अशी जुळली गाठ. भाग - २७
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"श्रावणी, घरी आई बाबा वाट बघताय... प्लीज काय झालंय ते सांग. माझ्यावर विश्वास ठेव, जे काही घडलं असेल त्यात मी तुला मदत करेल." कबीर म्हणाला. पण तरीही श्रावणी काहीच सांगायला तयार नव्हती. मग सान्वीनेच तिला विचारलं.
"श्रावणी, तुला कोणी मुलगा काही त्रास वगैरे देतोय का? तसं असेल तर प्लीज सांग, असं मनात ठेवून त्याचा तुलाच त्रास होईल." सान्वीने विचारलं तसं श्रावणी अजूनच रडायला लागली. आता कबीर आणि सान्वी दोघांचीही खात्री पटली की हिला कोणीतरी काहीतरी बोललं आहे. म्हणूनच ही एवढं रडतेय. तेव्हा कबीरने लगेच तिला विचारलं.
"कोण आहे तो मुलगा? काय केलं त्याने सांग मला? तुझ्या डोळ्यात पाणी आणणाऱ्याला मी सोडणार नाही." कबीर रागाने म्हणाला.
"दादा, चुक माझीच आहे.... मी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला." श्रावणी म्हणाली. ती बोलायचा प्रयत्न करत होती पण तिचं रडणंच थांबत नव्हते.
"श्रावणी, तू आधी शांत हो आणि रडणं थांबव. तरच तुला नीट सांगता येईल." सान्वी म्हणाली. तेव्हा श्रावणीने डोळे पुसले आणि बोलू लागली.
"दादा, माझं आणि अनय म्हणजेच माझ्या काॅलेजचा मुलगा... आमचं एकमेकांवर खुप प्रेम होतं. आमची ओळख अकरावीत असताना झाली. आधी आमची ओळख झाली नंतर आमच्यात हळूहळू मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं हे कळलंच नाही. मला वाटायचं की अनय खरंच खूप चांगला आहे. त्याचं माझ्यावर खुप प्रेम आहे पण तसं काही नाहीये. मी बऱ्याच दिवसांपासून बघतेय, त्याचं वागणं, बोलणं यात खुप फरक पडत चालला होता. मी फोन केला की काही न काही कारणं सांगून माझा फोन ठेवून द्यायचा. मी भेटायचा विषय काढला की तो मला टाळायचा." श्रावणीचं बोलणं ऐकून कबीर आणि सान्वी एकमेकांकडे बघू लागले.
"म्हणजे श्रावणी तुझं एका मुलावर प्रेम आहे आणि ते आम्हाला कोणालाच माहीत नाही. तुला कधी आम्हाला सांगावेसे वाटले नाही का?" कबीरने विचारलं.
"सांगणार होती मी.... पण आमचं दोघांचंही ठरलं होतं जेव्हा घरचे लग्नाचा विषय काढतील तेव्हाच सांगायचं, तोपर्यंत घरी काहीच सांगायचं नाही, तरीही मी मागच्याच महिन्यात अनयला विचारलं सुद्धा होतं, आता तरी घरी सांगू पण तो नाहीच म्हणाला. त्याचं बहुतेक आधीच ठरलं होतं, त्याला मी नकोच होती म्हणून त्याने घरी सांगू दिलं नाही." श्रावणी म्हणाली. तिच्या आवाजाचा स्वर अजूनही गहिवरलेलाच होता.
"पण नेमकं झालंय तरी काय?" सान्वी.
"मी आणि अदिती इथे या कॅफेत आलो तेव्हा अनय इथेच एका मुलीसोबत होता आणि तिचा हात हातात घेऊन तिच्याशी गप्पा मारत होता. मी त्याला पाहिलं आणि परत बाहेर येऊन त्याला फोन केला आणि कुठे आहे हे विचारलं तर तो म्हणाला की एका महत्वाच्या कामात आहे नंतर बोलू. एवढं बोलून त्याने लगेच फोन ठेवून दिला." श्रावणी.
"म्हणजे तो तुझ्याशी खोटं बोलला. त्यावरून तू एवढं रडत होती?" कबीर.
"मग तू त्याला सरळ त्याच्या समोर जाऊन जाब का नाही विचारला?" सान्वी.
"विचारला ना... फोन ठेवल्यावर मी लगेच आत गेली. त्याला विचारलं, माझ्याशी खोटं का बोलला म्हणून. पण त्याने मला ओळखच दाखवली नाही." श्रावणी म्हणाली.
"काय??? असं कसं ओळख दाखवली नाही त्याने तुला! नेमकं काय बोलला तो सांग मला, मी सोडणार नाही त्याला." कबीर रागाने बोलला.
"दादा, मी त्याला विचारलं का माझ्याशी खोटं बोलला? तुझ्यासोबत ही मुलगी आहे ही कोण आहे, तर त्याने मलाच विचारलं... तू कोण आहेस? माझ्यासोबत कोणीही असो तुला त्याच्याशी काही देणं घेणं नाही." बोलताना श्रावणीच्या डोळ्यात परत पाणी येत होते.
"तू त्याला असं जाऊच कसं दिलं मग, तो इथे असतानाच मला का नाही बोलावलं?" कबीर.
