अशी जुळली गाठ. भाग - २४
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"सान्वी, तुला राग येणं किंवा वाईट वाटणं सहाजिकच आहे पण एक गोष्ट लक्षात घे... कबीर आपल्यासोबत जेवढा वेळ राहतो ना त्यापेक्षा जास्त वेळ तो इशिता सोबत राहतो. त्याला काय हवं ते बघणं आणि त्याची काळजी घेणं हे तिचं कामच आहे. ते कामानिमित्त दिवसभर सोबत असतात. त्यामुळे तिने सवयीप्रमाणे तसं केलं असेल. तू उगाच मनात काही पण शंका आणू नकोस. या असल्या शंका मनात आल्या की संसार उद्धवस्त व्हायला वेळ लागत नाही. कबीर वर आमचा पुर्ण विश्वास आहे आणि इशितावर सुद्धा. तिने आता जे केलं ते तिच्या कामाचा भाग म्हणूनच केलं असेल असा विचार कर आणि हा विषय इथेच सोडून दे." सविता म्हणाली. तिला कबीर आणि इशिता बद्दल काहीच माहिती नव्हतं. म्हणून ती तसं बोलत होती. शेवटी आईचं मन ते... मुलावर विश्वास ठेवणारच.
"बरोबर आहे आई, पण ऑफिसची गोष्ट वेगळी आहे आणि घरची गोष्ट वेगळी आहे. आता इथे ती आपल्या घरी होती ना... मग तिने नव्हतं त्यांना पाणी द्यायला पाहिजे. असं मला वाटतं." सान्वी म्हणाली
"तुझं बरोबर आहे पण तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने पाणी दिलं असेल. नसेल तिच्या पटकन लक्षात आले. नको जास्त विचार करू आणि याबद्दल कबीरशी सुद्धा बोलू नकोस. नाही तर तुमच्यात त्यावरून वाद होतील. आणि माझ्यावर विश्वास ठेव, इशिताला आम्ही सगळे पहिल्यापासून ओळखतो. ती तिचं काम प्रामाणिकपणे करते. आपण सगळे गावी होतो तेव्हा इथलं सगळं तिने एकटीने सांभाळलं होतं. त्यामुळे तिच्यावर असा अविश्वास दाखवणं चुकीचे आहे." सविता म्हणाली.
"कदाचित मी आज पहिल्यांदाच तिला पाहिलं म्हणून मला वेगळं वाटलं असेल." सान्वी म्हणाली आणि तिने इशिताचा विचार डोक्यातून काढून टाकला.
"श्रावणी कुठे गेली आहे, बराच वेळ झाला मला दिसलीच नाही." सान्वीने जाणीव पुर्वक विषय बदलला.
"ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे." सविता म्हणाली. त्यानंतर सान्वी पण रूममध्ये जाऊन आराम करू लागली.
इकडे कबीर इशिताला सोडवायला चालला होता. तो ड्राईव्ह करत असताना इशिताचं लक्ष त्याच्या हाताकडेच होतं.
"कबीर, कशाला उगाच त्रास करून घेतला. मी गेली असती ना... तुझा हात दुखेल ड्राईव्ह करून." इशिता म्हणाली.
"एवढं काही नाहीये, उलट तुझ्यासोबत तेवढाच थोडा तरी वेळ मला भेटेल." कबीर म्हणाला तसं ती रागाने बघू लागली.
"तुला हे बोलताना काहीच कसं वाटत नाही कबीर, तुझं लग्न झालंय आता." इशिता म्हणाली.
"लग्न झालंय म्हणून मी तुझ्यासोबत बोलायचं सुद्धा नाही का आता!" कबीर म्हणाला.
"तसं म्हटलंय का मी!" इशिता.
"मग कसं म्हणायचं आहे तुला, तू मला बोलतेय आणि तू तरी काय वेगळं करतेय. तू तरी कुठे विसरली आहे मला. माझी तब्येत बरी नाहीये हे ऐकून न जेवताच मला बघायला आलीच ना... एवढंच नाही तर मला ठसका लागला तर तुझा जीव नुसता खाली वर होत होता ते सुद्धा मी पाहिलं आहे. आपल्याला एकमेकांची लागलेली सवय अशी लगेच नाही मोडणार इशिता. थोडा वेळ तर जाईलच ना!" कबीर.
"तुला जाईल बहुतेक थोडा फार वेळ पण मला नाही जाणार. माझ्या मनातलं तुझ्याविषयीचं प्रेम मी या जन्मात तरी विसरेल असं नाही वाटत मला. कबीर तू तीन दिवस इथे नव्हता पण तुझ्याशिवाय ते तीन दिवस मी कसे काढले आहेत ते माझं मलाच माहीत. तू प्लीज मला चुकीचं समजू नकोस, मला तुझ्यात आणि सान्वीभध्ये नाही यायचं. मी तसा प्रयत्न सुद्धा करणार नाही... पण माझ्या मनात जे आहे ते मी तुला सांगतेय." इशिता म्हणाली.
"आता हे सगळं बोलून काहीच फायदा नाही. माझं लग्न झालं तेव्हाच तू असं बोलली असतीस तर मी सान्वीला आपल्या मार्गांत येऊच दिले नसते पण आता तिलाही हे नातं हवं आहे आणि त्यासाठी ती खुप प्रयत्न करतेय." कबीर म्हणाला तसं इशिताचे डोळे पाणावले पण तिने पापण्यांची उघडझाप करून डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आटवलं. पुढे ती काहीच बोलली नाही.
