अशी जुळली गाठ. भाग - २६
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"कबीर, श्रावणी फोनच उचलत नाहीये. आता काय करायचं?" विक्रम म्हणाले.
"आई, तुम्हाला दोघींना ती जाताने काही सांगून गेली होती का? म्हणजे कुठे जाते, कोणासोबत जाते वगैरे वगैरे..." कबीरने विचारलं.
"नाही रे, तिने काहीच सांगितलं नव्हतं आणि रोजच ती वेळेवर घरी येत असते त्यामुळे मी ही तिला काही विचारलं नाही. पण अशी न सांगता ती कधीच कुठे जात नाही, मला तर आता तिची खुप काळजी वाटतेय." सविता म्हणाली.
"सान्वी, तुला काही सांगितलंय का तिने. तसं काही असेल तर प्लीज सांग." कबीर म्हणाला.
"मला खरंच काही माहिती नाही, ती रोजच्या सारखीच जाताना बाय तेवढं करून गेली आणि तिचा मुडही चांगलाच वाटत होता." सान्वी म्हणाली.
"आई, तुझ्याकडे तिच्या कुठल्या मैत्रिणीचा फोन नंबर आहे का? असेल तर आपण फोन करून तरी बघू." कबीर.
"नाही, म्हणजे कधी मला तशी गरजच नाही वाटली. आता काय करायचं माझं तर डोकंच चालेना झालंय. एवढ्या वर्षात असं कधीच झालं नाही. मला तर खुप टेन्शन येतंय आता." सविता म्हणाली. त्याचवेळी सान्वीला काहीतरी आठवलं आणि ती बोलू लागली.
"त्या दिवशी श्रावणीने माझा मोबाईल घेतला होता. तिच्या मोबाईलचा काहीतरी प्राॅब्लेम झाला होता. तेव्हा तिने माझ्या मोबाईलवरून तिच्या एका मैत्रिणीला कॉल केला होता. आपण त्याच नंबर वर फोन करून बघायचा का?" सान्वी म्हणाली. तसं सगळेच तिच्याकडे बघू लागले.
"अगं पण मग तिचा नंबर कोणता आहे ते कळणार कसं?" सविता.
"मला शक्यतो अनोळखी नंबर वरून काॅल येतच नाही. त्यामुळे तिचा नंबर शोधायला सोपं जाईल. थांबा मी चेक करते." सान्वी म्हणाली आणि तिला एक नंबर भेटला. आणि तो बरोबर श्रावणीने ज्या दिवशी तिचा मोबाईल घेतला होता. त्या दिवशीच केलेला फोन होता. तो बघून ती लगेच कबीरला सांगू लागली.
"कबीर, हे बघा हाच तो नंबर असेल असं वाटतंय, आपण त्यावर काॅल करून बघायचा का?" सान्वी म्हणाली.
"हो हो चालेल, तू कर काॅल आणि कोण आहे ते बघ." कबीर म्हणाला तसं सान्वीने त्या नंबर वर फोन केला. पलिकडून एकाच रिंग मध्ये फोन उचलला गेला. तसं सान्वीने समोरच्या व्यक्तीला तिचं नाव विचारलं, समोरून एक मुलगी बोलत होती. मग सान्वीने तिला तिचं नाव आणि श्रावणी बद्दल विचारलं. तिच्याशी बोलणं झाल्यावर सान्वी कबीर कडे बघू लागली.
"काय झालं? श्रावणीची मैत्रीणच होती ना ती! आणि काय बोलत होती ती तुझ्याशी?" कबीरने विचारलं.
"हो ती मुलगी श्रावणीची मैत्रीणच होती. अदिती नाव आहे तिचं त्या दोघीही सोबतच आहे." सान्वी म्हणाली.
"काय??? मग श्रावणी आपले कोणाचेच का फोन घेत नाहीये? काय झालंय नेमकं?" कबीर.
"तिने तसं काही सांगितले नाही पण श्रावणी रडतेय, हे मात्र ती बोलली. कबीर... आपल्याला आताच तिथे जायला हवं, तिथे गेल्याशिवाय आपल्याला काय झालंय ते कळणार नाही." सान्वी म्हणाली.
श्रावणी रडतेय हे ऐकून सगळ्यांनाच तिची काळजी वाटली. सविता तर ते ऐकून रडायलाच लागली.
"काय झालं असेल? श्रावणी रडत का असेल? तिला कोणी काही केलं तर नसेल ना!" सविता रडता रडताच बोलली. तिच्या मनात आता नाही नाही ते विचार येऊ लागले. कबीर कसं बसं तिला शांत करू लागला.
"शांत हो आई तू... उगाच काहीतरी विचार मनात आणू नकोस, काही नाही होणार श्रावणीला. मैत्रीणी मैत्रीणीमध्ये काही छोटे मोठे वाद झाले असतील. मी बघतो तिकडे जाऊन. पण तू आधी रडणं थांबव." कबीर म्हणाला आणि सान्वीकडे बघू लागला.
"सान्वी, ती कुठे आहे याबद्दल काही सांगितले आहे का तिने तुला?" कबीरने विचारलं.
"त्या दोघी एका कॅफेत आहे, मी तिला तिथला ॲड्रेस पाठवायला सांगितला आहे. हे बघा पाठवला तिने आताच, चला आपण दोघेही तिथे जाऊ." सान्वी म्हणाली.
"मी पण येतो तुमच्या सोबत, मी जोपर्यंत श्रावणीला समोर बघत नाही तोपर्यंत माझं मन काही स्थीर राहणार नाही." विक्रम म्हणाले.
"बाबा, मी आहे ना... मी जातो आणि बघतो नेमकं काय झालं आहे ते, तुम्ही इथेच थांबा आणि आईकडे लक्ष द्या." कबीर म्हणाला आणि सान्वीला घेऊन तो घराबाहेर पडला. ते दोघेही गाडीत बसताच कबीरने गाडी स्टार्ट केली आणि अदितीने पाठवलेल्या ॲड्रेसवर ते दोघेही थोड्या वेळाने पोहचले. तिथे गेल्यावर पाहिलं तर श्रावणी एका कोपऱ्यात एका टेबलावर बसलेली होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते आणि तिच्या सोबत ती अदिती पण होती. श्रावणीला बघताच हे दोघेही धावतच तिच्याकडे गेले.
"तू अदितीच ना... काय झालंय श्रावणीला?" कबीरने विचारलं. त्याच्या आवाजाने श्रावणीने वर मान केली आणि समोर कबीर दिसताच त्याला मिठी मारत रडू लागली.
"श्रावणी, रडू नकोस... शांत हो आणि काय झालंय ते नीट सांग मला." कबीर म्हणाला. तसं ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि डोळे पुसले.
"काही नाही झालंय दादा, चला आपण घरी जाऊ." श्रावणी म्हणाली. तिथे आजूबाजूला थोडी वर्दळ होती त्यामुळे कबीरही काही बोलला नाही. सान्वीने श्रावणीचा हात हातात घेतला आणि ते तिथून बाहेर आले. बाहेर आल्यावर सान्वी अदितीकडे बघू लागली.
"अदिती, तू श्रावणी सोबत थांबून राहिली आणि ती कुठे आहे हे आम्हाला सांगितले म्हणून मी तुझी खुप आभारी आहे... पण आता तू सुद्धा घरी जा, तुझ्याही घरचे तुझी वाट बघत असतील. उगाच त्यांना तुझी काळजी लागून राहील." सान्वी म्हणाली तसं अदितीने मान हलवली आणि श्रावणीच्या खांद्यावर हात ठेवून तिला डोळ्यांनीच जाते म्हणून सांगून ती निघून गेली. ती गेल्यावर सान्वी श्रावणीकडे बघू लागली.
"श्रावणी, मी आत असताना तुला काहीच विचारलं नाही पण आता खरं खरं सांग, काय झालयं?" सान्वी म्हणाली.
"कुठे काय काहीच नाही?" श्रावणी खाली मान घालून बोलली.
"काहीच नाही झाले तर तू घरी का आली नाही? आम्ही सगळे किती काळजी करत होतो तुझी. निदान एकदा तरी आमचा फोन घेऊन तू ठीक आहे असं सांगायचं होतं ना, तुझ्या काळजीने आई बाबा किती अस्वस्थ झालेय माहितीये का तुला!" कबीर जवळ जवळ तिला ओरडलाच.
"ओरडू नका ओ तुम्ही तिला, जरा तिची अवस्था तरी बघा. थोडं शांततेत बोला तिच्याशी." सान्वी कबीरला हळू आवाजात पण रागाने बोलली.
"बरं आता नीट शांततेत विचारतोय. काय झालयं ते सांगशील का?" कबीर म्हणाला.
"नाही दादा, खरंच काही नाही झालंय... चला आपणही घरी जाऊ, आई बाबा वाट बघत असतील." श्रावणी म्हणाली. तसं कबीरने त्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर हात ठेवले. तिला थोडा वेळ शांत होऊ दिले मग एका हाताने तिला जवळ घेतले.
"श्रावणी, आजपर्यंत तू घरी यायला कधीच उशीर केला नाही. आणि आमचे कोणाचेच फोन घेतले नाही असंही कधी झालं नाही, तू काही सांगत नसली तरी मला तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय काहीतरी झालं आहे पण ते तू मला सांगत नाहीये. जे काही असेल ते प्लीज मला सांग, झाली तर माझी मदतच होईल तुला. तू माझी लहान बहिण आहेस, तुझ्या डोळ्यात पाणी बघून मला किती त्रास होत असेल याची कल्पना नाहीये तुला." बोलताना कबीरचा कंठ दाटून आला होता. सान्वीने त्याच्या पाठोपाठ हात ठेवत त्याला धीर दिला आणि श्रावणी सोबत बोलू लागली.
"हे बघ श्रावणी, जे काही असेल ते खरंच मनमोकळे पणाने सांगून टाक, घरी गेल्यावर आई बाबा असतील आपल्याला त्यांच्यासमोर नीट बोलता येईल की नाही माहित नाही. त्यामुळे आताच वेळ आहे असं समज आणि सांगून टाक." सान्वी म्हणाली. त्याचवेळी विक्रमचा फोन आला. मग सान्वीने तो रिसिव्ह केला आणि बोलू लागली.
"बाबा, श्रावणी आमच्या सोबतच आहे आणि ती ठीक आहे तुम्ही काळजी करू नका, आम्ही थोड्या वेळातच तिला घेऊन घरी येतोय." सान्वी म्हणाली. तसं विक्रमच्या जीवात जीव आला आणि त्यांनी फोन ठेवल्यावर सविताला पण श्रावणी ठीक असल्याचे सांगितले.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा