अशी जुळली गाठ. भाग - २९
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.
"दादा, तुझ्या चेहऱ्याचा रंग का बदललाय, मी काय विचारेल याचं टेन्शन आलंय की काय तुला!" श्रावणी म्हणाली.
"तसं काही नाहीये, तू विचार की काय विचारायचं आहे ते!" कबीर एकदम थंड आवाजात बोलला. पण आतून जरा घाबरलेलाच होता.
"तू वहिनीचा नक्की बायको म्हणून स्विकार केलाय ना? की तू फक्त आम्हाला तसं दाखवतोय." श्रावणीने विचारलं. त्यावर कबीर काहीच बोलला नाही. तो तसाच शांत उभा राहिला, त्याची श्रावणीकडे बघायची पण हिम्मत होत नव्हती. त्याची नजर खाली होती आणि चेहरा निर्विकार होता. पण त्याच्या कपाळावर एक आठी पडली होती आणि ती काहीतरी वेगळंच सांगत होती.
"दादा… तू काहीच उत्तर देत नाहीये, याचा अर्थ मी काय घ्यायचा?" श्रावणीने विचारलं. पण तरीसुद्धा कबीर काहीच बोलला नाही.
"तुझ्या गप्प राहण्यातच मला माझं उत्तर मिळाले आहे दादा, पण तू हे खुप चुकीचे वागतोय. वहिनी तुला खूप मान देतेय, तिचं तुझ्यावर प्रेम तर आहेच पण त्याहून जास्त तिचा तुझ्यावर विश्वास आहे. ती स्वतःला तुझ्या आयुष्यात बसवायचा प्रयत्न करतेय… पण तू तिला अजून मनाच्या दारातच थांबवून ठेवलंय." श्रावणी स्पष्ट आणि परखड शब्दात बोलली. कबीर मात्र शांत होता. तिथे क्षणभर शांतता पसरली. नंतर कबीर बोलू लागला.
"तुझ्या गप्प राहण्यातच मला माझं उत्तर मिळाले आहे दादा, पण तू हे खुप चुकीचे वागतोय. वहिनी तुला खूप मान देतेय, तिचं तुझ्यावर प्रेम तर आहेच पण त्याहून जास्त तिचा तुझ्यावर विश्वास आहे. ती स्वतःला तुझ्या आयुष्यात बसवायचा प्रयत्न करतेय… पण तू तिला अजून मनाच्या दारातच थांबवून ठेवलंय." श्रावणी स्पष्ट आणि परखड शब्दात बोलली. कबीर मात्र शांत होता. तिथे क्षणभर शांतता पसरली. नंतर कबीर बोलू लागला.
"कधी कधी… समोरचा माणूस योग्य असतो… पण आपण स्वतःच तयार नसतो. तसंच झालंय माझं." कबीरचे हे शब्द ऐकून श्रावणीचं काळीज अगदी हेलावून गेलं. तिला सान्वी बद्दल खुप वाईट वाटू लागले.
"दादा, काल अनय गेल्यानंतर मी आतून एवढी तुटली होती की एक क्षण मला माझं जगणं संपलं असंच वाटत होतं पण आता वहिनीच्या बाजूने विचार केल्यावर असं वाटतंय की माझ्यापेक्षा तिचं दुःख मोठं आहे. किती आणि कसं सहन करत असेल ती हे सगळं. बरं तिला मनातलं सांगायला किंवा बोलायला सुद्धा कोणी नाही. तरी सुद्धा ती कायम हसऱ्या चेहऱ्याने घरात वावरत असते." श्रावणी म्हणाली.
"हो बरोबर आहे तुझं, पण...." कबीरला पुढे काय बोलावं हेच सुचेना. मग श्रावणीच पुढे बोलू लागली.
"दादा, तुला राग येईल पण मी जरा स्पष्टच बोलते, जर हे नातं पुढे न्यायची तुझी तयारी नसेल तर तिचं आयुष्य वाट बघण्यात घालवू नको. तिला मोकळं करून टाक!" श्रावणीचं ते वाक्य ऐकून कबीरने डोळे मिटले.
त्या एका क्षणात त्याला पहिल्यांदाच जाणवलं की तो फक्त सान्वी पासून नाही तर स्वतःपासूनही पळत होता. श्रावणीच्या बोलण्याने तो नि:शब्द झाला होता. दोघांमध्येही आता शांतता होती.
त्या एका क्षणात त्याला पहिल्यांदाच जाणवलं की तो फक्त सान्वी पासून नाही तर स्वतःपासूनही पळत होता. श्रावणीच्या बोलण्याने तो नि:शब्द झाला होता. दोघांमध्येही आता शांतता होती.
थोड्या वेळातच तिथे सान्वी आली आणि त्या दोघांकडे बघू लागली.
"हे काय... तुम्ही दोघं असे शांत का उभे आहात? कबीर, जायचं आहे ना आपल्याला पिक्चर बघायला? बोला पटकन, मी तर आईंना सुद्धा सांगून आलेय आपण पिक्चर बघायला जाणार आहे ते!" सान्वी हसतमुखाने एकदम उत्साहात बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून तिने काही ऐकलं नाही हे तर त्या दोघांना समजलं होतं. कबीरनेही तिच्याकडे बघून सगळे विचार बाजूला ठेवले आणि चेहरा हसरा ठेवायचा प्रयत्न केला.
"हो जाऊया आपण, आज दिवसभर फक्त धमाल करू. मस्त ब्रेकफास्ट करून घराबाहेर पडू. मग पिक्चर, त्यानंतर शाॅपिंग. आज मला पुर्ण दिवस माझ्या बायको सोबत आणि बहिणी सोबत घालवायचा आहे." कबीर असं बोलताच सान्वी एकटक त्याच्याकडे बघू लागली. त्याच्या तोंडून तिने पहिल्यांदाच बायको हा शब्द ऐकला होता त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
कबीरचे ते शब्द परत परत सान्वीच्या कानात घुमत होते. माझ्या बायकोसोबत… तो शब्द ऐकून तिच्या ओठांवर आलेलं हसू तिने कसंबसं आवरलं. ती काहीच बोलली नाही. पण तिच्या डोळ्यांत चमक होती. कबीरने पहिल्यांदाच स्वतःला या नात्यात पूर्णपणे स्वीकारलेलं वाटत होतं. श्रावणीला सुद्धा त्याच्या नजरेत ते दिसत होते.
"व्वा काय बात है दादा, म्हणजे आज वहिनीला आणि मला तुझ्या खिशाला कात्री लावायचा चांगलाच चान्स मिळाला आहे. वहिनी... आज आपण हा चान्स अजिबात सोडायचा नाही." श्रावणी हसून म्हणाली. कबीरही त्यावर हलकसं हसला.
"तुम्हाला काय कात्री लावायची आहे ती बिनधास्त लावा. आजचा दिवस तुमच्या दोघींचा आहे." कबीर म्हणाला.
"आज कबीर भोसले फारच उदार झालेले दिसताय, काय भानगड काय आहे. जरा मला तरी सांगा!" सान्वी हसून म्हणाली.
"तो मी पहिल्यापासूनच आहे कळलं का?" कबीर हलकसं हसत म्हणाला.
"हो कळलं ना.... म्हणून तर एवढे दिवस मला कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन गेले नाही." सान्वी म्हणाली.
"म्हणून तर आज नेतोय ना... आज डायरेक्ट बाहेरून डिनर करूनच घरी यायचं, पण आता मला एक काम आठवलं आहे. मी अर्ध्या तासात ते काम करून येतो. मी आलो की मग निघू आपण." कबीर म्हणाला.
"अजिबात नाही, दादा... आता तू कुठेच जायचं नाही. तू अर्धा तास म्हणून जाशील आणि दिवसभर तिकडेच थांबून राहशील." श्रावणी म्हणाली.
"नाही... मी येतो म्हणालोय ना मग नक्की अर्ध्या तासात परत येणार, प्राॅमिस..." कबीर.
