अशी जुळली गाठ. भाग - २५
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"कबीर, माझ्या फोनची कधी एवढी आतुरतेने वाट पाहिली होती का रे तू?" इशिताने त्याला विचारलं तसं त्याच्या हातात असलेला पेन खाली गळून पडला आणि तो तिच्याकडे एकटक बघू लागला.
"इशिता, प्रत्येक गोष्टीत तू असं तुम्हा दोघींची तुलना का करत असते?" कबीर.
"मी तुलना नाही करत पण आता महत्वाचं काम चालू आहे मग लक्ष नको का द्यायला!" इशिता म्हणाली.
"काम होईलच पण रोज तिचा फोन येतो आज नाही आला म्हणून मला तिची काळजी वाटतेय." कबीर बोलतच होता तोच सान्वी हसतच आत आली. तिने त्याचं ते वाक्य ऐकलं होतं. कबीर आपली काळजी करतोय हे ऐकून तिलाही छान वाटलं.
"माझा फोन नाही आला म्हणून काय झालं, हे बघा मी प्रत्यक्ष इथे आले आहे. आणि फक्त मीच आले नाही तर तुमच्यासाठी मस्त स्पेशल जेवण सुद्धा आणलं आहे." सान्वी हसून म्हणाली. तिच्या आवाजाने ते दोघेही तिच्याकडे बघू लागले.
"तू असं काहीच न सांगता कशी काय आलीस?" कबीरने विचारलं.
"तुम्हाला सरप्राईज द्यायला, आवडलं की नाही माझं सरप्राईज!" सान्वी म्हणाली.
"हो आवडलं ना... खुप आवडलं, आता कुठे कबीर सरांचं कामात लक्ष लागेल. हो की नाही कबीर सsssर." इशिता मुद्दामच सर या शब्दावर जोर देत बोलली. तसं कबीरने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिले आणि परत सान्वीकडे बघू लागला.
"हे टिफीन वगैरे आणायची खरंच गरज नव्हती." कबीर म्हणाला.
"आता आणलाय तर घ्या की! तुमच्या दोघांसाठीही आणला आहे. जेवण थंड व्हायच्या आधी खाऊन घ्या, मग नंतर काम करत बसा." सान्वी म्हणाली.
"सान्वी, आता खरंच वेळ नाहीये... एक महत्वाचं काम चालू आहे ते झालं की मग मी जेवेन. आता तू गेलीस तरी चालेल." कबीर म्हणाला.
"नाही, मी एवढं तुमच्यासाठी टिफीन घेऊन आली आहे पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. तुमच्यासाठी कामच महत्वाचे आहे ना!" सान्वीचा चेहराच उतरला. तिचा उदास चेहरा बघून कबीरने काम बाजूला ठेवलं आणि जेवायला तयार झाला. त्याचं जेवण झाल्यावरच सान्वी घरी गेली. ती गेल्यावर इशिता दोन्ही हातांची घडी घालून डोळे मोठे करून त्याच्याकडे बघू लागली.
"आता तरी तुझं कामात लक्ष लागणार आहे ना?" इशिताने विचारलं.
"हो..." कबीर पण मुद्दामच हसत हो म्हणाला.
"मी गेल्यावर कसं होणार आहे काय माहीत, बघता बघता तीन महिने गेले. आता तीनच महिने राहिले आहे." इशिता म्हणाली तसं कबीरला ती नोकरी सोडणार आहे हे आठवलं.
"इशिता, प्लीज नको ना जाऊ... तुझी आणि तुझ्या कामाची खुप सवय झाली आहे मला, तुझ्याशिवाय मला खरचं काही काम नाही जमणार. तू नसलीस मी एकटा हे सगळं हॅण्डल नाही करू शकणार." कबीर म्हणाला.
"तुझी बायको आहे ना... तिला घे ना तुझी पीए म्हणून. चोवीस तास ती तुझ्या नजरेसमोर असली की मग तुझंही कामात लक्ष लागेल." इशिता म्हणाली. तिच्या बोलण्याचा नूर काहीतरी वेगळाच होता आणि तो कबीरला समजलाही होता. पण त्याने विषय न वाढवता काम करू लागला.
घरी जाताना कबीरला गाडीतून एक मुलगा दिसला. त्याच्या हातातले गजरे बघून कबीरला मागे घेतलेल्या गजऱ्यांची आठवण झाली आणि त्यावेळी सान्वी किती खुश झाली होती हे सुद्धा आठवलं. यावेळी त्याने स्वतःहून त्या मुलाला आवाज दिला आणि सान्वीसाठी गजरे घेतले.
घरी आल्यावर त्याने स्वतःहून सान्वीला हाक मारली.
"सान्वी, काय करतेस.... जरा रूममध्ये ये, एक काम आहे!" कबीर म्हणाला आणि रूममध्ये गेला. त्याने घरी आल्या आल्या हाक मारली म्हणून सान्वीला इतका आनंद झाला की ती धावतच रूममध्ये गेली.
"हे बघ तुझ्यासाठी गजरा आणला आहे, तुला आवडतो ना गजरा!" कबीर म्हणाला आणि तिच्यासमोर गजरा धरला. पण तिने काही हात पुढे केला नाही.
"मला गजरा आवडतोच... पण हाच गजरा जर तुम्ही तुमच्या हाताने माझ्या केसात माळला तर मला जास्त आवडेल." सान्वी म्हणाली. तिचा तो इनोसंट चेहरा बघून कबीरची तिला नकार द्यायची इच्छाच झाली नाही.
"असं आहे का... दे मी माळतो, पण मला जमेल की नाही माहित नाही. मी कधी प्रयत्न केला नाही." कबीर म्हणाला. इशिताला गुलाबच आवडत होते त्यामुळे तो तिला फक्त गुलाबच देत होता. त्यामुळे हे गजरा वगैरे याच्याशी त्याचा कधी संबंधच आला नव्हता पण तरीही त्याने तयारी दाखवली.
"सोपं आहे ओ... प्रयत्न करून बघा, जमेल तुम्हाला." सान्वी हसून म्हणाली. आणि कबीरकडे पाठ करून उभी राहिली. आरशातून ती कबीरकडेच बघत होती. कबीरने गजरा घेतला आणि तो तिच्या केसात माळला. छान क्लिप लावून त्याने तो मस्त खाली सोडला आणि तिच्या एका खांद्यावर अर्धे केस ठेऊन गजऱ्याचा एक पदर त्यावर ठेवला आणि आरशातून तिच्याकडे बघू लागला.
"बघ कसा जमलाय!" कबीर म्हणाला.
"अरे व्वा छानच जमलाय की! मला तर तुम्ही जर असेच रोज गजरे आणले तर खुप आवडतील, मग मी रोजच ते तुमच्याकडून माळून घेईल." सान्वी म्हणाली.
"तुला हवे असतील तर आणेल की रोजच." कबीर म्हणाला.
"कबीर, आपल्या लग्नाला तीन महिने कसे झाले हे सुद्धा कळलं नाही. तुमच्यासोबत हे तीन महिने खरंच खूप छान गेले." सान्वी म्हणाली.
"खरंच छान गेले की मला छान वाटावं म्हणून वरवर असं बोलतेय." कबीर म्हणाला.
"नाही ओ.... खरंच छान गेले. आपल्या नात्यात अजूनही आपण पुढे गेलो नाही, पण खरं सांगू का तुम्ही मनाने खुप जवळ आल्यासारखे वाटताय मला, म्हणजे तुम्ही माझ्या फोनची वाट बघणं, तुमचं काम सोडून माझ्याशी फोनवर बोलणं. तुम्हाला माझी काळजी वाटणं, मला काय हवं ते बघणं. हे सगळं तुम्हाला हळूहळू माझ्याकडे घेऊन येतंय. मला खात्री आहे की एक दिवस नक्कीच आपण अजून पुढची पायरी गाठू." सान्वी त्याच्याकडे बघत प्रेमाने बोलली.
"सान्वी, मी तुला कधी अंतर दिलं नाही पण कधी जवळही केलं नाही, पण तू माझ्यावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत फक्त मला वेळ देत देत आली. या रूमच्या आत काय घडतंय हे अजूनही रूमच्या बाहेर कोणालाही माहीती नाही. तीन महिन्यात मी तुला साधं प्रेमाने मिठी सुद्धा मारली नाही तरी सुद्धा ही गोष्ट तू घरात कोणालाही सांगितली नाही. खरंच एवढं सगळं कसं तू मनात साठवून ठेवू शकते. कदाचित तुझ्या जागी मी असतो तर मला हे जमलं नसतं." कबीरने तिचा हात हातात घेतला आणि बोलला.
"कसं असतं ना कबीर आपण जेव्हा आपल्या माणसाबद्दल समोरच्या व्यक्तीला सांगतो ना तेव्हा तो फक्त त्या माणसाचा अपमान नसतो. तो आपलाही अपमान असतो. मला तुमचाही आणि माझाही मान जपायचा आहे त्यामुळे मी आपल्यातल्या गोष्टी इतरांना सांगत नाही. आणि तुमच्या एका मिठीचं काय घेऊन बसलात ओ.... आताशी कुठे तीन महिने झाले आहे. मला माझं सगळंच आयुष्य तुमच्या मिठीत घालवायचं आहे. तेव्हा कितीही वाट बघायला लागली तरी मी तयार आहे वाट बघायला. तेव्हा आता जास्त विचार करू नका, फ्रेश होऊन खाली या, मी तुमच्यासाठी मस्त वेलची घालून चहा बनवते." सान्वी म्हणाली आणि लगेच खाली गेली. कबीर मात्र ती गेली त्याच दिशेने एकटक बघत उभा राहिला.
कबीर खाली येताच सान्वीने सगळ्यांसाठी चहा आणला आणि ती ही तिथेच बसली.
"आई, आज श्रावणीला यायला खुपच उशीर झाला... हो ना!" सान्वी म्हणाली.
"हो गं... रोज या वेळेपर्यंत ती घरी येत असते. कुठे मैत्रीणींसोबत थांबली की काय!" सविता म्हणाली.
"पण तिला उशीर होणार असेल तर तसं ती फोन करून सांगत असते नेहमी." सान्वी म्हणाली.
"थांब, मी फोन करून बघतो तिला." कबीर म्हणाला आणि त्याने श्रावणीला फोन केला पण तिने त्याचा काॅल घेतलाच नाही.
"बहुतेक ती येत असेल, इथेच कुठेतरी जवळपास आली असेल म्हणून फोन घेत नसेल. येईलच ती नका काळजी करू!" कबीर म्हणाला. त्यानंतर सगळेच तिची वाट बघू लागले.
अर्धा तास होऊन गेला तरी श्रावणी घरी आली नव्हती. आता सगळ्यांनाच तिची काळजी वाटू लागली. मग यावेळी विक्रमने तिला फोन केला. पण आताही श्रावणीने फोन उचलला नाही. आता मात्र सगळ्यांनाच टेन्शन आले.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा