Login

अशी जुळली गाठ. भाग - ३२

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३२

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

कबीर ऑफिसला आला तेव्हा इशिता त्याच्या आधी येऊन बसली होती आणि ती तिचं कामही करत होती. तिला बघताच कबीर हसतच तिच्याशी बोलला.

"गुड मॉर्निंग..." कबीरच्या आवाजाने तिनेही त्याच्याकडे पाहिलं आणि ती सुद्धा त्याला गुड मॉर्निंग बोलली.

"अरे व्वा, आज खुपच लवकर आलीस तू!" कबीर म्हणाला.

"मी लवकर नाही, तू उशीरा आला आहेस कबीर. तुझं काय आता... तू संसारी माणूस झालाच. बायको सोबत मुव्हीला काय जातोस, डिनरला काय जातोस. माझं थोडीच तुझ्यासारखं आहे, मी आपली सिंगलच आहे. मला थोडी कोणी फिरायला, मुव्ही बघायला घेऊन जाणार आहे." इशिता हसत पण थोडं खोचकपणे बोलली. कबीरला ते कळलं.

"मी आहे की, मी जातो तुला मुव्ही बघायला घेऊन!" कबीर म्हणाला तसं ती त्याच्याकडे रागाने बघू लागली.

"कुठल्या हक्काने?" इशिताने विचारलं.

"इशिता, प्लीज आता सकाळी सकाळीच मुड खराब करू नकोस." कबीर म्हणाला.

"साॅरी, पण कधी कधी खरंच या सगळ्याचा खुप त्रास होतो कबीर मला. मी तुला विसरण्याचा प्रयत्न करतेय पण नाही विसरू शकत. हेच मोठं दुर्दैव आहे." इशिता म्हणाली. तिचा तो दुःखी चेहरा बघून कबीरलाही वाईट वाटले.

"इशिता, तुझं दुःख मला दिसत नाही असं नाहीये, पण परीस्थितीच अशी आहे की मी काहीच करू शकत नाही." कबीर.

"जाऊ दे सोड तो विषय, तसंही आता बोलून, दुःख करून काही उपयोग नाही. फक्त मनस्तापच होईल. माझं नाही पण तुझं तरी आयुष्य मार्गी लागतंय याचा मला आनंदच आहे." इशिता म्हणाली.

"पण अजूनही माझ्या मनात काय चालू आहे तेच मला कळत नाही. कधी कधी वाटतं की मला सान्वी हवी आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे. पण परत मी दुसराच विचार करतो. असं का होतंय तेच कळत नाहीये मला." कबीर म्हणाला.

"तुला कळत नाहीये पण मला चांगलंच कळतंय कबीर, तू मला पुर्णपणे विसरला आहे हे दिसतंय मला. मी तुझ्यासमोर असते तरी तुझ्या मनात सान्वी असते. आणि तू माझ्यासमोरच तिच्याविषयी बोलतोय, त्यावरूनच कळतंय की तू माझ्यावर नाही तर तिच्यावर प्रेम करतोय." इशिता म्हणाली. तसं कबीर आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला.

"हे बोलताना तुला त्रास होत नाही का?" कबीरने विचारलं तसं ती हलकंसं हसली.

"मला त्रास झाला तरी सत्य परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे आता तू सुद्धा हे मान्य कर आणि आहे ती परिस्थिती स्विकार, आणि आता एकच गोष्ट लक्षात ठेव... सान्वी सोडून तुझ्या आयुष्यात कोणीच नाहीये." इशिता म्हणाली. खरं तर हे बोलताना तिच्या मनाला किती यातना होत होत्या हे तिचं तिलाच माहीत होतं. पण तिला हे ही कळून चुकले होते की कबीरच्या आयुष्यात आपल्याला काहीच स्थान नाहीये.

"तू खरंच हे मनापासून बोलतेय?" कबीर.

"हो अगदी मनापासून बोलतेय. आता मलाच तू माझ्या आयुष्यात नको आहे. त्यामुळे तू तुझा संसार सान्वी सोबत सुखाने कर." इशिता म्हणाली. आज ती असं का बोलतेय हेच कबीरला कळत नव्हते. पण ती जे बोलत होती तेच तिच्या डोळ्यात दिसत होते. इशिता आपल्याला विसरली आहे हे ऐकून कबीरला थोडं का होईना पण वाईट वाटत होते. पण त्याने मनातले विचार सोडून दिले आणि कामावर फोकस करू लागला.

दुपारी मिटींग झाल्यावर कबीर केबीनमध्ये येतच होता तोच इशिता घाईघाईने त्याच्याकडे आली आणि त्याच्याशी बोलू लागली.

"कबीर, एक प्राॅब्लेम झाला आहे आपल्याला आताच्या आता साईटवर जायला हवं." इशिता टेन्शनमध्येच बोलली. तिचा तो आवाज ऐकून कबीरलाही टेन्शन आले.

"काय झालं?" कबीरने विचारलं.

"आपला तो प्रोजेक्ट आहे ना तिथली बिल्डिंग पुर्ण झाली आहे पण नवीन बांधकाम असताना सुद्धा त्या बिल्डींगला तडे गेले आहेत. आपल्याला तिकडे बघायला जायला हवं. ते तडे कशाने गेले आहे ते बघायला हवं." इशिताचं बोलणं ऐकून कबीरला धक्काच बसला.

