Login

अशी जुळली गाठ. भाग - ३१

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३१

डिसेंबर-जानेवारी २०२५-२६ दिर्घ कथालेखन स्पर्धा.

सान्वी आणि श्रावणी गाडीत बसताच त्यांच्या गप्पा चालू होत्या पण कबीर मात्र विचारात हरवला होता. आता तो जे बोलला होता, जे वागला होता. त्याचाच विचार तो करत होता. त्याला विचारात हरवलेलं बघून श्रावणीने आवाज दिला.

"दादा, कसला विचार करतोय एवढा?" श्रावणीच्या आवाजाने तो भानावर आला आणि नाही मध्ये मान हलवली. थोड्या वेळातच ते तिघेही थिएटरला पोहचले.

सान्वी पहिल्यांदाच कबीर सोबत बाहेर आली होती त्यामुळे ती थोडी बुजल्यासारखीच वाटत होती. श्रावणीने मुद्दामच त्या दोघांना एकमेकांच्या बाजूला बसवलं. पिक्चर चालू होता, पण कबीरचं काही तिकडे लक्ष नव्हतं. तो श्रावणीला सान्वी बद्दल जे बोलत होता ते काही त्याच्या डोक्यातून जात नव्हते.

"माझं खरंच सान्वीवर प्रेम आहे की मी फक्त उत्साहाच्या भरात ते बोलून गेलो. मी इशिताला खरंच विसरलोय का?" असे अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू होते. एवढं सगळं बोलून सुद्धा कबीरच्या मनात अजूनही शंकाच होती. पिक्चर संपला तेव्हा ते तिघेही तिथून बाहेर पडले. त्यानंतर राहिलेला पुर्ण दिवस त्यांनी शाॅपिंग मध्ये घालवला. कबीरने दोघींनाही त्यांना जे जे हवं ते घेऊ दिलं. रात्री डिनर करूनच ते घरी गेले.

कबीर, सान्वी आणि श्रावणी तिघेही घरी आले तेव्हा विक्रम आणि सविता हाॅलमध्येच बसून होते. हे तिघं येताच ते त्यांच्याकडे बघू लागले.

"आलात तुम्ही, मी आता तुम्हालाच फोन करणार होतो." विक्रम म्हणाले.

"आज या दोघींनी मला चांगलंच दमवलयं बाबा, बायकांची शाॅपिंग म्हणजे खरंच किती अवघड असतं हे आज चांगलंच कळलंय मला." कबीर हसून म्हणाला. तसं सान्वी त्याच्याकडे डोळे मोठे करून बघू लागली.

"आम्ही काही नाही केलंय, बाबा... तुम्हाला माहितीये का जे आम्हाला पसंत पडायचं तेच नेमकं यांना आवडायचं नाही." सान्वी म्हणाली. नंतर श्रावणी पण तेच बोलली. ते तिघेही शाॅपिंगच्या गमती जमती सांगत होते. त्यांचं बोलणं, एकमेकांना ओरडणं हे सगळं बघून विक्रम आणि सविता दोघेही खुश झाले.

"एकंदरीत तुमची शाॅपिंग चांगली झाली म्हणायची." विक्रम म्हणाले.

"हो बाबा, खरंच आम्ही खुप धमाल केली. आजचा दिवस खरंच खुप छान गेला." श्रावणी.

"याचं सगळं श्रेय सान्वीला जातं, त्या दिवशी तुझी अवस्था पाहिली. तेव्हा आम्हाला किती टेन्शन आले होते. सतत तुझी काळजी वाटत होती. तुझा उतरलेला आणि रडका चेहरा आमच्या दोघांच्याही नजरेसमोरून जात नव्हता. पण सान्वीने तुला यातून बाहेर काढलं." सविता म्हणाली आणि सान्वीकडे बघू लागली.

"थॅंक्यू यू सो मच सान्वी, तुझ्यामुळेच श्रावणी एवढ्या लवकर सावरली." सविता.

"थॅंक्यू म्हणून तुम्ही मला परकं करताय आई, श्रावणी मला माझ्या लहान बहिणी सारखी आहे. तिला दुःखातून बाहेर काढणं हे माझंही कर्तव्य आहे." सान्वी म्हणाली.

"पण तरीही तू जे केलंस ते आम्हाला कोणालाच जमलं नसतं." सविता.

"बरं असूदे आता, आजचा दिवस एवढा छान गेला आहे ना मग मला आता दुसरा कोणताही विषय नकोय." श्रावणी म्हणाली. एवढा वेळ आनंदी असलेला तिचा चेहरा एकदमच उतरला.

"आई, आता या घरात तो विषय परत कधीच नकोय. श्रावणीच्या बाबतीत जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न होतं असं समजायचं आणि सगळ्यांनी ते विसरून जायचं आणि श्रावणी.... तू... उद्यापासून तुझं जे रूटीन होतं ते चालू ठेवायचं आहे. काॅलेजला जायचं आणि शिक्षणावर फोकस करायचं. अशा मुर्ख लोकांना दाखवून द्यायचं की त्यांच्या निघून जाण्याने आपल्याला काही फरक पडत नाही. जेव्हा तू असं करशील तेव्हाच समोरच्या व्यक्तीला त्याची चुक कळेल." कबीर.

"दादा, तुझं पटतंय मला... मला माझं आयुष्य कोणासाठी थांबवायचे नाहीये. मला माझं ध्येय साध्य करायचं आहे. आई, मी सकाळी लवकर उठणार आहे. मला लवकर काॅलेजला जायचं आहे. लता मावशीला माझा डबा तयार ठेवायला सांग. आणि हो... आम्ही शाॅपिंगला गेलो होतो म्हणजे आम्ही काय फक्त आमच्यासाठीच शाॅपिंग केली नाही, तुझ्यासाठी सुद्धा छान साडी आणली आहे. ती मी तुला उद्या दाखवते. नाही तर रात्रभर मनात विचार करत बसशील की मला काहीच नाही आणलं." श्रावणी म्हणाली आणि सविताचे लाडाने गाल ओढून तिच्या रूममध्ये गेली. ती गेल्यावर सविता हलकसं हसत कबीर कडे बघू लागली.