थोड्या वेळातच दोघेही ऑफिसला पोहचले. कबीरने इशिताला सोडलं आणि तो परत घरी जायला निघाला. आता घरी येताना त्याच्या मनात सान्वीचे विचार चालू होते. ती इशिता बद्दल काही प्रश्न तर विचारणार नाही ना याची कबीरला भिती वाटत होती. गाडी एका सिग्नलवर थांबली तसं त्याच्या गाडीजवळ एक मुलगा आला आणि तो कबीरला गजरे घेण्यासाठी हट्ट करू लागला. मग कबीरनेही त्याला पैशाची मदत म्हणून त्याच्याकडून ते गजरे विकत घेतले.
कबीर घरी आला तेव्हा ते गजरेही त्याने सोबतच आणले आणि रूममध्ये आल्यावर ते टेबलवर ठेवले. नंतर त्याची नजर सोफ्यावर गेली तर सान्वी शांत झोपली होती. मग तो ही बेडवर येऊन बसला आणि शांतपणे तिच्याकडे बघू लागला. थोड्या वेळातच तिला जाग आली. कबीरला समोर बघताच ती पटकन उठून बसली.
"तुम्ही कधी आलात?" सान्वीने विचारलं.
"झाला थोडा वेळ." कबीर म्हणाला त्याचवेळी सान्वीला फुलांचा सुगंध जाणवला आणि तिने बरोबर तो सुगंध ओळखला.
"व्वा काय मस्त मोगऱ्याचा वास सुटलाय. मी इथे आल्यापासून पहिल्यांदाच हा वास दरवळतोय इथे." सान्वी म्हणाली. त्यावर कबीर काहीच बोलला नाही. पण तिचं लक्ष समोरच्या टेबलावर गेलं तसं ती घाईघाईने उठली आणि तिने ते गजरे हातात घेतले आणि त्यांचा वास घेऊ लागली.
"किती फ्रेश गजरे आहे हे, कबीर... हे गजरे तुम्ही माझ्यासाठीच आणलेत ना... खुप खुप थॅंक्यू. मला खुप आवडतात असे गजरे." सान्वी खुश होऊन म्हणाली. कबीरने खास तिच्यासाठीच ते गजरे आणले असा सान्वीने स्वतःच स्वतःचा गैरसमज करून घेतला आणि ते गजरे तिने केसातही माळले. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कबीरची सुद्धा तिच्यावरची नजर हटत नव्हती. ती किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधतेय हे बघून त्याला तिचं कौतुक वाटत होतं.
सान्वीने ते गजरे माळले आणि त्या गजऱ्यांच्या आनंदात इशिताचा विचारही तिच्या डोक्यातून निघून गेला. ती कबीरशी जसं काही काहीच घडलं नाही असं बोलत होती त्यामुळे तोही निश्चिंत होता आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद डोळ्यात साठवून घेत होता.
दुसऱ्या दिवशीही कबीरचा हात दुखतच होता पण तरीही तो ऑफिसला गेला. सान्वीने दिवसभरात तीन वेळा फोन करून त्याच्या हाताबद्दल विचारलं.
संध्याकाळी कबीर घरी आल्यावर सान्वीने स्वतःच्या हाताने त्याच्या हाताला मलम लावून दिला.
सान्वी कबीरची छान काळजी घेत होती. त्याचा हातही हळूहळू बरा होत होता. त्यांचं नातं फुलण्यासाठी सान्वी कबीरची प्रत्येक आवड जपत होती. त्याची मर्जी राखत होती. तिचं गोड बोलणं बघून कबीरही तिच्याशी छान मोकळेपणाने बोलत होता. पण अजूनही त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण झालं नव्हतं.
कबीर आणि सान्वीच्या लग्नाला आता तीन महिने झाले होते. दरम्यान श्रावणीचंही काॅलेज चालू झाले होते. त्यामुळे सान्वीलाही घरी कंटाळा येत होता. ती असंच कशात ना कशात तिचं मन रमवायची. जास्तच कंटाळा आला तर कबीरला फोन करायची. तो सुद्धा तिचे फोन रिजेक्ट करत नव्हता. प्रेम नव्हतं पण त्यालाही तिची सवय झाली होती.
कबीर ऑफिसमध्ये काम करत होता पण त्याचं लक्ष सारखंच मोबाईलकडे होतं. त्याचं कामात पुर्ण लक्षच नव्हतं. इशिता त्याला काहीतरी महत्त्वाचं सांगत होती पण तरीही त्याचं तिच्याकडे लक्ष नव्हते. ते बघून ती वैतागली.
"कबीर, काय चाललंय तुझं? मी इथे कधीपासून तुझ्याशी एवढं महत्त्वाचं बोलतेय, पण तुझं माझ्याकडे लक्षच नाहिये. आपल्यासाठी हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे हे माहितीये ना तुला, तरीही तू असा माझं बोलणं इग्नोर का करतोय!" इशिता त्याच्यावर चांगलीच चिडली.
"साॅरी, ते खरंच मी दुसऱ्याच विचारात होतो. तू परत सांग ना काय सांगत होतीस." कबीर म्हणाला.
"दुसऱ्याच विचारात म्हणजे तुझ्या बायकोच्या विचारात हरवला होता बरोबर ना..." इशिता रागाने म्हणाली.
"खरं तर मी आता तिचाच विचार करत होतो, रोज तिचा एवढ्या वेळापर्यंत एक तरी फोन येतो... पण आज तिने अजून एकही फोन केला नाही म्हणून जरा काळजी वाटतेय." कबीरने इशिताला खरं काय ते सांगितलं. तसं ती त्याच्याकडे रागाने बघू लागली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा