अशी जुळली गाठ. भाग - ३६
डिसेंबर - जानेवारी २०२५-२६ दिर्घकथा लेखन स्पर्धा.
"म्हणजे कबीर पण येणार आहे का तुझ्या मैत्रीणीच्या बर्थडेला?" सान्वीने गोंधळलेल्या नजरेने बघत विचारलं. तसं श्रावणीला आपण काय बोलून गेलो ते कळलं आणि मनातल्या मनात स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला.
"नाही गं... दादा कसा येईल तिकडे. तो येणार नाही पण आपण घरी आल्यावर तर तो तुला बघणारच ना... म्हणून म्हणाले, आता प्लीज अजून प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालवू नको. जा पटकन चेंज करून ये." श्रावणी म्हणाली तसं सान्वी लगेच चेंज करायला गेली आणि थोड्याच वेळात आली. मग श्रावणीने तिचा थोडाफार मेकअप केला आणि त्या दोघीही बाहेर गेल्या.
थोड्या वेळातच त्या दोघीही एका हाॅटेलसमोर पोहचल्या. गाडीतून खाली उतरताच सान्वी समोर बघू लागली.
"श्रावणी, या एवढ्या मोठ्या हाॅटेलमध्ये तुझ्या मैत्रीणीचा बर्थडे आहे?" सान्वीने विचारलं. तसं श्रावणी हलकसं हसली.
"हो... आता माझ्या सगळ्याच मैत्रीणी श्रीमंत आहे तर पार्टी पण अशाच ठिकाणी होणार ना...." श्रावणी म्हणाली आणि तिला आत घेऊन गेली. दोघीही लिफ्टने टाॅप फ्लोअर वर गेल्या. तिथे गेल्यावर सान्वीला सगळीकडे शांतता दिसली, ती शांतता बघून सान्वी खुपच गोंधळली.
"श्रावणी, तू तर म्हणाली होतीस की बर्थडे पार्टी आहे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये." सान्वीने विचारलं.
"अगं… ते सगळे आतच असतील, तू आधी आत तर चल...." श्रावणी म्हणाली आणि घाईघाईत पुढे जाऊ लागली.
"आता अजून कुठे जायचं आहे? तू मला नेमकं कुठे घेऊन चालली आहे, मला तर खरंच काहीच कळत नाहीये." सान्वी म्हणाली. ती अजूनही गोंधळलेली होती. एवढ्या मोठ्या हाॅटेलच्या टाॅप फ्लोअरवर असूनही एकही आवाज येत नव्हता, हे तिला जरा विचित्र वाटत होतं.
"तू चल तर… तुला आत्ता कळेलच आपण कुठे आलोय ते." श्रावणी म्हणाली आणि तिचा हात धरून पुढे घेऊन गेली.
पुढे गेल्यावर एका मोठ्या काचेच्या दरवाज्यापाशी येऊन श्रावणी थांबली. तिच्या चेहऱ्यावर एक दडलेलं हसू होतं, पण सान्वीचं मन मात्र धडधडू लागलं होतं. तिला अजूनही काहीच कळत नव्हते.
"श्रावणी, खरं सांग… इथे नेमकं कशासाठी आणलंय मला?" सान्वीने थोडं घाबरतच विचारलं.
"बस… अजून फक्त दोन मिनिटं, मग तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील." एवढं बोलून श्रावणीने हळूच दरवाजा उघडला. आत अंधार होता. सान्वी दोन पावलं आत गेली आणि तो अंधार बघून नकळत तिचा श्वास अडखळला. तेवढ्यात अचानक तिथल्या लाइट्स लागल्या.
"सरप्राईज!!!" तिच्या कानावर आवाज पडला. तेव्हा तिने समोर पाहिलं तर समोर फुलांनी सजावलेला टेबल होता. त्याचवेळी कानावर सौम्य संगीताचा आवाज येऊ लागला. आणि समोर उभा असलेला कबीर हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन तिला दिसला. तो तिच्याकडे बघत हसत होता. त्याला समोर बघून सान्वी क्षणभर स्तब्धच राहिली.
"कबीर…?" तिच्या ओठांवर त्याचं नाव आलं. त्याचवेळी कबीर पुढे आला.
"माझ्या बायकोसाठी थोडं स्पेशल करायचं होतं… म्हणून हे छोटसं सरप्राईज." कबीर हसतच बोलला. ते सगळं बघून सान्वीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिला काही बोलताच येईना. मग मागून श्रावणीच बोलू लागली.
"दादा, माझं काम झालं आहे आता. तुझी बायको तू सांगितलेल्या ठिकाणी घेऊन आली आहे. त्यामुळे आता मी चालली, चलो बाय... बाय... तुम्ही तुमचं चालू द्या मस्त... आणि हो... घरी यायची अजिबात घाई करू नका." श्रावणी म्हणाली तसं सान्वी तिच्याकडे आश्चर्याने बघू लागली.
"श्रावणी, म्हणजे तू...." सान्वी अजून काही बोलणार तोच श्रावणी निघूनही गेली. मग सान्वी कबीरकडे बघू लागली.
"श्रावणीने खोटं बोलून तुला इथलं आणलं आहे. म्हणजे तसं मीच तिला फोन करून सांगितले होते." कबीर म्हणाला. सान्वीच्या चेहऱ्यावर हसू आलं ती हसतच कबीरकडे बघत राहिली. त्या क्षणी तिच्या सगळ्या शंका, सगळा गोंधळ दूर झाला.
"म्हणजे हे सगळं सजावट, संगीत वगैरे हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं आहे?" सान्वीने विचारलं.
"हो... हे सगळं तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी आहेस." कबीर तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला. आता तो तिचं रूप नजरेत साठवून घेत होता. तिने पिंक कलरचा लॉन्ग वन पीस घातला होता आणि अर्धंवट केस खाली मोकळे सोडले होते. गळ्यात नाजूकसं मंगळसूत्र घातलं होतं आणि ओठांवर सुद्धा पिंक कलरची लिपस्टिक लावलेली होती. त्याची तिच्यावरून नजरच हटत नव्हती. तो एकटक फक्त तिच्याकडे बघत होता.
"सान्वी, खुप सुंदर दिसतेय तू." कबीर म्हणाला तसं ती लाजली. पण तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्याचं असं एकटक बघण्याची तिला अजून एवढी सवय नव्हती. आता जास्त वेळ घालवायला नको म्हणून कबीरने लगेच बोलायला सुरुवात केली.
"आता या वेळी मी तुला इथे कशासाठी बोलावलं आहे हा प्रश्न तुला पडला असेल ना!" कबीरने विचारताच सान्वीने अलगद होकारार्थी मान हलवली. पण तिला बोलायला काही सुचत नव्हते.
"सान्वी, आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे तुलाही माहीत आहे. लग्न झाल्यापासून मी तुला कधीच बायकोचं स्थान दिलं नाही, पण मी आपलं नातं नाकारलं सुद्धा नव्हते. पण मला निर्णय घेण्यासाठी काही वेळ हवा होता. आता आपल्या लग्नाला चार महिने झाले. या चार महिन्यांत मी खुप विचार केला. तुझ्या बाजूने सगळं काही ओके होतं, पण माझं तसं नव्हतं. असो... जे झालं ते झालं पण आता मला जाणीव झाली आहे की माझ्या आयुष्यात तू मला कायमची हवी आहे. तुझ्याशिवाय हा कबीर भोसले अपुर्ण आहे, कधी वाटायचं की मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे तर कधी वाटायचं नाही अजून माझ्या मनाची तयारी झाली नाहीये, पण आज या क्षणी मला तुला काही सांगायचं आहे." कबीर म्हणाला तसं सान्वी त्याच्याकडे बघू लागली. तिचं हृदय आधीपासूनच धडधडत होतं पण आता ते अजून वेगाने धडधडायला लागलं होतं. आता कबीर नेमकं काय सांगणार आहे. हाच प्रश्न तिच्या मनात चालू होता.
"काय सांगायचं आहे तुम्हाला?" सान्वीने घाबरत विचारलं.
"हेच की माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे.... I love you सान्वी." कबीर म्हणाला तसं सान्वीच्या डोळ्यात पाणी तरळले. तिचा अजूनही तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
"काय म्हणालात तुम्ही...?" तिने अडखळत विचारलं.
"तू जे ऐकलं तेच बोललो मी. I love you.... आणि हेच मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, अर्थात तुझं माझ्यावर प्रेम असेल तरच..." कबीर म्हणाला.
"तुम्हाला माहित नाही कबीर, आपलं लग्न झाल्यापासून मी फक्त याच क्षणाची वाट बघत होती. रोज रात्री माझ्या मनात हाच विचार असायचा. कबीर माझा स्विकार कधी करतील. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होती. तो दिवस आणि तो क्षण अखेर आलाच. तुम्ही मला खुप आवडतात कबीर, मला फक्त हाच जन्म नाही तर पुढचे सगळेच जन्म तुमच्यासोबत घालवायचे आहे." सान्वीला बोलताना एकदमच भरून आले होते. बोलताना श्वास अडखळत होता पण तरीही ती बोलत होती.
"मला काहीच प्राॅब्लेम नाहीये, पण बघं हं... माझा स्वभाव हा असा आहे, तो तुला झेलावा लागणार आहे. तुझी तयारी आहे का मला झेलायची!" कबीर हसून म्हणाला तसं तिच्याही चेहऱ्यावर हसू आलं.
"तुमचा स्वभाव तर मी लग्न झाल्यावरच ओळखला होता. तेव्हा मी तुम्हाला काय बोलली होती आठवतंय का?" सान्वी म्हणाली.
"हो आठवतंय ना.... तू म्हणाली होतीस की रागावणं हा तुमचा मुळ स्वभाव नाहीये. तू तोच स्वभाव लक्षात ठेवला आणि तुझे प्रयत्न चालू ठेवले." कबीर म्हणाला.
"हो आणि त्याच प्रयत्नांना अखेर आज यश आले." सान्वी म्हणाली.
"हो पण माझ्या प्रयत्नांना कुठे यश आलंय, मी एवढं ही रूम सजवली, हा टेबल सजवला. एवढंच नाही तर श्रावणीला तुला इथे घेऊन यायला सांगितलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही." कबीर तिच्याकडे खोडकर पणे बघत हसून बोलला. बिचारी सान्वी अजूनच गोंधळली. तो नेमकं असं का बोलतोय हेच तिला कळेना.
क्रमशः
लेखिका - सौ. रोहिणी किसन बांगर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा