अशी जुळली गाठ. भाग - २८
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
गाडी घरासमोर येताच कबीर विचारातून बाहेर आला आणि त्याने गाडी थांबवली. श्रावणीला घेऊन तो आणि सान्वी आत गेले. आत विक्रम आणि सविता त्यांची वाटच बघत होते. सान्वीला बघताच ते दोघेही उभे राहिले. श्रावणी आत येताच शांतपणे सोफ्यावर बसली. तिच्या चेहऱ्याकडे बघताच ती खुप रडली होती हे सविता आणि विक्रमच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी लगेच तिला विचारलं.
"श्रावणी, काय झालंय? जरा सांगशील का आम्हाला!" विक्रम म्हणाले तसं ती तिथून उठली आणि रडतच तिच्या रूममध्ये गेली. ती गेल्यावर ते दोघेही काळजीने कबीर आणि सान्वी कडे बघू लागले.
"सान्वी, मी बोलतो आई बाबांशी. तू जा आणि श्रावणी सोबत बोल म्हणजे तिला बरं वाटेल." कबीर म्हणाला तसं सान्वी श्रावणीकडे गेली. ती गेल्यावर कबीरने विक्रम आणी सविताला सगळं खरं खरं सांगून टाकलं. ते ऐकून त्या दोघांनाही खुप वाईट वाटले. त्यांना अनयचा खुप राग येत होता.
"कबीर, आताच्या आता त्या मुलाला फोन कर आणि त्याला इथे यायला सांग, मी त्याला सोडणार नाही. माझी मुलगी म्हणजे काय समजला काय तो." विक्रम रागाने बोलले.
"बाबा, आता पहिलं श्रावणीला सावरू द्या... त्याचं काय करायचं ते आपण नंतर बघू. त्याला आताच इथे बोलावलं तर श्रावणीला अजून त्रास होईल." कबीरचं बोलणं त्यांनाही पटलं.
"कबीर, मी बोलू का आता तिच्याशी? मला तिची खुप काळजी वाटते." सविता.
"आई, आता तिच्याशी कोणीच काही बोलू नका, सान्वी आहे तिच्यासोबत, आपण सारखा सारखा तिच्यासमोर तोच विषय काढला तर तिला त्रास होईल. त्यापेक्षा तो विषय काढायलाच नको. मी आलोच...." असे बोलून कबीर त्याच्या रूममध्ये गेला. आत येताच त्याला सान्वी बोललेला शब्द ना शब्द आठवत होता. आता तो श्रावणीच्या जागेवर सान्वीला बघत होता.
"आपल्या बहिणीच्या बाबतीत जे घडलं त्यामुळे आपल्याला किती त्रास होतोय. असं वाटतंय की तिकडे जाऊन त्या मुलाला शिक्षा द्यावी... पण आपण तरी काय वेगळं करतोय. लग्न झाल्यापासून मी कधी सान्वीचा विचार केला नाही, तिला काही हवं आहे का हे सुद्धा कधी विचारलं नाही. मी सुद्धा सान्वीचा गुन्हेगार आहे. मग मलाही शिक्षा व्हायला हवी." कबीर स्वतःशीच बोलला. बराच वेळ तो त्याच विचारात होता.
"काय हो... तुम्ही अजून फ्रेश नाही झालात, श्रावणीचा विचार करताय का?" सान्वीच्या आवाजाने कबीर विचारातून बाहेर आला आणि तिच्याकडे बघू लागला. पण यावेळी तिच्या डोळ्यात बघायची त्याची हिंमतच होत नव्हती.
"हम्म्म...." कबीरने हुंकार देत उत्तर दिले.
"नका एवढा विचार करू, सावरेल ती हळूहळू. तसं आपली श्रावणी समजदार आहे." सान्वी म्हणाली आणि चेंज करायला गेली. कबीर मात्र कितीतरी वेळ तसाच बसून होता.
रात्री श्रावणीच्या विचाराने कोणालाच नीट झोप लागली नाही. घरातलं वातावरणही खुप शांत झालं होतं. दुसऱ्या दिवशीही घरात शांतताच होती. श्रावणी काॅलेजला गेलीच नाही पण दिवसभर ती तिच्या रूमच्या बाहेर सुद्धा आली नाही.
*******************
सकाळी कबीर ऑफिसला जायची तयारी करत होता. तेव्हा सान्वी त्याच्याकडे आली आणि त्याच्याशी बोलू लागली.
"कबीर, तुम्ही आजचा दिवस ऑफिसला नाही गेलात तर चालणार नाही का! आपण दोघं श्रावणीला बाहेर कुठेतरी घेऊन गेलो असतो. तेवढंच तिलाही फ्रेश वाटेल आणि जे झालंय ते ती विसरेल तरी. काल दिवसभर ती एकटीच तिच्या रूममध्ये बसून होती. तसं मी बोलली होती तिच्याशी पण कसं असतं, घरात बसून राहिले की कितीही नाही म्हटलं तरी मनात तेच तेच विचार येत राहतात. बाहेर गेली तर बाहेरच्या वातावरणात तिला थोडा तरी विसर पडेल." सान्वी म्हणाली.
"पण ती येईल का?" कबीर.
"मी बोलते तिच्याशी, काहीतरी कारण काढून तिला तयार करते." सान्वी म्हणाली.
"चालेल मग, मी नाही जात आज ऑफिसला." कबीर म्हणाला तसं सान्वी लगेच श्रावणीच्या रूममध्ये गेली तर श्रावणी एकटीच शांत बसून होती. मग सान्वी तिच्याजवळ जाऊन बसली.
"श्रावणी, का त्रास करून घेतेय स्वतःला. ते ही अशा माणसासाठी ज्याला तुझी किंमत नाही." सान्वी म्हणाली तसं श्रावणी तिच्याकडे बघू लागली.
"मी खुप ठरवतेय वहिनी, त्याचा विचार करायचा नाही, पण काही केलं तरी त्याचा विचार डोक्यातून जातच नाही. तो जे वागला, जे बोलला ते सगळं चित्र डोळ्यासमोर दिसतंय माझ्या." श्रावणी.
"तू जेवढा विचार करशील तेवढी त्यातच अडकून पडशील. तेव्हा त्यातून बाहेर ये आणि तुझा विचार कर, तुला तुझं भविष्य आहे ना... त्याला जर धडा शिकवायचा असेल तर तुला त्याच्या नाकावर टिच्चून सगळं मागे टाकून पुढे जावं लागणार आहे. तू स्वतःला इतकी खंबीर कर की जेव्हा तो तुला समोर बघेल ना तेव्हा त्याला तुला नाकारून पश्चात्ताप झाला पाहिजे." सान्वी म्हणाली.
"वहिनी, तुझं म्हणणं पटतंय मला... पण हे सगळं मागे टाकायला थोडा वेळ तर लागेलच ना!" श्रावणी.
"वेळ खुप अनमोल आहे श्रावणी, ती कधीच कोणासाठी थांबत नाही. मग आपण तरी कशाला वेळ घालवायचा." सान्वी म्हणाली त्यावर श्रावणी काहीच बोलली नाही. ती एकदमच शांत झाली. तिला शांत बघून सान्वीने विषय बदलला आणि हसऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत बोलायला सुरुवात केली.
"श्रावणी, इथलं पिक्चर थिएटर कसं असतं गं... मी कधी बघितलंच नाही, मला ना ते खुप बघायची इच्छा आहे." सान्वीने मुद्दामच विषय काढला.
"अगं मग दादाला सांग ना, तो तुला घेऊन जाईल पिक्चर बघायला." श्रावणी म्हणाली.
"तुझा दादा... आणि मला पिक्चर बघायला घेऊन जाणार? शक्य तरी आहे का... एवढे दिवस झालेत लग्नाला, साधं शाॅपिंगला सुद्धा कधी नेलं नाही त्यांनी मला." सान्वी खरं तर श्रावणीचा मुड ठिक व्हावा म्हणून हे बोलली पण ते बोलताच तिचाच मुड खराब झाला. तिचा चेहरा सुद्धा लगेच उतरला. तिला मनातून खूप वाईट वाटत होते. कारण ती बोलली ते खरंच होतं. कबीरने तिला कधीच बाहेर फिरायला नेलं नव्हतं की कधी शाॅपिंगला सुद्धा नेलं नव्हतं आणि हे श्रावणीला पण माहित होतं. सान्वीचा उतरलेला चेहरा बघून तिलाही वाईट वाटले.
"वहिनी, तुला पिक्चर बघायचा आहे ना, मग मी दादाला सांगते. आज आपण तिघेही पिक्चरला जाऊ. नंतर मग तुला हवी तेवढी शाॅपिंग करू!" श्रावणी म्हणाली तसं सान्वीचा चेहरा खुलला. आपण जिला धीर द्यायला आलो होतो तिच आपल्याला धीर देतेय हे बघून सान्वीला खुप आनंद झाला. श्रावणी लगेचच कबीर कडे गेली आणि पिक्चरला जायचा विषय काढला.
"दादा, आपण पिक्चरला जायचं का?" श्रावणीने एवढ्या उत्साहात विचारलं की तिचा तो उत्साह बघून कबीर क्षणभर स्तब्ध होऊनच तिच्याकडे बघू लागला. सान्वीने नेमकी काय जादू केली असेल म्हणून हिच्यात एवढा उत्साह संचारला आहे हा विचार त्याच्या मनात आला. पण तो काहीच बोलला नाही. बोलायला त्याला काही सुचतही नव्हते म्हणा.... पण त्याला असं स्तब्ध बघून श्रावणी हसली.
"एवढा कसला विचार करतोस दादा, प्लीज नाही म्हणू नकोस. आज एक दिवस ऑफिसला नाही गेला तर काही फरक पडत नाही. प्लीज पिक्चरला जायला हो म्हण... अरे ती बिचारी वहिनी... लग्न झाल्यापासून एकदा तरी तिला फिरायला घेऊन गेला आहे का तू कधी. तिला आपलं घर आणि ऑफिस एवढं सोडून काही माहितही नाही. कधीतरी तिच्या मनाचाही विचार कर ना तू!" श्रावणी म्हणाली तेव्हा कबीरला त्याची चुक लक्षात आली. सान्वीने पिक्चरला जायचा विषय काढला तेव्हा तो श्रावणीसाठी सहज तयार झाला. पण त्यावेळी त्याने सान्वीचा विचार केला नाही. आता श्रावणी बोलल्यावर त्याच्या मनात सान्वीचा विचार आला.
"खरंच श्रावणी, मी कधीच सान्वीला कुठे बाहेर घेऊन गेलो नाही आणि कधी तिने तसं बोलूनही दाखवलं नाही. आता तू जे बोलतेय तसा विचार मी कधी केलाच नाही. सान्वीला किती वाईट वाटत असेल." कबीर म्हणाला.
"दादा, तुला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारू का?" श्रावणी म्हणाली तसं कबीर एकटक तिच्याकडे बघू लागला. श्रावणी आता काय प्रश्न विचारेल याचंच त्याला टेन्शन आलं होतं.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा