Login

अशी जुळली गाठ. भाग - ३३

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३३

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा

कबीर समोर कोसळलेल्या बिल्डिंगकडे स्तब्ध होऊन बघत होता. सान्वी सोबत बोलत असताना तो आवाज ऐकून त्याचा मोबाईल सुद्धा हातातून निसटून खाली पडला. कोसळलेली बिल्डिंग बघून कबीरचे हात पाय लटपटू लागले होते. समोर धुळीचे लोट दिसत होते. ते बघून त्याच्या मनात वादळ उठलं होतं. त्याचा श्वासच घशात अडकला होता. आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या डोळ्यासमोर सान्वीचा चेहरा दिसू लागला आणि मनात विचार चालू झाले.

"आता सान्वीचा फोन आला नसता तर?" या विचाराने त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. आज सान्वीमुळे आपल्या वरचं किती मोठं संकट टळले आहे याची जाणीव त्याला झाली. मग त्याने खाली पडलेला मोबाईल उचलला तर तो स्विच ऑफ झालेला होता. मग त्याने तो तसाच खिशात ठेवून दिला.

नंतर काही क्षणातच त्याला इशिताची आठवण झाली. ती पण तिथेच होती. मग तिचं नेमकं काय झालं हे त्याला कळलंच नाही. म्हणून तो तिला जोरजोरात हाका मारू लागला. खुप घाबरला होता तो आणि इशिताची काळजीही वाटत होती. तो इशिताला हाका मारत असताना इशिता पळतच तिथे आली.

"कबीर, तू ठिक आहेस ना?" इशिताने काळजीने विचारलं.

"मी ठिक आहे, पण तुला काही झालं नाही ना? तू तिथेच उभी होती ना...!" कबीर म्हणाला.

"तू गेल्यावर मी सुद्धा बाहेर पडली होती. आज आपलं नशीब चांगलं म्हणून आपण दोघेही वाचलो, नाही तर काय झालं असतं काय माहीत! आपण तिथेच असतो तर कदाचित....." इशिता थरथरत्या आवाजात बोलली. बोलता बोलताच तिचा श्वास अडकला. ती तिचं वाक्य सुद्धा पुर्ण करू शकली नाही. ती बिल्डींग कोसळताना तिने पाहिलं होतं त्यामुळे ती खुप घाबरली होती.

"नशीब म्हणजे काय असतं हे नाही माहिती, पण आज सान्वीमुळे आपण सुखरूप आहोत. ती सारखी सारखी फोन करत होती. त्यामुळे मी तिथून बाहेर गेलो. तिचा फोन नसता आला तर मी अजूनही तिथेच असतो. किंवा कदाचित कायमचं तिथेच राहिलो असतो." कबीर म्हणाला. त्याच्या आवाजात भिती स्पष्ट जाणवत होती.

"आणि कदाचित मी सुद्धा, तू बाहेर पडला नसता तर मी तरी कशाला बाहेर आली असती. आज आपल्याला नवीन आयुष्य मिळालं आहे आणि ते ही सान्वीमुळे." इशिता म्हणाली. त्यानंतर ते दोघेही क्षणभर समोर बघत राहिले. नंतर दोघेही पुढे गेले.

"इशिता, आत नक्की कोणी नव्हतं ना?" कबीरने विचारलं.

"नाही, मी स्वतः खात्री करून घेतली होती. बांधकामाला तडे गेल्यामुळे आत कोणी जायचं नाही हा आदेशच दिला होता." इशिता.

"इशिता, तुझा मोबाईल दे ना. मी बाबांना कळवतो." कबीर म्हणाला आणि त्याने इशिताच्या मोबाईल वरून विक्रमला फोन केला आणि त्यांच्या कानावर ही बातमी घातली. त्यानंतर पोलिसांनाही कळवले. नंतर ते दोघेही तिथून बाहेर पडले.

"इशिता, आता ऑफिसला नको येऊस, मी तुला घरी सोडतो. ते सगळं बघितल्यामुळे तू खुप घाबरली आहे. त्यामुळे तुझं कामात लक्ष लागणार नाही आणि माझंही लागेल असे नाही वाटत. तुला तुझ्या घरी सोडून मी पण घरी जातो." कबीर म्हणाला.

"कबीर, मी तुझ्या सोबत तुझ्या घरी येऊ का? मला सान्वीला भेटून तिचे आभार मानायचे आहे. आज तिच्यामुळेच माझा जीव वाचला आहे. एवढी तरी माणुसकी दाखवायला हवी ना, म्हणतात ना आपला जीव वाचवणाऱ्याचे उपकार कधी विसरायचे नसतात, आज खरंच तिचे खुप उपकार झाले आहे माझ्यावर!" इशिता म्हणाली.

"तुझी इच्छा असेल तर येऊ शकते. मला काहीच प्राॅब्लेम नाहीये." कबीर म्हणाला. मग तो इशिताला घेऊन त्याच्या घरी येऊ लागला. थोड्या वेळातच ते घरी पोहचले. घरी येताच पाहिलं तर सान्वी काळजीतच बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते आणि हातात मोबाईल घेऊन ती बटनं दाबत होती. तिला काळजीत बघून कबीरने तिला आवाज दिला.

"सान्वी..." कबीरच्या आवाजाने सान्वी पळतच आली आणि त्याला विचारू लागली.

"कबीर, तुम्ही ठिक आहात ना? मी कधीपासून तुम्हाला फोन करतेय... पण तुमचा फोनच लागत नाहीये." सान्वी रडवेल्या सुरात म्हणाली तसं कबीरने काहीच न बोलता तिला घट्ट मिठी मारली. तिला मिठी मारत असताना आपल्या सोबत इशिता आहे. याचंही त्याला भान नव्हते. पण त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे सान्वी सुन्न झाली होती. तिला काहीच सुचेना झाले होते. त्याची मिठी घट्ट होती पण तिचे हात हवेतच होते. पण मनात असंख्य विचार चालू होते.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

0

🎭 Series Post

View all