अशी जुळली गाठ. भाग - ३५
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.
"कबीर ऑफिसला आल्यावर त्याने आठवणीने सान्वीला फोन केला आणि तिच्याशी बोलून त्याच्या कामाला सुरुवात केली. इशिता पण तिथेच होती पण आज तिचं कामात काही लक्ष लागत नव्हतं. ते कबीरच्या लक्षात आलं होतं. तो बराच वेळ तिचं निरिक्षण करत होता. सुरवातीला त्याने लक्ष दिले नाही पण आता त्याला राहवलेच नाही म्हणून त्याने विचारलं.
"इशिता, काही प्राॅब्लेम आहे का? मी आल्यापासून बघतोय, तुझं कामात अजिबात लक्ष नाहिये." कबीरने विचारलं. तसं इशिता थोडी गोंधळली आणि तिच्या समोर असलेल्या फाईलमध्ये बघू लागली.
"कुठे काय काहीच नाही, हे काय मी कामच करतेय!" इशिता म्हणाली आणि लगेच फाईलमधले पेपर मागेपुढे करू लागली. तोच कबीरने तिच्या हातातली फाईल घेतली आणि बाजूला ठेवली.
"इशिता, तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाही, हे तुलाही माहीत आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या चेहऱ्यावरची एक रेष जरी हलली तरी मला लगेच कळतं." कबीर म्हणाला. तसं ती त्याच्याकडे बघू लागली.
"कबीर, काल सान्वीला जे वाटत होतं तसं मला का नाही वाटलं? म्हणजे तिचं तुझ्याशी लग्न झालंय, पण मी तर तिच्या आधीपासून तुझ्या आयुष्यात आहे. मग माझं मन का अस्वस्थ झालं नाही, मी का आधीच तुला तिथे जाण्यापासून अडवले नाही?" इशिताने विचारलं.
"तू सान्वी आणि तुझ्यात कम्पॅरिझन करतेय का? इशिता अगं प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो आणि प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. जे तिला वाटेल, तेच तुला वाटेल असं नाहीये. तू उगाच काही पण विचार करतेय!" कबीर म्हणाला.
"नाही कबीर, उगाच नाही विचार करत. कदाचित सान्वीच तुझ्यासाठी योग्य होती म्हणून देवाने माझ्याऐवजी तिला तुझ्या आयुष्यात आणलं आहे. मी आता हे मान्य करतेय आणि तुला सुद्धा हे पटलं असेल हो ना..." इशिता म्हणाली.
"इशिता, खरं सांगू का सान्वी मला आवडू लागली आहे पण मी अजूनही तिला बायकोचं स्थान दिलं नाहीये, मागे श्रावणी सुद्धा मला बोलली होती. तेव्हा मी सुद्धा तिला एकदम उत्साहाच्या भरात बोलून गेलो होतो की माझं सान्वीवर प्रेम आहे पण नंतर परत मी स्वतःच कन्फ्युज होऊ लागलो. माझ्या मनात काय चाललंय तेच कळत नाही मला. मला सान्वी हवी आहे पण मनातलं सांगणं जमत नाहीये." कबीर म्हणाला.
"तू कन्फ्युज नाहीये कबीर, तू स्वतः तुला कन्फ्युज करतोय. तुझं सान्वीवर प्रेम आहे हे तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय. पण जोपर्यंत तू तुझ्या मनातलं तिला सांगून मोकळा होत नाहीये, तोपर्यंत तुला असंच वाटत राहील. तेव्हा आता फार उशीर करू नको. तिला प्रपोज करून टाक आणि छान संसाराला सुरुवात करा." इशिता बोलताच तो तिच्याकडे आश्चर्याने बघू लागला.
"इशिता, हे तू बोलतेय...? बोलताना तुला काहीच त्रास कसा होत नाही?" कबीरने विचारलं. तसं ती हलकंसं हसली.
"प्रेम म्हणजे काय असतं कबीर, आपल्या प्रिय व्यक्तीच्या सुखात सुख माननं आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीत त्याला साथ देणं. असंही तुझं प्रेम मला मिळणार नाही हे मला माहीत आहे मग उगाच तुला जबरदस्ती करून तुझं आणि माझं दोघांचंही आयुष्य का उद्ध्वस्त करायचं आणि कोणीतरी म्हटलं आहे खरं प्रेम हे प्रेम मिळवण्यात नाही तर त्यागात असतं." इशिता एवढं छान बोलत होती ते ऐकून कबीरही भारावून गेला होता. तो बराच वेळ तिच्या बोलण्याचा विचार करत होता. आता त्यालाही त्याचं आणि सान्वीचं आयुष्य पुढे न्यावसं वाटत होते.
"मी जर सान्वी सोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि आमचा संसार सुरळीत चालू झाला तर इशिता सुद्धा तिचं नवीन आयुष्य सुरू करेल. त्यासाठी मला एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे." कबीर मनातल्या मनात स्वतःशीच बोलला आणि तिथून उठून बाहेर जाऊ लागला तोच इशिताने त्याला अडवले.
"कबीर, असा अचानक काहीच न सांगता कुठे चाललाय?" इशिताने विचारलं.
"ते... मला अचानक एक काम आठवलं. मी आलोच पाच मिनिटात." कबीर म्हणाला आणि बाहेर गेला. तो नेमका कुठे आणि कशासाठी गेला असेल याचाच विचार तिच्या मनात चालू होता. थोड्या वेळातच कबीर परत आला आणि त्याच्या चेअरवर येऊन बसला.