"काय बोलतेय तू हे इशिता! नवीन बिल्डिंगला तडे? हे कसं शक्य आहे?" त्याने गंभीरपणे विचारलं.

"हो हे खरं आहे कबीर!" इशिता.

"कन्स्ट्रक्शनच्या वेळी सगळे रिपोर्ट्स क्लिअर होते ना?" कबीर.

"हो, सगळं नीट केलं होतं. मी स्वतः तिथे जाऊन आली होती, पण साइटवरून आलेले फोटो पाहिले आणि मलाही धक्काच बसला." इशिता म्हणाली आणि तिने मोबाईल पुढे केला. तसं कबीरनेही ते फोटो पाहिले आणि त्याचा चेहरा अधिकच गंभीर झाला.

"हे साधे तडे नाहीत… इशिता, आतलं बांधकाम आणि रचना कमकुवत असण्याची शक्यता आहे." कबीर थोडा विचार करून म्हणाला.

"हो मलाही तसंच वाटतंय." इशिता.

"आपण स्वतः जाऊन बघणं गरजेचं आहे. पण सगळं निरिक्षण करेपर्यंत कुणालाही काही कळायला नको, नाही तर आपलं नाव खराब होईल." कबीर म्हणाला. तसं इशिताने हलकेच मान हलवली.

"मी सगळ्या फाईल्स आणि ड्रॉइंग्स सोबत घेते." इशिता म्हणाली.

"हा प्रोजेक्ट आपल्या विश्वासाचा आहे… आणि तो तसाच टिकायला हवा." कबीर म्हणाला. मग थोड्या वेळातच ते साईटवर गेले. कबीर आणि इशिता दोघेही तिथल्या बांधकामाची पाहणी करत होते. त्याचवेळी सान्वीचा फोन आला. कबीर फोन कट करत होता तरीही ती परत परत फोन करत होती. शेवटी वैतागून त्याने फोन रिसिव्ह केला.

"सान्वी, मी फोन कट करतोय म्हणजे मी कामात आहे. एवढी साधी गोष्टही तुला कळत नाही का!" कबीर रागाने बोलला. पण तिथे नेटवर्क प्राॅब्लेम असल्याने तिला तो काय बोलला ते ऐकूच आले नाही.  तो परत परत बोलत होता पण तरीही तिला निटसं ऐकू येत नव्हते. शेवटी वैतागून त्याने फोन कट केला. पण तिचे फोन काही बंद होत नव्हते. आता तो खुपच चिडला होता. त्याचा तो चिडलेला चेहरा बघून इशिता हसू लागली. ती हसल्यामुळे त्याला अजूनच राग आला.

"इशिता, ही हसायची वेळ आहे का? तिला एक कळत नाही पण तू इथे परिस्थिती बघतेय ना, तरीही तुला हसायला येतंय." कबीर रागाने बोलला. ती काही बोलणार तोच परत सान्वीचा फोन आला. आता मात्र अजून मोठ्याने हसू लागली.

"हे असं सारखं सारखं फोन कट करत राहिलास तर त्यातच तुझा वेळ जाईल त्यापेक्षा बोल तिच्याशी. इथे नेटवर्क इश्यू आहे, तू एक काम कर... बाहेर जा आणि तिला नीट समजून सांग तू कामात बिझी आहे, म्हणजे ती तुला परत फोन करणार नाही." इशिताचं बोलणं कबीरला पटलं मग तो तिथून बाहेर पडला आणि सान्वीला फोन करण्यासाठी गेटच्या बाहेर गेला. इशिता पण तिथून बाहेर पडली आणि आजूबाजूच्या परिसराचे निरिक्षण करू लागली.

"सान्वी, काय झालं? एवढी सारखी सारखी का फोन करतेय तू! एकतर मी इथे महत्वाच्या कामात आहे, तुझ्या फोन मुळे माझं कामात लक्षही लागत नाही. तुला जरा पण धीर धरवत नाही का! "सान्वीने फोन रिसिव्ह करताच कबीर थोडं रागातच बोलला.

"तुम्हाला डिस्टर्ब केलं असेल तर साॅरी, माहिती नाही का पण मला ना खुप कसंतरीच वाटतंय. तुम्ही काहीतरी प्राॅब्लेम मध्ये असाल किंवा काहीतरी विचित्र घडणार आहे असं वाटत होतं, माझं मनच लागत नव्हते. सारखी तुमची काळजी वाटत होती. म्हणून मी तुम्हाला फोन केला." सान्वी काळजीने बोलली.

"मी अगदी ठिक आहे, माझ्या आवाजावरून तरी तुला ते जाणवलं असेल ना, आता प्लीज फोन ठेव आणि मला माझं काम करू दे. घरी आल्यावर तुला काय बोलायचं आहे ते बोल माझ्याशी." कबीर बोलतच होता तेवढ्यात त्याला एकदम जोरात आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि त्याला खुप मोठा धक्का बसला. तो ते बघून क्षणभर सुन्न झाला. सान्वीचा फोन कट केला की नाही याचेही भान त्याला राहिले नाही. आता त्याच्या डोक्यात फक्त सान्वीचं बोलणं घुमत होते.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all