"दादा, मी त्या मुली समोर त्याला हे सुद्धा बोलली... एवढ्या वर्षांपासून आपलं एकमेकांवर प्रेम असून सुद्धा तू असं का बोलतोय. तर त्याने मलाच वेड्यात काढलं. म्हणाला माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, माझं फक्त मानसीवर प्रेम आहे आणि आता आम्ही दोघं लग्न करणार आहोत. जाताना तो मला हे सुद्धा सांगून गेला लग्नाची तारीख ठरली की तुला निमंत्रण पत्रिका पाठवतो." श्रावणी म्हणाली.
"बापरे, म्हणजे किती निर्लज्ज आहे तो मुलगा. श्रावणी... तू फक्त मला तो कुठे राहतो ते सांग, तिथे जाऊन त्याची अशी धुलाई करते की परत तुलाच काय पण दुसऱ्या कोणत्याही मुलीला तो फसवणार नाही." सान्वी खुपच रागाने बोलली. तिचा एवढा राग बघून कबीरला सुद्धा काय बोलावं ते सुचेना. त्याने पहिल्यांदा तिला एवढं रागात पाहिलं होतं. राग तर त्यालाही आला होता पण आता सान्वीचा राग बघून त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते.
"जाऊदे ना वहिनी, ज्या मुलाला माझ्याबद्दल काही वाटतच नाही अशा मुलाला बोलून काही फायदाच नाही. चुक माझी झालीये, तो मला एवढे दिवस इग्नोर करत होता तेव्हाच मी त्याचं खरं रूप ओळखायला हवं होतं. किती प्रयत्न केले मी त्याला थांबवायचे, पण तो नाही थांबला. त्याच्यासमोर रडत होती तरी त्याला माझी दया आली नाही, शेवटी अदितीने मला सावरलं पण तरीही मी स्वतःला रडण्यापासून थांबवू शकले नाही. अजूनही खुप त्रास होतोय मला." श्रावणी म्हणाली.
"ज्या मुलाला तुझ्या भावनांची कदर नाही, अशा मुलासाठी तू इथे एवढा वेळ रडत होती. श्रावणी, मी तुझी वहिनी आहे पण एक चांगली मैत्रीण म्हणून मी तुला सल्ला देतेय, जिथे आपली किंमत नाही तिथून आपण स्वतःच बाजूला बाजूला व्हायचं. नुसतं बाजूला व्हायचं नाही तर स्वतःला खंबीर करायचं. माझ्या लग्नाच्या वेळी माझ्यावर काय प्रसंग ओढवला होता ते पाहिलंय ना तू. ऋग्वेद भर मंडपातून पळून गेले. त्यानंतर मी कधीच त्यांचा विचार केला नाही. कबीरने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हापासून मी कबीरला माझं मानत आलेय. पण ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे, कबीरने जर माझा विश्वास घात केला तर मी कधीच त्यांना माफ करू शकणार नाही." सान्वी एवढं आत्मविश्वासाने बोलत होती की श्रावणी फक्त तिच्याकडेच एकटक बघत होती. पण तिचं बोलणं ऐकून कबीरच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
कबीर सुन्न होऊन सान्वीकडे बघत होता. याक्षणी त्याला श्रावणीची काळजी तर वाटत होती. पण त्यापेक्षाही जास्त स्वतःची काळजी वाटत होती आणि सान्वीशी खोटं बोलल्याचा पश्चात्ताप होत होता.
"वहिनी, तू खरंच खुप खंबीर आहे... तुझ्या एवढं खंबीर मला होता येईल की नाही माहिती नाही. माझं प्रेम खरं होतं. अनय मला धोका देईल असा विचार मी स्वप्नात सुद्धा केला नव्हता." श्रावणी म्हणाली.
"तुझं प्रेम खरं असलं तरी त्याला तुझ्या प्रेमाची कदर नाही श्रावणी, त्यामुळे त्याला विसरणं हाच एक पर्याय आहे." सान्वी म्हणाली.
"मी एकदा त्याच्याशी बोलून बघू का?" कबीरने शांतपणे श्रावणीला विचारलं.
"नको दादा, त्याच्याशी बोलून काही फायदा नाही होणार. मी खुप प्रयत्न केला. त्याच्यासमोर एवढी रडत असताना तो निघून गेला. तेव्हा त्याला काहीच नाही वाटलं. तेव्हा तू बोलून काय होणार आहे." श्रावणी म्हणाली.
"श्रावणी बरोबर बोलतेय कबीर, आपण कोणालाही जबरदस्ती नाही करू शकत. आता आपण त्याला बोललो आणि त्याचीच इच्छा नसेल तर बोलून काही उपयोगही नाही. पण एवढं नक्की आहे तो श्रावणीचा गुन्हेगार आहे तेव्हा त्याला शिक्षा झालीच पाहिजे." सान्वी म्हणाली.
"इथे मलाच एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे तर त्याला काय शिक्षा देऊ मी." श्रावणी म्हणाली.
"ते मी तुला नंतर सांगते. आता आपण घरी जाऊयात, आई बाबा काळजीत असतील. जे झालं त्याचा आता काहीच विचार करू नको. बाकी या विषयावर आपण नंतर बोलूच." सान्वी म्हणाली तसं ते तिघेही घरी जायला निघाले.
पुर्ण रस्त्यात कबीरच्या मनात फक्त एकच विचार चालू होता. सान्वी जे जे बोलली होती तेच त्याच्या डोक्यात सारखं सारखं घोळत होते.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा