Login

अशी जुळली गाठ. भाग - ३४

कबीर आणि सान्वीच्या अबोल प्रेमाची कहाणी
अशी जुळली गाठ. भाग - ३४

डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.

"कबीर फक्त सान्वीला घट्ट मिठी मारून उभा होता. तो काहीच बोलत नव्हता. त्याची अवस्था बघून सान्वी पण घाबरली होती. इशिता तर काहीच न बोलता फक्त त्या दोघांकडे बघत होती. 

काही क्षणाने सान्वीने कबीरचे दोन्ही हात पकडले तेव्हा कबीरने तिची मिठी सोडली आणि थोडा मागे झाला. पण बोलायला शब्दच सुचत नव्हते. तो फक्त तिच्याकडेच एकटक बघत होता. सान्वीही त्याला असं बघून घाबरली होती पण तिने स्वतःला सावरलं आणि त्याच्याशी बोलू लागली.

"कबीर, काय झालयं? तुम्हाला काय होतंय? तुम्ही एवढे का घाबरले आहात? प्लीज... काहीतरी बोला, मला आता खुप भिती वाटतेय." सान्वीचा सुर अगदी रडवेला होता. डोळ्यातले अश्रू तर कधीच वाहू लागले होते.

"सान्वी... आज तुझ्या एका फोन मुळे खुप मोठा अनर्थ टळला आहे." कबीर कसं बसं सावरत बोलला. तसं ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागली.

"म्हणजे?" सान्वी म्हणाली. कबीरला तिला सांगायला कशी आणि कुठून सुरुवात करावी हेच सुचत नव्हते. तो काहीच बोलत नाही हे बघून सान्वी इशिताकडे बघू लागली.

"हे काहीच बोलत नाहीये, किमान तुम्ही तरी बोला आणि काय झालयं ते सांगा." सान्वी म्हणाली. तसं इशिता दोन पावलं पुढे आली.

"आम्ही साईट वर गेलो होतो. तिथे बिल्डिंग जवळ जवळ पुर्णच झाली होती पण बांधकामाचा दर्जा खालावला होता. त्या बिल्डींगला तडे गेले होते. ते का आणि कसे हेच आम्ही बघत होतो आणि तिथलं निरिक्षण करत होतो. पण त्याचवेळी तुमचा फोन आला. तिथे आवाज येत नव्हता म्हणून कबीर सर तिथून दुसरीकडे गेले आणि नेमकं त्याचवेळी बिल्डिंग कोसळली. त्यावेळी तुमचा फोन आला नसता तर त्या ढिगाऱ्याखाली मी आणि कबीर असतो." इशिताने सान्वीला सगळं सविस्तर सांगितले. ते ऐकून सान्वीने दोन्ही हात तोंडावर ठेवले आणि घाबरून कबीरकडे बघू लागली.

"बापरे..." एवढाच शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला आणि ती खाली बसली. ते सगळं ऐकून तिलाही धक्का बसला होता. डोळ्यातले अश्रू तर आधीपासूनच वाहत होते.

"तरी मला सारखं सारखं अस्वस्थ वाटत होतं. सारखं काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटत होतं. म्हणून तर मी काळजीने तुम्हाला फोन करत होती." सान्वी म्हणाली.

"तुझ्या फोन मुळे तर आज आमचा जीव वाचला." कबीर भावूक होत म्हणाला.

"हो सान्वी मॅडम, आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. आज तुमच्यामुळेच आम्ही सुखरुप आहोत. मी तर तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. आता मी इथे खास तुमचे आभार मानायलाच आली आहे." इशिता म्हणाली.

"माझे आभार नका मानू, देवानेच कदाचित मला ही बुद्धी दिली असेल म्हणून तर कबीर फोन कट करत असतानाही मी सारखी फोन करत होती. आज आपल्यावरचं संकट देवानेच घालवलं आहे. मी आलेच देवासमोर साखर ठेवून येते." सान्वी म्हणाली आणि देवाजवळ जाऊन देवाचा दिवा लावला आणि देवाजवळ साखर ठेवली. नंतर तोच साखरेचा प्रसाद कबीर आणि इशिताला दिला.

"सान्वी, आई कुठे गेली आहे?" सविता कुठेच दिसली नाही म्हणून कबीरने विचारलं.

"आई एका कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या आहेत. त्या घरी नव्हत्या म्हणून तर मला इथून हलता येईना. नाही तर तुमची इथे बसून काळजी केल्या पेक्षा मी सरळ तुमच्या ऑफिसमध्ये आली असती." सान्वीचं ते धाडशी बोलणं ऐकून इशिता तिच्याकडेच एकटक बघत होती. तिच्याकडे बघून कबीर साठी सान्वीच योग्य आहे, कदाचित त्याच्यावरचं संकट दूर करण्यासाठीच देवाने तिची गाठ कबीरशी बांधली असेल. असा विचार इशिताच्या मनात आला. आणि त्याचवेळी आपलं आता कबीरच्या आयुष्यात काहीच स्थान नाही हे तिचं तिनेच मान्य केले. नंतर तिला विक्रमला फोन करायची आठवण झाली तेव्हा तिने कबीरला आवाज दिला.

"कबीर..." एवढं बोलून तिने सान्वीकडे पाहिलं आणि तिची चुक तिच्या लक्षात आली तसं परत ती कबीर सर अशी हाक मारली. मग कबीरही तिच्याकडे बघू लागला.

"सरांना फोन करायचा आहे ना, मी करू की तुम्ही करताय?" इशिताने विचारलं.