"तुमचा दिवस एवढा छान गेला, मी उगाच नको तो विषय काढून सगळ्यांच्या आनंदावर विरजण पाडलं." सविता म्हणाली.

"असं काही नाहीये आई, तुम्ही जे बोललात ते काळजीपोटी बोललात. आता सोडा तो विषय आणि जाऊन मस्त आराम करा. तसंही आता बराच उशीर झाला आहे." सान्वी म्हणाली तसं सविताने हलकेच मान हलवली आणि विक्रम सोबत त्यांच्या रूममध्ये गेली. ते गेल्यावर कबीर आणि सान्वी पण त्यांच्या रूममध्ये गेले.

आत येताच सान्वीने शाॅपिंगच्या पिशव्या वगैरे होत्या. त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या. तोपर्यंत कबीर चेंज करून आला आणि बेडवर येऊन मोबाईल घेऊन बसला. मग सान्वी पण फ्रेश होऊन चेंज करून आली आणि सोफ्यावर बसली. त्यावेळी तिला सकाळंच कबीरचं बोलणं, वागणं आठवलं आणि तिचं मन परत सुखावून गेलं. आता कबीरने स्वतःहून आपल्याशी काहीतरी बोलावे असे तिला वाटत होते पण कबीर मोबाईल मध्येच गुंग होऊन गेला होता.

सान्वी खाली मान घालून बसली होती पण तिरक्या नजरेने कबीर कडे बघत होती. पण तो काही तिच्याकडे बघत नव्हता. शेवटी नाराज होऊन ती झोपली. ती झोपली आहे हे बघून कबीरनेही मोबाईल बाजूला ठेवला आणि तो ही झोपला. पण त्याला झोप लागत नव्हती. कितीही डोळे बंद केले तरी त्याचं मन त्याला ते उघडायला भाग पाडत होते. तो कितीतरी वेळ सान्वीच्या झोपलेल्या चेहऱ्याकडेच एकटक बघत होता. तिच्याकडे बघता बघता त्याला कधी झोप लागली ते त्याचं त्यालाच कळलं नाही.

सकाळी सान्वीला नेहमी प्रमाणे लवकरच जाग आली पण कबीर मात्र अजूनही उठला नव्हता. सान्वी उठली आणि तिचं आवरून झाल्यावर ती कबीरला उठवायला गेली.

"कबीर, आज ऑफिसला जायचं नाहीये का? घड्याळ बघा जरा, किती उशीर झालाय!" सान्वी म्हणाली पण कबीरने अंगावरचं ब्लॅंकेट अजूनच तोंडावर ओढून घेतले. ते बघून सान्वी लगेच पुढे आली आणि ते ब्लॅंकेट ओढू लागली.

सान्वीने ब्लॅंकेट ओढताच कबीरने सुद्धा जोर लावला आणि ब्लॅंकेट ओढलं. पण त्याने डोळे काही अजून उघडले नव्हते. सान्वी बेसावध असल्यामुळे ती डायरेक्ट त्याच्या अंगावर पडली. त्यावेळी कबीरने दचकून डोळे उघडले… आणि त्याला समोर सान्वी इतकी जवळ दिसली की तिचे केस त्याच्या गालावर पसरले होते, तिचा श्वास त्याला स्पष्ट जाणवत होता. क्षणभर दोघेही हललेच नाहीत. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. दुसऱ्या क्षणी कबीरने तिला आवाज दिला.

"सान्वी…?"  त्याच्या आवाजाने ती घाबरून मागे सरकायचा प्रयत्न करू लागली.

"सॉरी… ते.... मला कळलंच नाही, माझा अचानक तोल गेला." सान्वी घाबरून म्हणाली पण त्याचवेळी तिचा हात उशीवर होता तो सरकला आणि ती अजूनच त्याच्या जवळ आली. आता तर त्यांच्यात अजिबातच अंतर उरलंच नव्हतं.

दोघांमध्येही क्षणभर शांतता पसरली. त्या रूममध्ये फक्त दोघांचे वाढलेले श्वास ऐकू येत होते. दुसऱ्या क्षणी सान्वी घाबरली आणि पटकन उठून तिने तिची साडी सावरली.

"साॅरी... खरंच साॅरी, माझा चुकून तोल गेला. उशी वरून हात कसा सरकला ते कळलंच नाही." सान्वी घाबरून म्हणाली.

"इट्स ओके, खरं तर माझीच चुक झाली. मी असं पटकन ब्लॅंकेट ओढायला नको होतं." कबीर म्हणाला.

"बरं उठा आता, नाही तर तुम्हालाच उशीर होईल." सान्वी म्हणाली आणि बाहेर जाऊ लागली. तोच कबीरने तिला आवाज दिला.

"बरं झालं तू उठवलं, नाही तर खरंच उशीर झाला असता. आज एक मिटींग आहे. तुझ्यामुळे मी वेळेत पोहचेल." कबीरचं असं बोलणं तिच्या मनाला सुखावून गेलं. ती हलकंसं हसली आणि बाहेर जाऊ लागली बाहेर जाताना मागे वळून पाहिलं तर कबीरच्या ओठांवर तिला हसू दिसलं. त्याचं हसू बघून तिला तो प्रसंग आठवला आणि परत तिचं हृदय धडधडू लागलं. मग ती पटकन बाहेर गेली.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all