"अरे कुठे गेला होतास. सांग तरी...." इशिताने विचारलं.
"उद्या सांगतो." कबीर एवढंच बोलला आणि हसतच त्याचं काम करू लागला. इशितानेही त्याच्याकडे बघत हलकेच मान हलवली आणि ती ही तिचं काम करू लागली. थोड्या वेळातच तिथे विक्रम आले. आणि कबीरला आवाज दिला.
"कबीर, आपल्या साईटवर ते मटेरियल आलं होतं त्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे." विक्रम म्हणाले.
"हो का... पण नेमकी काय माहीती मिळाली आहे त्यांना?" कबीरने विचारलं.
"साईटवर पोलिसांनी चौकशी केली. सगळे कागदपत्रं, बिल्स, टेस्ट रिपोर्ट्स सगळं तपासलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की सप्लायरकडून आलेल्या लोखंडाचा सॅम्पल आणि साईटवर सापडलेलं लोखंड दोन्ही वेगळे आहेत." विक्रमने सांगितले तसं कबीर दचकला. इशितालाही ते ऐकून धक्काच बसला.
"म्हणजे?" कबीर.
"म्हणजे सप्लायरचा माल बदलला गेला आहे, असं इन्स्पेक्टर शिंदेंनी सांगितलं." विक्रम म्हणाले.
"पण हे कसं शक्य आहे? मी स्वतः तिथे जाऊन आली होती. मी स्वतः सगळी खात्री करून घेतली होती. तेव्हा तर सगळं काही व्यवस्थित होतं!" इशिता म्हणाली.
"तुझं बरोबर आहे, पण आता जे घडलं आहे ते तर खोटं नाहीये ना!" विक्रम म्हणाले.
"म्हणजे याचा अर्थ आपल्यातलंच कोणीतरी आहे, ज्याने हे केलंय." कबीर.
"पण आपलीच माणसं असं का करतील? इथून मागे तर असं कधीच नव्हतं झालं!" इशिता म्हणाली.
"मलाही तोच प्रश्न पडला आहे. आता पोलिस तपास करताय, बघू जो कोणी असेल तो सापडेलच. शेवटी गुन्हेगार काही लपून राहत नाही." विक्रम म्हणाले आणि निघून गेले. ते गेल्यावर कबीर आणि इशिता पण हे सगळं कोणी केलं असेल याचा विचार करत होते.
***************
"वहिनी sss काय करतेय?" श्रावणी सान्वीकडे येताच तिला विचारलं.
"काही नाही, जरा पसारा आवरतेय. पण आज तू एवढ्या लवकर कशी काय आलीस?" सान्वीने विचारलं.
"अगं आज ना माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी बर्थडेला जाणार आहोत. आणि तुलाही माझ्यासोबत यायचं आहे." श्रावणी म्हणाली.
"मी? कशाला? नाही... नाही... तुझ्या मैत्रीणीचा बर्थडे आहे ना मग मी कशाला उगाच येऊ!" सान्वी म्हणाली.
"अगं तिने तुला बोलावलं आहे, तुला यावंच लागेल." श्रावणी.
"प्लीज नको गं... मला खरंच तिथे तुमच्या सगळ्या मुलींमध्ये खुप ऑकवर्ड होईल." सान्वी.
"आम्ही मुली आणि तू काय म्हातारी झालीस का? लग्न झालं म्हणजे लगेच जास्त वय झालं असं काही नाहीये. ते काही नाही तुला यावंच लागेल, नाही तर मी सुद्धा नाही जाणार." श्रावणीने हट्टच केला.
"बरं पण मला आधी कबीरला विचारावं लागेल. ते जर हो म्हणाले तरच मी येईन." सान्वी.
"मी दादाला विचारलं आहे, त्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता परत विचारायची गरज नाही." श्रावणी.
"तू खरंच विचारलं आहे?" सान्वी.
"हो खरंच विचारलं आहे. आता कुठलंही कारण सांगायची गरज नाही. तू यायचं आहे म्हणजे यायचं आहे." श्रावणी म्हणाली. तसं सान्वीने यायला होकार दिला.
संध्याकाळ झाली तसं श्रावणी तयार होऊन सान्वीकडे आली. तर सान्वी साडी नेसून तयार झाली होती. ते बघून श्रावणीने डोक्यालाच हात लावला.
"वहिनी, तू साडी का नेसली आहे? अगं आपण पुजेला नाही चाललो. हाॅटेलमध्ये जायचं आहे आपल्याला." श्रावणी म्हणाली.
"पण तू मला तसं कुठे सांगितलं? मला वाटलं की घरीच पार्टी आहे." सान्वी.
"बरं आता सांगतेय ना मग आता तरी छान ड्रेस घाल, तू एक काम कर... तो दादाने आणलेला पिंक कलरचा लॉन्ग वन पीस आहे ना तो घाल!" श्रावणी.
"आता मी एवढी छान तयार झाली आहे ना, मग राहू दे की साडी! छान तर दिसतेय ना मी!" सान्वी म्हणाली.
"तू साडीत छानच दिसतेय, मला एरवी काहीच प्राॅब्लेम नसता पण आता कसं सांगू तुला... दादाने जर तुला तिकडे साडीत पाहिलं तर तो मलाच ओरडेल." श्रावणी म्हणाली तसं सान्वी तिच्याकडे गोंधळून बघू लागली.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा