक न सांगता आली म्हणून विचारलं." कबीर म्हणाला.

"तुझी तब्येत बरी नाही हे ऐकून तुझी काळजी वाटत होती. काय करणार... प्रेम केलंय ना तुझ्यावर, मनात कितीही ठरवलं तरी तुला विसरता येत नाही. म्हणून मग लंच ब्रेक होताच घाईघाईने न जेवताच तुला बघायला आले पण इथे येऊन पाहतेय तर काहीतरी वेगळेच चालू आहे. एवढं खोटं बोलायची काय गरज होती तुला... मी तुझी बाॅस नाहीये, तू माझा बाॅस आहे. तू सरळ सांगू शकला असता ना मला माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मी नाही येऊ शकत. असं सांगितल्यावर मी काही तुला जाब नसता विचारला." इशिता रागावून बोलत होती. कबीर फक्त तिच्याकडे बघत होता. तिचं बोलून झाल्यावर मग त्याने बोलायला सुरुवात केली.

"तुझं बोलून झालं असेल तर मी बोलू का?" कबीर म्हणाला.

"आता काय बोलणार आहे तू? अजून काही खोटं बोलायचं बाकी आहे?" इशिताने रागाने विचारलं.

"मी खोटं नव्हतो बोलत, हे बघ.... जरा हात बघ माझा. हाताला जखम आहे आणि मला त्यावर शर्ट आणि ब्लेझर घालता आले नसते. ते घातल्यावर अजून दुखलं असतं. म्हणून मी नाही आलो ऑफिसला. आता हे टी शर्ट आहे, असा तर नाही येऊ शकत ना मी." कबीर बोलला तेव्हा तिने त्याच्या हाताकडे पाहिले तर हात बराच भाजलेला होता. मग तिने घाईघाईने त्याचा हात हातात घेतला आणि त्या हाताकडे बघू लागली.

"बापरे केवढी मोठी जखम झाली आहे कबीर ही, एवढं काय लागलंय तुझ्या हाताला? मला तर हात भाजल्यासारखा वाटतोय. तू डॉक्टरकडे नाही गेला का?" इशिताने काळजीने विचारलं.

"गेलो होतो मलम दिलाय त्यांनी लावायला." कबीर म्हणाला तसं तिने परत कसं भाजलं ते विचारलं पण त्याने तिला ते सांगितलंच नाही. तिला समोरून सान्वी येताना दिसली तेव्हा तिने कबीरचा हात सोडला आणि तिच्याकडे बघू लागली.

"हे काय... तुम्ही अजून इथेच उभ्या आहेत. आत का नाही आलात?" सान्वी तिथे येताच तिने इशिताला विचारलं.

"माझं कबीर सरांकडे एक काम होतं, ते झालंय. आता जाते मी." इशिता म्हणाली.

"असं कसं, तुम्ही इथूनच परत गेला तर मला वाईट वाटेल. आत चला ना... काही चहा काॅफी वगैरे घ्या." सान्वीच्या बोलण्याने इशिताला इरीटेट होत होतं. पण तिला काही बोललं तर ते कबीरला आवडणार नाही म्हणून ती शांतच होती.

"नाही, मला काहीच नकोय मी येते." इशिता म्हणाली आणि जायला मागे वळली तोच कबीरने तिचा हात पकडला. इशिताने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं तेव्हा त्याला सान्वी तिथे असल्याची जाणीव झाली आणि त्याने पटकन तिचा हात सोडला.

"आता आलीच आहेस तर जेवून जा. मी पण नाही जेवलोय अजून." ती जेवली नव्हती म्हणून कबीर तसं बोलला. ते ऐकून इशिताचं मन आतून सुखावून गेलं पण तिला सान्वी समोर काहीच बोलता येत नव्हते. मग सान्वीनेही इशिताचा हात पकडला आणि ती तिला आत घेऊन गेली. तिने कबीर सोबत इशितालाही जेवायला वाढलं. ते दोघं जेवत असताना सविता पण तिथे आली आणि इशिताला समोर बघून तिलाही आश्चर्य वाटले.

"इशिता, तू आज घरी कशी काय?" सविताने विचारलं. इशिताला आता काय बोलावं हेच सुचेना. ती कबीर कडे बघू लागली.

"ती कामाचं बोलायला आली होती, ते फोनवर बोलता येण्यासारखं नव्हते म्हणून घरीच आली." कबीरने तिची बाजू सांभाळून घेतली.

"अच्छा, इशिता... कबीरने तुझी ओळख करून दिलीच असेल पण मी परत करून देते. ही सान्वी... कबीरची बायको आहे. तू अशीच अधूनमधून येत जा, तेवढंच तिच्याशीही ओळख होईल आणि तुमची मैत्री होईल. तसंही सान्वीसाठी इथे सगळं अनोळखी आहे ना, तुमची मैत्री झाली तर तेवढंच तिला एकटेपणा नाही वाटणार." सविता म्हणाली.

"कबीर सर असल्यावर त्यांना एकटं वाटायची काही गरजच नाही आणि मैत्रीचीही गरज नाही. हो ना कबीर सर!" इशिताचा बोलण्याचा नूर काहीतरी वेगळाच होता. ती कबीरकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होती. पण कबीर काहीच न बोलता खाली मान घालून जेवत होता. तो काहीच बोलला नाही म्हणून सान्वीनेच बोलायला सुरुवात केली.

"मला आवडेल तुमची मैत्रीण व्हायला, तुम्ही कबीर सोबत दिवसभर असतात ना मग तुमच्याकडून मला त्यांची प्रत्येक आवड निवड जाणून घेता येईल. तसं काही झाल्यात माहिती, पण तुमच्याकडून अजून माहिती होतील." सान्वी म्हणाली. आता इशितालाही नाही म्हणता येत नव्हते.

"मलाही आवडेल तुमची मैत्रीण व्हायला. आपण भेटत जाऊ अध्ये मध्ये." इशिता म्हणाली. त्यानंतर सान्वी तिला बरेच प्रश्न विचारत होती. तिच्या प्रश्नांची उत्तरे देऊन इशिताला कंटाळा आला होता. पण काहीच बोलता येत नव्हते. बोलता बोलता सान्वीने लगेच तिच्या लग्नाचाही विषय काढला.

"काय मग लग्न वगैरे ठरलं आहे की नाही!" सान्वीने इशिताला विचारताच कबीरला जोराचा ठसका लागला. ती त्याला पाणी द्यायला जाणार त्याच्या आधीच पटकन इशिताने त्याला पाणी दिलं आणि त्याच्या पाठीवर हाताने रब करू लागली. समोरचं दृश्य बघून सान्वीचा चेहराच पडला. पण ती काहीच बोलली नाही. कबीरने सान्वीकडे बघताच त्याने इशिताचा हात मागे घेतला.

"मी ठिक आहे, तू तुझं खाऊन घे." कबीर म्हणाला तसं इशितालाही जरा ओशाळल्यासारखे झाले आणि ती खाली बसली.

जेवण झाल्यावर इशिता उठली आणि सविताकडे बघू लागली.

"मी येते आता." इशिता म्हणाली.

"हो ये... आणि पुढच्या वेळी यायच्या आधी फोन करून सांग, तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवेल. आता घाईघाईत आल्यामुळे साधंच जेवण झालं." सविता म्हणाली.

"नाही ठिक आहे, तुम्ही एवढं आपुलकीने बोललात तेच खुप झालं." इशिता म्हणाली आणि जाऊ लागली तोच कबीरने तिला अडवले.

"थांब मी येतो तुला सोडवायला." कबीर म्हणाला.

"नको मी जाईल." इशिता.

"तू ऑटोने जाईपर्यंत वेळ लागेल, मग उशीर होईल त्यापेक्षा मी सोडतो तुला म्हणजे लवकर जाशील." कबीर म्हणाला आणि तिचं पुढे काही ऐकून न घेताच बाहेर पडला. मग इशिताही त्याच्या मागे गेली. ती गेल्यावर सान्वी चेहरा पाडून सोफ्यावर बसली.

"आई, तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक बोलू का?" सान्वीने विचारलं.

"अगं बोल की... मला कशाला राग येईल!" सविता म्हणाली.

"मला त्या इशिताचं वागणं अजिबात नाही आवडलं, यांना ठसका लागला तर ती कशी करत होती पाहिलं ना तुम्ही. मी तिथे असताना माझ्या नवऱ्याला पाणी द्यायची आणि त्याची पाठ चोळायची तिला काय गरज होती. माझं मी केलं असतं ना, अगदीच मी नाही तर तुम्ही सुद्धा इथेच होत्या. मग कबीरची आई आणि बायको दोघीही असताना तिला असं वागणं शोभतं का!" सान्वी थोडी रागातच बोलली. तसं सविता तिच्याकडे बघू लागली.


क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all