"मी करतो..." कबीर म्हणाला आणि त्याने घरातल्या लँडलाईन वरून विक्रमला फोन केला. त्यांच्याशी बोलून झाल्यावर इशिताने लगेच त्याला विचारलं.

"काय म्हणाले सर?" इशिता.

"बाबा आता घरीच येताय, घरी आल्यावर सगळं सविस्तर सांगतो म्हणाले." कबीर म्हणाला.

"मग ते येईपर्यंत मी इथेच थांबली तर चालेल का?" इशिता म्हणाली.

"हो चालेल ना..." कबीर म्हणाला आणि ते तिघेही विक्रमची वाट बघू लागले. थोड्या वेळातच विक्रमही घरी आले. त्यांना बघताच कबीर लगेच उभा राहिला.

"बाबा, काय झालं? पोलिसांनी काही चौकशी केली का?" कबीरने विचारलं.

"हो ते येऊन तिथला परिसर पाहून गेले आहे. त्यांनी वाॅचमन आणि काही कामगारांकडे सुद्धा चौकशी केली आहे. अजून पुढेही चौकशी करतील. कोणीतरी जाणूनबुजून कच्चा माल तिथे पोहचवला आहे... असो... बिझनेस म्हणल्यावर अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात, तुम्ही नका त्यात लक्ष घालू. मी माझ्या पद्धतीने ते हॅण्डल करेल." विक्रमने कबीर आणि इशितालाही धीर दिला. विक्रमच्या बोलण्याने त्यांनाही धीर आला.

"सर, मी आता घरी गेली तर चालेल का?" इशिता म्हणाली.

"हो जा आणि जे झालं ते विसरून जा!" विक्रम म्हणाले. तसं इशिता जाऊ लागली तोच सान्वीने तिला थांबवलं.

"इशिता, मला अजूनही खरंच खूप भिती वाटतेय, तुम्ही प्लीज एकट्या जाऊ नका, हवं तर गाडी घेऊन जा आणि ड्रायव्हरला सोबत घेऊन जा." सान्वीचं ते काळजीचं बोलणं ऐकून इशिताला खुपच भरून आले. तिने चेहऱ्यावर हलकसं हसू आणत मान डोलावली. त्याचवेळी कबीरने तिच्या हातात गाडीची चावी दिली मग इशिता पण तिथून गेली.

संध्याकाळी सविता घरी आल्यावर तिलाही कबीरने सगळं सांगितलं ते ऐकून ती सुद्धा घाबरली पण कबीर सुखरूप बाहेर पडला म्हणून तिनेही देवाचे आभार मानले.

सान्वी जेव्हा रूममध्ये गेली तेव्हा कबीर कोणाशी तरी फोनवर कामाचं बोलत होता. मग ती आली आणि सोफ्यावर बसली. कबीरचं बोलणं चालू होतं आणि ही फक्त एकटक त्याच्याकडे पाहत होती. त्याचवेळी तिला त्याने मारलेली मिठी आठवली तसं तिच्या अंगावर शहारे आले.

"कबीरने आज घरी येताच मला मिठी मारली पण त्यांच्या मिठीत नेमकं काय होतं? माझ्याबद्दल प्रेम होतं की त्यांची भिती होती?" सान्वीने मनातच स्वतःला प्रश्न विचारला पण त्याचं उत्तर काही तिला सापडत नव्हते.

****************

कबीरची सकाळी ऑफिसला जायची तयारी चालू होती. त्याचवेळी सान्वी त्याच्याजवळ आली आणि बोलू लागली.

"तुम्हाला कामातून जसं वेळ मिळेल तसं मला फोन करा, जास्त बोलला नाही तरी चालेल पण फोन करा. म्हणजे मी निश्चिंत राहील." सान्वी म्हणाली.

"इथून पुढे मी रोज ऑफिसला गेलो की तुला फोन करून कळवेल आणि तुझा फोन आला तर चुकून सुद्धा कधी इग्नोर करणार नाही." कबीर म्हणाला.

"कालच्या प्रकारामुळे तुम्ही खरंच मनात धसका घेतला आहे की काय!" सान्वीने विचारलं.

"खरं तर मी एवढा घाबरट नाहीये, पण डोळ्यासमोर असं घडताना पाहिल्यावर खरंच मी हादरलो होतो. तुला माहितीये का त्याही परिस्थितीत मला आपण गावी गेल्यावर मंदिरात गुरूजी बोलले होते ते आठवलं आणि पहिल्यांदा माझा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला." कबीर म्हणाला.

"ते बोललेले शब्द कधीच खोटे ठरत नाही. पण आता इथून पुढे सगळंच छान होणार आहे. याची मला खात्री आहे." सान्वी म्हणाली.

"तू म्हणतेय म्हणजे नक्की सगळं छान होईल." कबीर म्हणाला आणि तिला सांगून तो ऑफिसला गेला. तो गेल्यावर सान्वी खिडकीत उभी राहिली आणि खाली त्याच्या गाडीकडे बघू लागली. कबीर तिथे जाऊन गाडीत बसला आणि त्याची गाडी पुढे गेली तरीही ती त्याच दिशेने बघत होती. मनात परत विचारांची मालिका सुरू झाली.

"मी कबीरला म्हणाली तसं खरंच इथून पुढे सगळं काही छान होणार आहे का? जर सगळं छान होणार आहे तर माझ्या मनात ही शंका का आली?" सान्वी स्वतःशीच बोलली आणि त्या विचाराने तिचं मन अजूनच अस्वस्थ झाले.

क्रमशः

लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all