"जर नाही आला तर?" श्रावणीने दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत विचारलं. तसं तो कपाळावर अंगठा घासत काहीतरी आठवू लागला.
"हम्म्म... मी जर अर्ध्या तासात परत आलो नाही तर आजच्या बदल्यात तुम्हाला दोघींना दोन दिवस फिरायला घेऊन जाणार आणि ते ही मुंबई बाहेर. आता तरी जाऊ का?" कबीर म्हणाला.
"हो असं असेल तर तू दुपारपर्यंत घरी नाही आला तरी चालेल." श्रावणी खुश होऊन बोलली. मग कबीरही हसतच बाहेर पडला. तो गेल्यावर श्रावणी सान्वीकडे बघू लागली.
"चला आता आपण खाली जाऊ, दादा बोललाय खरं पण वेळेत येईल की नाही याची खात्री नाही." श्रावणी म्हणाली.
"पण मला खात्री आहे, ते सांगितलेल्या वेळेत नक्की येतील." सान्वी म्हणाली. तसं श्रावणी हलकसं हसली.
"वहिनी, दादावर किती विश्वास आहे ना तुझा... पण तुला खरंच असं वाटतं की तो विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा आहे." श्रावणी.
"हो, माझा त्यांच्यावर पुर्ण विश्वास आहे, खरं सांगू का आज आम्ही बाहेर जायचा प्लॅन तुझ्यासाठीच केला होता. तू परत पहिल्यासारखी हसावी, बोलावी असं आम्हाला वाटत होतं. माझ्यासाठी नाही पण तुझ्यासाठी तरी तुझा दादा अगदी वेळेत येईल बघ." सान्वी म्हणाली.
"वहिनी, किती विचार करतेस गं तू सगळ्यांचा. देव करो आणि तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण होवोत." श्रावणी म्हणाली.
"त्या व्हायच्या तेव्हा होतील, पण आता तू जा आणि फ्रेश हो. अजून अंघोळ सुद्धा नाही केली तू." सान्वी हसून म्हणाली तसं श्रावणीने डोक्यालाच हात लावला.
"हो की... मी विसरलीच बघ, चल मी आलेच पटकन आवरून, नाही तर असं व्हायचं दादा यायचा आणि माझीच काही तयारी व्हायची नाही." श्रावणी म्हणाली आणि लगबगीने तिच्या रूममध्ये गेली. ती गेल्यावर सान्वी स्वतःशीच हसली आणि त्याचवेळी तिला परत कबीरचा तो शब्द आठवला. तोच तिच्या चेहऱ्यावर एक लज्जेची छटा उमटली. तिचे गाल गुलाबी झाले होते.
"आज नाही, पण कधीतरी… हा ‘बायको’चा हक्क तुम्ही मला मनापासून द्याल याची मला खात्री आहे." सान्वी स्वतःशीच बोलली आणि त्या आशेवरच तिने स्वतःला सावरलं.
थोड्या वेळातच सान्वी खाली गेली. तोपर्यंत श्रावणी पण तयार होऊन आली होती. सान्वीला साध्या ड्रेस मध्ये बघून श्रावणी लगेच तिला बोलली.
"वहिनी, आपण बाहेर जातोय मग दुसरा चांगला ड्रेस घालायचा ना... नाही तर वेस्टर्न वगैरे काहीतरी घालायचं." श्रावणी म्हणाली.
"असूदे गं... हा ड्रेस पण छान आहे. मला तसंही असेच साधे सिंपल ड्रेस आवडतात. तसंही आता यांना जाऊन अर्धा तास होत आलाय. ते येतीलच आता. मग कशाला उगाच चेंज वगैरे करत बसायचं." सान्वी म्हणाली.
"दादा... आणि अर्ध्या तासात येणार शक्यच नाही." श्रावणी म्हणाली तोच बाहेरून कबीरच्या गाडीचा हॉर्न जोरात वाजला. तसं त्या दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा